पुणे : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेत शुभेच्छा दिल्या.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आरिफ मोहम्मद खान यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, राजू चमेडिया, निलेश लद्दड आदी उपस्थित होते.
आरिफ मोहम्मद खान म्हणाले, आपल्या सर्वांवर देवीची कृपा राहू देत. आपला देश पुढे जात राहो. आपल्या देशाला मजबूत करु. इतके आपण देशाला मजबूत करु की आपल्या हातून संपूर्ण मानवतेची सेवा होईल, अशी प्रार्थना त्यांनी श्री महालक्ष्मी देवीचरणी केली.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू
मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी केले.
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते.
श्री.देशपांडे म्हणाले की, राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.
या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.
प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या क्षमतांच्या पुरेपूर वापरासाठीच्या धोरणांबाबत सरकार आणि उद्योग जगतादरम्यान संवाद
मुंबई, 26 सप्टेंबर 2022
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईतील चित्रपट उद्योगातील विविध भागधारकांशी संवाद साधला.

दृकश्राव्य क्षेत्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरणे, परस्पर सहकार्य तसेच सरकार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांच्यात नियमित संवाद आवश्यक आहे. या अनुषंगाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे – एनएफडीसी तर्फे आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत, अशा भागधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर, या बैठकीसाठी उपस्थित होते.
त्याचबरोबर, मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन, धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, अयान मुखर्जी, आर. बाल्की, अबंडांटियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा, अॅमेझॉन प्राइम व्हिडीयोचे गौरव गांधी आणि अपर्णा पुरोहित, नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल, पीईएन इंडियाचे अध्यक्ष जयंतीलाल गाडा, बालाजी मोशन पिक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाविनी शेठ, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशीष सरकार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा तसेच निर्माते महावीर जैन आणि मधु मंटाना, अशा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी आणि मनोरंजन उद्योग व्यावसायिकांनी उद्योग विश्वाचे प्रतिनिधित्व केले.
प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांबाबत यावेळी प्राधान्याने चर्चा करण्यात आली. भारतात चित्रीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी चित्रपट सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत असलेले प्रयत्न तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय निर्मिती आणि अधिकृत सह-निर्मितीसाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली प्रोत्साहनपर योजना आणि त्यामुळे भारतात आशय निर्मितीसाठी होणाऱ्या लाभाबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा करण्यात आली. सरकारतर्फे देऊ करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत, उद्योगांनी केलेल्या अपेक्षित प्रोत्साहनपर सूचनांची नोंदही यावेळी घेण्यात आली.
आगामी 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत आणि त्याद्वारे उद्योगासाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबतही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2021 च्या मसुद्यामध्ये केलेल्या सुधारणांबाबत अभिप्राय घेण्यात आला. या भागधारकांनी सकारात्मक अभिप्राय देत, प्रस्तावित सुधारणा एकमताने स्वीकारल्या.
भारतातील चित्रपटगृहांच्या संख्येबद्दल उद्योग जगताच्या मनातील प्रश्नांची दखल घेत, चित्रपटगृहांच्या बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने एक खिडकी यंत्रणा विकसित करत असून, त्यासंदर्भातील कायदा प्रगतीपथावर असल्याची माहितीही संबंधित भागधारकांना देण्यात आली. दृकश्राव्य क्षेत्रातील इतर अनेक उपक्रमांबाबतही उपस्थितांना तपशीलवार माहिती देण्यात आली.
आजची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले “चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी मनोरंजन उद्योग जगतासोबत साधलेला संवाद, ही एक उत्तम संधी आहे. या संवादात सहभागी सर्व भागधारकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यांच्यासाठी प्रदान केलेल्या विविध प्रसारण मंचांचा लाभ घ्यावा आणि भारताला ग्लोबल कंटेट हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.”






KHSQ.jpeg)


