Home Blog Page 1586

‘स्टँड अप इंडिया- मार्जिन मनी’ योजनाविषयी कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. 30: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्ताने सहायक आयुक्त समाजकल्याण आणि कर्वे समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टँड अप इंडिया-मार्जिन मनी’ योजनेविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका अश्विनी कोकाटे, कर्वे समाजसेवा संस्थेच्या संचालिका डॉ. शमिला रामटेके, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश ठाकूर आदी उपस्थित होते.

श्रीमती डावखर यांनी स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजनेबाबत मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहचवावी. विद्यार्थी व नवउद्योजकांनी नवनवीन उदयोग सुरू करून या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबाबत आवश्यक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

श्रीमती कोकाटे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या बीज सांडवल योजनासह विविध योजनांची माहिती दिली.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट

पुणे दि.३०: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डी.सी.एम.सोसायटी ऑफ इंडियाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयाचीदेखील पाहणी केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी.टी. राजपूत, सरचिटणीस विशाल शेवळे, प्राचार्य डॉ.नरेश पोते आदी उपस्थित होते.

डी.सी.एम.सोसायटी ही संस्था वंचितांना शिक्षण मिळावे यासाठी चांगले कार्य करीत आहे. संस्थेला कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, तसेच इतरही शैक्षणिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतला भेट दिली. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा डॉ. विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, संस्थेच्या मुलींच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबिर्डे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थीनींचे आणि संस्थेचे अभिनंदन करुन मंत्री पाटील म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात मुलींनी चांगली प्रगती केली आहे. मुलींच्या शिक्षणाचे अग्रणी, संस्थापक म्हणून महर्षी कर्वेंनी काम केले. महिला मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात पुढे यायला लागल्या आहेत, असे ते म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, आगामी काळात मुलींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून हे कार्य कर्वे शिक्षण संस्था करीत आहे. संस्थेच्या तुकड्या वाढवणे, एखादी विद्याशाखा वाढवणे यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले. कौशल्य विकासाला आगामी काळात पर्याय नाही. त्यामुळे कौशल्य विकासासाठी एखादा विभाग सुरू करण्यासाठी संस्थेने विचार करावा, अशी सूचनाही श्री. पाटील यांनी केली.

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि: ३० : सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  केले आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. 8 मार्च 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे)

नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधित किंवा अनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर – पारंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरित्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाऊ शकते. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरीलप्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in किंवा www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर दि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव फक्त ऑनलाईनद्वारेच स्वीकारले जातील, असे मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
  • शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धा घोषित

मुंबई दि.३० :- स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

यावेळी स्वच्छ  महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० – कचरामुक्त शहरे या तसेच घनकचरा आयसीटी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत सहकार्य करणाऱ्या संस्थांशी सहकार्य करारांची देवाण – घेवाणही यावेळी झाली. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत शहरांसाठी शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मान्यवरांनी यावेळी स्वच्छता अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची तसेच विविध प्रकल्प व यंत्रणांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानेच गाव आणि शहरांचा विकास होतो हे आपण पाहिले आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गावागावांत स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करणारे स्वच्छतादूत हेच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत. देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असून इच्छाशक्तीद्वारेच ही कामे साध्य होऊ शकणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राज्यात सुरू होत आहे. या अभियानाद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे  मुख्य उद्दिष्ट आहे.  यापुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावरही भर द्यावा लागेल. याद्वारे महापालिकांना उत्पन्नही मिळू शकेल. नागपूर महापालिकेने यासंदर्भात सर्वोत्कृष्ट काम केले आहे.

सर्व प्रकारचा कचरा ही आता समस्या नसून हाच कचरा आता भांडवल ठरणार आहे. घनकचरा तसेच या सर्वच प्रकारच्या कचऱ्याच्या सुनियोजित व्यवस्थापनाद्वारे खत निर्मिती आणि अन्य बाबीही उत्पादित होऊ शकतात. उल्हासनगर महापालिकेने राबविलेला गटार स्वच्छतेसाठीचा रोबो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारची नाविन्यपूर्ण कामे आणि उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० याअंतर्गत राबविण्यात यावीत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० मधील कामे टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीचीच झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

९० दिवसात मुंबईचा कायापालट

येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे अभियानही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत ४५० रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले.

कचरामुक्तीव्दारे शहरांचा पूर्णपणे कायापालट करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहरीकरण हा अभिशाप नसून शहरीकरणाचे आता सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शहरे ही विकासाची केंद्र असून शहरातच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. स्वच्छतेत राज्य नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्र राज्य २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाले. यापुढील काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील. कचरा व्यवस्थापनात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागेल. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) 2.0 अंतर्गत राज्यातील नागरी भागाचा कायापालट करण्यात येणार आहे. या टप्प्यात आता राज्यातील सर्व नागरी भागांचा समावेश असणार आहे. याद्वारे पूर्णपणे नगरोत्थान होईल. स्वच्छता अभियानात छोटी शहरेही चमकदार कामगिरी करत आहेत. या बऱ्याच शहरात घनकचरा व्यवस्थापन अतिशय व्यवस्थितपणे केले जाते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) २.० मध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे. अभियानातील कामांमध्ये उत्तरदायित्व महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानात सर्वांनी अत्यंत तळमळीने काम करावे. कामात पारदर्शकता ठेवावी. आपल्याला उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि वापरण्यावर भर द्यावा.

पीपीपी मॉडेलद्वारेही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यामध्ये खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत आपल्याला शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी म्हणाल्या, स्वच्छ महाराष्ट्र अभियान  नागरी (२.०) अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे कचरामुक्त शहरांकडे वाटचाल करायची आहे. महाराष्ट्र २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाला. नवीन टप्प्यांमध्ये वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, आकांक्षी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कच-यावर प्रक्रिया करणे व क्षमताबांधणीचे उपक्रमही घेण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमचे महासंचालक राधेशाम मोपलवार यांनी वॉररूमबद्दल माहिती दिली. श्री मोपलवार म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमव्दारे महत्त्वाच्या योजना, प्रकल्प यासंदर्भात धोरणात्मक विचार व समन्वयन करण्यात येते.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०

  • केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राबविण्यास मान्यता. शासन निर्णय दिनांक १५ जुलै, २०२२.
  • या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शहरे कचरामुक्त करणे अभिप्रेत असून त्यानुसार घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचरा संकलीत करणे, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर १०० टक्के वैज्ञानिक प्रक्रिया करणे, जुन्या साठलेल्या कचऱ्यावर १०० टक्के उपाययोजना व त्या जागेचे हरित झोनमध्ये रुपातंरण करण्यात येऊन सर्व शहराकरिता कचरा मुक्तीची ३ स्टार मानांकन प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • या अभियानांतर्गत घरोघरी वैयक्तिक शौचालयाचे उभारणी, आकांक्षी सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येऊन वापरलेल्या पाण्यावर १०० टक्के शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येऊन सर्व शहरांनी ओडीएफ ++ व एक लाख लोकसंख्येखालील शहरांमध्ये किमान ५० टक्के शहरांनी वॉटर + प्रमाणीकरण प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • या अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी राज्य शासनाने रु. १२, ४०९ कोटीचा आराखडा मंजूर केला असून या अभियानातंर्गत सन २०२६ पर्यंत वैयक्तिक शौचालये १,८८, ३३४, सामुदायिक शौचालये १६,९०५ सीट्स, आकांक्षी शौचालये ३,२२८ सीट्स सार्वजनिक शौचालये ४,२९२ सीट्स व ६,८३० मुताऱ्या बांधण्यात येणार आहेत. वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन या घटकात १०,०५६ कि.मी. भूमिगत गटाराची बांधणी, नाला अडवणे व वळवणे, यामध्ये नाले १८२३ कि.मी. व १६५६ द. ल. प्र. दि. इतक्या क्षमतेचे मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १०० टक्के प्रक्रिया करणे, सर्व जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
  • दि. ०२ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत ९० दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या प्रभाग व शहरांना बक्षीसे देण्यात येणार आहेत. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या प्रथम ३ शहरांना अनुक्रमे रु. १५ कोटी, रु. १० कोटी व रु. ५ कोटी इतक्या रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत.

पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 30 : निसर्गचक्रात पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेतली तरच मानवी जीवन सुखी होवू शकते, यासाठी  पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवनातील दरबार हॉल येथे समस्त महाजन संघटनेच्यावतीने मुंबई शहरातील पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी 11 अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रुपाला, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आमदार गीता जैन, जैन संघटनेचे गिरीषभाई शहा यांच्यासह जैन समस्त महाजन संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी म्हणाले, खरा वैष्णव तोच आहे ज्याला दुसऱ्याचे दुःख जाण आहे. दुसऱ्यांचे दुःख निवारणासाठी त्याने जरी काही कार्य केले तरीही त्याच्या मनाला गर्वाचा आणि अहंकाराचा स्पर्श देखील होत नाही. याप्रमाणे संघटना काम करीत आहे. अॅम्बुलन्सच्या माध्यमातून वर्षभरात अंदाजे 36 हजार पशु पक्षांचे प्राण वाचू शकतात.

राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्र मुनि महाराज साहेब प्रेरित अबोल जखमी पशुपक्षी यांच्या उपचारासाठी सुरू करण्यात येत असलेल्या 11 अॅम्बुलन्सद्वारे अनेक प्राण वाचतील. पशुपक्षी यांच्या उपचारासाठी जे कोणी काम करीत आहे त्यांचे जेवढे कौतुक करावे ते कमी आहे. कारण पशूंना बोलता येत नसूनही पशुवैद्यांना प्राण्यांना होणाऱ्या वेदना कळू शकतात आणि ते उपचार करतात.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये या उपक्रमाचे कौतुक केले आहे. केंद्र शासनाने देशभरात 5 हजार अॅम्बुलन्स सुरू केले आहेत. या अॅम्बुलन्स चा पुढील खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार 60:40 याप्रमाणे करणार आहे. कोरोना मोफत लसीकरण  करण्यात आले याचे जगात कौतुक करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षांत असे उपक्रम महत्त्वाचे असून समस्त महाजन संघटनेने पुढाकार घेतला त्याबद्दल अभिनंदन करून या संघटनेच्या माध्यमातून देशातील पशुपक्षी यांची सेवा घडत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले राज्यात निसर्ग निर्मित कास पठार या ठिकाणी  हजारो प्रकारची फुलांची झाडे आहेत. वर्षातून दोन महिने विविध रंग, गंध असणारी फुले फुलतात, जगातील असंख्य पर्यटन येथे येतात. या ठिकाणच्या पशुपक्षांची काळजी समस्त महाजन संघटना घेइल असे सांगून पशुपक्षांचीही निगा राखणाऱ्या या संघटनेस शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

समस्त महाजन ट्रस्टचे व्यवस्थापक गिरीश शहा यांनी संघटनेच्या कार्याविषयी प्रास्ताविक केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेशभाई शाह यांनी केले.

शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे स्वागत व सन्मान

पुणे :  शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहितीही जाणून घेतली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आदित्य ठाकरे यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडनंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता देखील मी पुण्यात आली होतो. त्याचप्रमाणे आज नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेण्याकरिता आलो आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे, लोक सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे चांगले वातावरण आहे. देवीसमोर मी नेहमी हात जोडून नमस्कार करतो आणि आशिर्वाद घेतो. त्याप्रमाणे आजही आशिर्वाद घेत आहे.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ढगांच्या गडगडाटांसहित जोरदार हजेरी ;महापालिकेच्या कामाचा पुन्हा पुन्हा पंचनामा ;रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पुणे- सकाळ पासून पडलेले उन , आणि वाढलेला उष्मा यामुळे आज सायंकाळी ‘तो’ बरसेल याची जाणीव अनेकांना झाली होतीच आणि तो आला देखील , कालच्या हून आज जरा जास्त जोराने बरसला आणि पुन्हा महापालिकेच्या कामाचे पंचनामे चव्हाट्यावर मांडले, रस्ते नेहमीप्रमाणे नद्या नाल्यान्पारमाणे दुथादिभारून वाहू लागले आणि पुणेकर त्यातून वाट काढून पुढे निघू लागले दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात अन् विजेच्या कडकडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली.अनेक भागात अवघ्या २० मिनिटांत पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. काही ठिकाणी तर पार्किंगला लावलेलल्या दुचाकी वाहून चालल्या होत्या.


शहरात अचानक सुरु झालेल्या वादळी पावसाने नागरिकात कुठे आनंदाचे तर कुठे भीतीचे तर कुठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाबरोबर येणारे वीज आणि ढगांचे आवाज एक वेगळीच लहर निर्माण करत होते. तसेच सुसाट वाऱ्यामुळे झाडे जोरजोरात एकमेकांवर आदळताना दिसून आली. पावसाच्या भीतीने रस्ते लगेचच सामसूम झाल्याचे दिसून आले. शहरात काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले.

पेपरफ्रायने महाराष्ट्रात पुण्यामध्ये नवा स्टुडिओ सुरु केला

पेपरफ्राय पश्चिम भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये आपले स्थान मजबूत करत आहे

पुणे- सप्टेंबर 30,२०२२: ई-कॉमर्समार्फत फर्निचर आणि इतर घरगुती वस्तूंची विक्री करणारी कंपनी पेपरफ्रायने महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आपला नवा स्टुडिओ सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. निम्न श्रेणीच्या बाजारपेठांमध्ये विस्तार करत भारतभरात घरगुती आणि जीवनशैलीशी निगडित वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये अनेक वेगवेगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने ऑफलाईन विस्ताराचे हे पाऊल उचलले गेले आहे. आज देशभरात ९० पेक्षा जास्त शहरांमध्ये पेपरफ्रायचे १८० पेक्षा जास्त स्टुडिओ आहेत.

पेपरफ्राय स्टुडिओनी भारतात फर्निचर रिटेल उद्योगक्षेत्रात नवे परिवर्तन घडवून आणले आहे.  अनेक वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये विस्ताराच्या कंपनीच्या धोरणाला अनुसरून देशभरात फोफो (स्टुडिओची मालकी व संचालन फ्रँचायझीचे) स्टुडिओ सुरु केले जात आहेत.  सध्या ही कंपनी ९० पेक्षा जास्त भागीदारांसोबत काम करत आहे. ईशान्य ब्रँड सर्व्हिसेस लिमिटेडसोबत भागीदारीमध्ये सुरु करण्यात आलेला नवा स्टुडिओ पुण्यामध्ये पिसोळी रोडवर नारायणदास मोटवानीमध्ये असून त्याचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ २६६० चौरस फीट आहे. पेपरफ्राय स्टुडिओमध्ये ग्राहकांना फर्निचर आणि घरगुती उपयोगाच्या उत्पादनांची विशाल श्रेणी पाहता येते. याठिकाणी ग्राहक कंपनीच्या इंटीरियर डिझाईन कंसल्टंट्सकडून डिझाईनविषयी विशेष सल्ला मिळवू शकतात. महाराष्ट्रातील ग्राहकांच्या घर आणि जीवनशैलीशी संबंधित वस्तूंच्या खास गरजा आणि आवडनिवड समजून त्यांना खरेदीचा व्यक्तिगत अनुभव प्रदान करण्यासाठी पुण्यातील पेपरफ्राय स्टुडिओ तयार करण्यात आला आहे.

पेपरफ्रायच्या बिझनेस हेड – फ्रँचायझिंग अँड अलायन्सेस श्रीमती अमृता गुप्ता म्हणाल्यापुण्यामध्ये ईशान्य ब्रँड सर्व्हिसेस लिमिटेडसोबत आमचा नवा स्टुडिओ लॉन्च करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पेपरफ्राय फ्रँचायझीची मालकी मिळवणे ही बाब व्यवसायामध्ये यश मिळण्यासारखी आहे.  महानगरे आणि प्रथम श्रेणी शहरांच्या बाहेर प्रचंड संख्येने असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे आमचे उद्दिष्ट आहे.  आमच्या फ्रँचायझी भागीदारांमध्ये यशस्वी उद्योजकमहिला उद्योजिकासेनेतील माजी कर्मचारी आणि पहिल्यांदाच व्यवसायात उतरणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक आहेत. आज पेपरफ्रायमध्ये ग्राहकांसोबत संपर्कसंवाद साधताना एआर आणि व्हर्च्युअल प्रोडक्ट इंटरॅक्शनचा उपयोग केला जातो.  जगभरात घर ही भावना निर्माण करवून देण्याच्या आमच्या दृष्टिकोनानुसार आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट ग्राहकसेवा प्रदान करतो.”

पेपरफ्राय पुणे पिसोळीचे मालक श्री जय ससाणे म्हणाले, “घरगुती वस्तू आणि फर्निचरची भारतातील आघाडीची बाजारपेठ पेपरफ्रायसोबत भागीदारी करून आम्ही खूप खुश आहोत. कंपनीने वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये एका अनोख्या व्यवसायाची सुरुवात केली आहे आणि सर्वात मोठ्या ओम्नीचॅनेल होम अँड फर्निचर व्यवसायाच्या निर्मितीमध्ये त्यांची साथ देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”   

पेपरफ्राय फ्रँचायझी बिझनेस मॉडेल २०१७ मध्ये सुरु करण्यात आले. यामध्ये पेपरफ्रायकडून ऑर्डर पूर्ण केल्या जाणे आणि विक्रीपश्चात सेवा दिल्या जाणे, स्टुडिओ डिझाईनमध्ये साहाय्य, लॉन्च आणि सेटअप, संचालनामध्ये मार्गदर्शन, मार्केटिंग, प्रमोशन्स या गोष्टी केल्या जातात. पेपरफ्रायने स्थानिक उद्योजकांसोबत भागीदारी केली आहे ज्यांना स्थानिक स्तरावरील मागणी चक्र आणि ट्रेंड्स यांची खूप चांगली माहिती असते.  पेपरफ्राय दर महिन्याला जवळपास ८ ते ९ फ्रँचायझी लॉन्च करतात.

पेपरफ्रायचा ऑफलाईन विस्तार अजून जास्त वाढवण्यासाठी जून २०२१ मध्ये पेपरफ्राय एक्सेलेटर प्रोग्राम सुरु करण्यात आला.  प्रोग्रामचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँचायझी भागीदाराकडून कॅपेक्सची गरज फक्त १५ लाख रुपयांपासून सुरु होते. हे मॉडेल १००% किंमत समतेवर आधारित आहे आणि यामध्ये भागीदाराने उत्पादनांचा स्टॉक भरून ठेवण्याची गरज नसते, त्यामुळे ही भागीदारी दोघांसाठी फायदेशीर ठरते. 

गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी

पुणे दि.३०-केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली.

एनडीए चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतून चांदणी चौक ते रावेत / किवळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पुल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाच्या आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना श्री.गडकरी यांनी दिले.

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी श्री.गडकरी यांना चांदणी चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सव आणि ‘चेतना’ केंद्राचे उद्धाटन

पुणे दि.३०: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित युवा महोत्सव २०२२ आणि विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या ‘चेतना’ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्वला चक्रदेव, ‘चेतना’ केंद्राच्या प्रमुख डॉ.नलिनी पाटील, समन्वयक डॉ.शितल मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख नितीन प्रभू तेंडुलकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, माणसाला शारीरिक आणि मानसिक गरजा असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणाला संधी देण्यासोबत त्यांच्या सादरीकरणाविषयी त्याला दाद मिळविता यावी यासाठी युवा महोत्सवाची आवश्यकता आहे. एसएनडीटी विद्यापीठ कलेच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहे. परदेशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपले संगीत आणि योग याविषयी आकर्षण आहे. त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी विद्यापीठाला परिश्रम घ्यावे लागतील.

कोविड काळात शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अल्प कालावधीचा जोड अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आली आहे. यामुळे उद्योगजगतात शैक्षणिक पात्रतेबाबत विश्वास निर्माण होईल.

आज परंपरागत शिक्षणाने देशातील जनतेला रोजगार देता येणे शक्य नाही. कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना देश-विदेशात मागणी आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने ‘चेतना’ केंद्राची महत्वाची भूमिका असेल.

आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत असताना, गांभीर्य व पावित्र्याने आपली जबाबदारी सांभाळत असताना त्यांना चांगले शिक्षण देण्याची एसएनडीटी विद्यापीठाची मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला चंद्रपूर येथे केंद्र सुरू करण्यासाठी आणि पुणे परिसर (कँपस) विकासासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालघर येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचनादेखील श्री.पाटील यांनी केली.

कुलगुरू प्रा.चक्रदेव म्हणाल्या, न्यूयॉर्क येथील विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना या विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी मिळेल. ‘चेतना’ केंद्राद्वारे विद्यार्थिनींना सर्व क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. महिला सबलीकरणासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करण्यासोबत विद्यार्थिनींना सर्वांगीण विकासासाठी संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डॉ.मोरे यांनी विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘चेतना’ केंद्राविषयी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे हे केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थीनींसाठी सर्वस्पर्शी व आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.प्रभू तेंडुलकर यांनी प्रास्ताविकात युवा महोत्सवाची माहिती दिली. १९ कला प्रकारात ८०० ते ९०० विद्यार्थिनी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.पाटील यांच्या हस्ते विद्यापीठात कौशल्य विकसन अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘चेतना’ (सेंट्रल फॉर हॉलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नॉव्हल ॲडव्हान्समेंट केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमपूर्वी त्यांनी महर्षी कर्वे कुटीला भेट दिली.

तंबाखू दुष्परिणाम जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना

पुणे, दि.३०: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर, समितीचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा. यासाठी विशेषत: सामाजिक, स्वयंसेवी संस्थेतील प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी. कार्यक्रमाद्वारे व्यापक स्वरुपात जनजागृती करुन नागरिकांपर्यंत तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती पोहचवावी. तंबाखूमुक्त शालेय परिसर करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांच्या समन्वयातून तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करावी अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय प्राथमिक स्तरावर जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याची गरज आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात यावे, असेही ते म्हणाले.

डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विविध कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात ऑगस्ट अखेर 34 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 2 हजार 665 नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 26 प्रशिक्षण सत्रांद्वारे 3 हजार 609 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने 39 नागरिकांवर कारवाई करुन 4 हजार 150 रुपये, पोलीस विभागाकडून 405 नागरिकांवर कारवाई करुन 4 हजार रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली.

पोलीसांकडून ऑगस्टअखेर 1 कोटी 80 हजार रुपयांचा गुटखा जप्त
ग्रामीण आणि शहर पोलिसांनी 2022-23 मध्ये ऑगस्टअखेर 1 कोटी 80 लाख 73 हजार 31 रकमेचा गुटखा, 6 हजार 300 रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले असून सात प्रकरणात गुन्हे दाखल केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत भोई प्रतिष्ठानच्यावतीने लक्ष्मी रस्ता येथील मुख्य गणेशोत्सव मिरवणूकीत ‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’ या विषयावर चित्ररथाद्वारे जनजागृती केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये ३.३४ कोटी ऑर्डर नोंदवल्या गेल्या

खरेदीविक्री करणाऱ्या युजर्सच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६०% वाढ

●       लघु उद्योजकांचा सहभाग ४ पटींनी वाढलापाच दिवसांच्या या सेलमध्ये जवळपास २०,००० विक्रेते लक्षाधीश बनले आहेत.

●       २०२१ च्या फेस्टिव्ह सेलच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मीशोवर विक्रेत्यांच्या नोंदणीमध्ये ३ पट वाढ झाली आहे.

●       सर्वाधिक उत्पादने फॅशनघर व स्वयंपाकघरइलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज आणि सौंदर्य प्रसाधने व वैयक्तिक काळजी या विभागांमध्ये विकली गेली आहेत.

बंगलोरभारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली इंटरनेट कॉमर्स कंपनी मीशोवर २३ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेल आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये या कंपनीने आपली सर्वोत्तम सेल कामगिरी नोंदवली आहे. पाच दिवसांच्या या सेलमध्ये मीशोवर ग्राहकांनी ~३.३४ कोटी विक्रमी ऑर्डर्स नोंदवल्या. गेल्या वर्षीच्या सेलच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या सेलमधील ऑर्डर्स ६८%नी जास्त आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने सर्वात कमी किमतीवर खरेदी करण्याच्या सुविधेचा पुरेपूर लाभ मीशो ग्राहकांनी घेतला आहे.

इंटरनेटमार्फत व्यापाराची सुविधा देशातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावी हे मीशोचे मिशन आहे आणि त्याला अनुसरून तब्बल ६०% ऑर्डर्स देशातील ४+ श्रेणीच्या शहरांमधून दिल्या गेल्या आहेत.  मीशोचे हे यश दर्शवते की परवडण्याजोग्या किमती हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहे. खरेदीविक्री करणाऱ्या युजर्सची संख्या देखील या सेलच्या काळात ६०% नी वाढली आहे. ई-कॉमर्सचा वापर पहिल्यांदा करत असलेले आणि ऑनलाईन खरेदी देखील पहिल्यांदा करत असलेले अनेक ग्राहक यामध्ये आहेत. हिमाचल प्रदेशात ऊना आणि आंध्र प्रदेशात चिमकुरथी पर्यंतपश्चिम बंगालमधील कालिम्पोन्ग ते गुजरातेत भरूच आणि लेह पर्यंत संपूर्ण देशभरात मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलचा दबदबा होता. संपूर्ण भारताच्या सणासुदीच्या खरेदीच्या इच्छा पूर्ण करण्यात मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेलने खूप मोठे योगदान दिले आहे.

मीशोवर संपूर्ण देशभरातून ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या त्यामुळे मीशोवरील लघु उद्योजकांनी या फेस्टिव्ह सेलमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ साध्य केली आहे.  या उद्योगक्षेत्रात प्रथमच मीशोने सादर केलेल्या झीरो पर्सेंट सेलर कमिशन उपक्रमामुळे भरपूर एमएसएमईना डिजिटाईज होण्यात मदत मिळाली आहेत्यांनी या सेलच्या काळात कमिशनच्या १०४ कोटी रुपयांची बचत केली. मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये विक्रेत्यांचा सहभाग गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ पटींनी वाढला आहेयातील ~७५% विक्रेते द्वितीय आणि त्याहीपेक्षा खालच्या श्रेणीतील बाजारपेठांमधील आहेत. सेलमुळे तब्बल २०,००० विक्रेते लक्षाधीश व २४ विक्रेते कोट्याधीश बनले आहेत.

मीशोचे संस्थापक व सीईओ श्री. विदित आत्रे यांनी सांगितलेमीशोच्या ब्लॉकबस्टर सेलने यंदाच्या वर्षी खऱ्या अर्थाने भारताच्या सणासुदीच्या खरेदीच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आपल्या ग्राहकांना सर्वात कमी किमतींना दर्जेदार उत्पादने मिळवून देण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केलेत्याचे हे फलित आहे.  फेस्टिव्ह सेलमध्ये ८०% जास्त ऑर्डर्स २+ श्रेणीच्या शहरांमधून आल्या आहेत. वस्तूंची निवड आणि परवडण्याजोग्या किमती याबाबतच्या ज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि ज्यांना आजवर इंटरनेटवर खरेदीविक्रीचे लाभ मिळू शकलेले नाहीत अशा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. भारतात जिथे इंटरनेटमार्फत व्यापाराची सुविधा अद्याप पोहोचलेली नाही अशा प्रत्येक भागापर्यंत आम्ही पोचू इच्छितो. फेस्टिव्ह सीझनमध्ये मीशोवर लघु उद्योजकांना मिळत असलेले यश पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योजकांना जास्त वृद्धी प्रदान करण्याच्या प्लॅटफॉर्मच्या उभारणीच्या आमच्या प्रयत्नांना आता अजून जास्त बळ मिळाले आहे.” 

यावर्षीच्या सेलमध्ये स्वयंपाकघरात उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंसारख्या विभागांमध्ये ११६% वाढ झाली आहेसौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल विभागात १०९% आणि लगेज व प्रवासादरम्यान लागणाऱ्या ऍक्सेसरीजमध्ये ९९% वाढ झाली आहे. फॅशनघर व स्वयंपाकघरइलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज व सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल या विभागांमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. साड्याब्ल्यूटूथ हेडफोनदुपट्टालिपस्टिकमंगळसूत्रस्मार्ट वॉचेसआर्टिफिशियल प्लांट्स व ज्यूसर्स यासारख्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाली आहे.  या प्लॅटफॉर्मवर ग्राहक मूल्य हा घटक किती महत्त्वाचा मानतात ते यामधून दिसून येते.  

मीशो महा दिवाळी सेल ७ ते ११ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.  कोट्यावधी दर्जेदार उत्पादने सर्वात कमी किमतींमध्ये विकत घेण्याची आणखी एक सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे.  जवळपास ८ लाख विक्रेते आणि ३० विभागांमधील ६.५ कोटी सक्रिय प्रॉडक्ट लिस्टिंग्स यांच्यासह अजून लाखो भारतीय ग्राहकांचे प्रथम पसंतीचे शॉपिंग डेस्टिनेशन बनावे हे मीशोचे उद्दिष्ट आहे. 

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई, दि. २९- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आतापर्यंत सुमारे ३९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित
राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ
● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये

पावसाने केले पुणे महापालिकेचे पितळ उघडे

पुणे- फार वेळ नाही झाला, तास , दोन तास , अर्धा दिवस , रात्रभर असे काही नाही झाले , अवघी काही मिनटात पावसाने पुणे महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे केले. २० मिनिटांच्या अवधीत झालेल्या पावसाने पुण्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.

वंचित विकासतर्फे ‘अभया’ अभियान


पुणे, ता. २९ : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, नवरा सोडलेली, नवऱ्याने टाकलेली, बिना लग्नाची असे शब्द वापरून आपण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेच्या वतीने या महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान हाती घेतले आहे, असे संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीनाताई कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रसंगी संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.
मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, “एकल महिलांच्या बाबतीत बोलताना अनेकदा असे शब्द सहज वापरतो. मात्र, तिच्या मनावर होणाऱ्या आघातांचा आपण विचार करत नाही. संघर्षमय परिस्थितीचा सामना करत निर्भयपणे उभारणारी स्त्री म्हणजे अभया असते. तेव्हा संघर्ष वाट्याला आलेल्या अशा स्त्रियांना आपण ‘अभया’ म्हणायला हवे. अपंगांसाठी दिव्यांग, मतिमंद यासह प्राण्यांच्या बाबतीत श्वान, वराह असे सन्मानजनक शब्द आपण वापरतो आहोत. मग या स्त्रियांच्या बाबतीत भाषिक संवेदनशीलता दाखवायला हवी की नको, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच विचार घेऊन आम्ही समाजातील या महिलांच्या सन्मानासाठी हे अभियान राबवत आहोत.”
“या अभियानांतर्गत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्वांना निवेदने देण्यात येणार आहेत. या स्त्रियांसाठी ‘अभया’ शब्दाचा वापर करण्याचा आग्रह केला जाणार आहे,” असेही मीनाताई कुर्लेकर यांनी सांगितले.

अभया’साठी संवाद सुविधाखूपदा अशा महिलांना आपल्या भावना, मन व्यक्त करायचे असते. मात्र, कोणाशी बोलावे हे समजत नाही. यासाठी संस्थेच्या वतीने ‘अभया’शी संवाद साधायला ‘अभया-मनातली’ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना हा मुक्तसंवाद करायचा असेल त्यांनी ९३७०८२५३६८ या नंबरवर संपर्क साधावा. ही सुविधा पूर्णपणे मोफत आणि गोपनीय आहे, असे सुनीता जोगळेकर यांनी सांगितले.