पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा “सन्मान नवदुर्गांचा २०२२” या अभियानाअंतर्गत त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात येत आहे. काल भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रावहिनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रतिभाताईंनी देखील पवार साहेब व अजितदादा यांच्या समवेत त्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रियांचा सन्मान करणे, त्यांना विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आपल्या मराठी मातीचे संस्कार आहेत. नवरात्रीचा हा उत्सव आदिशक्तीच्या जागर करण्याचा उत्सव असतो. या उत्सव काळात देव-देवतांमधील दुर्गा सोबतच समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या आलौकीक कामगिरीतून नाव कमविलेल्या महिला भगिनी देखील आम्हाला दुर्गे इतक्यात वंदनीय आहेत. या महिलांचा मान सन्मान व्हावा या हेतूने पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसने या स्तुत्य उपक्रम आयोजन केले आहे. प्रतिभाताई पाटील यांनी या पुरस्काराचा स्वीकार करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सर्व टीमचे कौतुक केले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक महेंद्र पठारे,पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, दिपक कामठे आदींसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, दि.३: ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला.
मुंबईत २२७ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, “महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून, त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.’’
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय
“प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅथलॅब देखील सुरू करणार
“राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी पूजन, मुखवटा उभारणे व देवीची दृष्ट काढणे असे पारंपरिक कार्यक्रम पुणे : श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी देवीची महापूजा, देवीचा मुखवटा उभारणे आणि घागरी फुंकणे यांसारख्या कार्यक्रमांतून महिलांनी देवीला नमन केले. रात्री १२ वाजता देवीची दृष्ट देखील काढण्यात आली. घागर फुंकणे हा नवरात्रीतील पारंपरिक कार्यक्रम… मात्र, आजमितीस हा फारसा बघायला मिळत नाही. त्यामुळे श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात झालेल्या घागरी फुंकणे कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेत देवीची चरणी प्रार्थना केली.
बिबवेवाडीतील हजारे परिवाराच्या श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात महालक्ष्मीपूजन, घागरी फुंकणे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात अनुराधा हजारे, संध्या तारांबळे, उषा चावरे, मिनल हजारे, कै.सितामाई शिवरामपंत करंदीकर भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले. घागरी फुंकणे यासोबतच फुगड्या, गरबा, दांडिया असे कार्यक्रम देखील महिलांनी केले. तर, कीर्ती कस्तुरे व सहका-यांचा सुगम संगीत कार्यक्रम व जंगली महाराज ग्रुपचा आत्मामालिक हा भक्ती संगीताचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला. यज्ञदत्त हजारे म्हणाले, मंदिराची स्थापना सन १९८१ साली झाली असून शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केले जाते. महोत्सवा दरम्यान महिला मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. वादन-गायन, कीर्तन, भजन, कविता, भक्तीगीते याचबरोबर सौंदर्य लहरी पठण, श्रीसुक्त, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, घागरी फुंकणे, मुखवटा उभारणे, देवीची दृष्ट काढणे असे विविध पारंपरिक सोहळे देखील केले जातात. त्याचबरोबर मंदिरात विश्व कल्याणासाठी १ कोटी श्रीसुक्त आवर्तन म्हणण्याचा संकल्प केला असून आजपर्यंत ६४ लाख आवर्तने पूर्ण झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे आयोजन ; पं. नंदकिशोर कपोते यांची उपस्थिती पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्यातील १४ शाळांतील शिक्षकांच्या संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमाला पं. नंदकिशोर कपोते, पूजा थिगळे, खासदार अॅड.वंदना चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, परीक्षक शिरीषा जोशी, निवेदिता मेहेंदळे, मंदिराचे विश्वस्त तृप्ती अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल आदी उपस्थित होते. मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर शाळेच्या शिक्षक संघाचा द्वितीय तर, चंद्रकांत दरोडे विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी पहिल्या तिन्ही क्रमांकाच्या विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली. स्त्री भ्रूण हत्या, देवीची नऊ रुपे, स्त्री शक्तीचे महत्व आणि महात्म्या भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याच्या पारंपरिक गाणी व खेळ मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले. शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये भोंडला हा एक प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज भोंडल्याविषयी माहिती लहान मुली व तरुणांनी फारशी नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करावी आणि विद्यार्थ्यांनाही याची माहिती सांगावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.
पुणे-देवस्थानच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरपुणे : तळजाई माता देवस्थानतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३२५ महिलांनी शिबिरात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती करून उपस्थित महिलांना माहिती देखील शिबिरात देण्यात आली.
तळजाई माता देवस्थानचे प्रमुख अण्णा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले. विजय थोरात, सुरज थोरात, अमोल पडळकर, प्रणव मलभारे, तन्मय पारवे, ओंकार थोरात, किरण जगताप, शाम खंडेलवाल, यश खंडेलवाल, नाना साठे यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. तळजाई माता देवस्थानच्या वतीने सहकार नगरमधील पाचगाव पर्वती पठारावर मंदिराच्या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर गोल्ड, लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंचुरी, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांचे सहकार्य मिळाले.
अण्णा थोरात म्हणाले, महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात परंतु स्वतःची काळजी घेण्याकडे मात्र त्या दुर्लक्ष करतात. नवरात्रीनिमित्त असंख्य महिला मंदिरात दर्शनासाठी येतात, याचे निमित्त साधून देवस्थानच्यावतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोग निदान, उपचार व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन महिलांना उपलब्ध करून देण्यात आले. ब्रेस्ट कॅन्सर चेकअप, डोळ्यांची तपासणी, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी या शिबिरात करण्यात आली.
सातारा-विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फलावर घेतल्याचे माण-खटावमध्ये पाहायला मिळाले. आमच्याकडे सर्व संस्था होत्या. मात्र, आम्ही सत्तेचा माज केला नाही. आज जे सुरू ते सर्व गलिच्छ राजकारण सुरू आहे. अधिकाऱ्यांनो कुणाचाही दबावात कुणाला त्रास देऊ नका, आम्ही कधी सत्तेत येऊ कळणार नाही, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील मार्डीमध्ये माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यातील 50 जणाचे सरकार विकासकामाचा आराखडा बनवत नाही. केवळ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे. केवळ आपल्या मर्जीतले अधिकारी आपल्या मतदारसंघात आणायचे यासाठीच सर्व जण आग्रही आहेत, पण विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
विकास कामाकडे कुणाचे लक्ष नाही. माण-खटाव मतदारसंघात तात्यांच्या जाण्यानंतर मोठ्या प्रमाणात गलिच्छ राजकारण सुरू आहे. काही लोक अपक्ष निवडून येतात तर काँग्रेसमध्ये जातात तर काँग्रेसमधून निवडून येत भाजपमध्ये जातात आता हे कुठे जाणार असा मिश्किल टोला आमदार जयकुमार गोरेंना लगावला आहे.
पुणे-दसरा मेळाव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गटाला आणि शिवसेनेला एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नका. राज्याच्या दृष्टीने हे चांगलं होणार नाही, असा सल्ला दिला आहे. आज पुण्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.राज्याचे प्रमुख म्हणून याबाबत शिंदे यांच्यावर अधिक जबाबदारी असल्याचे विधान त्यांनी केले .शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत शरद पवार म्हणाले, खरे तर हे दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत आणि खरा पक्ष कोणता यावरुन त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेच्या निकालाची सुत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. असा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षालाही एक मर्यादा ठेवली पाहीजे. मर्यादा ओलांडून काही होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ते चांगल नाही.
शरद पवार म्हणाले, दसरा मेळाव्यात दोन्ही गटांकडून जी काही मांडणी होईल, त्यातून आणखी कटुता वाढू नये. उलट दोन्ही बाजूंनी मर्यादा पाळत मांडणी केल्यास राज्याच्या राजकारणातील कटुता कमी होण्यास मदत होईल. तणावपूर्ण वातावरण दुरुस्त व्हावे, यासाठी पावले टाकली पाहीजे. त्याची जबाबदारी राजकारणातील आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर तर आहेच, मात्र राज्यातील 14 कोटी लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्याच्या प्रमुखांवर ही जबाबदारी अधिक आहे. ते ही जबाबदारी पाळतील, अशी अपेक्षा करुयात.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्या समर्थनार्थ मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोस्टर्स लावल्याचे समोर आले आहे. यावर भाजपने टीका करत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही गर्दी जमवण्यात येईल, असा दावा केला आहे. यावर शरद पवार म्हणाले, या सर्व गोष्टीत राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. दसरा मेळावा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. दुसरा मेळावा मुख्यमंत्री शिंदेंचा आहे. त्यात इतर पक्षीयांनी ढवळाढवळ करण्याचे कारण नाही.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेनेला सहकार्य करणार, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे की, 2014 मध्येच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हाच ही आघाडी झाली असती तर आज अशी वेळ आली नसती. यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीला असा प्रस्ताव आला असे कधीही माझ्या कानावर आले नाही. राष्ट्रवादीला कुणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला नक्कीच कळाले असते.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, भारत जोडो हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाकरिता ही यात्रा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील यात्रेत त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते, नेते सहभागी होतील, हे योग्य आहे. इतरांनी सहभागी होण्याचे कारण मला दिसत नाही.
भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक मासिक ट्रॅक्टर विक्री
पुणे-: महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने (एफईएस) आज सप्टेंबर २०२२ मधील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली.
सप्टेंबर २०२२ मध्ये ‘महिंद्रा’च्या ट्रॅक्टर्सची देशांतर्गत विक्री ४७१०० युनिट्स इतकी झाली, जी सप्टेंबर २०२१ मध्ये ३९०५३ युनिट्स होती.
सप्टेंबर २०२२ मध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत + निर्यात) ४८७१३ युनिट्स झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीत ती ४०३३१ युनिट्स होती. या महिन्यात १६१३ युनिट्सची निर्यात झाली.
या कामगिरीबद्दल माहिती देताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “आम्ही सप्टेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत बाजारात ४७१०० ट्रॅक्टर विकले आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही २१ टक्क्यांची वाढ आहे. एका महिन्यात झालेली आतापर्यंतची आमची ही सर्वात जास्त विक्री आहे. सणासुदीमुळे या महिन्यात मागणी चांगली होती. ऑक्टोबरमध्येही ती अशीच कायम राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. खरिपाच्या पिकांची कापणी लवकरच सुरू होत असल्याने आणि पिकांच्या किमती स्थिर राहिल्याने लोकांची भावना सकारात्मक आहे. यंदा मान्सूनही सामान्य पातळीपेक्षा जास्त झाल्याने देशभरातील जलाशयांच्या पातळीत सुधारणा आहे, जमिनीत आर्द्रता वाढली आहे आणि ही परिस्थिती आगामी रब्बी हंगामासाठी खूप सकारात्मक आहे. निर्यातीच्या बाजारपेठेत आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १६१३ ट्रॅक्टर विकले आहेत. ही वाढ २६ टक्के इतकी आहे.”
ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गटाच्या ‘ नृत्य समिधा’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद पुणे : ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे आयोजित ‘नृत्य समिधा’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.सुचेता परांजपे,डॉ.स्वाती दैठणकर,सुवर्णा गोखले यांच्या उपस्थितीत ‘शेडस् ऑफ वूमनहूड’ या माहितीपट-मालिकेचे यू ट्यूबवर प्रकाशन झाले.या मालिकेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘भरतनाट्यम’ नृत्य माध्यमातून स्त्रीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. ‘वेदांमधील स्त्रिया,कला व आनंद’ या विषयावर डॉ.सुचेता परांजपे यांनी संवाद साधला. माहितीपट मालिकेचा रसास्वाद डॉ.स्वाती दैठणकर यांनी सादर केला. ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांनी ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गटातर्फे डॉ.वैदेही केळकर,मिलिंद संत यांनी स्वागत केले.माहितीपटाचे दिग्दर्शक देवेंद्र भोमे आणि माहितीपटाची संकल्पना आणि लेखन करणाऱ्या धनश्री पुणतांबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, रामभाऊ डिंबळे, सुभाष देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ अनघा लवळेकर, डॉ समीर दुबळे, माजी विद्यार्थी व ज्ञानप्रबोधिनी परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘शेडस् ऑफ वूमनहूड ‘ या माहितीपटातून आपल्याला भरतनाट्यम चा इतिहास समजला, वेद काळातील स्त्रिया कलेचा आनंद घेत होत्या. चौसष्ठ कला आपल्याकडे आहेत. कला या शब्दाचे वीस अर्थ आहेत. कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराच्या प्रतिभेला प्रतिमेत प्रतिबिंबीत करून ती सृजनशक्ती अविष्कृत करतो त्याला कला असे म्हणावे, कला म्हणजे आनंद देणे, प्रसन्न करणे, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, यज्ञ, भक्ती, ऋग्वेदापासून नृत्यकलेला मान्यता आहे, त्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. ऋग्वेदात नर्तकीचे वर्णन आहे. जे जे वाड़मयात होते, त्याला मान्यता होती. समाजात मान्यता असो वा नसो धर्म आणि संस्कृतीने सर्व कलांना मान्यता दिली आहे.’ ‘शेडस् ऑफ वूमनहूड’ या भरतनाट्यावर आधारित माहितीपटाविषयी बोलताना डॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या, ‘ हा माहितीपट अतिशय उत्तम झाला आहे. नृत्य म्हणजे स्वतःचा स्वतःशी मुक्तसंवाद असतो. नृत्य म्हणजे आसिधारा व्रत आहे. माहितीपटात देवदासींपासून चालत आलेला भरतनाट्यम चा इतिहास खूप छान मांडला आहे. मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होत आहे हे वाखाणण्याजोगे आहे. हा सगळा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जतन करून ठेवला पाहिजे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून हा कार्यक्रम होत आहे ही खूप चांगली बाब आहे. ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले या ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडताना म्हणाल्या, ‘नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. कला ही उपजत असते. ग्रामीण भागातील स्त्री यांच्या गटात राहून सहज शिकली जाते. स्वतःच्या आतला झरा शोधायला ग्रामीण भागातील व्यक्ती असो किंवा शिक्षण न घेणारी व्यक्ती असो ती सहज व्यक्त होते. त्यामुळे कला तिच्या अभिव्यक्तीचा अविभाज्य भाग असतो. महिलांच्या वेगवेगळ्या गटात वावरताना वाटतं, कला म्हणजे फक्त स्टेजवर सादर केलेली अशी नाही तर गावात फिरताना जात्यावरच्या ओवीत, पंचमीच्या निमित्ताने पारावर रंगलेले खेळ हा सुद्धा कलेचा अविष्कार आहे. उस्फूर्त प्रतिसाद आतून दिला जातो आणि निरपेक्षपणे स्वत: कडे बघता येणे, त्यातून आनंद शोधणे त्याचा या ‘नृत्य समिधा’ या कार्यक्रमाशी खूप जवळचा संबंध आहे,असेही त्या म्हणाल्या.
ऋचा बोंद्रे यांच्या ‘गणेश वर्णन’ गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गट व नृत्य विभागाविषयी मिलिंद संत यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी पुणतांबेकर आणि ईशा म्हसकर यांनी आदी तालात ‘अर्धनारीनटेश्वर ‘या नृत्याचे सादरीकरण केले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वैदही केळकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य होता. हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृह येथे झाला.
नाशिक-शिंदे -फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल दोन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ‘आपण बसून विषय मिटवून टाकू’, असे खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.तसेच, एकनाथ खडसे व त्यांची सून रक्षा खडसे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. अमित शहांच्या कार्यालयाबाहेर 3 तास बसूनही त्यांना शहांनी भेट दिली नाही, असा दावाही गिरीश महाजनांनी केला आहे.
नाशिकमध्ये नुकताच महानुभव पंथाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात एकनाथ खडसे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, कार्यक्रमातील भाषणे संपल्यानंतर एकनाथ खडसे हे मी आणि फडणवीस जेथे बसलो होतो, तेथे आले. ‘आपण बसवून एक विषय मिटवून टाकू’, असे ते म्हणाले.नेमका ‘तो’ विषय कोणता? या पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, कार्यक्रमात गर्दी फार होती. त्यामुळे ते नेमके कोणत्या विषयाबाबत बोलत होते, त्यांच्या मनात कोणता विषय होता, हे काही कळले नाही. तसेच, कार्यक्रमातील गर्दीमुळे तो विषय कोणता, हे मीही त्यांना विचारले नाही.
गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे अमित शहांच्या कार्यालयाबाहेर बसल्याचे मलाही कळले होते. तेव्हा रक्षा खडसे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. बऱ्याच वेळापासून इथे बसून आहोत. आता तीन सात बसून आहोत, तरीही भेट झाली नाही, असे रक्षा खडसेंनीच मला सांगितले होते. अमित शहांच्या कार्यालयाबाहेर तीन तास बसूनही शहांनी खडसेंना भेट दिली नाही, असे गिरीश महाजन म्हणाले,
पुणे- राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला जनप्रतिसाद चांगला मिळत असतानाही मिडिया त्याची दखल घेत नाही असा आरोप होत असताना कॉंग्रेसच्या प्रसारमाध्यम संपर्क विभागाचे झालेले पानिपत याकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय , कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत तर ,गांधींविना काँग्रेस म्हणजे आत्म्याशिवाय शरीर ,गांधींव्यतरिक्त कोणी कॉंग्रेस चालवू शकणार नाही असाच प्रत्येक काँग्रेसजनांचा आणि काँगेसला मानणाऱ्या मतदारांचा कौल असूनही तो लक्षात घेतला जात नाही हे दुर्दैव आहे . प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी या दोहोंनाच अध्यक्षपदासाठी कार्यकर्ते प्रथम प्राधान्य देत आहेत .हि घराणेशाही नाही तर देशाला आणि देश हितासाठी बलिदानाची तयारी ठेवलेल्या कुटुंबाची देशाला असलेली गरज आहे असेही कॉंग्रेसचे निष्ठावंत मानत आहेत . कॉंग्रेस चे अधपतन व्ह्यायला गांधी जबाबदार नसून त्यांच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करून घेणारे कॉंग्रेसचे अन्य नेत्यांनीच कॉंग्रेस संपविण्याचेच कृत्य कायम कलेले असल्याचा दावा केला जातोय .
कल सूरज ने कहा सियाह रात से, ये वक़्त अब तेरे ढलने का है। बादलों की ओट हो या तूफानों का साया, ये वक़्त अब मेरे निकलने का है।।
दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली आहे. बंडखोर जी-२३ गटाचा पाठिंबा असलेले अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचाराच्या शुभारंभ करताना प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्यावर टीका केली.काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वसहमतीने उमेदवार असता तर बरे झाले असते,असे शशी थरूर यांना म्हणालो होतो. परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. आता माघार घेऊ शकत नाही, अन्यथा पाठिंबा देणाऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखे होईल. लोकशाहीत दृष्टीने निवडणूक झाली पाहिजे असे थरूर यांचे म्हणणे पडले, असे खरगे म्हणाले. रविवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थरूर यांना फोन केला होता. त्या वेळी सहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, परंतु त्यांनी तो नाकारला. आता एखाद्याने निवडणूक लढवण्याचा निश्चय केला असेल तर त्याला कोण थांबवू शकतो? थरूर मला धाकट्या भावासारखे आहेत. हा आमच्या कुटुंबातील प्रश्न आहे, असे खरगे म्हणाले. खरगे हे गांधी कुटंुबाचेच उमेदवार असल्याचे सांगितले जाते. परंतु खरगेंनी हे नाकारले. गांधी कुटुंबीय आणि ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून त्यांच्या चांगल्या सूचनांवर अंमलबजावणी करू. त्याचबरोबर आता बंडखोरांचा जी-२३ वगैरे गट उरला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अध्यक्षपद उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर असून १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तीन पक्ष प्रवक्त्यांचे राजीनामे : अध्यक्षपद निवडणूक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी गौरव वल्लभ, दीपेंद्र हुड्डा आणि सय्यद नासिर हुसेन या तिघांनी काँग्रेस पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. आता आम्ही खरगे यांचा प्रचार करु, असे वल्लभ यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेत सोनियांचा सहभाग : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटक येथे ६ अॉक्टोबर रोजी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. तामिळनाडू, केरळनंतर राहुल यांची यात्रा शुक्रवारी कर्नाटकात दाखल झाली. ही यात्रा कर्नाटकात २१ दिवस चालणार असून ५११ किमी प्रवास करणार आहे.
जाहीर वादविवाद झाल्यास लोकांचा रस वाढेल : थरूर खरगेंचा पक्षातील टॉप थ्री नेत्यांमध्ये समावेश आहे, परंतु ते अध्यक्ष बनल्यास पक्षात फार काही बदल घडून येणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार केवळ आपणच (थरूर) परिवर्तन करू शकतो तसेच उमेदवारांमध्ये जाहीर वादविवाद झाल्यास लोकांचा रस वाढेल,असे थरूर नागपुरात म्हणाले.
नवी दिल्लीत रविवारी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करताना सोनिया गांधी. पाठीमागे मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीनंतरही पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाकडेच राहणार हेच दर्शवणारे हे चित्र.
गांधी कुटुंबीयांचा शब्द अंतिम : दिग्विजय सिंह निवडणूक ही निव्वळ धूळफेक असून पक्षाचे नियंत्रण गांधी कुटुंबाकडेच राहील, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक कधी झाली? जे. पी. नड्डा यांची निवड कुणी केली होती, असा सवाल खरगेंनी केला. तर काँग्रेस अध्यक्ष कुणीही होवो, तो गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखालीच काम करेल, असे ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
मुंबई-मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचल्याची खोटी माहिती देणाऱ्या मुंबईच्या अविनाश अप्पा वाघमारे या तरुणास लोणावळा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. सांगलीकडे जाताना लोणावळ्यात हॉटेल मालकाशी वाद झाल्याने त्याला अद्दल घडवण्यासाठी हा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली.त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री शिंदेंच्या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला त्याबात घेतलं. मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी असलेल्या वाघमारेने पोलिसांना असा फोन का केला होता यासंदर्भातील विचित्र माहिती समोर आली आहे.
लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी वाघमारे हा जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॅाटेलमध्ये दारु प्यायली. नंतर दारुच्या नशेतच त्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला. पाण्यावरुन झालेल्या वादातून हॉटेल चालकाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या १०० या आप्तकालीन क्रमांकावर फोन करुन मुख्यमंत्रीयांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा बनावट माहिती देणारा फोन अविनाशने केला. लोणावळ्यामधील याच हॉटेलमधून अविनाशने हा फोन केला होता.हॉटेल मालक किशोर पाटील यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “तो (आरोपी अविनाश) मुंबईवरुन कवठेमहांकाळ चालला होता. तो इथं आला हॉटेलला जेवला. त्याला थंड पाणी हवं होतं. मात्र आमच्याकडे थंड पाणी त्यावेळी नव्हतं. त्यावरुन त्याने वाद घातला,” असं पाटील यांनी सांगितलं. हॉटेल मालकाने अविनाशला बाजूच्या दुकानातून थंड पाणी घेण्याचा सल्ला दिला किंवा हॉटेलमधील साधं पाणी घ्यावं असं सांगितलं. “मात्र तो थोडा वेडसर असल्याप्रमाणे वागत होता. त्याने मद्यपान केलं होतं. त्याने हॉटेलचे फोटो वगैरे काढले. आरोही ट्रॅव्हल्सचा माणूस होता होता. मी मॅनेजरला फोन करुन चालकाचा क्रमांक घेतला. तो पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याला नाशिक फाट्यावरुन पकडून आणलं,” असं किशोर पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितलं.
पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी अविनाश वाघमारेविरोधात कलम १७७ अंतर्गत लोणावळा पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर अविनाश वाघमारेला आरोपीला सोडून देण्यात आलं आहे. अविनाश वाघमारेला घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. अविनाश वाघमारेच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना, “तो मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. त्याचं डोकं चालत नाही. तो फार मद्यपान करतो,” असं सांगितलं. “मामाचं निधन झाल्याने तो गावी चालला होता. पाण्याच्या बाटलीवरुन काहीतरी वाद झाला म्हणून त्यांनी खोटा कॉल केला. मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगून पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिलं आहे,” असंही वाघमारेच्या पत्नीनं म्हटलं आहे.
मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो 2022 मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक , नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुणवाल, नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन भालेकर,अभय चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ‘सर्वांसाठी घरे: या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, ही योजना राबविण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. शासनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात.
बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ओळखले जाते. हे खूप मोठे क्षेत्र असून यावर लक्ष देण्याची गरज आहे.त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सण उत्सव काळात अहोरात्र पोलीस आपल्या कर्तव्य बजावत असतात, विकासकाने घरे बांधत असताना एक सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत असे सांगून पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरिता योजना तयार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत दरवर्षी 50 कि.मी. चे रस्ते बनवले जात होते. हे सरकार आल्यानंतर आता दरवर्षी 500 कि.मी. चे रस्ते तयार केले जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कामासाठी 550 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत उर्वरित रस्त्याचे संपूर्ण कॉक्रेंटीकरण होईल. तसेच दोन ते अडीच वर्षात एकही रस्ता डांबराचा आढळून येणार नसून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यापुढे मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा आढळून येणार नाही असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
शासनामार्फत मुंबई आणि महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेऊन त्याभागात गृहनिर्माण प्रकल्प देखील झपाट्याने उभे राहत आहेत. राज्यभरात बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता यावी आणि शहरांच्या विकासात एकत्रितपणा यावा, यासाठी नगरविकास विभागाने युनिफाइड डीसीपीआर राज्यभर लागू केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मोकळ्या जागेवरील नव्या बांधकांमाऐवजी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे आले पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर समुह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) व झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) नियमावली मध्ये ठाणे तसेच राज्यातील इतर शहरासाठी लागू केल्यामुळे जुन्या शहराच्या भागाचा पुनर्विकास आता अधिक चांगल्या प्रकारे व नियोजनबध्द पध्दतीने करता येईल. सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार आहे. अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरतील त्यातून पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच पायाभूत आणि दळणवळण प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे. सद्यस्थिती अनेक माठ्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.
मुंबईतील वांद्रे कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 आयोजन करण्यात आले होते. रिअल इस्टेट संबंधित असलेल्या या प्रदर्शनामध्ये 125 हून अधिक स्टॉल्स होते, मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भातील विकासक या प्रर्दशनात सहभागी झाले होते
मुंबई :- वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (औषधे) जी.बी.ब्याळे यांनी कळविले आहे.
रुग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जात होते. आता नव्या कायद्यानुसार सुमारे २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित केले जाणार आहे. वैद्यकीय उपकरणे अधिनियम (Medical Device Rules) २०१७ नुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना असणे आवश्यक आहे. (परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे).
नेब्युलायझर, डिजिटल थर्मामिटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमिटर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या अंतर्गत औषधे या वर्गवारीत गणले जाणार आहे.
यापूर्वी फक्त कार्डियाक स्टेंट, हार्ट व्हॉल्व्ह, ऑर्थोपेडिक्स इम्प्लांट, यासारख्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी उत्पादन परवाने दिली जात होते. याव्यतिरिक्त इतर काही वैद्यकीय उपकरणांची (जसे ब्लड प्रेशर मशीन, एमआरआय आणि एक्स-रे मशीन) मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि नियंत्रणाशिवाय उत्पादन विक्री होत होती.
मात्र २०१७ च्या नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करण्यात येणार आहे. कमी जोखीम आणि जास्त जोखमीच्या उपकरणांना अ आणि ब श्रेणीत ठेवले आहे. यामध्ये १ हजार ६४ प्रकारची उपकरणे आहेत. त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाने घ्यावे लागतील, असे अन्न व औषध विभागाने कळविले आहे.
पुणे : ढोलकीच्या तालावर…सोडा सोडा राया हा नांद खुळा… तुमच्या पुढ्यात बसले मी… चंद्रा चित्रपटातील बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा, नटरंग चित्रपटातील नटरंग उभा अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली. हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभविला. आणि तोही सलग 12 तास! वर्षा पवार, सोनाली जळगावकर सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, पुनम कापसे, सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे यांनी आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली. पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सलग बारा तास लावणी महोत्सव पार पडला. यावेळी लावणी महोत्सवाचे सात संचानी सहभाग घेतला होता. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्यविष्कार दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फडले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. विचार काय हाय तुमचा… पैलवान आला हो पैलवान आला… बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा… ज्वानीच्या आगीची मशाल हाती… या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. वर्षा पवार यांनी सादर केलेल्या हिर्याची अंगठी रुतून बसली, बाई मी लाडाची गं… या लावणीला रसिकांनी विशेष दाद दिली. तर सोनाली जवळगावकर यांनी चंद्रा लावणी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. वाजले की बारा…. अप्सरा आली… नटरंग उभा… या नटरंग चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा… या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. मी मेनका ऊर्वशी… आणि छत्तीस नखरेवाली… या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. भैरवीच्या सुरातील लावणीचे सादरीकरण करण्यात आले. केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा.. तुमच्या पुढ्यात बसले मी.. तुझ्या उसाला लागल कोल्हा, वाजले की बारा, बाई माझी करंगळी मोडली, आई मला नेसव शालू नवा, अशा ठसकेबाज लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली. तसेच अनेक लावण्यांनी शिट्या आणि वन्समोअरही वसूल केले. महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणले महिलांसाठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात होती. महिलांची मोठी गर्दी होती. या लावणी महोत्सवात इश्काचा नाद खुळा, लावण्य जल्लोष, जल्लोष अप्सरांचा, लावणी धमाका, अहो नाद खुळा, तुझ्यात जीव रंगला यातील लावणीवती वर्षा पवार, सोनाली जळगावकर, शिवानी कोरे, पुनम कापसे, सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे, चतुर्थी पुणेकर, पतंजली पाटील, वैजयंती पाष्टे, वासंती पुणेकर, माया खुटेगावकर, प्रिया मुंबईकर, अर्चना जावळेकर व नमिता पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर करुन प्रक्षेकांची वाहवा मिळविली.
या सर्व लावणीवती व सह कलाकारांचा सत्कार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व सदस्य अमित बागुल यांनी केला. पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग बारा तासांच्या लावणी महोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली 28 वर्षे रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. तसेच यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी लावणी महोत्सव सुरु केले ही आनंदाची बाब आहे, असे आबा बागुल म्हणाले. प्रारंभी लावणी महोत्सवाचे उदघाटन नारळ वाढवून ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री लिला गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. गांधी यांनी या नवरात्रौत्सवाला शुभेच्छा दिल्या. हा महोत्सव कलाकारांसाठी महत्वाचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यगंणा जयमाला इनामदार, लावणी अभ्यासिका आसावरी तारे, पुणे नवरौत्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, सदस्य अमित बागुल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संवादचे अध्यक्ष सुनिल महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका व नृत्य दिग्दर्शिका निकीता मोघे, महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, चिटणीस नंदकुमार कोंढाळकर, सदस्य अमित बागुल, सदस्य रमेश भंडारी, सतिश मानकामे, विलास रत्नपारखी, राजेंद्र बागुल, महेश ढवळे, सागर बागुल, सागर आरोळे, धनंजय कांबळे, अभिषेक बागुल, दुर्गादास देवकर, इम्तियाज तांबोळी, संतोष शिंदे, संतोष पवार, राहुल तौर, गणेश खांदवे, आस्मिन शेख, गणेश पवार यावेळी इत्यादी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत यांनी सुत्रसंचालन केले. हा लावणी महोत्सव रात्री उशीरापर्यंत संपला. लावणी रसिकांनी सारे प्रक्षेगृहा खचाखच भरले होते.
आमचा काळ खुप वेगळा होता. त्याकाळी साजुक तुपातील लावणी होती. आता लावणीचा रंग बदलत गेला असून खुलला आहे. लावणीत होणारा बदलदेखील चांगला आहे. तो झालाही पाहिजे, मात्र लावणीचे सौंदर्यात बदल करु नये. त्याचे ते रुप तसेच टिकवून ठेवण्याची गरज आहे. पूर्वी नववारी नेसूनच लावणी व्हायची. आता ती बदलत आहे. लावणीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण देखील प्रयत्न करायला हवा. गाण्याचे शब्द, ताल, सौंदर्य व चेहर्यावरील हावभाव लावणीवतींना समजून घेतला पाहिजे. लावणीसारखे सौंदर्य नाही, अशी भावना यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यगंणा जयमाला इनामदार यांनी व्यक्त केली.
लावणी परंपरा पुणे नवरात्रौत्सवात कायम टिकून आहे. यामध्ये पारंपारिक लावण्या झाल्या पाहिजे. लावणी आयटम साँगकडे वळली आहे. लावणीचे रुप बदलण्यात येऊ नाही, अशी भावना यावेळी लावणी अभ्यासक आसावरी तारे यांनी व्यक्त केली.