Home Blog Page 1592

आज जागतिक पर्यटन दिन – दि. 27 सप्टेंबर


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यावर्षीही 27 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक पर्यटन दिन 2022 साजरा करत असुन युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) यांचेद्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) “Rethinking Tourism” हे घोषित करण्यात आले आहे.
या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या Theme नुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सदर जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार,महाराष्ट्र्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतुन साजरा केला जातो.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये,सर्व पर्यटक निवासे,उपहारगृहे,बोल्ट क्लब्स,माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी दि.27 सप्टेंबर 2022 रोजीच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत आपल्या अखत्यारीत येणाऱ्या प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत “पर्यटन सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.
पर्यटन दिनी विविध पर्यटन पूरक कार्यक्रमाचे आयोजन करून महामंडळ नजीकच्या नामावंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था महाविद्यालये शाळा पुरातत्व विभाग इ. यांसारख्या सर्व समावेशक योगदानातून सदर पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जागतिक पर्यटन दिनाचे Banner लावण्यात यावा. सदर घोषवाक्यसहित रचनाबद्ध Banner सर्व पर्यटक निवासांमध्ये लावण्यात येणार आहेत. सदर दिनी पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये सदर दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपारिक खेळाचे आयोजन असेल. जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधत सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिध्द असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असुन त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना ज्यामध्ये वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित- पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल नॅचरल Walk इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.
‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा तसेच व्याख्यानमाला, कलाकारांच्या कलेतून प्रबोधन इ. आयोजन करण्यात येणार आहे. ‘पर्यटन सप्ताह हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आपण आयोजित करत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास राष्ट्रास नक्कीच हातभार लाभेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात यावा, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. जयश्री भोज यांनी सर्वांना दिल्या आहेत.
मा. व्यवस्थापकिय संचालक यांच्या संकल्पनेनुसार आणि मा. महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांसाठी नवनवीन उपक्रमांची पर्वणीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन सादर करण्यात येत आहे. ऐतिहासिक स्थळी पदयांत्रांचे आयोजन, छोटया मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरण पुरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विदयमाने “Microplastic Plogging” या नाविण्यापूर्ण उपक्रमासोबतच दि. 27/09/2022 रोजी Cyclothon सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणासाठी पुरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. “Rethinking Tourism” म्हणजेच पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेवुन पर्यटनाचा आनंद घ्यावा तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा,

श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ….

लोकसाहित्याच्या परंपरेचा जागर घालणारा निस्सीम पाईक

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ.रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली

मुंबई,दि. २५:- ‘ महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेचा संशोधन, अभ्यासातून जागर घालणारा निस्सीम पाईक गमावला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वारकरी संप्रदायाचा वारसा जपतानाच डॉ. देखणे यांनी संत साहित्याचा, लोकसाहित्याचा आत्मियतेने अभ्यास केला. भारूड या लोकसाहित्याचा त्यांनी संशोधनात्मक ध्यास घेतला.हा विषय समजावून देण्यासाठी त्यांनी विदेशात जाऊन असंख्य कार्यक्रम केले. नव्या पिढीसाठी त्यांनी संशोधक, मार्गदर्शकाची भूमिका नेटाने निभावली. लोकसाहित्याविषयीची त्यांची तळमळ आणि संशोधन सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’
0000

दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने २८व्या पुणे नवरात्रौ महोत्सवास प्रारंभ

पुणे : कला, गायन, वादन, नृत्य आणि संगीताचा मिलाफ असणाऱ्या  पुणे नवरात्रौ महोत्सवास सोमवारी दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने प्रारंभ झाला. महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंच मध्ये‌ आयोजित महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, जयश्री बागुल, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह चित्र तारका व अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या अभिनेत्री या सोहळ्यास उपस्थित होत्या.

यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे, सामाजिक नेते अंकूश काकडे आणि लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम आदींना यावेळी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून धमाल कार्यक्रम व नियोजन पहायला मिळाले. आबा बागुल विधानसभेत येणे गरजेचे आहे. आबा चैतन्यमय व्यक्तीमत्व आहे. अत्यंत चांगल्या  पद्धतीचा महोत्सव आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव म्हंटले‌ तर काही वावगे ठरणार नाही. पुणे हे जशे शिक्षणाचे माहेर घर आहे, तसेच हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. अंकुश काकडे, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्याकडे पाहिल्यावर नवी पिढी कुठे आहे, असे प्रश्न मनात येतो.

डॉ. पी. डी. पाटील माझे आवडत व्यक्तीमत्व आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण आक्षरांनी लिहीले आहे.

कधी कधी खूप वाईट बातम्या ऐकल्यावर आपले मन व्यथीत होते. महिलांवर अत्याचार होतात, त्यांच्या‌ घरच्यांना मारतात आणि आरोपी बाहेर आल्यावर त्यांची‌ सत्कार व मिरवणुक काढली जाते, हा प्रकार माणुसकीला कलंक आहे.

अंकुश काकडे यांनाच अद्याप संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीत त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. असे असताना काकडे यांनी आबांना ऑफर देणे योग्य नाही. उलट काकडे यांनीच आमची ऑफर स्विकारावी असे मिस्किलपणे ते म्हणाले.

उल्हास पवार म्हणाले, मी आणि मोहन जोशी पहिल्या नवरात्रौ महोत्सवापासून गेली २८ वर्षे या सोहळ्यात सहभागी होत आहोत. ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुबात जन्म घेवून डॉ. पी. डी. पाटील यांनी मोठे काम केले. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेकांना मदत केली. त्यांना माणुसकीची जाण आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. अंकुश काकडे आमचे जगन्मित्र आहेत. प्रत्येक माणसाच्या‌ आयुष्यात दुखाचे व आनंदाचे क्षण येत असतात. स्वत:चे दु:ख विसरून दुसऱ्यांना हसवत राहणे, खूप अवघड काम आहे, हे काम अंकुश काकडे करतात. प्रवीण तरडे यांच्या‌ चित्रपटापासून समाजाला अनेक गोष्टी शिकता येतात. लोकाभिमूख नगरसेवक व कल्पक बुद्धीचा नगरसेवक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आबा बागुल, असेही पवार म्हणाले.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आजचा दिवस दृढनिश्चयाचा आहे. या दिवसी आमचा सन्मान झाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. मितेश घट्टे म्हणाले, माणुसकी व माणुसकीचे महत्व कोरोनाच्या‌ काळात समजले. त्या काळात जे कार्य‌ केले, त्याची पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली.

प्रवीण तरडे म्हणाले, अनेक चित्रपट लिहीले, पण मी हा पुरस्कार मुळशी पॅटर्नसाठी स्विकारतो. शेती विकायची नसते तर राखायची असते, हा संदेश मी दिला.

अंकुश काकडे म्हणाले, गेली २८ वर्षे बागुल परिवार हा महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना आता मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर महोत्सव घ्यायचा आहे. त्यासाठी आबाला बाळासाहेब थोरातांनी मुंबईला न्यावे, नसेल तर आबांनी हातात घड्याळ बांधावे, त्यांना पाहिजे‌ ते मिळेल असे मिस्किलपणे ते म्हणाले .

प्रियंका गौतम म्हणाल्या, बागुलयांनी मला सन्मान देवून नवीन कलाकाराचा‌ सन्मान केला आहे. माझे आई वडील शिक्षकआहेत, तरीही मी कलेसाठी लावणी नृत्य करते. आई वडीलांनी मला कायमचा पाठिंबा दिला.

महोत्सवाचे मुख्य‌ आयोजक अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की महोत्सव सुरु करने सोपे असते मात्र चालू ठेवणे अवघड असते. गेली २८ वर्षे हा महोत्सव सुरु आहे हे केवळ श्री लक्ष्मी मातेच्या कृपेनेच.

प्रारंभीमहाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्काराने महोत्सवास सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली.  नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे यांनी त्यांच्या शिष्यांसह महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार  सादर करून महोत्सवाची सुरूवात केली.

– रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर केला.- विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर केला.- सँण्डी डान्स अ‍ॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर केला. – पायल वृंद तर्फे अभिनेत्रींनी कॅलिडोस्कोप दिलखेचक नृत्याविष्कार सादर केला. या नृत्याविष्काराते दिग्दर्शन अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी केले आहे. यामध्ये पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर यांनी नेत्र दीपक नृत्य विष्कार सदर करून डोळ्याचे पारणे फेडले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दीपप्रज्वलन व आरती होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. घनशांम सावंत‌ यांनी आभार मानले.

उद्घाटन समारंभानंतर गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे यांनी वाद्यवृंदासह स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. 

… तर राज्यात राष्ट्रपती राजवट -बाळासाहेब थोरात

पुणे- राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळणार असून त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.असे

वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.

बाळासाहेब थोरात आज पुणे नवरात्र महत्वाच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,मंत्री म्हणजे जबाबदार व्यक्तिमत्त्व असत.सगळे मराठा समाजाला आंदोलना साठी प्रयत्न करत होते .त्या सगळयाचा अपमान केला आहे .अस वाटतंय.
पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो परत पुणे पोलिसांनी गुन्हा मागे घेतला आहे. त्यावर थोरात म्हणाले,बंदी घातली पाहिजे आशा संघटनेवर का भाजप बंदी घालत नाही.त्यांना पाठिशी घालत आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद भेटत आहे त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,सर्व समाज राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत. १९४२ ला जसे झाले तसे राहुल गांधी भारत जोडो काम करत आहेत कोणी काही बोलाव हा त्याचा प्रश्न आहे. तसेच ,खरोखरच महाविकास आघाडी यांनी वेदात साठी प्रयत्न केले होते.तरुणांचे रोजगार घालवले. गुजरात खुश करण्याच काम या सरकारने केलंय अशी टीकाबाळासाहेब थोरात यांनी शिंदे व फडणवीस सरकार वर केली.

महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर असून काँग्रेस महापालिकेत किती जागा लढवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या वेळी म्हणून काम करू त्या त्या वेळी भूमिका ठरवू. तसेच शिंदे वफडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नियुक्ती दोन तीन महिन्यांनी केली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,पालकमंत्री केलं याचाच कौतुक,जनतेचे प्रश्न राहिले,आता काम करावे एवढीच अपेक्षा


संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

पुणे -संतसाहित्याचे आणि लोकवाडःमयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे (वय ६६ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. देखणे यांचा फिटनेस चांगला होता. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

0

मुंबई, दि. 26 : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य  निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.  नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

अहमदाबाद, दि. 26 : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री श्री. जगदीश विश्वकर्मा व श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यात आज सोमवार, 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे यासंदर्भात चर्चा झाली.

प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्री सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक श्री सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर श्री. सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री श्री. विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

गॅबनला भेट देणारी पहिली भारतीय युद्धनौका

0

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

भारतीय नौदलाची आयएनएस तरकश ही युद्धनौका सागरी चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी सुरु असलेल्या गिनीच्या आखातामधील आपल्या तैनातीचा भाग म्हणून गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे पोहोचली. भारतीय नौदलाच्या एखाद्या जहाजाने गॅबनला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

बंदरावरील आपल्या मुक्कामादरम्यान जहाज आणि त्यावरील कर्मचारी अधिकृत आणि व्यावसायिक संवाद तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील.  

जहाजाच्या व्यावसायिक संवादामध्ये अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण, वैद्यकीय आणि अपघातग्रस्तांच्या सुटकेबाबतच्या समस्या आणि डायव्हिंग ऑपरेशन्सवरील चर्चा आणि कवायती याचा समावेश असेल. यावेळी परिचय भेटी देखील होतील. याशिवाय, योग सत्रे आणि सामाजिक संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

हे जहाज पर्यटकांना पाहण्यासाठी देखील खुले राहील.

सीपीआर जागरुकता व प्रशिक्षण सप्ताहाचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशनतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त ‘धडकन’ प्रकल्प

२ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम देणार प्रशिक्षण  

पुणे | जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांतर्गत रोटरीच्या मदतीने २ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम सीपीआर जागरुकता व प्रशिक्षण देणार आहे. शहरातील विविध भागातील सोसायट्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते लॉ कॉलेज रोडवरील नॅशनल फिल्म अर्काईव्ह येथे झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ अनिल परमार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ जगदीश हिरेमठ, डॉ. किंजल गोयल, डॉ. सुनील साठे, पल्लवी साबळे, हेमंत शिरगुप्पी, डॉ जिग्नेश पंड्या, नरेंद्र गांधी, पद्मजा जोशी, केतन शाह, महेंद्र चित्ते, मनिषा सुर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

धडकन प्रकल्पाविषयी आणि याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सीपीआर प्रशिक्षणासंबंधी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांनी माहिती दिली. केतन शाह यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे आत्तापर्यंतचे कार्य स्लाईड शोच्या माध्यमातून सांगितले.

यावेळी डॉ. जगदिश हिरेमठ यांनी रक्तदाब मोजण्याची पद्धत सांगितली. त्याचप्रमाणे बंद पडलेलं हृदय तत्काळ सुरु करण्याची शक्ती सीपीआर मध्ये आहे असे सांगून सीपीआर नेमकं कसं करतात त्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. तसेच सीपीआर कसा करावा या संदर्भात लघुपट दाखवण्यात आला.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सीपीआर संदर्भात कुठलीही मदत करण्याचे आश्वासन दिले. तर, अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी हृदय विकाराच्या प्रथमोपचारासाठी लागणारे AED मशीन जास्तीत जास्त पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश गांधी यांनी केले.

10 यूट्युब वाहिन्यांवरील 45 ध्वनी-चित्रफितींवर घातली बंदी

0

भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी मॉर्फ केलेल्या प्रतिमा आणि ध्वनी-चित्रफितींचा वापर केला गेला

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, यूट्युब या ऑनलाईन मंचाला त्यांच्या 10 युट्युब वाहिन्यांवरील 45 ध्वनी-चित्रफितींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित ध्वनी-चित्रफितींबर बंदी घालण्याचे निर्देश 23.09.2022 रोजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आले होते. बंदी घालण्यात आलेल्या ध्वनी-चित्रफितींना 1 कोटी 30 लाखांहून अधिक एकत्रित प्रेक्षक संख्या मिळाली होती. 

या ध्वनी-चित्रफितींमध्ये बोगस बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेले व्हिडिओ याचा समावेश होता. उदाहरणांमध्ये सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचे खोटे दावे, धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतात सांप्रदायिक युद्ध भडकल्याची घोषणा इ. याचा समावेश आहे. या ध्वनी-चित्र फितींमध्ये सांप्रदायिक विसंवाद निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याची क्षमता असल्याचे आढळून आले. 

मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही ध्वनी-चित्रफिती अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दले, भारताची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि अशाच संबंधित मुद्द्यांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरल्या जात होत्या. ही सामग्री भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या परदेशी देशांबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीकोनातून चुकीची आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले होते.

काही ध्वनी-चित्रफितींमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या काही भागांसह भारतीय हद्दीबाहेर भारताची चुकीची बाह्य सीमा दाखवण्यात आली होती. नकाशामधून करण्यात आलेले हे चुकीचे सादरीकरण भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी हानीकारक असल्याचे आढळून आले.  मंत्रालयाने बंदी घातलेली सामग्री भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षा, भारताचे परदेशी देशांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशाच्या  सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानीकारक असल्याचे आढळून आले. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A च्या कक्षेत ही सामग्री समाविष्ट करण्यात आली. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे.  

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

0

मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी केले.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले की, राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf  या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या क्षमतांच्या पुरेपूर वापरासाठीच्या धोरणांबाबत सरकार आणि उद्योग जगतादरम्यान संवाद

0

मुंबई, 26 सप्‍टेंबर 2022

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईतील चित्रपट उद्योगातील विविध भागधारकांशी संवाद साधला.

दृकश्राव्य क्षेत्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरणे, परस्पर सहकार्य तसेच सरकार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांच्यात नियमित संवाद आवश्यक आहे. या अनुषंगाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे – एनएफडीसी तर्फे आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत, अशा भागधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर, या बैठकीसाठी उपस्थित होते.

त्याचबरोबर, मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन, धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, अयान मुखर्जी, आर. बाल्की, अबंडांटियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा, अॅमेझॉन प्राइम व्हिडीयोचे गौरव गांधी आणि अपर्णा पुरोहित, नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल, पीईएन इंडियाचे अध्यक्ष जयंतीलाल गाडा, बालाजी मोशन पिक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाविनी शेठ, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशीष सरकार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा तसेच निर्माते महावीर जैन आणि मधु मंटाना, अशा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी आणि मनोरंजन उद्योग व्यावसायिकांनी उद्योग विश्वाचे प्रतिनिधित्व केले.

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांबाबत यावेळी प्राधान्याने चर्चा करण्यात आली. भारतात चित्रीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी चित्रपट सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत असलेले प्रयत्न तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यात आली. आंतरराष्‍ट्रीय निर्मिती आणि अधिकृत सह-निर्मितीसाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली प्रोत्‍साहनपर योजना आणि त्‍यामुळे भारतात आशय निर्मितीसाठी होणाऱ्या लाभाबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा करण्यात आली. सरकारतर्फे देऊ करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत, उद्योगांनी केलेल्या अपेक्षित प्रोत्साहनपर सूचनांची नोंदही यावेळी घेण्यात आली.

आगामी 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  यशस्वी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत आणि त्याद्वारे उद्योगासाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबतही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2021 च्या मसुद्यामध्ये केलेल्या सुधारणांबाबत अभिप्राय घेण्यात आला. या भागधारकांनी सकारात्मक अभिप्राय देत, प्रस्तावित सुधारणा एकमताने स्वीकारल्या.

भारतातील चित्रपटगृहांच्या संख्येबद्दल उद्योग जगताच्या मनातील प्रश्नांची दखल घेत, चित्रपटगृहांच्या बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने एक खिडकी यंत्रणा विकसित करत असून, त्यासंदर्भातील कायदा प्रगतीपथावर असल्याची माहितीही संबंधित भागधारकांना देण्यात आली. दृकश्राव्य क्षेत्रातील इतर अनेक उपक्रमांबाबतही उपस्थितांना तपशीलवार माहिती देण्यात आली.

आजची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले “चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी  मनोरंजन उद्योग जगतासोबत साधलेला संवाद, ही एक उत्तम संधी आहे. या संवादात सहभागी सर्व भागधारकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यांच्यासाठी प्रदान केलेल्या विविध प्रसारण मंचांचा लाभ घ्यावा आणि भारताला ग्लोबल कंटेट हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.”

मानवरहित विमानांसाठीचे एव्हीगॅस 100 एलएल या हवाई इंधनाच्या स्वदेशी उत्पादनाच्या वापराचा प्रारंभ

0

इंडियन ऑइल ठरली एव्हीगॅस 100 एलएलचे उत्पादन आणि विपणन करणारी देशातील पहिली तेल विपणन कंपनी

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नागरी विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पिस्टन इंजिनची विमाने आणि मानवरहित विमानांसाठी बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएल (AVGAS 100 LL) या हवाई इंधनाच्या वापराचा प्रारंभ केला. भारतात सध्या या इंधनाची युरोपियन देशांमधून आयात होते. इंडियन ऑइलने भारतीय वायुसेनेच्या हिंडन हवाई तळावर आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, एमओपीएनजी (MoPNG) आणि एमओसीए (MoCA) चे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) अधिकारी सहभागी झाले होते.

स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएलचा वापर सुरू होण्याचे महत्व सांगताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की एव्हीगॅस 100 एलएल हे भविष्यात विमानतळांवरील वाढती गर्दी तसेच वैमानिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी विमानांसह वैमानिक प्रशिक्षण संस्थांची वाढती संख्या यासह भरभराटीला येत असलेल्या विमान वाहतूक उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहे. भारतातील विमान प्रवासाची मागणी भविष्यात अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशिक्षित वैमानिकांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. आणि यासाठी, एफटीओ (FTOs) संख्येतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, ते म्हणाले.  

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल:

सध्या एव्हीगॅस 100 एलएल हे इंधन पूर्णपणे आयात केले जाणारे उत्पादन आहे. इंडियन ऑइलने गुजरात येथील तेल शुद्धीकरण केंद्रात उत्पादित केलेल्या  एव्हीगॅस 100 एलएल चे देशांतर्गत उत्पादन भारतात विमान उड्डाणाचे प्रशिक्षण अधिक परवडणारे बनवेल. एफटीओ आणि संरक्षण दलांद्वारे चालवल्या जाणार्‍या विमानांना इंधन पुरवणारे हे उत्पादन भारत अनेक दशकांपासून आयात करत आहे. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास (R&D), तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विपणन संघांनी स्वदेशी उत्पादनाची ही यशस्वी कामगिरी केली आहे आणि उद्योग क्षेत्राला कमी किमतीचा फायदा दिला आहे.

कर्करुग्णांना निवारा देणाऱ्या नाना पालकर रुग्ण सेवा सदनसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 26 : नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवारा, अन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या नाना पालकर स्मृती समितीसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या व त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे ‘डे केअर किमोथेरपी’ केंद्र सुरू करण्यासंदर्भात नाना पालकर स्मृती समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वेचले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले नाना पालकर रुग्ण सेवा सदन केवळ कर्करुग्णांनाच नाही तर इतर अनेक रुग्णांना तसेच त्यांच्या आप्तेष्टांना मदत करीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात वाराणसी येथेदेखील कर्करुग्णांच्या उपचाराची सोय आहे. परंतु ‘टाटा’ या नावातच काही जादू आहे, की ज्यामुळे लोक देशभरातून टाटा स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी येतात, असे राज्यपालांनी सांगितले.  विज्ञानातील संशोधनामुळे एक दिवस प्रत्येक कर्करुग्ण बरा होईल असा आपणास विश्वास वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.

कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक : डॉ. राहुल बाणावली

देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे, तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून सन २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल, असे सांगताना कर्करुग्णांच्या उपचाराचा वाढत असलेला खर्च आणि रोगनिदान होईपर्यंत होणारा खर्च चिंताजनक असल्याचे टाटा स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल बाणावली यांनी सांगितले.

टाटा रुणालयात आजही उपचार परवडणाऱ्या किंमतीत होत असल्यामुळे देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले.  रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी मुंबईत निवाऱ्याची सोय होणे महत्त्वाचे असते, असे सांगून नाना पालकर संस्थेसारख्या किमान दहा सेवाभावी संस्थांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बोरिवली येथे २ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या केमोथेरपी केंद्रामुळे लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळेल तसेच त्यामुळे पश्चिम उपनगरे, विरार, डहाणू, पालघर येथील रुग्णांची सोय होईल असे नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव सुमेधा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 26 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा  असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेना, प्रधान सचिव (अपील आणि सुरक्षा) श्याम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन, राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अपराध सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव तातडीने 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. राज्यात नवीन पोलीस स्टेशन निर्मिती करण्यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा तसेच हा आराखडा तयार करताना लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे आधारभूत मानण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी पोलीस स्पोर्टस् अकादमीचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करावा. तसेच पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा टप्पा 1 पूर्ण झाला असून टप्पा 2 ची कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबरोबरच नवीन बोटी खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच सागरी सुरक्षेकरिता जुन्या बोटींची दुरुस्ती आणि तांत्रिक पदे भरती करण्यासाठीचाही प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीचा प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी. नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन देण्यात येतात. सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा. सध्या असलेल्या अंमली पदार्थ विरोधी (नार्कोटिक) कायद्यात राज्य सरकारच्या सुधारणा प्रस्तावित करण्यासंदर्भात विभागाने अभ्यास करावा. मुंबईमध्ये प्रस्तावित डिटेंशन सेंटरचा प्रस्ताव तातडीने सादर करुन त्यास मंजुरी घ्यावी. तसेच राज्यामध्ये प्रशिक्षित असे श्वान पथक तयार करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शक्ती कायदा, निर्भया पथक या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राजकीय, सामाजिक आंदोलनातील, कोरोना काळातील, गणपती व दहीहंडी उत्सव काळातील खटले मागे घेण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबतचे खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यामध्ये नवीन कारागृह निर्मिती करण्याबरोबरच कारागृह विभागात सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या 1 हजार 641 बंदींना जामीन मंजूर असून त्यांना कारागृहातून सोडण्याची योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी शासनाने सर्व कायदेशीर सहकार्य करावे तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीत महिला सुरक्षा, पोलीस स्टेशन बांधकाम, पोलिसांसाठी घरे, पोलीस गृह कर्ज योजना, पोलिसांच्या आस्थापना विषयक बाबी, पोलिसांसाठी अद्ययावत वाहने, राज्य राखीव पोलीस दल, डायल 112, अम्बीस प्रणाली, सिसिटीएन्स प्रणाली टप्पा 2, तुरुंग सेवा यांसह विविध विषयांचा आढावा उपमुख्यमंत्री यांनी घेतला. यावेळी सर्व पोलीस घटकांनी समन्वयाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस भरतीला प्राधान्य

राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 10 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

गृह विभागाचे सादरीकरण अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांनी केले. तर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी सादरीकरण केले.