Home Blog Page 159

इतिहास साक्षरता व सार्वजनिक नीतिमत्तेपासून आपण दुरावलो -डॉ. राजा दीक्षित

पुणे : आज कोणत्याही गोष्टीवरून वाद होताना दिसत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे इतिहासाचे भान सामान्य माणसाच्या पातळीवर निर्माण झालेले नाही. बाळशास्त्री जांभेकरांपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत सगळ्या सुधारकांनी सत्य आणि नीतिमत्तेवर भर दिला. मात्र, आज इतिहास साक्षरता आणि सार्वजानिक नीतिमत्तेपासून आपण दुरावलो आहोत, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे प्रार्थना समाज आणि डॉ. अशोक पद्मनाभ भांडारकर यांचे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रा.गो.भांडारकर स्मृतिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भांडारकर संस्थेच्या श्री नवलमल फिरोदिया सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, येथील माजी कुलगुरु डॉ. उमा वैद्य, भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री .भूपाल पटवर्धन, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सेक्रेटरी डॉ.दिलीप जोग, सहचिटणीस श्रीमती नमिता मुजुमदार आदी उपस्थित होते. डॉ. रा.गो.भांडारकर – जीवन आणि कार्य या विषयावर डॉ. उमा वैद्य यांनी विचार मांडले.

प्रमुख पाहुणे डॉ. राजा दीक्षित म्हणाले, इतिहासाचे परिपक्व भान निर्माण झाले, तर सगळ्या सामाजिक समस्या दूर होतील. सध्याच्या काळात धर्माची परिस्थिती इतकी दारूण झाली आहे की त्याच्याइतकी अधार्मिक गोष्ट दुसरी नसेल. खऱ्या धर्माची जाणीव निर्माण करणे ही आजची गरज असून भांडारकरांच्या जीवनातून हे आपण शिकायला हवे. मराठीच्या इतिहासात रानडे आणि भांडारकर हा समास आहे, ही नावे नेहमी जोडून येतात. प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाला दोघांनी आकार दिला. तसेच भारतीय समाजाला संस्थात्मकता देण्यात त्यांचे योगदान होते.

डॉ. उमा वैद्य म्हणाल्या, डॉ. भांडारकर यांनी संस्कृत भाषा, प्राच्यविद्या, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा असे चौपदरी कार्य केले. ज्या काळात भारतावर पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम होऊ लागला होता त्या संक्रमणाच्या काळात देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम ज्या समाजसुधारकांनी केले, त्यांपैकी  सर भांडारकर हे अग्रेसर होते. शिक्षणतज्ज्ञ, प्राच्यविद्या विशारद, समाज सुधारक आणि धर्म सुधारक ही त्यांची ओळख होती. प्राचीन भारतीय इतिहासाचे पुर्नलेखन करण्यात ते अग्रभागी होते. भांडारकर संस्था व प्रार्थना समाज ह्या संस्था म्हणजे त्यांच्या कामाचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. रा.गो.भांडारकर यांच्याविषयी आधुनिक कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने साकारण्यात आलेली चित्रफीत भांडारकर संस्थेतर्फे  दाखविण्यात आली. तसेच पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने डॉ. भांडारकरांनी रचलेली पदे व त्यांनी संतरचनांवर केलेले निरूपण समाविष्ट करून विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर झाला. यात डॉ . दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग यांनी निरूपण केले तर धनश्री घाटे, धनश्री गणात्रा, सानिका सोमण व प्रणव कुलकर्णी यांनी गायन केले, तसेच अंजली राव, नीलेश कुलकर्णी, शशिकांत भोसले व नमिता मुजुमदार यांनी वाद्यसाथ केली. भांडारकर संस्थचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप जोग यांनी आभार मानले.

विकसित भारत २०४७ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न.

पुणे (दि.२४) डॉ.अनिल धनेश्वर लिखित “विकसित भारत २०४७” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या टाटा सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर, प्रमुख वक्ते भारतीय रिझर्व बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ.आर.बी.बर्मन, सन्मानार्थी प्रा.डॉ.मुकुंद महाजन, आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी मुकुंद लेले,निरंजन आगाशे, अनघा कऱ्हाडे, हेमांगी ताम्हणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी विकसित भारत २०४७ ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून त्या अनुसार ते विविध योजना व उपक्रमाचे आयोजन करीत आहेत असे सांगितले. डॉ.आर.बी बर्मन यांनी कोणतेही बदल लगेच होत नाही त्यासाठी काही कालावधी लागतो, व सर्वांनी त्यात सहभागी होणे महत्वाचे असते असे सांगितले. लेखक डॉ.अनिल धनेश्वर यांनी विकसित भारत या संकल्पनेवर लिहिलेल्या अनेक लेखांचा यात समावेश असून २०४७ मध्ये देश विकसित भारत होणार याची खात्री असल्याचे सांगितले. पुस्तकाची पाने २०६ असून किंमत ५००/- रुपये आहे.

लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत उत्साहवर्धक वातावरण — डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

मुंबई दि.२३: मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद, उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि एकमेकींवरील विश्वासाचे मनापासून कौतुक केले. “सरावाच्या काळातील परिश्रम आणि खेळताना दाखवलेला विश्वास हेच खऱ्या भगिनीभावाचे दर्शन घडवणारे आहे, यामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत असल्याचे आज दिसून आले,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली. तथापि, शिंदे यांनी स्वतः फोन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, पुढील काही दिवसांत त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती दिली. “साहेब आले असते तर महिलांना त्यांच्या चार शब्दांचा आधार लाभला असता. तरीदेखील पुढील मोठ्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करून अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढवूया,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा दाखला देत सांगितले की, “महिलांचा सन्मान कधीच मागून मिळत नाही, तो स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवावा लागतो.” पुढे बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा उल्लेख करत सांगितले की, महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर महिला निवडून येतील. “तुळजाभवानीच्या कृपेने महिलांना भरघोस यश मिळेल आणि त्यात आपल्यापैकी अनेकांचा सहभाग असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे संयोजन मीनाताई, सुशांत शेलार, दिनेश शिंदे, शितल म्हात्रे आदींनी केले होते. त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांचा कार्यक्रम घेणे सोपे नाही; त्यासाठी परिश्रम, संयोजनशक्ती आणि सातत्याची गरज असते.” उपस्थित महिलांच्या दमदार परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाला विशेष रंगत चढल्याचे त्यांनी नमूद केले.

मंगळागौरीच्या खेळांना श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडत त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या आराधनेचा उल्लेख केला. महिलांच्या आंदोलनांतील सहभाग आणि मोर्च्यांमधील धैर्याचे दर्शन चित्रपटांतून घडवले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “प्रत्येक महिला ही हिऱ्यासारखी आहे; हिऱ्याची चमक कायम टिकते. त्यामुळे तुम्हा सर्वांना भविष्यात अजून मोठे यश आणि स्थान मिळो,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

भाषणाचा शेवट करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्याचे आवाहन केले आणि “जय महाराष्ट्र”च्या घोषणेसह आपल्या मनोगताची सांगता केली.

पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या युपीच्या दोघांना पकडले, ३ किलो ४०० ग्राम गांजा हस्तगत

पुणे- अमलीपदार्थ विरोधी कारवाईत २ तरुण ३ किलो ४०० ग्राम गांजा सहित पुणे पोलिसांनी पकडले आहेत. मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे दोघे पुण्यात गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अमली पदार्थ विरुद्ध मोहीम अंतर्गत बाणेर पोलीस स्टेशन यांनी ब्लूमिंग डेल सोसायटी बिल्डींग ए जुपिटर हॉस्पिटलच्या समोर बाणेर पुणे येथे रवी विजय वर्मा राहणार सध्या शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पिंपळे सौदागर पुणे वय 19 वर्ष मुळगाव ग्राम भरतवाल ठाणा भरत जिल्हा चित्रकूट राज्य उत्तर प्रदेश ,शैलेंद्र नथू प्रसाद वर्मा वय 23 वर्ष राहणार सध्या शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळाजवळ पिंपळे सौदागर पुणे मूळ ग्राम भरतवाल ठाणा भरत खूप जिल्हा चित्रकूट राज्य उत्तर प्रदेश यांनी तीन किलो 400 ग्रॅम इतका गांजा हा अमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवला असताना दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक गुन्हे अलका सरक सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम पोलीस निरीक्षक अनिल माने पोलीस उपनिरीक्षक संदेश माने पोलीस उपनिरीक्षक शैला पात्रे सहाय्यक फौजदार सकपाळ पोलीस हवालदार गायकवाड आहेर शिंगे र इंगळे पोलीस शिपाई गाडेकर खरात राऊत मोरे काळे, कुठे पात्रुड बर्गे बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी ही कारवाई केली.

अहिल्यानगर रस्त्यावरील सुप्यात 32 एकरमध्ये “कार्ल्सबर्ग’ करणार 500 कोटींचा मद्य निर्मितीचा प्रकल्प


पुणे-अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्याेगिक वसाहतीतील “जपानी इंडस्ट्रीज पार्क’ मध्ये “कार्ल्सबर्ग’ हा मद्य निर्मितीचा उद्याेग ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ३२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ५०० जणांना राेजगार उपलब्ध हाेईल. त्यासाठी या उद्याेग समूहाकडून जागेचा आलेला प्रस्ताव हा मुंबई येथील औद्याेगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला. दरम्यान, गेल्या ७ महिन्यात या औद्याेगिक वसाहतीत २ हजार १३५ काेटींची गुंतवणूक या औद्याेगिक वसाहतीत झाली आहे.

सुपा औद्याेगिक वसाहतीत ५ नाेव्हेंबर २०१८ ला चीनच्या कॅरियर मायडिया या होम अप्लायन्सेसच्या पहिल्या उद्याेग समूहाच्या कामाचे भुमिपूजन झाले हाेते. गेल्या ८ वर्षांत या वसाहतीत आंतराष्ट्रीय स्तरावरील चीन, जपान या देशांसह भारतातील माेठ्या उद्याेगांनी ३३ उद्याेगांनी गुंतवणूक केली. गेल्या ७ महिन्यात सुपा औद्याेगिक वसाहतीत २ हजार १३५ काेटींची गुंतवणूक झाली. यामध्ये श्रीलंकेचा किक्रेटर मुथ्यया मुरलीधरनच्या “सिलॉन ब्रव्हरेजेस’ या उद्याेगाने १ हजार ६४५ काेटींची गुंतवणूक केली. तर पश्चिम बंगाल राज्यातील काेलकत्ता येथील एसपीएमएल इन्फ्रा या उद्याेगाने ५०० काेटींची गुंतवणूक केली. त्यानंतर आता “कार्ल्सबर्ग’ हा बिअर निर्मितीचा उद्योग सुरू होणार आहे. “कार्ल्सबर्ग’कडून छत्रपती संभाजीनगर येथील औद्याेगिक वसाहतीतदेखील बिअर निर्मिती होते. आता अहिल्यानगर जिल्ह्यात हा प्रकल्प येत असल्याने स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. यामुळे अर्थिक उलाढालही होणार आहे.

“कार्ल्सबर्ग’कडून सुपा औद्याेगिक वसाहतीत ३२ एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव आला. ५०० काेटींची गुंतवणूक हा उद्याेग समूह करणार आहे. त्यातून ५०० जणांना राेजगार मिळणार आहे. जागेच्या मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो मुंबई येथील औद्याेगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. त्यानंतर जागेबाबत निर्णय घेतला जाईल. – गणेश राठाेड, प्रादेशिक अधिकारी

अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यातील चाकण, शिक्रापूर, रांजनगाव या औद्याेगिक वसाहतीत उद्याेगांसाठी जागा उपलब्ध हाेत नसल्याने तेथील उद्याेगांनी सुपा औद्याेगिक वसाहतीचा पर्याय निवडला आहे. त्याचबराेबर छत्रपती संभाजीनगर औद्याेगिक वसाहतीत जागेचा प्रश्न आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या महामार्गावरच सुपा औद्याेगिक वसाहत असल्यामुळे तेथील उद्याेगांसाठी सुप्यातील “जपानी इंडस्ट्रीज पार्क ठरणार सुवर्णमध्य ठरणार आहे. आगामी काळात या एमआयडीसीमध्ये अनेक मोठे प्रकल्प येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

चिमुरड्याला सुरतहून मुंबईमध्ये आणून केला खून, आरोपी मृताचा मावस भाऊ:मुंबईत रेल्वे शौचालयात 7 वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह कचरापेटीत कोंबला

बिहारच्या नरापराधाने केली अमानुष हत्या

मुंबई-मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी कोचच्या शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावर शनिवारी ही घटना उघडकीस आली. आरोपीने मुलाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह कचरापेटीत टाकून पळ काढला. या प्रकरणी बिहारच्या २६ वर्षीय विकास साहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत मुलाचा नात्याने मावस भाऊ असल्याचेही समाेर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश साहा हा गुजरातमधील सुरतच्या अमरेली येथून बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार अमरेली पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचे अपहरण केल्याचा संशय विकास याच्यावर होता. त्यामुळे अमरेली पोलिस विकासच्या मोबाइल लोकेशनचा मागोवा घेत होते. त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईत आढळले. विकास साहा दोन आठवड्यांपूर्वीच बिहारहून कामाच्या निमित्ताने सुरत येथे आला होता. पीडित मुलाची आई घरात एकटीच राहत होती. तिने विकासला तिच्या घरी येण्यास मनाई केल्यामुळे तो नाराज होता. मात्र, अद्याप याची पुष्टी झाली नाही.

आकाशची त्याचा मावस भाऊ विकाससोबत खूप गट्टी जमली होती. त्यामुळेच तो त्याच्यासोबत सुरतहून मुंबईला आला. त्याला हे माहीत नव्हते की त्याचा मावस भाऊच त्याचा मारेकरी ठरणार आहे. सुरतहून रेल्वने विकास मुंबईतील दादर स्थानकावर उतरला. त्यानंतर लोकल ट्रेनने तो एलटीटीला पोहोचला. एलटीटी स्थानकावर त्याने कुशीनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक २२५३७) पाहिली. नंतर त्याने आपला कट पूर्ण करण्यासाठी एसी कोच बी २ मध्ये प्रवेश केला आणि तेथेच त्याने आकाशची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह त्याने कचरापेटीत टाकून पळ काढला. याप्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

भारतीय ज्ञान परंपरा ब्रिटिशांनी दडविली : निलेश ओक

पुणे : भारतीय वेदशास्त्र म्हणजे एक ज्ञानपरंपरा असून ते अनंत आहे. वेदशास्त्रात शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प असे सहा विभाग असून यातील ज्योतिष हे कालगणनेसाठी वापरले जाते. भारतीय संस्कृतीनुसार इतिहास याचा अर्थ विशिष्ट परिस्थितीचा अथवा घटनेचा सखोल अभ्यास असा होय. आधुनिक विज्ञानातील शोध हे आपल्या भारतीय ज्ञान परंपरेने जगाला दिले आहेत. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतीय ज्ञान परंपरेचे भांडार, खजिना प्रयत्नपूर्वक दडवून ठेवण्यात आला. सूर्य सिद्धांतात जे सांगितले गेले ते आजही आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे कळलेले नाही, असे प्रतिपादन रामायण-महाभारताची साधार कालनिश्चितीकर्ते निलेश ओक यांनी केले.

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी (दि. 23 ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. समारोप समारंभात ‌‘प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र‌’ या विषयावरील व्याख्यानात निलेश ओक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या अध्यक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक होत्या. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, वे. शा. सं. विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, उपाध्यक्ष डॉ. मल्हार कुलकर्णी मंचावर होते.

महाभारत व रामायणातील खगोलशास्त्रीय निष्कर्षांचे विश्लेषण केल्यास भारतीय प्राचीन घटनांच्या काळाचे आकलन होते, असे सांगून निलेश ओक म्हणाले, भारतीय ग्रंथांचे पुरावे देऊन दोन लाख 20 हजार वर्षांपूर्वीचा इतिहासही अभ्यासला जाऊ शकतो. शब्द अथवा उपमान, अनुमान, प्रत्यक्ष, आगम या पद्धतीने प्रमेये मांडल्यास महाभारत, रामायण यांचा कालावधी समजून घेता येतो. श्रद्धेची शहानिशा करत आपल्यातील जिज्ञासा जागृत ठेवून अभ्यास केल्यास वेदशास्त्रामध्ये कालगणनेचे अनेक पुरावे आढळतात. यात ग्रह नक्षत्रांची मांडणी महत्त्वाची ठरते. भारतीय खगोल शास्त्र हे अतिशय पुरातन शास्त्र असून यातील सूर्यसिद्धांत, नक्षत्रांची स्थिती, अक्षांश-रेखांश यांचा अभ्यास केल्यास कालखंड जाणून घेण्यास मदत होते. सूर्य सिद्धांतातील पाचशे श्लोकांद्वारे भारतीय खगोलशास्त्र समजून घेता येते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, भारतीय ज्ञान परंपरा समजून घेणे ही काळाची गरज असून भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासाठी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या माध्यमातून अखंडितपणे कार्य केले जात आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेविषयी पदवी, पदव्युत्तर, विद्यावाचस्पतीपर्यंतचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. खगोलशास्त्रीय दृष्टीकोन विस्तारण्यास निलेश ओक यांच्या व्याख्यानातून मदत झाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या वेळी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या सुवर्णमहोत्सवी ‌‘स्मृतिगंध‌’ या स्मरणिकेचे, वेदशास्त्रोत्तेजक सभेचे माजी कार्यवाह कै. परशुराम परांजपे यांनी लिहिलेल्या ‌‘सम्मानपत्रसमुल्लास: ‌’ तसेच डॉ. ज्योत्स्ना खरे लिखित ‌‘सार्थ श्रीविष्णुसहस्रनाम‌’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‌‘स्मृतिगंध‌’ स्मरणिकेचे संपादक सु. गो. पाटील, श्रद्धा परांजपे उपस्थित होते. प्रकाशनांविषयी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे कार्यवाह अविनाश चाफेकर यांनी माहिती दिली.

वेदशास्त्रोत्तेजक सभेतील निवडक पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा परिचय वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पुंड यांनी केले तर आभार भगवंत ठिपसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वेदमूर्ती श्यामसुंदर धर्माधिकारी यांनी सादर केलेल्या वैदिक राष्ट्रगीताने झाली.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु …

पुणे- येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे , यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सहाय्याने पुणे महापालिका नेमका आराखडा तयार करत असून याबाबत केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन या कामकाजाची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याची सूचना केली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन, विमानतळ संचालक संतोष ढोके, सीएडीओ एअरफोर्स कुलदीप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच रस्ते अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.

यावेळी पुणे विमानतळ परिसराच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामासंदर्भात आज भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), हवाई दल आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मोहोळ यांनी रस्त्यांचे रुंदीकरण, फुटपाथ विकास, सांस्कृतिक वारसा संवर्धन तसेच एकूणच विमानतळ परिसराचे सौंदर्यीकरण याबाबत सविस्तर चर्चा केली .संरक्षण मंत्रालयाने या कामांसाठी पुणे महापालिकेला कामाची परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे विमानतळ परिसरातील प्रवेशमार्ग अधिक सुकर आणि आकर्षक होणार आहेत.असा दावा या बैठकीनंतर मोहोळ यंनी केला आहे.

पोलीस आयुक्तांची फिल्डिंग …

पुणे शहर पोलीसांतर्फे गणेश उत्सव २०२५ दरम्यान गणेश मंडळात येणा-या गणेश भाविकांच्या सुरक्षेकरीता व पोलीस बंदोबस्त यांचे चांगले नियोजन करीता यावे यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्वतः इतर पोलीस अधिक-यांसोबत पायी फिरून शहरातील मध्यभागातील मानाच्या व महत्वाच्या तसेच मध्या भागातील गणेश मंडळांना भेट दिली व गणेश मंडळांचे मंडप, वाहतुक आणि बंदोबस्त याची पाहणी केली.


पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी गणेशोत्सव साजरा करणे बाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या. पोलीस अधिका-यांना गर्दी व वाहतुकीच्या नियोजनाबाबत सुचना दिल्या. तसेच गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश उत्सव २०२५ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम

काश्मीरमधील गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा पुण्यात निर्धार
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान
युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

पुणे ; – काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सध्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात व्यक्त केला.

काश्मीरमधील लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गतवर्षी तीन ठिकाणी हा उत्सव साजरा झाला. यावर्षी पुन्हा तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. केसरीवाडा गणपतीची मूर्ती लाल चौक गणपती मंडळांकडे तर अखिल मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती श्रीनगरमधील इंदिरानगर मंडळाकडे आणि साऊथ काश्मीरमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळांचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात, केसरी गणपतीचे अनिल सपकाळ, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळांचे विनायक कदम, जोगेश्वरी मंडळांचे प्रसाद कुलकर्णी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह काश्मीरमधील मोहित भान, संदीप रैना, सनी रैना, अमित कुमार भट, संदीप कौल, शिशान चकू, उदय भट हे गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीनगरमधील लाल चौकातील गणपती यार मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी पुनीत बालन यांच्यासमवेत काश्मीरमध्ये पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि पहिल्याच वर्षी दीड आणि पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गेल्या वर्षी तीन ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही हा उत्सव साजरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पुढील वर्षी पाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे आमचे नियोजन आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने काश्मीरी पंडित पुन्हा पूर्वीसारखे सुखा समाधानाने तिथे रहावेत अशीच आमची प्रार्थना आहे.’’


‘‘पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव १७५ देशात साजरा होतो, पण आपल्या काश्मीरमध्ये १९८९ नंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नव्हता. ही कसर गेल्या दोन वर्षांपासून भरून काढण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना पुण्यातील मंडळांनी आणि काश्मिरमधील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळंच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आता भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मिरमध्येही होणार याचं समाधान वाटतं. त्यासाठी सहकार्य करणारे पुण्यातील मंडळं आणि काश्मिरमधील कार्यकर्ते या सर्वांचे मनःपूर्वक आभार!’’
– पुनीत बालन
(उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.)

महाराष्ट्रातील 1 कोटी बहीणींना लखपती दीदी करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपातर्फे ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राखी प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न

मुंबई- लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत पण महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठविलेल्या हजारो राख्या सुपूर्त करण्याचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानपूर्वक स्वीकारल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे, कालीदास कोळंबकर, अमित साटम, संजय उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुलभा गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. संजय केनेकर, माधवी नाईक, राजेश पांडे, ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे, नीता केळकर, प्रा. वर्षा भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यभरातील बहीणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहीणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही, निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतिक आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहीणींच्या प्रेमाची दखल घेतली. लाडक्या बहीणींच्या मताला व्होट चोरी म्हणणारेच सर्वात मोठे चोर आहेत अशी प्रखर टीका श्री. फडणवीस यांनी केली. व्होट चोरी म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे, बुद्धी चोरी गेली आहे. माझ्या लाडक्या बहीणींना विनंती आहे की अशा निर्बुद्धांसाठी 25 टक्के आशीर्वाद मागा जेणे करून त्यांना अक्कल येईल. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात ना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. महाराष्ट्रात जी यांची गत झाली तीच गत बिहारमध्ये होणार आहे. मातृशक्ती मोदीजींच्या पाठीशी आहे. बहीणींची मान अभिमानाने उंचावेल असेच कार्य आम्ही करू. देश, राज्य, समाज हितासाठी काम करू. तुमचे प्रेम आशीर्वाद असेच मिळो, प्रेम मिळाले तर महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवू अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जाऊन दिवसाचे 18 तास केवळ महाराष्ट्र आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न करतो अशा लाखमोलाच्या भावाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखी भेट द्यायला हवी या विचाराने हा राखी प्रदान सोहळा आखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 36 लाख 78 हजार राख्या राज्यभरातून आल्या. महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी देवाभाऊंनी अविरत केलेले काम सर्वापर्यंत त्यांच्या भगीनींनी पोहोचवायला हवे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी आ. चित्रा वाघ म्हणाल्या की देवाभाऊंच्या संकल्पनेनुसार महिलांच्या हाताला काम मिळून दाम मिळावे यासाठी महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या. हा देवाभाऊ लाडक्या बहिणींच्या भल्यासाठी नेहमी झटत असतो. असा भाऊ मिळणे म्हणजे भाग्य आहे. यशवंत, किर्तीवंत व्हा या शुभेच्छा त्यांनी दिल्या. जो निर्णय देवाभाऊ घेतील तो निर्णय तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महिला मोर्चाची आहे अशी ग्वाहीही दिली.
यावेळी श्री. शेलार म्हणाले की, हा मेळावा भावनिक आणि नाते जपणारा कार्यक्रम आहे. लाडक्या बहिणींची सदैव काळजी करणारा देवाभाऊ आणि त्यांच्या बहिणींचे नाते अनोखे आहे. मुंबई, मराठी वरून राजकारण करणारे आणि देवाभाऊ यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारण करणारी मंडळी आज भावाभावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरातील बहीणीला मतदार म्हणून नाही तर बहीण म्हणून बघणारा भाजपा आहे. त्या बहीणींच्या हितासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य स्तरावर आज आखल्या जात आहेत.

बहीणींच्या आशीर्वादाने 2029 साली ही आमचेच सरकार येणार
बहिणींच्या प्रेमाचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मला लाभली असे नमूद करीत श्री. फडणवीस यांनी बहिणींच्या आशीर्वादाने 2029 मध्येही आमचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात महायुती सरकार महिला सहकारी संस्थांसाठी डेडीकेटेड काम मिळायलाच हवे यासाठी त्यांना हिस्सेदारी व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

खेळाडूंसाठी धावले महाराष्ट्राचे मंत्रीकॅनडाला रवाना होण्यासाठी भारतीय संघांचे विमाना १५ ऑगस्‍ट रोजी होते. परंतु एअर कॅनडाचा संप झाल्यामुळे भारताच्या संघ 4 दिवस विमानतळावरच अडकून पडला होता. भारतीय तिरंदाजी संघटना आणि साईने यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर महाराष्ट्राचे केंद्रिय राज्‍यमंत्री रक्षाताई खडके आणि मुरलीधर मोहोळ खेळाडूंच्‍या मदतीला धावले. या मराठमोळ्या मंत्र्यांच्‍या प्रयासाने प्रयत्न खेळाडूंना वेळेवर कॅनडाला रवाना झाले. संघाचे मार्गदर्शक रणजीत चामले हे स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता कॅनडात पोचलले. नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली केल्‍याने क्रीडा मंत्रालय व साईकडून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

पुणे ः कॅनडा येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्‍या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे.
अमेरिकेच्या संघाचा ६-० ने दणदणीत विजय नोंदवून १८ वर्षांखालील रिकरर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्यपदकाचा पराक्रम केला आहे. पात्रता फेरीत भारत चौथ्या स्‍थानावर होता. उपउपांत्‍यपूर्व फेरीत मेक्सिको संघावर ६-० ने सेटने पराभव करून स्‍पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्‍यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघाचा 5-3 सेटने पराभव भारताने उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली. ६-२ सेटपर्यंत लढत रंगली. अखेर 1 गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.
कांस्य पदकाच्‍या लढतीत अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. ५५-५३, ५९-५६,५५-५२ गुणांसह ६-० सेटने भारताने ऐतिहासिक कांस्य पदकाचर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा रणजित चामले हे या संघांचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्‍या प्रोत्‍साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्‍या गाथा खडके हीने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्‍या गाथा खडके, पुण्याच्‍या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्‍या जियाना कुमार हीचा समावेश होता.

टाटा क्लिक लक्झरीच्या विशेष भागीदारीत सब्यसाचीने सादर केले संपूर्ण भारतासाठी डिजिटल बुटिक

हे डिजिटल बुटिक २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू होईल; यात सब्यसाची कलकत्ताकडील १८ कॅरेट सोन्यात घडवलेला, व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, नैसर्गिक मोती, मौल्यवान रत्ने आणि ब्रँडच्या खास कारागिरी यांनी सजलेला फाइन ज्वेलरीचा निवडक संग्रह सादर केला जाईल.

पुणे : टाटा क्लिक लक्झरी या भारतातील लक्झरी लाइफस्टाइलच्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मने देशातील पहिले डिजिटल ज्वेलरी बुटिक सुरू करण्यासाठी सब्यसाची कलकत्ता या भारतातील प्रमुख लक्झरी ब्रँडशी विशेष भागीदारी जाहीर केली आहे. परंपरेची सांगड आणि डिजिटल नवकल्पना यांचा अनोखा संगम या भागीदारीत असेल. त्यामुळे सब्यसाचीचे अप्रतिम कारागिरीचे नमुने अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या चिरंतन लक्झरीच्या वारशाला साजेसे राहतील.

हे बुटिक २१ ऑगस्ट २०२५पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे . सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचा सर्वांत मोठा संग्रह यामध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल. १८ कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेल्या या संग्रहात कोलकात्याच्या सुप्रसिद्ध अटेलिअरमधून आलेल्या विविध फाइन ज्वेलरी कलेक्शन्सचा समावेश आहे.

यातील रॉयल बंगाल हेरिटेज गोल्ड कलेक्शनमध्ये शुद्ध सोन्यात कोरलेले बंगाली वाघाचे प्रतीकचिन्ह आणि पारंपरिक सब्यसाची मंगळसूत्र यांचा समावेश आहे. रॉयल बंगाल डायमंड कलेक्शनमध्ये व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, मौल्यवान रत्ने आणि नैसर्गिक स्टोन चार्म्स जडवले आहेत. रॉयल बंगाल पर्ल सीरीजमध्ये नैसर्गिक, कल्चर्ड आणि‘साउथ सी मोत्यांचा समावेश आहे. सुंदरबन कलेक्शन या संग्रहात इतिहासात डोकावणाऱ्या प्राचीन हस्तकलेचे ज्ञान फुलाफळांच्या रूपात खुलणारे आहे. टायगर स्ट्राईप आणि शालिमार कलेक्शन्स ही १८ कॅरेट सोन्यात लॅकरची कलात्मक झाक देऊन तयार करण्यात आलेली आधुनिक प्रतीके आहेत. टायगर आय गटात हिरेजडित बंगाली वाघाचे प्रतीक आहे. इतर उत्पादनांच्या यादीत इअरिंग्स, लॉकेट्स, ब्रेसलेट्स आणि अंगठ्या आहेत. हे सर्व दागिने दैनंदिन वापरातील सौंदर्य लक्षात घेऊन घडवलेले आहेत.

एखाद्या खास प्रसंगासाठीची खरेदी असो, वैयक्तिक स्टाईलसाठी असो किंवा मनापासून द्यावयाच्या भेटीसाठी असो, टाटा क्लिक लक्झरीच्या ग्राहकांना सब्यसाचीच्या या विविध उत्पादनांच्या खरेदीचा खास वैयक्तिक अनुभव जाणकार तज्ज्ञांच्या मदतीने घेता येईल.

सब्यसाचीच्या सादरीकरणाविषयी बोलताना टाटा क्लिक लक्झरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल आस्थाना म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीमध्ये आम्ही भारतीय, तसेच जागतिक लक्झरीचा उत्सव साजरा करतो. जगातील सर्वोत्तम लक्झरी ब्रँड्सची जपून निवड करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला आणखी बळकटी देणारे हे सब्यसाचीचे सादरीकरण आहे. अप्रतिम कारागिरीसाठी आणि भारतीय परंपरेशी घट्ट नात्यासाठी सब्यसाची प्रसिद्ध आहे. हा ब्रॅंड पारंपरिक सौंदर्यशास्त्र आणि जागतिक आकर्षण यांचा अनोखा संगम सादर करतो. सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचे आमच्या प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत असल्यामुळे आमच्या लक्झरी ज्वेलरी संग्रहाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे. देशातील टियर-२ व टियर-३ शहरांतील कलासक्त ग्राहकांसह संपूर्ण भारतात हा प्रतिष्ठित ब्रँड आम्ही पोहोचवीत आहोत. भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म आणि देशातील सर्वाधिक गौरवशाली डिझायनर या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळे डिजिटल युगातील फाइन ज्वेलरी अनुभवाची नवी व्याख्या या विशेष भागीदारीतून परिभाषित होत आहे.”

सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे संस्थापक व क्रिएटिव्ह डायरेक्टर सब्यसाची मुखर्जी म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर सब्यसाची फाइन ज्वेलरी सादर करताना मला अभिमान वाटतो. ज्यामुळे आमचा ब्रँड सदैव लोकांच्या मनात घर करून आहे, त्याच गाभ्याने, तेवढ्याच चिरंतन उच्च मानकांनी आणि तेवढ्याच विलक्षण मूल्यदृष्टीने हा संग्रह साकारला आहे. आमची किंमत स्वप्नवत नाही, तर वास्तवाशी जोडलेली आहे. सुसंस्कृत, परंपरांशी निगडित आणि चिरंतन ही मूल्ये ग्राहकांना ‘सब्यसाची हाऊस’कडून अपेक्षित असतात, ती सर्व या कलेक्शनमध्ये समाविष्ट आहेत. भारतात आपण किंमतींबद्दल बरेच बोलतो, पण मूल्याबद्दल फारसे बोलत नाही. तुम्ही लोकांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टता देता, तेव्हा त्यांना त्यातील फरक जाणवतो, हा माझा विश्वास आहे.”

सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष चोप्रा म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर आमच्या फाइन ज्वेलरी लाईनचे पदार्पण होणे हा सब्यसाचीसाठी एक नवा रोमांचक अध्याय आहे. दोन दशकांहून अधिक काळ हा ब्रँड आपल्या प्रामाणिकतेसाठी, कारागिरीसाठी आणि शाश्वत मूल्यांसाठी ओळखला जातो. आता आमची ज्वेलरी ऑनलाइन लक्झरी रिटेलच्या जगात आणून आम्ही आमचे अटेलिअर्स आणि देशभरातील घरे यांच्यातील अंतर मिटवत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला सब्यसाचीच्या मूल्यांचा अनुभव घेता येईल आणि ती मूल्ये आत्मसात करता येतील. अप्रतिम गुणवत्ता असलेली आमची फाइन ज्वेलरी आणि विचारपूर्वक ठरवलेल्या त्यांच्या किंमती, असा हा लक्झरीच्या जगात दुर्मिळ असलेला सुंदर मिलाफ आहे. टाटा क्लिक लक्झरीचे नवे दार उघडताना, आमची ज्वेलरी नवीन घरांमध्ये पोहोचेल आणि देशभरात नव्या कथांनी फुलेल, हे पाहण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे.”

सब्यसाचीच्या प्रतिष्ठित फाइन ज्वेलरीचे कलेक्शन २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरीवर उपलब्ध आहे .

मनोहारी नृत्याविष्काराने रंगले १७० कथक नृत्यांगनांचे ‘आवर्तन’

पुणे: चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्रा… कलात्मक व लयबद्ध हालचाली… घुंगरांचा तालबद्ध नाद… अशा मनोहारी नृत्याविष्काराने कथकचे ‘आवर्तन’ रंगले. निमित्त होते, कथक नृत्याविष्काराची अनुभूती देणाऱ्या, ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘आवर्तन २०२५’ कार्यक्रमाचे! कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

कथक नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांच्या ‘लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडिया’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त या नेत्रदीपक व हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या उपस्थितीत १७० कथक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केले. लहानग्यांनी ‘मैत्री असावी अशी’ या कवितेवर सादर केलेले कोमल, उमलत्या पदन्यासांचे नृत्य विशेष दाद मिळवून गेले. राग बिहाग, बागेश्री आदींच्या आल्हाददायक सुरावटींवर ‘गुरु वंदना’, ‘गगन सदन’, ‘रसिले रंगीले’, ‘निज रे’, ‘दशावतार’ यांसारख्या नृत्यरचना सादर होताच सभागृह मंत्रमुग्ध झाले.

वेदांती भागवत महाडिक यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण नृत्यरचना सादर करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शास्त्रीय बंदिशी, शिववंदना, गणेशवंदना, धृपद, चतुरंग, त्रिवट तराणा, तसेच तीनताल यासारख्या विविध अंगांचे सादरीकरण झाले. प्रत्येक नृत्यरचना ताल-लयबद्ध पावले, ठेक्यांची नजाकत आणि भावनांची अभिव्यक्ती यामुळे उठून दिसली. या सर्जनशील रचनांमधून प्रेक्षकांना कथकनृत्याची विविध रूपे अनुभवायला मिळाली. अभिजित पाटसकर (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), मयूर महाजन (गायन), मुक्ता जोशी (गायन), यश सोमण (तबला) आणि अपूर्व द्रविड (पखवाज) यांनी साथसंगत केली. प्रशांत कात्यायन यांनी निवेदन केले.

पं. राजेंद्र गंगाणी यांनी नृत्यांगनांच्या मेहनतीचे कौतुक केले. “इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी एकाच मंचावर कथकातील अंगांचा सुसंवाद साधून नृत्य सादर करणे अद्वितीय आहे. लयोम इन्स्टिट्यूटने पुण्यात कथक संवर्धनासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. तरुणाईला शास्त्रीय कलेशी जोडण्याचा प्रयत्न यातून होतो आहे, हे भविष्याच्या दृष्टीने आनंददायी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या मागील १५ वर्षांत चार विद्यार्थिनींना केंद्र सरकारकडून ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांत पारितोषिके मिळाल्याचे वेदांती भागवत महाडिक यांनी सांगितले. अक्षय महाडिक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध

ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशन आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव
पुणे : सुप्रसिद्ध बासरी वादक, गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली बासरी वादनातील अनोखी रूपरंगी जुगलबंदी, कोलकाता येथील गायक पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी सादर केलेले मल्हार रागातील अप्रचलित प्रकार आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय सोहोळा रंगला.
निमित्त होते रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाचे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकाच बासरीवादकाने दोन तबला वादकांच्या साथीने केलेले वादन, त्यात दोन स्वतंत्र राग आणि दोन वेगळे ताल यांच्या माध्यामातून रंगत गेलेली सूर-तालाची अनोखी जुगलबंदी कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरली. या रूपरंग जुगलबंदीत पंडित रूपक कुलकर्णी यांना ज्येष्ठ तबलावादक पंडित मुकुंदराज देव आणि त्यांचे पुत्र रोहित देव यांनी समर्पक साथ करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
पंडित रूपक कुलकर्णी यांच्या अनोख्या संकल्पनेतून ही रूपरंगी जुगलबंदी सादर झाली. त्यांनी भूपाली रागातील रूपक ताल आणि यमन रागतील मत्तताल ऐकविताना केलेले सुमधुर बासरी वादन रसिकांना संमोहित करणारे ठरले. त्यांनतर दोन्ही तबला वादकांच्या साथीने शुद्धकल्याण राग सादर करून रसिकांना स्वरवर्षावात चिंब केले. कार्यक्रमाची सांगता बासरीवादनातील मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या मांझ खमाज या रागाच्या सादरीकरणाने केली. निसर्गात बरसत असणाऱ्या श्रावण धारा आणि त्याचवेळी रंगमंचावर बरसत असणारे बासरीचे स्वर आणि दोन तबलजींच्या तबल्यातून उमटणारे बोल यांच्या अनोखा संगमातून रसिकांना सूरांच्या अवकाशात विहरत ठेवले. मृगेंद्र मोहाडकर, आदित्य सुतार यांनी सहवादन केले.
कोलकाता येथील सुप्रसिद्ध गायक शुभोमोय भट्टाचार्य यांनी मैफलीची सुरुवात राग गौड मल्हारमधील ‘तोरे मुख चंद्र’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुतलयीतील ‘कारे पिरे बदरवा छाए’ ही बंदिश सादर करून ‘तानाना दिर दिर ताना’ हा तराणा बहारदारपणे सादर केला. मल्हार रागातील अभावानेच सादर होणारे अप्रचलित प्रकार ऐकविताना पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी खमाज आणि मल्हार रागांचे मिश्रण असणाऱ्या खमाजी मल्हारमधील ‘रिमझिम रुमझुम बरसे बदरा’ ही बंदिश सादर केली. धूंधिया मल्हार हा अनोखा राग सादर करताना ‘बिजुरी चमके, बदरा गरजे’ ही बंदिश तर बिरजू की मल्हारमधील ‘जंगल बिच बोले मुरवा’ या पारंपरिक बंदिशी ऐकविल्या. त्यांना दिपिन दास (तबला), नचिकेत हरिदास (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
सुरुवातीस मृगेंद्र मोहाडकर यांच्या ६० शिष्यांचे बासरीवादन झाले. यात आठ वर्षे वयाच्या शिष्यांपासून साठ वर्षे वयाच्या शिष्यांचा सहभाग होता.
कलाकरांचा सन्मान पंडित रूपक कुलकर्णी, मृगेंद्र मोहाडकर यांनी केला तर सूत्रसंचालन रजत जोशी यांनी केले.