पुणे-पुण्याची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधीन असलेली, संस्था असून, पुण्याच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्ग (ताडीवाला मार्ग) इथली संस्थेची इमारत “बापू भवन” नावाने ओळखली जाते. या संस्थेत आज- 2 ऑक्टोबर 2022 रोजी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या महाराष्ट्र-गोवा प्रदेशाच्या टपाल विभागासह, संयुक्तरित्या, महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त, टपाल कार्यालयाच्या मदतीने, महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राशी संबंधित टपाल टिकीटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आजपासून चार ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन, ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. यावेळी (निवृत्त) अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक अभय नारायण, टपाल सेवेच्या पुणे विभागाच्या संचालिका सिमरन कौर , केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, ‘इंटरनॅशनल रेअर कलेक्टिंग सोसायटी’चे उपाध्यक्ष राजेंद्र शाह, ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ आणि गांधीवादी प्रा. आर.के. मुटाटकर, आणि शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विठ्ठल एस. बांदल यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या संचालिका, प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी फळांची परडी आणि शाल देऊन सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात, त्यांनी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचा महात्मा गांधी यांच्याशी असलेला संबंध उलगडून सांगितला. महात्मा गांधी स्वतः या संस्थेत वास्तव्य करत असत आणि रुग्णांवर उपचारही करत. तसेच इथे त्यांनी निसर्गोपचाराचे अनेक प्रयोगही केले, त्यांनी यावेळी संस्थेतल्या, निसर्गोपचाराशी संबंधित अनेक उपक्रम आणि सुविधांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, यांनी सांगितले की आपण जसजसे निसर्गापासून, नैसर्गिक जीवनशैलीपासून दूर जात आहोत, तसतसे आपण आजार आणि विविध रोगांना बळी पडतो आहोत. आपण निसर्गाकडून जेवढे घेतो, तेवढे त्याला परतही द्यायला हवे, असा विचार त्यांनी व्यक्त केला.
इतर वक्त्यांनीही महात्मा गांधी, त्यांचे विचार आणि तत्वे याबद्दल आपली मते व्यक्त केलीत. महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान केवळ भारतासाठीच नव्हे, तर पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्र आणि मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्यांची घोषणा करुन त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलीत. त्यानंतर ओझोन थेरपी महिला युनिटचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या विद्यार्थिनीनी यावेळी खादी फॅशन शोचे आयोजन केले होते.



R9XH.jpeg)


