Home Blog Page 160

सुरक्षा रक्षकानेच सोसायटीमध्ये केली पावणेनऊ लाखाची घरफोडी

पुणे- एमपी चा सोनी नामक तरुण पोट भरायला पुण्यात आला सोसायटीचा सुरक्षा रक्षक बनला आणि तिथेच त्याने घरफोडी करून पावणे नऊ लाखाचा ऐवज चोरून नेला . पुणे पोलिसांनी त्याला चातुर्याने पकडले असून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व ऐवज देखील हस्तगत केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि. १२/०८/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दिमध्ये औंदुबर सोसायटी, गणेशमळा, सिहगडरोड पुणे येथील फिर्यादी यांचे राहते घरी दि.०८/०८/२०२५ ते दि. १२/०८/२०२५ रोजीचे दरम्यान त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन स्वतःच्या आर्थिक फायदया करता घरफोडी करुन १० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदिचे दागिन्यांचा ऐवज चोरीस गेला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिलेवरुन पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे. गुन्हा नोंद करण्यात आला .
दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर पर्वती पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक किरण पवार, व पोलीस अंमदार, पर्वती पोलीस स्टेशन पुणे करीत असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे दोन टिम तयार करुन सोसायटीमध्ये व आजुबाजुचे परिसरात तपास केला असता सदर सोसायटीमधील वॉचमन राकेशकुमार मुलचंद सोनी वय २९ वर्षे रा. औदुंबर सोसायटी, गणेशमळा सिंहगडरोड पुणे, मुळ रा. ४९/१, राम अमिलीया, पो. पटणा कला, जि. अनुपपुर रा. मध्यप्रदेश त्यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरची घरफोडी केल्याचे त्याने कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयाचे तपास कामी दि. १२/०८/२०२५ रोजी अटक करुन त्याने घरफोडी करुन चोरी केलेल्या सोन्यापैकी ८,६५,०००/-रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-०३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासो खाडे, राकेश सुर्वे यांनी केली.

सिंगापूरच्या लेखिका नीला बर्वे…

सिंगापूर येथील लेखिका नीला बर्वे यांच्या
“कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन आज; शनिवारी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांची ही ओळख….

मुंबईचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणाऱ्या विलेपार्ले येथे नीलाजी यांचा जन्म झाला. घरात सर्वांना वाचनाची अत्यंत आवड. आजीसुद्धा खूप पुस्तके वाचायची, त्याबद्दल सांगायचीही! पार्ले टिळक शाळा आणि टिळक मंदिर या दोन संस्थांनी त्यांचं बालपण समृद्ध केलं. शाळेत अभ्यास आणि खेळ, सूर्यनमस्कार या सर्वांना सारखाच न्याय असे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक जडणघडण उत्तम झाली. तिथेच बी.एससी. पर्यंत शिक्षण झाले. पदवीनंतर आवड म्हणून भारतीय विद्याभवन येथे पत्रकारितेचा कोर्स केला. तेथे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीसाठी पत्र आले पण त्याचवेळी लग्न ठरल्याने, बॉण्ड लिहून देता आला नाही आणि आत्यंतिक आवड असलेली नोकरी मुकली ही खंत त्यांना कायम राहिली.

त्यानंतर नीलाजी पार्ले टिळक विद्यालय येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लग्न होऊन ठाण्याला गेल्या आणि तेथून रोज सकाळी येत होत्या त्यामुळे शाळेतर्फे बी.एड. करून कायमची शिक्षिका म्हणून तेथे रुजू होण्याची संधी नाकारावी लागली. कारण रोज ठाणे येथून, पहाटे साडेतीन वाजता उठून, सकाळी साडेसहाला पार्त्याला येणे कायम जमेल असे वाटले नाही. बँकेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा नियुक्तीपत्रे आली तेव्हा सर्वांच्या सल्ल्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाची नोकरी स्वीकारली. तीही तशी दूर म्हणजे फोर्ट विभागात होती.

नोकरी आणि घरचे काम सांभाळून लेखनाची आवड जपत नीलाजी या काही वृत्तपत्रांमध्येही लेखन करीत.
तसेच घरी काही वर्षे त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेतल्या.सोबतच पर्यावरण विषयक काम करणाऱ्या हरियाली या स्वयंसेवी संस्थेचे , ग्रंथालीचे , व्यायाम शाळेचे, शुभंकरोति संस्थेचे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत.

कर्तृत्ववान परंतु समाजापुढे न आलेल्या ठाण्यातील महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर नीलाजींनी एका वृत्तपत्रासाठी लेखमाला लिहिली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

बँकेची नोकरी म्हणजे सतत आकड्यांची जुळवाजुळव, पण नीलाजींनी आयुष्यभर आकड्यांची यशस्वीपणे जुळवाजुळव करीत असतानाच आपलं अक्षरप्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. बँकेमध्ये बदली होणाऱ्या व सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकासाठी कवितेमधून निरोप देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. आजही प्रत्येकाकडे आपापली कविता आहे.

मुले मोठी झाल्यावरच नीलाजींनी प्रमोशन घेतले. बँकेत अनेक महत्त्वाची कामे सांभाळली. त्यात गृहकर्जे आणि त्यानंतर बँकेच्या सुवर्ण व्यवसायाची जबाबदारी आणि विविध योजना.

त्यानंतर नीलजींची गोव्यात बदली झाल्यावर व्यवस्थापकाच्या पदाबरोबरच येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरीतीने निभावल्या. शिवाय वेळ काढून काही वृत्तपत्रातही लिखाण केले. पणजी आकाशवाणीवरून कविता, नाट्यछटा, लेख सादर झालेच पण बँकेविषयी माहिती आणि जागृतता यावरही काही भाषणे झाली.
गोवा दूरदर्शनवरूनही त्यांचे कार्यक्रम झाले. गोव्यातील
विविध काव्यसंमेलनांची त्यांना आमंत्रणे असत.

नीलाजींचा “रानफुले “हा काव्यसंग्रह पद्मश्री प्रसाद सावकार यांच्याहस्ते प्रकाशित
झाला आहे.

नीलाजींच्या सेवानिवृत्तीला काही वर्षे असताना एका दुर्घटनेत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्या गोव्यात ग्रामीण भागांत शाखाप्रमुख होत्या.पुढे नीलाजी सेवानिवृत्त झाल्यावर स्टेट बँकेने तसेच गोव्यातील काही सहकारी बँकांनी, तसेच काही वृत्तपत्रांनीही त्यांच्याकडे रुजू होण्याविषयी विचारले. पण मुलगा राहुल ,जो मद्रास आयआयटी मधून एम टेक
झाला आहे,त्यास हे कळताच त्याने त्यांना सिंगापूरला बोलावून घेतले आणि यापुढे तू नोकरी करायची नाही, खूप केलेस आत्तापर्यंत ,आता तुझे राहून गेलेले छंद पुरे करायचे असे सांगितले.

नीलाजींचे प्रांजळ मत आहे की, जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. नोकरी, वाढता संसार, नव्या जागीं सेटल होण्यास धडपड होते, पण १०-१५ वर्षांत तिथलेच होऊन जातो. सारे आयुष्य एका देशात गेल्यावर, अनेक वर्षांचे स्नेहबंध सोडून दुसरीकडे जुळवून घेणे कठीण जातेच . सारा वेळ मोकळा पण बाकी कोणी नाहीत मोकळे आपल्याबरोबर संवाद साधण्यास. काही मित्रपरिवाराच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांचे म्हणणे… थोडे दिवस ठीक आहे, जातो वेळ इकडेतिकडे फिरण्यात पण नंतर बोअर होते. त्यांची आपली संस्कृती, खाणे-पिणे, सारेच वेगळे. कसे जुळवून घेणार या वयात? आणि परत आले भारतात. पण त्यामुळे मुलांना काळजीच.नीलाजींनी मात्र ठरविले, मुलाला असल्या टेन्शनमध्ये अडकवायचे नाही. त्याची अपेक्षा किती माफक होती की, आईने निव्वळ आनंदात रहावे! त्याप्रमाणे त्यांनी सिंगापूर महाराष्ट्र मंडळातील उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. तसेच या देशाने आधार दिला म्हणून तेथील लोकांसाठी काम करणे हे कर्तव्यच आहे असे मानून विविध संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आरएसव्हीपी सिंगापूर (ज्येष्ठ स्वयंसेवकांची संस्था) या संस्थेत सहभागी होऊन त्यांच्यातर्फे नॅशनल हार्ट हॉस्पिटल, स्त्रिया आणि मुलांसाठी असलेले के. के. हॉस्पिटल, वृद्धाश्रम, इंडियन हेरिटेज अशा निरनिराळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊ लागल्या. तसेच खेळांची आवड असल्याने अॅक्टिव्ह एसजी या सिंगापूरच्या क्रीडा संस्थेमध्ये सभासद होऊन निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय रग्बीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करताना विदेशातील ८ टॉपमोस्ट टीम्सच्या खेळाडूंच्या स्पर्धा त्यांना बघण्यास मिळाल्या. शिवाय हा खेळ त्या पहिल्यांदाच लाईव्ह बघत असल्याने त्याचे नियम, स्किल इ. सर्व समजावून घेण्याची संधी त्यांना मिळाली. नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पिअनशिप, बून ले येथील अॅक्टिव्ह एसजी हॉकी व्हिलेजचा उद्घाटन समारंभ (१७ ऑगस्ट २०१९) येथे फोटोग्राफर म्हणून त्या स्वयंसेवक होत्या.

सिंगापूरला आल्याआल्याच आरएसव्हीपी सिंगापूर या संस्थेला २० वर्षे झाल्याबद्दल त्यांनी लोगो स्पर्धा जाहीर केली होती. एकमेव बक्षिस होते आणि ते २०० डॉलर्स आणि गाला डिनर विथ सिंगापूर प्रेसिडेंट असे होते. नीलाजींची चित्रकलेची आवड उफाळून आली.अथक परिश्रम करून नीलाजी या स्पर्धेत सहभागी झाल्या आणि विशेष म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांना मुलासह
तेथील राष्ट्रपतींना भेटायची संधी मिळाली. या लोगोमुळे संस्थेतही चांगली ओळख झाली.

नीलाजींना कॅरम लहानपणापासून अतिप्रिय. शिवाय त्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या पंच. त्यामुळे सिंगापूर सरकारच्या क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी हा खेळ सिंगापूरमध्ये लोकप्रिय करायचा आहे, इथल्या मुलांना शिकवायचा आहे म्हणून सांगितले. काही बैठकीनंतर त्यांनी नीलाजींना कॅरमचे २ संच मंजूर केले त्याचप्रमाणे क्लेमेंटी स्पोर्ट्स हॉलमध्ये जागाही दिली. येणाऱ्या मुलांना (वयोगट ८ ते १४ वर्षे ठेवला होता) कॅरम म्हणजे काय खेळ आहे, सोंगट्या, स्ट्रायकर म्हणजे काय इ. पासून शिकविण्यास सुरुवात केली. मुले खेळांत रस घेऊ लागली, काही बऱ्यापैकी खेळू लागले पण हाय रे दैवा! कोरोनाच्या आक्रमणामुळे त्यांचा हा उपक्रम बंद पडला. काही काळाने असोसिएशन ऑफ कॅरम, सिंगापूर या नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील एकाने संपर्क साधला. २०२२ मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कॅरम वर्ल्ड चॅम्पिअनशिप आयोजित केली गेली. एसीएसने सिंगापूरतर्फे सहभाग घेतला .तिथे नीलाजींना अम्पायर म्हणून बोलावले गेले. २८ देशांच्या टॉपर्ससाठी अंपायर म्हणून एक आव्हानच ! पण त्यांनी ते एन्जॉय केले आणि तेथेच इंटरनॅशनल रेफ्रीसाठी परीक्षा दिली. ४ प्रकारात होणाऱ्या या परीक्षेत त्या पहिल्या आल्या.
परत आल्यावर नीलाजी २०२३ मध्ये नॅशनल रैंकिंगच्या स्पर्धेसाठी चीफ रेफ्री होत्या. खेळण्याचे वैयक्तिक प्रयत्न सुरूच होते. पूर्वीचे नैपुण्य नाही पण मग २०२४ मध्ये नॅशनल रैंकिंगमध्ये सहभाग घेतला. त्यात मालदीव येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. ही संधी त्याचवेळी त्या भारतात गेल्यामुळे नाही स्वीकारता आली पण त्यांनतर अमेरिका येथे सहाव्या कॅरम विश्वचषक स्पर्धेसाठी पुन्हां निवड होऊन त्या टीमबरोबर गेल्या. खूप चांगले अनुभव मिळाले आणि नुकतीच मे महिन्यात झालेल्या एसीएस नॅशनल स्पर्धेत भाग घेऊन २०२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.

नीलाजी सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या द्वैमासिकात लिहितात .मंडळातील सर्व साहित्यप्रेमी जमून दर महिन्याला कविता सादर करतात. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरी कविता लिहिल्या गेल्या, असे त्या आवर्जून सांगतात. या मंडळाच्या सर्व उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेतातच पण गणपती उत्सवात एकपात्री अभिनयात भाग घेऊन अभिनयाची हौस आणि गणपतीला निरोप देतेसमयी दीड-दोन तास लेझीम खेळून तीही हौस भागवून घेतात.

नीलार्जीच्या आईवडिलांचे देशावर अफाट प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर बहुसंख्य लोकांना भारतदर्शन घडविले. अशी समाजसेवा त्या करू शकत नाहीत पण त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना प्रवास खूप आवडू लागला. त्यामुळे त्या वर्षातून एक-दोन सहली एकटीनेच करतात. विविध अनुभव घेत, विविध जीवनपद्धती अनुभवत लोकांना जाणून घेत भ्रमण करतात. अर्थात यासाठी अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असते.

नीलाजी कथा, कविता, नाटुकलं, अलक, ललितलेखन, प्रवासवर्णन नियमितपणे लिहीत असतात. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अद्वितीय व्यक्तींचे ऋण म्हणून, त्यांचे कार्य सर्वांना समजावे म्हणून त्या
न्यूज स्टोरी टुडे या प्रख्यात पोर्टलवर त्यांची साप्ताहिक लेखमाला सुरू आहे. त्या व्हिडीओद्वारे कथा, कविता सादरीकरणहीकरतात. ऑनलाइन उपक्रमांना परीक्षक म्हणूनही असतात. त्यांना बागकामाची आवड असून त्यांनी सुमारे ६० झाडे बाल्कनी व लिफ्टच्या बाजूच्या जागेत लावली आहेत. तसेच एका ग्रुपला त्या मार्गदर्शनही करतात.

सिंगापूरमध्ये भारतीय सण साजरे करताना त्या शेजाऱ्यांना त्या सणांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या इमारतीतील लोक आवर्जून बघतात. त्यांची सून सिंगापूर येथील असल्याने, त्यांच्या पद्धती, परंपरा, सण समजावून घेऊन त्यांच्यात सामावून गेल्या आहेत. यांच्याकडे दिवाळीसाठी ज्या माळा लागतात, त्या ख्रिसमस, न्यू इयर, चायनीज न्यू इयर साजरे करीत गुढीपाडव्यापर्यंत लखलखत असतात.सुनेचे माहेर खूप मनमिळावू आहे, त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे इथेही स्नेहबंध जुळले. दोन्ही परिवार अनेक ठिकाणी एकत्र जातात, विविध ठिकाणी एकत्र भ्रमण करीत असतात.

अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचे नीलाजींनी यशस्वी आयोजन केले आहे. आळंदी येथील फुलोरा साहित्य संमेलनात त्या प्रमुख अतिथी होत्या. भारतीय स्त्रीशक्ती, ठाणेतर्फे आयोजित स्वलिखित कथाकथन स्पर्धेत तर ‘आभाळाखालची शाळा’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवमध्ये नाट्य विभागात तसेच शॉपीझन आयोजित कथास्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
अशा या नीलाजीना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन: देवेंद्र भुजबळ
_9869484800

परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ,आरोपी सुजित दुबेला अटक

मुंबई- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे अंधेरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते.मनसेच्या संतप्त भूमिकेनंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी सुजित दुबे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.

ही घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सुजित दुबे हा दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करताना व्हिडिओत दिसत आहे. राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांत संताप उसळला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीतील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर आरोपीकडून चालवले जाणारे तीन अनधिकृत धंदेही तात्काळ बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

मराठी लोगो की औकात क्या? तुम भंगार हो…दुसरीकडे, नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय व्यक्ती आणि मराठी लोकांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी शिकत असताना एका परप्रांतीय तरुणाने स्थानिकाच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्याने ”मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो” अशा प्रकारे अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्याने हा वाद अधिक वाढला आणि कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. मात्र, शिवीगाळ आणि मारहाणीबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई, दि. २३ ऑगस्ट २०२५
राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक व प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, “राज्य विद्युत महामंडळाच्या महावितरण, महापारेषण व इतर विभागांमध्ये शेकडो जागा रिक्त आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही पदे भरली जात नाहीत. रोजगार सत्याग्रह यात्रेतून आम्ही सरकारला कठोर इशारा देत आहोत, भरती प्रक्रिया सुरू करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर तसेच विधानसभेतही याविरोधात आवाज उठवेल. तरुणांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९:०० वाजता क्रांती चौक येथून या यात्रेला प्रारंभ होऊन MSEB चे सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय, मिल कॉर्नर येथे पोहोचेल. तेथे निवेदन सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करणार आहे.

सरकारने

१) महावितरण, महामार्ग व महानगरपालिका विभागांतील ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षणावर आधारित सर्व रिक्त पदांची तातडीने भरती करावी.
२) विभागातील सर्व रिक्त पदे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन भरावीत.
३) महावितरण व महामार्ग विभागांतील कंत्राटी सेवेची मुदत ३ वर्षांवरून १ वर्षावर आणावी.
४) दरवर्षी होणारी पदविका परीक्षा नियमित भरती प्रक्रियेत समाविष्ट करावी.
५) कोणत्याही कारणास्तव नोकरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” नियुक्तीची संधी द्यावी.
६) सहाय्यक अभियंता पदासाठीची GATE परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करावी.
७) कनिष्ठ अभियंता पदासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवावी.

या मागण्यांसाठी हा सत्याग्रह आहे.
या रोजगार यात्रेत मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व अन्य संलग्न विभागाचे कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे : संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
निमित्त होते कोथरूडमधील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा येथे आज (दि. २३) आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे. या कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव हा राज्याच्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची आयोजित केलेली ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे.
ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर, अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाये, सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर मंचावर होते. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर, निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले. वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आणि सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर यांच्या सहकार्याने कार्यशळा आयोजित करण्यात आली होती.
शिल्पकार विजय राऊत, विजय दीक्षित यांनी सुरुवातीस विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी साकारावी याविषयी मार्गदर्शन केले.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा कार्यशाळेचा उद्देश आहे.
किरण देवकर, प्रसाद पाटील, मुरली लाहोटी, विवेक खटावकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राहुल सुतार यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांनी केले.

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य

मुंबई — समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला जातो. या उपक्रमाच्या शिष्टमंडळाने, प्रणेते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली.

मागील दहा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणाऱ्या या अभियानाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक करत शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग नोंदवला तसेच समाजालाही आवाहन केले की, “गणेशोत्सवात हारफुलांसह शैक्षणिक साहित्य अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा.”

या भेटीत शिष्टमंडळात अविनाश गरुड, राजेश उबाळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, पत्रकार काशिनाथ म्हादे, सुरेश ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.

“नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार

मुंबई, — राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड कपॅसिटी बिल्डिंग मीटिंग विद स्टेट वूमन कमिशन्स’ या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीजिंग डिक्लेरेशनच्या पार्श्वभूमीवर महिला-केंद्रित धोरणांची अंमलबजावणी, मिळालेली प्रगती आणि उर्वरित आव्हाने यांचा सखोल आढावा सादर केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच विविध राज्य महिला आयोगांच्या अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी १९९५ च्या बीजिंग घोषणापत्राचा संदर्भ देत सांगितले की, हे घोषणापत्र महिलांच्या हक्कांसाठी आणि लिंगसमभाव साधण्यासाठी जगभरातील १८९ देशांनी दिलेले ऐतिहासिक वचन होते, ज्यात भारताचाही समावेश होता. “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” या ठाम संदेशातून त्यांनी महिलांच्या समान भागीदारीची आवश्यकता अधोरेखित केली. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या तीन दशकांत अनेक महत्त्वपूर्ण प्रगती साध्य झाली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, निर्भया प्रकरणानंतर झालेल्या फौजदारी कायद्याच्या दुरुस्त्या आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना दिलेले आरक्षण यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर सशक्त होण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया, जननी सुरक्षा योजना अशा उपक्रमांमुळे महिलांच्या शिक्षण, आरोग्य व आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळाले आहे.

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी अजूनही भेडसावत असलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांचा कामगार शक्तीतील सहभाग केवळ २० टक्क्यांवर स्थिर आहे, सुरक्षा आणि हिंसेचे प्रकार अद्यापही सुरू आहेत, संसद व विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व मर्यादित आहे, तर ग्रामीण भागातील महिलांना तंत्रज्ञान व डिजिटल साधनांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. यासोबतच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व दिव्यांग महिलांना बहुपदरी भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी काही ठोस शिफारसी करताना डॉ. गोऱ्हे यांनी संसद व विधानसभांमध्ये महिलांच्या आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, महिला उद्योजकतेसाठी स्वतंत्र निधी आणि बाजारपेठेतील संधी निर्माण व्हाव्यात, ग्रामीण-शहरी डिजिटल दरी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, कार्यस्थळांवर समानता व सुरक्षितता यांची हमी मिळावी आणि दिव्यांग तसेच विधवा महिलांसाठी विशेष धोरणे आखावीत, अशी मांडणी केली.

महाराष्ट्रातील उपक्रमांचे उदाहरण देताना त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), ग्रामीण महिलांसाठी स्वयं-सहायता गटांची उभारणी, नवउदीत क्षेत्रांत कौशल्य विकास, पौगंडावस्थेतील मुलींचे आरोग्य उपक्रम, दुष्काळग्रस्त भागातील रोजगार हमी व ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्य कार्यशाळांचा उल्लेख केला. या सर्व उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, २०३० मध्ये बीजिंग जाहीरनाम्याच्या अनुषंगाने शाश्वत विकास उद्दिष्टांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे तोपर्यंत स्त्री-पुरुष यांचा समान सहभाग असेल अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “बीजिंग घोषणा-पत्र ही केवळ एक कागदपत्र नव्हते, ती एक प्रतिज्ञा होती. १९९५ पासून आपण मोठा पल्ला गाठला आहे, पण अजूनही बरेच कार्य बाकी आहे. जेव्हा आपण एका महिलेला सशक्त करतो, तेव्हा आपण एका कुटुंबाला, समाजाला आणि अखेरीस राष्ट्राला सशक्त करतो.”

पुणेकरांसमोर उलगडली देशाचा अभिमान ठरलेल्या “चिनाब ब्रिज”ची जन्मकथा

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या तसेच सह आयोजक अल्ट्रा टेक, बीएनसीए,आयसिआय, एईएसए, आयजीएस यांच्या वतीने आयोजन

पुणे : जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर नव्याने बांधण्यात आलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो चिनाब नदीपासून ३५९ मीटर वर आहे आणि त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तासाला २६६ किमी वेगाने आलेले वारे सहन करण्याची क्षमता असलेल्या या जागतिक आश्चर्य, देशाचा अभिमान ठरलेल्या या पुलाच्या अंतरंगांची आणि बांधकामाची अनोखी कथा आज पुणेकरांसमोर उलगडण्यात आली.निमित्त होते पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारताचा अभिमान “चिनाब ब्रिज” या विशेष चर्चासत्राचे.

बीएनसीए, कर्वे नगर, पुणे येथे विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि. विकास रामगुडे(जॉईंट एम.डी एमएसआयडीसी, महाराष्ट्र सरकार), डॉ. सुनील बसारकर (अभियंता)(आयकॉनिक चिनाब रेल्वे ब्रिज चे भूगर्भ तंत्रज्ञान), ब्रिज इंजि. शशांक राजभोज(चिनाब आर्च ब्रिजचे डिझाइन आणि बांधकाम),कार्यक्रम समितीचे अध्यक्ष, इंजि. नारायण कोचक, पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव कदम,सचिव अजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना इंजि. विकास रामगुडे म्हणाले, आज पीएसईए च्या वतीने एक वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, अनेकदा इंजिनियरला कमी लेखल्याची तक्रार असते मला वाटते या चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मधून स्ट्रक्चरल इंजिनियरचे काम किती महत्वाचे असते हे दिसून आले आहे.

डॉ. सुनील बसारकर म्हणाले, आजच्या चर्चासत्रातून ऐतिहासिक आणि जागतिक आश्चर्य ठरलेल्या चिनाब ब्रिजची जन्मकथा सांगताना मला वाटते ही एक इंजिनियरिंग विश्वातील महत्वपूर्ण घटना आहे. अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार या पुलाच्या बांधकाममध्ये झाला आहे. २००३ साली मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला २००४ मध्ये सुरुवात झाली २०२० ते २०२२ या कोविड काळात हा पूल करण्यासाठी अनेक संकटांचा सामान्य करावा लागला,अनेक आव्हानांचा प्रतिकार करत हा ऐतिहासिक पूल निर्माण करण्यात आला.

इंजि. शशांक राजभोज म्हणाले,चिनाब ब्रिज हा जगात सर्वात मोठा पूल आहे. या उभारणीत आलेल्या अडचणी, आव्हाने मोठी होती, या निर्माणाचा मी एक भाग होतो, हा पूल उभारणे मोठे आव्हान होते, जिथे वाहतूक व्यवस्था नाही, पूलाची ऊंची, पूल उभरण्यात आलेला भूभाग या सर्वच बाबी म्हणजे एक अत्यंत खडतर प्रवास होता, ३० -३० टन वाजनांचे सेगमेंट्स त्या ठिकाणी उभारणे किती कौशल्याचे होते याची माहिती सांगताना माझ्या या पुलाच्या उभारणीतील आठवणींना उजाळा मिळाला.

शेषराव कदम म्हणाले,पीएसईए तर्फे एक तंत्रज्ञान उलगडणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला.मुळात संस्थेची स्थापनाच आमच्या व्यवसायातील लोकांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे आणि सर्वाना एकत्र आणणे हा आहे. आज इंजिनियर, आर्किटेक्ट आणि विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या प्रतिसदाने आम्ही भारावून गेलो आहोत, भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घ्यावेत यासाठी प्रेरणा यातून मिळाली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,

अजय कदम म्हणाले, पीएसईए ही संस्था आम्ही नव्याने सुरू केली असली तरी यातील सर्व संस्थापक हे अनुभवी आहेत. ३० ते ३५ वर्षांचा अनुभव त्यांचा आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स च्या समोरील आव्हाने आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या प्रॉजेक्ट बद्दल आशा पद्धतीचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.आजच्या परिसंवाद कार्यक्रमाला पुणेकर,वरिष्ठ प्रॉजेक्ट मॅनेजर्स, जेसीबी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यां मधील अनुभवी तज्ञ इंजिनियर्स व काही कन्स्ट्रक्शन उपकरणे बनवणारे मेकॅनिकल इंजिनियर्स,विद्यार्थी, पुणे, सातारा, मुंबई येथील स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बांधकाम व्यावसायिक,बिल्डर्स यांनी सहभाग घेतला यांचा मिळालेला प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देणार आहे. तसेच अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश PSEA संस्थेच्या प्रशासकीय समितीस आशादायक व उत्साहवर्धक वाटला.

मुंबईकडे कूच नको, कागद-पेन घ्या अन् चर्चेला या:शांततेने मागण्या मांडल्या तर सरकार ऐकेल, चंद्रकांत पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून, यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र तो सनदशीर पद्धतीनेच असायला हवा. जर आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन होणार असेल, तर सरकार कारवाईस पात्र ठरेल, असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांनी कागद-पेन घ्या आणि सरकारसमोर चर्चेला यावे. आरक्षणाबाबत-च्या मागण्या शांततेत मांडल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन केले असून, आता या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हेच या समितीचे अध्यक्ष होते. या बदलावर बोलताना पाटील म्हणाले, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? मी बराच काळ अध्यक्ष होतो, पण मी अजूनही समितीत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहेत आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मागण्या किंवा मराठा समाजाच्या उन्नती साठीच्या मागण्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे नेता येतील, यावर सरकार लक्ष देईल. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करणे आवश्यक असेल ते सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हि तर भाजपासाठी सोईची ठरणारी प्रभाग रचना,त्वरित रद्द करा: राहुल डंबाळे

पुणे : महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

शुक्रवारी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले , राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असताना सुद्धा त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.

तसेच सध्या निर्माण केलेल्या रचनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित आरक्षण व उमेदवारांवर विपरीत परिणाम करणारी रचना केल्याचे जाणवत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणा व्यतिरिक्त निवडून येणारे प्रमाण घटणार असल्याने त्याबाबत देखील नाराजगी या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.

प्रभाग रचना काही असली तरी सध्या राज्य सरकारचा कारभार व मागील पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेले निर्णय यामुळे शहराची प्रचंड हानी झाली असून त्याचा फटका सत्ताधारी भाजपाला बसण्याची शक्यता गृहीत धरूनच बेकायदेशीर हस्तक्षेप करून सोयीची प्रभाग रचना केल्याची भावना समस्त भाजप विरोधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना ही सध्या केंद्रामध्ये व देशभरामध्ये सुरू असलेल्या मतचोरी प्रकरणाशी साधर्म्य साधत मतदार चोरीचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत असलेने या विरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी जाहीर केले.

संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.  

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन. एम. डी . प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे. पी. श्रॉफ, अभिनेत्री प्रार्थना बेहरे, वरिष्ठ पोलिस अधिकारी पी. आय वाघमारे, एनएमडी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, नुकतेच झालेल्या सिंदूर ऑपरेशन मधील कर्नल सोफिया असेल किंवा  येथे शेतकऱ्यांच्या मुलांना पाठबळ देणारा नवनाथ दरेकर सारखा तरुण असेल त्यांनी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे बळ लाभले. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, मी जेव्हा जेव्हा परराज्यात किंवा परदेशात जाते तेव्हा मराठी उद्योजक दिसत नाही. मराठी माणूस उद्योक, व्यावसाव करू शकत नाही, असं बोललं जात पण आज मला मराठी असल्याचा अभिमान वाटतोय. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज येथे मिळाली आहे.

एन. एम. डी. प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेक च्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत आम्ही २५०+ समाधानी क्लायंट्सचा विश्वास संपादन केला असून ५०००+ विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. यापैकी २०००+ विद्यार्थ्यांना MNC मध्ये नोकरीची संधी मिळाली आहे, ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. भविष्यात आम्ही एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील क्लायंट्स मिळवून भारताला सर्वोच्च शक्ती बनविण्याच्या दिशेने योगदान देणार आहोत,” असे मनोगत नावनाथ दरेकर यांनी व्यक्त केले.

प्रशांत दरेकर म्हणाले, नवनाथ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यांत शालेय शिक्षण घेतले. पुढे पुण्यात येऊन कष्टाने स्वतचे वेगळे स्थान निर्माण केले, नाव कमावले.  आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ट्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपरं राबविला, यातून हजारो कुटुंबाचा टॉ आधार बनला आहे, त्यांची वाटचाल पुढेही अशीच सुरू राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. 

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्याना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले.

अनिल अंबानींच्या घरांवर CBIचे छापे:3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा खटला, येस बँकेतून घेतलेल्या पैशांच्या गैरवापराचा आरोप

मुंबई-आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी मुंबईत करण्यात आली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, येस बँकेच्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी ईडीने अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.

हे प्रकरण २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे.सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की ही कर्जे कथितपणे शेल कंपन्या आणि समूहाच्या इतर संस्थांना वळवण्यात आली होती. तपासात असेही आढळून आले की येस बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली असावी.सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला होता. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले होते.यानंतर, एका अधिकाऱ्याने सांगितले की, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा सारख्या इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीशी माहिती शेअर केली. आता ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.ईडीने त्यांच्या अहवालात म्हटले होते की ही एक “सुविचारित आणि सुनियोजित” योजना होती ज्यात अंतर्गत बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना खोटी माहिती देऊन पैसे लुटण्यात आले. तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या, जसे की:

कमकुवत किंवा पडताळणी नसलेल्या कंपन्यांना कर्जे.
अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर.
कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव.
बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे.
जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया (कर्ज सदाहरितीकरण).

काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि स्वतः अनिल अंबानी यांना “फसवे” म्हणून घोषित केले होते.एसबीआयचे म्हणणे आहे की आरकॉमने बँकेकडून घेतलेल्या ३१,५८० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर केला. यापैकी सुमारे १३,६६७ कोटी रुपये इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करण्यात आले. १२,६९२ कोटी रुपये रिलायन्स ग्रुपच्या इतर कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले.एसबीआयने असेही म्हटले आहे की आम्ही या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय, अनिल अंबानींविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई येथे वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई देखील सुरू आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर:पाहण्यासाठी खुली

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आज मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रभागरचना जाहीर केली .मनपा आयुक्तांनी प्रभाग रचना जाहीर करताना “पुणे महानगरपालिका निवडणूक 2025” असा उल्लेख केला.

या रचनेत ४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (मतदार संख्या ८४००० मतदार.)असून ५ नगरसेवकांचा १ प्रभाग (मतदारसंख्या १०५०००) आहे.

प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यांचा असेल.

नागरिकांना हरकती घेण्यासाठी ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.०० पर्यंत मुदत राहिल.

नकाशे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –

https://www.pmc.gov.in

५ वी महाराष्ट्र राज्य फिनस्विमिंग चॅम्पियनशिप बालेवाडीत संपन्न

पुणे-५ वी महाराष्ट्र राज्य फिनस्विमिंग चॅम्पियनशिप रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी महाळुंगे पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.बाणेर येथील टीपीएसए (तपन पाणिग्रही स्विमिंग अकादमी) मधील १२ विद्यार्थ्यांनी या फिनस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पाणिग्रही आणि सब्यसाची पाणिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने एकूण ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली.महावीरसिंग पाटील, ध्रुव महावर, सम्राज्ञी शं.जोशी, जागवी सबनानी, अद्विता तु देशमुख, अस्मी चौधरी आणि ओवी परब यांनी अप्रतिम कामगिरी केली.

अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (USAM) द्वारे आयोजित ५ व्या महाराष्ट्र स्टेट फिनस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये अपवादात्मक क्रीडा भावना दिसून आली. १६ जिल्ह्यांतील २५० हून अधिक स्पर्धकांनी ११२ स्पर्धांमध्ये भाग घेतला. ८ ते ८० वर्षे वयोगटातील, दोन्ही लिंगांच्या खेळाडूंनी कौशल्य, वेग, शक्ती, ताकद, सहनशक्ती आणि खेळाबद्दलची आवड दाखवली.या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध पॅरालिम्पियन, अर्जुन पुरस्कार विजेते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुयश जाधव यांच्या हस्ते झाले, ज्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने सहभागींना त्यांच्या मर्यादा ओलांडण्यास प्रोत्साहित केले.संपूर्ण स्पर्धेत, जलतरणपटूंनी उल्लेखनीय धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला, ज्यामुळे प्रत्येक शर्यत ताकद आणि उत्साहाची स्पर्धा बनली.

जीवंत स्पर्धा अधोरेखित केली

या उत्साही स्पर्धेने महाराष्ट्रात फिनस्विमनची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली आणि वेगाने वाढणाऱ्या जलचर खेळाच्या क्षमतेकडे लक्ष वेधले.या चॅम्पियनशिपचा समारोप एका उत्साहात झाला, ज्यामुळे राज्यभरातील पाण्याखालील खेळांमध्ये फिनस्विमिंगसाठी एक असाधारण उल्लेखनीय यशाचा टप्पा पार पडला.

चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन असावे – अर्जुन धवन

निकमार विद्यापीठात ९व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, २२ ऑगस्ट: “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता येतील. भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील, त्यावेळी शहराचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल,” असे विचार हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांनी व्यक्त केले.
देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (ICCRIP) या विषयावरील दोन दिवसीय ९व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सीडीआयआरचे महासंचालक अमित प्रोठी, निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व चीफ पॅट्रन प्रा. डॉ. विजय गुपचूप, पॅट्रन व कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी, इंटरिम डायरेक्टर जनरल डॉ. तपश कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक व संशोधन-विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.
अर्जुन धवन म्हणाले, “देशातील या उद्योगात अमूलाग्र परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानाने चालणारे हे क्षेत्र प्रचंड वेगाने बदलत आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता, नावीन्यता आणि शाश्वतता यांचा समावेश आहे. भारतीय बांधकाम बाजारपेठ २०२५ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार असून तिचे मूल्य १.४ ट्रिलियन डॉलर्स असेल. देशात रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मजबूत राजकीय नेतृत्व तसेच इंजिनियर्स आणि सिटी प्लॅनर्सची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.”
“स्थापत्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा हा आपल्या जीवनपद्धतीचा कणा आहे. या सुविधांमुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक आकांक्षांना योग्य दिशा मिळते. या क्षेत्रातील गुंतवणुकीचा आर्थिक विकासावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थापत्य ज्ञान, प्रकल्प समन्वयाची शिस्त आणि टिकाऊपणाची भूमिका अंगीकारणे गरजेचे आहे.”
अमित प्रोठी म्हणाले, “विकसित भारतासाठी २०५० पर्यंत १० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च पायाभूत सुविधा व गुंतवणूक सेवांवर होईल. नैसर्गिक आपत्ती व हवामान बदलांना तोंड देण्यासाठी क्षमता वाढविणे, नवीन धोरणे तयार करणे आणि नियोजन-व्यवस्थापन यावर अधिक भर दिला जाईल. यामुळे ३ अब्जाहून अधिक लोकांचे जीवनमान सुधारेल. आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि कृतीसाठी सरकारी, खाजगी उपक्रम आणि समुदायांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.”
डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, “आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन अधिक सुखमय झाले आहे. बांधकाम क्षेत्रातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. या क्षेत्रातील संशोधन, केस स्टडी, स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो. गुजरातमध्ये झालेल्या पुलाच्या दुर्घटनेत योग्य मेंटेनन्स न केल्याचे कारण समोर आले होते. अशा घटना टाळण्यासाठी सिव्हिल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे.”
प्रा. डॉ. विजय गुपचूप म्हणाले, “निकमारला २०२२ मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला. सतत बदलणाऱ्या या क्षेत्रात विद्यापीठाने उद्योग, अकादमिक क्षेत्र, ज्ञान क्षेत्र, संशोधन आणि इनोव्हेशन यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यावर भर दिला आहे.”
डॉ. तपश कुमार गांगुली म्हणाले, “लोकांचे जीवन सुचारू व आनंददायी करण्यासाठी बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ट स्मार्ट सिटींची निर्मिती शक्य आहे. निकमारने आयोजित या परिषदेत विद्यार्थ्यांना संशोधन, धोरण आणि तंत्रज्ञानाची अत्याधुनिक माहिती मिळेल.”
डॉ. रजनीकांत राजहंस यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, “या परिषदेत १८ देशांतील २०० हून अधिक संशोधन पेपर सादर केले जात आहेत. सहा प्रमुख श्रेणींवर लक्ष केंद्रित असलेल्या परिषदेत संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर्सचे दृष्टिकोन, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉनचा समावेश आहे.”
एल अँड टीचे कार्यकारी समिती सदस्य व अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार एम. व्ही. सतीश हे ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा ८ ते ९ टक्के वाटा आहे.”