Home Blog Page 158

धनंजय थोरातआदर्श कार्यकर्ता पुरस्कार नामदेव भोसले, सलील कुलकर्णी, मुश्ताक पटेल यांना जाहीर

पुणे : धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानचा कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार यंदा पारधी समाजासाठी भरीव कार्य करणारे नामदेव भोसले, तसेच संगीतकार सलील कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक पटेल यांना जाहीर झाले आहेत.प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार, मोहन जोशी यांनी काँग्रेस नेते, माजी नगरसेवक कै.धनंजय थोरात यांच्या १८व्या स्मृतीदिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा आज केली.

मुख्य पुरस्कार नामदेव भोसले यांना जाहीर झाला असून २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सलील कुलकर्णी आणि मुश्ताक पटेल यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे.

नामदेव भोसले
नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले. कानगाव तालुका – दौंड, जिल्हा -पुणे. जन्मतारीख २२ फेब्रुवारी १९७७. नदीकाठी काटेरी जंगलात पालामध्ये जन्म झाला. घरातील अठरा विश्व दारिद्र्यातून स्वतःला सावरत अथक परिश्रमातून प्रचंड सामाजिक कार्य त्यांनी केले.
नामदेव भोसले हे पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत आहेत. जवळपास १लाख७०० आदिवासी आणि पारधी लोकांना गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून बाहेर काढून त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी नामदेव भोसले यांनी घरकुले उभी करून दिली आणि शासकीय कागदपत्रे मिळवून दिली. आदिवासी आणि पारधी समाजाला लागलेला चोर, दरोडेखोर हा कलंक पुसण्यासाठी पोलीस आणि पारधी यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न भोसले करीत आहेत. एकल महिलांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे असे काम करत असून, त्यांनी महिला समितीही स्थापन केली आहे. आदिवासी, भटक्या समाजातील मृत्यू झालेल्या ३हजार४६० गरीब, बेवारस लोकांसाठी जागा मिळवून दिली. त्यासाठी संघर्ष केला. घर सोडून गेलेल्या ५४५ आदिवासी मुलींनी माघारी बोलावले त्यांचे विवाह करून दिली. अनेकांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेची जाणीव करून दिली. आदिवासी पाड्यांवर विविध प्रकारच्या ५लाख झाडांचे वृक्षारोपण केलं, करोना साथीच्या काळात मित्र परिवाराकडून मदत घेऊन ११हजार गरीब कुटुंबांना धान्य पुरवून त्यांची भूक भागविली.

सलील कुलकर्णी
नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख आहे. हिंदी, मराठी भाषेतील अनेक गीतांना त्यांनी संगीत दिलेले आहे. कवी संदीप खरे यांच्याबरोबर केलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ या सांगितिक कार्यक्रमाचे हजारहून अधिक प्रयोग त्यांनी केले. टीव्ही मालिकांतील संगीत स्पर्धेत परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अनेक नवोदित गायकांना मार्गदर्शन करून त्यांनी घडवले आहे. पुस्तक लेखन, वृत्तपत्रीय लेखन करून त्यांनी समृद्ध कामगिरी केली आहे.

मुश्ताक पटेल
मुश्ताक पटेल पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते असून गेली ३० वर्षांहून अधिक काळ जाती धर्मात सलोखा रहावा, यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. आषाढी वारी पुणे मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी स्वतःच्या जागेत निवारा उपलब्ध करून देणे, सुकामेवा मिश्रीत शीरकुर्माचा प्रसाद देणे अशी सेवा ते करत आहेत.

मुघलांना जसे धनाजी संताजी दिसायचे तसे फडणविसांना राहुल गांधीच दिसतात, खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर: हर्षवर्धन सपकाळ

निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही

निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने केलेल्या मतचोरीचा राहुल गांधींकडून भांडाफोड: बाळासाहेब थोरात.

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला धडा शिकवा, राज्यात काँग्रेसचा तिरंगा फडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: अमित देशमुख

मराठवाडा विभागातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न, संघटनात्मक बांधणी व निवडणुकांवर चर्चा.

छत्रपती संभाजीनगर/ मुंबई दि. २५ ऑगस्ट २५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजी नगर येथे पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आ. राजेश राठोड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर , शहराध्यक्ष युसुफ शेख आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही अजून या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. अद्याप आरक्षणही जाहीर झालेले नाही. परंतु काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. आघाडीचा निर्णयावर राज्य पातळीवर चर्चा झालेली नसून स्थानिक पातळीवरच मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक बांधणीवर यावेळी विचार विनिमय करण्यात आला. काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा असून मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला आजही मोठे जनसमर्थन आहे. मस्साजोग ते बीड पदयात्रा, परभणीतील संविधान बचाव यात्रा, परळीतील सद्भावना सत्याग्रह तसेच नांदेडमध्ये झालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली यातून काँग्रेस पक्षात आजही जोश व उत्साह कायम आहे हे दिसून आलेले आहे. काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता मात्र काँग्रेस पक्षासोबतच आहे हे स्पष्ट झाले आहे.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेले घोटाळे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात असून ती वाचवण्याची गरज आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठी लढत आहेत, या लढाईत देशातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. राज्य सरकारमध्येही तिघांत वाद सुरु आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. केंद्र व राज्य सरकारचा हा गैर कारभार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे. राज्यघटना व लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे जनतेला सांगितले पाहिजे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत असे थोरात म्हणाले.

माजी मंत्री आ. अमित देशमुख यावेळी म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात नारा दिला आहे, ‘वोट चोर, गद्दी छोड’, त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस रस्त्यावर उतरेल हा संकल्प आज करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारच्या कामाचा पर्दाफाश करण्याचा निश्चयही करण्यात आला आहे. अत्याचारी महायुती सरकारला या निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे यावरही चर्चा झाली. महायुती सरकारने मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अजून झालेली नसून मराठवाड्याचे मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशात व राज्यात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला वेळीच धडा शिकवला पाहिजे. आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा तिरंगा फडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही देशमुख म्हणाले..

मराठा समाजाला आरक्षण मिळावे…
मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राज्यात मराठा समाजाला काँग्रेस आघाडीच्या सरकारने आरक्षण दिले होते. जातनिहाय जनगणना करावी हा काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे, काँग्रेस पक्षाचे सरकार असलेल्या तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी ही भूमिका आहे असे सपकाळ म्हणाले..

अजित पवारांचा राजीनामा घ्या…
राज्यात दारु दुकानांच्या परवान्यांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुच्या व्यवसायाशी संबंध आहे. उत्पादन शुल्क विभाग अजित पवार यांच्याकडे आहे, यात उघडपणे conflict of interest दिसत असून मंत्रीपदाचा दुरुपयोग केलेला आहे. या प्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा असे सपकाळ म्हणाले.

172 किमी लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे नष्ट होतील पुनर्रोपणासाठी अनेकांनी पुढे येण्याची गरज -जान्हवी धारीवाल

RMD फाऊंडेशनने रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात 2100 हून अधिक झाडांचे पुनर्रोपण केले यशस्वी,मात्र पुढील आव्हाने खूप मोठी

पुणे-आत्तापर्यंत RMD फाऊंडेशनने पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात 2100 हून अधिक परिपक्व झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे.पण 172 किमी लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकांच्या मदतीने ही झाडे वाचविता येऊ शकतात. हे कार्य कोणतीही एक व्यक्ती, एक संस्था यांच्या क्षमते पेक्षा खूपच मोठे आहे त्यामुळेच अनेक संस्था, कंपन्या आणि समाजाने एकत्र येऊन ही चळवळ पुढे न्यायला हवी असे मत येथे आर. एम. धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्ष जान्हवी धारीवाल बालन यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.

त्या म्हणाल्या,’ आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे मुख्यालय येथे असून, गेली 40 वर्षे श्री. रसिकलाल एम. धारीवाल आणि श्रीमती शोभा आर. धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये 50 हून अधिक संस्थांद्वारे फाऊंडेशनने असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकला आहे.
आज फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन हा वारसा पुढे नेत आहेत. परिपक्व वृक्ष सरसकट कापण्याऐवजी, त्यांचे पुनर्रोपण करून त्यांना नवजीवन देणे हे त्यांचे नवीन ध्येय आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगर पालिका (PMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या सहकार्याने राबविला जात आहे.
आपल्या देशात दररोज रस्ते, बांधकामे आणि इतर विकासकामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. विकास आवश्यक असला तरी प्रत्येक परिपक्व वृक्ष तोडणे म्हणजे आपल्या पर्यावरणाची मोठी हानी करणे. पण वृक्ष पुनर्रोपणामुळे या झाडांना दुसरे जीवन मिळू शकते अशी खात्री आहे.

एक परिपक्व झाड दररोज 4 माणसांसाठी पुरेसा ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू निर्माण करते.
प्रत्येक झाड दरवर्षी 10-40 किलो कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेते.
झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे 80% झाडे व्यवस्थितरीत्या जगतात

लोक वृक्ष पुनर्रोपण अभियानात खालील मार्गांचा अवलंब करून अमूल्य योगदान देऊ शकतात

वृक्ष पुनर्रोपणासाठी निधी द्या : तुमच्या सहकार्याने झाडांना सुरक्षित ठिकाणी म्हणजेच शेत जमीन, लष्कराची जमीन किंवा जंगलात हलवून त्यांचे संरक्षण करता येईल. एका झाडाच्या पुनर्रोपणा साठी त्याचे वय व आकारानुसार रु. ५००० ते ४०००० इतका खर्च येतो.
एक झाड दत्तक घ्या : पुनर्रोपित झाड २ वर्षांसाठी प्रायोजित करा. योग्य देखभालीमुळे त्याचे जवळजवळ १००% व्यवस्थितरीत्या जगण्याचे प्रमाण वाढते. पुनर्रोपण केल्यापासूनच २० / २५ / ३० वर्षे वयाच्या परिपक्व वृक्षाचा लाभ आपल्याला होईल
झाडांसाठी जागा उपलब्ध करा : तुमच्याकडे जागा किंवा परिसर असल्यास, तुम्ही पुनर्रोपित झाडांना आश्रय देऊ शकता आणि त्यांना वाढण्यास मदत करू शकता.
जागरूकता निर्माण करा : या चळवळीबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवा, सम विचारी नागरिकांना जोडा आणि हरित उपक्रमाला बळकटी द्या.

चला, आजच पाऊल उचलूया – विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे नेता येईल.

अधिक माहितीसाठी भेट द्या : www.rmdfoundation.org.in/tree-transplantation
वृक्ष पुनर्रोपण अभियानात सहभागी व्हा, साथ द्या ! एकत्र येऊन झाडे वाचवू आणि आपले उद्याचे भविष्य सुरक्षित करू.

बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक, रस्त्यावर मांडला ठिय्या आंदोलन

पुणे/वाघोली : वाघोली-बकोरी रोडची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. गेल्या 13 वर्षापासून या रस्याची दुरावस्था झाली असून याठिकाणी खड्डे पडले आहेत तर मुख्य होत असल्याने या रोडच्या दुरुस्तीसाठी रविवारी (दि. २४) येथील नागरिक आक्रमक झाले होते. नागरिकांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने या ठिकाणी दररोज अपघात घडून गंभीर जखमा नागरिकांना होत आहेत तर वाहनांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. रस्त्याबाबत न्यायालयीन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी मागणी करण्यात आली. वाघोली पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी प्रकरण सुरु असले तरी तात्पुरती नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व वाहतूक सुरुळीत ठेवली. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांच्या वतीने नागरिकांचे जबाब घेण्यात येत आहेत तर संबंधित बिल्डरला याबाबत विचारणा केलीआहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार आहे.

हा प्रश्न सुटला नाही तर काही दिवसात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मयूर रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूकअखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष

पुणे: फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर, स्नेहल नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. आगमन मिरवणूक मार्ग  अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक – गोटीराम भैया चौक येथून  उत्सव मंडप असा असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक वादन करतील.

कृष्णकुंज’ मध्ये विराजमान होणार शारदा गजानन

यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान होणार आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात ‘कृष्णकुंज’ ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात येणार आहे. तब्बल ९० फूट बाय ६० फूट आकारात सजावट असणार आहे. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती असेल. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेतील. याशिवाय ५ ते ६ मोठी झुंबरे देखील लावण्यात येणार आहेत.

दर तीन वर्षांनी  शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. हा झोपाळा राजस्थानी शैलीने फुलांनी सजवण्यात येणार आहे. कृष्णकुंज सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल ४० कारागीर काम करत असून, संपूर्ण कलादिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांचे आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

“विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्मसन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची दिशा”

नवी दिल्ली, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महाराष्ट्राने दिलेल्या अद्वितीय योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “विठ्ठलभाई पटेल यांनी २४ ऑगस्ट १९२५ रोजी दिल्ली विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याच्या शताब्दी निमित्ताने आयोजित या परिषदेत लोकशाहीचे महत्त्व, कृत्रिम बुद्धिमत्तेची आव्हाने तसेच स्वातंत्र्यलढ्यातील विविध सेनानींचे योगदान अधोरेखित करण्यात आले. मी महाराष्ट्राच्या वतीने हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अधिवेशनात वीर सावरकर, अरुणा आसफ अली, उषा मेहता, जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.”

या अधिवेशनात महाराष्ट्राच्या वतीने केलेल्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर झालेल्या सीपीएच्या संध्याकाळी बैठकीत दिल्ली विधानसभा वाचनालयातील उपयुक्त साहित्य महाराष्ट्र विधानसभेत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चाही झाली.

पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेबाबत विशेष भाष्य केले. त्या म्हणाल्या, “शिवसेना महिला आघाडीच्या बैठकींतून आम्ही महिलांचा आवाज ऐकून शासनापर्यंत पोहोचवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून या योजनेतून महिलांना थेट दीड हजार रुपयांचा निधी मिळत आहे. हा निधी ही फक्त सुरुवात असून पुढे आणखी उपयुक्त स्वरूपात ही योजना विकसित होणार आहे. महिलांच्या क्रेडिट बँकची सुरूवात झाली आहे. काहींना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळाल्यास त्यावर कार्यवाही सुरू आहे. परंतु काही विरोधक महिलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो आहे. अनेक बँका, आमदार, पालकमंत्री सहकार्य करत आहेत. महिलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि कुटुंबाचा वाढलेला सन्मान हीच या योजनेची खरी यशोगाथा आहे. शिवसेना महिला आघाडी ही योजना प्रत्येक भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. ही योजना महिलांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी नक्कीच मोलाची ठरणार आहे.”

निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड

मुंबई -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली. ते मंत्री आशिष शेलार यांची जागा घेतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आमदार अमित साटम यांच्या खांद्यावर मुंबईची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरुषोत्तम करंडक : अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड

पुणे : हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघांची आज (दि. 24 ऑगस्ट) निवड करण्यात आली. अंतिम फेरी दि. 13 व दि. 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार आहे.

एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 10 ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीत 51 संघांनी सादरीकरण केले. प्राथमिक फेरीचे परीक्षण शेखर भागवत, राजेश कोलन, धनेश जोशी यांनी केले.

अंतिम फेरीसाठी निवडलेले संघ (महाविद्यालयाचे नाव, एकांकिका या क्रमाने)
डीइएस पुणे युनिव्हर्सिटी , पुणे (व्हिक्टोरिया)
पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, पर्वती (कोयता)
अण्णासाहेब मगर महाविद्याल (काही प्रॉब्लेम ये का?)
मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (वामन आख्यान)
आयएमसीसी स्वायत्त (रामरक्षा)
मएसो सिनिअर कॉलेज (यथा प्रजा तथा राजा)
श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय ( निर्वासित)
मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय ( पावसात आला कोणी…)
सर परशुरामभाऊ महाविद्यालय स्वायत्त (आतल्या गाठी)

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक
राज दीक्षित (इन बिटविन ऑफ, बृ. म. वाणिज्य महाविद्यालय)
उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिका
मयुरी निकम (मित्तर, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) या क्रमाने
ऋतीक रास्ते (पंढरीनाथ, मृगजळ, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय)
लावण्या पोहेकर (आवडी, देव रोकडा सज्जनी, पद्मभूषण वसंतदादा पाटील इस्टि. टेक्नॉलॉजी)
अनुराग भोसले (भावी सरपंच, सवारी भवानी चौकामधी, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय)
गुणेश मंडलिक (सरपंच, सवारी भवानी चौकामधी, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय)
पार्थ ढोरे (पिंट्या, सवारी भवानी चौकामधी, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय)
सुजल बर्गे (सदाकाका, मित्तर, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
वैभव वासणकर (बजरंग, 14 इंचाचा वनवास, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस ॲण्ड स्ट्रॅटेजी, पुणे)
राखी गोरखा (इंदू (आई), पिसाळा, न्यू आर्टस्‌ कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, स्वायत्त)
प्रणिता गोडसे (वचकी मावशी, मु. पो. बेडकपूर, जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)
स्नेहा भालेराव (दमडी, पायवाट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय)

दर्जा खालावलेले संघ (एकांकिका, महाविद्यालय क्रमाने)
सत्यम्‌‍ शोधम्‌‍ सुंदरम्‌‍ (अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय)
मोक्ष कॅफे (अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय)
द स्मेल (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय)
क्षणसरी (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर)
पडघम (वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालय)
मु. पो. बेडकपूर (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)
बलिवर्द (प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड कॉम्प्युटर स्टडिज)
पालखीचे भोई (झिल अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय)
चूक (सिंहगड विधी महाविद्यालय, आंबेगाव)
सॉर्टेड (पेमराज सारडा महाविद्यालय)

11 गणेश मंडळांकडून चौथ्या वर्षीही संयुक्त मिरवणूक:कौतुकास्पद अन ऐतिहासिक उपक्रम

: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरव रथ ठरेल आकर्षक
: 500 मराठी शिक्षकांचा होणार सन्मान
: 10 हजार पुस्तकांचे होईल वितरण

पुणे, २४ ऑगस्ट: बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून सलग चौथ्या वर्षी ११ गणेश मंडळांची संयुक्त मिरवणुकीचा कौतुकास्पद प्रयोग शहरात केला जाणार आहे.
यावर्षीच्या मिरवणुकीची विशेषता म्हणजे मराठी भाषेचा गौरव रथ असेल. या रथामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी व मराठी भाषेला साहित्य, नाटक, कथा व कवितेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या लेखकांचे त्यांच्या पुस्तकाचे सहचित्र या रथात असणार आहे. या मिरवणुकीत 500 मराठी भाषा शिक्षकांचा सहभाग असून यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावर 10 हजार मराठी पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. या रथावर ११ गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप, विजय क्षिरसागर, सुनिल पिसाळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले यांनी दिली.
शहरातील अन्य गणेश मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे अशी चळवळ पुढे चालण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.
एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ यांच्या सारख्या ११ गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूकीचे आयोजन बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते सायं. 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. यामध्ये ज्ञान प्रबोधनीचा पथक असणार आहे

मिरवणूकीच्या प्रारंभी महाराष्ट्र भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक केले अशा लेखकांची यशोगाथा, मराठी साहित्याला जागतिक दर्जावर पोचविणारे लेखकांची माहिती येथे उपस्थित गणेश भक्तांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर समाजउपयोगी कार्यक्रम चालविले जाणार आहेत. त्यामुळे या कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. गेल्या वर्षी धनकवडी मध्ये ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूकीचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला होता. या वर्षी याच कार्याची रेघ पुढे ओढत ११ गणेश मंडळांनी सहभाग घेऊन ही मिरवणूक यशस्वीपणे पुर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे.
या वेळी प्रतीक कुंभार, उदय गुंड पाटील, विकी सुबागडे, आनंद शिंदे, विशाल निगडे, उदय भोसले, सोमनाथ शिर्के, शंतनू येवले, मनोज शिंदे, विजय क्षीरसागर व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

पुणे हे जागतिक बाजारपेठेचे केंद्र व्हावे-अरुण फिरोदिया

 सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ यशोगाथेच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे, ता. २४: “भारतात ज्ञानाची मोठी शक्ती आहे. अनेक परदेशी लोक इथे येऊन ज्ञान ग्रहण करतात व जगाला सेवा पुरवतात. भारतीयांनी आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखून घेत प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे. जगाकडून शिकण्यासह जगाला शिकवण्याची जिद्द आपल्याकडे हवी. भारतीय ग्राहकांचे समाधान करणारे उत्पादन जगात यशस्वी ठरते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी केले. पुणे सर्वार्थाने समृद्ध असून, पुण्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्सच्या (आयएमए) संचालक मंडळाचे ग्लोबल चेअर सीएमए सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या सोहळ्यात सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी, देशमुख यांच्या पत्नी माधुरी देशमुख आदी उपस्थित होते.

अरुण फिरोदिया म्हणाले, “लोकांकडून, ग्राहकांकडून शिकत गेल्याने माझ्या मनात अनेक नवनव्या कल्पना विकसित होत गेल्या. आपण जे काही करू त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास आपल्याकडे हवा. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बाहेर पडा व शिकत राहा. विविध ठिकाणचे लोक, बाजारपेठ समजून घ्या. त्यासाठी देशाटन करत राहा. भारतात शिकून जगभरासाठी काम करा. जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून सुनील देशमुख यांनी आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवली आहे. त्यांचा हा यशस्वी जीवनप्रवास तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे अशा यशोगाथा व्यवस्थापनासह इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हव्यात. बिकट वाटेला न घाबरता धैर्याने यशशिखरे संपादन करत राहावीत.”

डॉ. पराग काळकर म्हणाले, “यशस्वी माणसेच इतरांना प्रेरणा मार्ग दाखवतात. नांदेडच्या छोट्याशा गावातून सुरु झालेला सुनील देशमुख यांचा प्रवास जागतिक स्तरावर गेला. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामागे आपले परिश्रम, जिद्द असते. त्यांची ही यशोगाथा तरुणांसाठी ऊर्जादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहचूनही आपल्या मातीशी, गावाशी आणि माणसांशी नाळ जोडून ठेवणारा हा माणूस आहे. तरुणांनी देशमुखांचा हा आदर्श घेऊन जीवनात यशाकडे वाटचाल करावी. छोट्या अपयशाने खचून न जाता झालेल्या चुकांचे अवलोकन करून पुन्हा नव्या ऊर्जेने प्रयत्न करावेत.”

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “आयुष्य हे खूप सहज असते. आपण त्याला किचकट करतो. शिका, कमवा आणि परत करा या तीन मूल्यांवर आपले आयुष्य आधारलेले असते. दादा वासवानी यांनी दिलेल्या तत्वांवर वाटचाल केली, तर सदृढ समाजाची जडणघडण होईल. लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवा पिढी वाचण्यासाठी पुस्तकांबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करते. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विविध भाषांमध्ये हे पुस्तक जावे.”

सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रशांत शुक्ला, मानसी शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रचिती अंकाईकर यांनी आभार मानले.

गणेशोत्सव काळात दारूबंदी; लाऊडस्पीकरला मध्यरात्रीपर्यंत परवानगी

पुणे-: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, पुण्यातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणारी दारूची दुकाने, परमिट रूम, बीअर बार आणि रेस्टॉरंट्स गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागांत गणेश मंडळांची संख्या लक्षणीय असल्याने आणि मोठी गर्दी अपेक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी अशी बंदी केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी लागू होत असे, मात्र यंदा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण उत्सवासाठी ‘ड्राय डे’ लागू करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव काळात लाऊडस्पीकरच्या वापराला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्याचा आदेश जारी केला आहे. ही परवानगी ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर (विसर्जन) या दिवसांसाठी लागू असेल. म्हणजेच, एकूण सात दिवसांची विशेष सूट देण्यात आली आहे.

सहसा लाऊडस्पीकरला पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंतची मुभा मिळते, मात्र यंदा उत्सवाचे चौथे आणि पाचवे दिवस शनिवार-रविवारी येत असल्यामुळे आणि त्या दिवशी गर्दीचा मोठा अंदाज असल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही पुण्यात आढावा घेत असताना या निर्णयाची घोषणा केली होती.

स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन

पुणे : सुश्राव्य आणि सहज फिरत असलेला आवाज, दमदार ताना, बहारदार सादरीकरण यातून रंगली किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांची मैफल.
निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित मासिक स्वरमयी बैठकीचे. मैफल आज (दि. 24 ऑगस्ट) स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर येथे झाली.
पंडित डॉ. संजय गरुड यांनी आपल्या मैफलीची सुरुवात मिया की तोडी रागातील ‌‘बैय्या भर न देत गगरिया‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तालातील ‌‘लंगर कांकरिया जी ना मारो‌’ ही सुप्रसिद्ध रचना सादर केली. या नंतर खमाजमधील ‌‘अब कैसे घर जाऊ कन्हैया‌’ ही रचना ऐकविताना पंडित गरुड यांनी रसिकांसमोर कृष्णलिलेचे अवर्णनिय रूप साकार केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रचित ‌‘आता कोठे धावे मन‌’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना भक्तीरसाचा अद्भुत आनंद दिला. ‌‘बाजे रे मुरलिया बाजे‌’ हे सुप्रसिद्ध कृष्णभजन ऐकवून पंडित गरुड यांनी कृष्ण आणि त्याच्या वेणूच्या अद्वैताचे रूप दर्शविले. मैफलीची सांगता ‌‘जो भजे हरि को सदा‌’ या लोकप्रिय भैरवीने केली.
स्वरसावलीच्या वास्तूत सादर झालेली ही मैफल रसिकांना अवर्णनीय आनंद देऊन गेली. रोहन पंढरपूरकर (तबला), माऊली फाटक (पखवाज), तुषार केळकर (संवादिनी), प्रसाद कुलकर्णी, गणेश ढाकोळे (सहगायन) यांनी साथसंगत करत मैफलीत बहार आणली.
डॉ. अश्विनी वळसंगकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय गरुड यांच्या गुरुमाता शीला देशपांडे यांनी कलाकारांना आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन वर्षा किराड यांनी केले.

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव

नवी दिल्ली, दि. २४ ऑगस्ट २०२५ —
दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री गिरेन्द्र सिंह शेखावत यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रभावी भाषण करून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महाराष्ट्राच्या गौरवशाली योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई हे सदैव केंद्रस्थान राहिले आहे. १८५७ च्या उठावावेळी मरीन बटालियनचे सैयद हुसेन आणि मंगळ गडिया या वीरांनी प्राणाची आहुती दिली. पुढे भगतसिंह, सुखदेव आणि महाराष्ट्राच्या सुपुत्र राजगुरु यांनी केलेले बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले.

डॉ. गोऱ्हे यांनी लोकमान्य टिळकांचा विशेष गौरव केला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या त्यांच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी समाजाला संघटित केले आणि आजही हा उत्सव युवकांच्या संघटनाचा आधार आहे, असे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधींनी मुंबईतून “भारत छोडो” आंदोलनाची हाक दिल्याचे त्यांनी आठवले. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वि.दा.सावरकर, सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली आणि उषा मेहता यांच्या योगदानामुळे मुंबई केवळ आर्थिक राजधानी नव्हे, तर स्वातंत्र्यआंदोलनाची राजधानी होती, असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गोपाल गणेश आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आवश्यक अशी सामाजिक पायाभरणी केली, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

शिवाजी महाराजांचे शौर्य, पेशव्यांचे पराक्रम, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाईंचे योगदानही डॉ. गोऱ्हे यांनी स्मरणात आणले. “इतिहासातील या पराक्रमी गाथा केवळ स्मरणापुरत्या मर्यादित ठेवायच्या नाहीत, त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ठामपणे सांगून त्यांनी आपल्या विचारांचा समारोप केला.

सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. भाषणाच्या शेवटी डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि “जय हिंद, जय महाराष्ट्र” या घोषवाक्याने आपले भाषण संपवले.

संगीत सौभद्र.. पाच तास.. 56 नाट्यपदे.. टाळ्या अन्‌‍ वन्समोअर


निमित्त पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्ष
पुणे : पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेले बालगंधर्व रंगमंदिर, वेळ सकाळी नऊची, रंगमंदिराच्या आवारातील लक्ष वेधून घेणारी आकर्षक रांगोळी, रसिकांच्या चेहऱ्यावर दिसणारी उत्कंठा, तिसरी घंटा होते, भरजरी वस्त्रातील कलाकार आणि रसिकांमधील मखमली पडदा दूर होतो, 56 नाट्यपदे, टाळ्या, वन्स मोअरची दाद देत पाच तास रंगलेला चार अंकी नाट्यप्रयोग.. होय आज हे घडलयं.. संगीत सौभद्र या संगीत नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने…
मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आज (दि. 24) अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या नाटकाचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
‌‘प्रिये पहा‌’, ‌‘लग्नाला जातो मी‌’, ‌‘राधाधर मधुमिलिंद जय जय‌’, ‌‘नच सुंदरी करू कोपा‌’, ‌‘पावना वामना या मना‌’, ‌‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी‌’, ‌‘पांडु नृपती जनक जया‌’, ‌‘पार्था तुज देऊन वचन‌’, ‌‘बहुत दिन नच भेटलो‌’, ‌‘लाल शालजोडी जरतारी‌’ अशा गाजलेल्या अनेक नाट्यपदांसह सहसा प्रयोगात घेतली न जाणारी ‌‘वसंती बघुनी मेनकेला‌’, ‌‘अति कोपयुक्त‌’, ‌‘तुज देऊनी वचने‌’, ‌‘माझ्यासाठी तिने‌’, ‌‘व्यर्थ मी जन्मले‌’, ‌‘पुष्पपराग सुगंधीत‌’ ही पदे देखील रसिकांना आज ऐकावयास मिळाली. या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटक सादरीकरणादरम्यान जो सध्या होत नाही असा नटीसूत्रधाराचा प्रवेशही या नाट्यप्रयोगात सुरुवातीस सादर झाला तसेच नाटकाची सांगता भरतवाक्याने झाली. या प्रयोगात रुक्मिणी आणि सुभद्रा प्रवेश हा देखील अनेक वर्षांनी सादर केला गेला.
पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक संगीत नाटकप्रेमी रसिकांनी या दीर्घ प्रयोगास आवर्जून उपस्थिती लावली तर रसिकांमधील अनेक ज्येष्ठांनी जयमालाबाई शिलेदार यांनी सादर केलेला संगीत सौभद्रचा रंगलेला प्रयोग पाहिला होता. त्यातील एका रसिक महिलेने प्रयोग संपल्यानंतर रंगमंचावर येत भावनेने ओथंबलेल्या शब्दांनी आठवणींना उजाळा देत नव्या संचातील प्रयोगाचे कौतुक केले.
निनाद जाधव, चिन्मयजोगळेकर, भक्ती पागे, ज्ञानेश पेंढारकर, डॉ. धनश्री खरवंडीकर, ओंकार खाडिलकर, सुदीप सबनीस, वैभवी जोगळेकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, निरंजन कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, अवंती बायस, सयाजी शेंडकर, चिन्मय पाटसकर, रमा जोगळेकर, राकेश घोलप, संतोष गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. तर लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), अभिजित जायदे (तबला) यांची समर्पक साथसंगत लाभली. दीप्ती शिलेदार-भोगले यांचे दिग्दर्शन होते तर वर्षा जोगळेकर यांनी संयोजन केले.
लोकमान्य मल्टिपर्पजचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे, सुरेश रानडे, जयश्री रानडे, दीप्ती शिलेदार-भोगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन नाट्यप्रयोगाचा शुभारंभ झाला.

पैशांअभावी शिक्षण, सामाजिक कार्यात खंड पडू नये-जितेंद्र सिंह शंटी 

दिशा परिवाराच्या वतीने २२५ गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

‘दादाची शाळा’चे अभिजित पोखरणीकर यांना दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरव


पुणे: “चांगले काम करणाऱ्या संस्‍थांना पाठबळ देण्याच्‍या उद्देशाने कंपन्यांकडून दोन टक्के सीएसआर निधीची तरतूद आहे. मात्र, मोठ्या कंपन्या स्‍वत:च मंदिर, ट्रस्‍ट, शाळा, सामाजिक संस्‍था सुरु करतात. त्‍यामध्ये सीएसआरचा निधी वळवितात. परिणामी गरजू संस्थांना पैशांची तूट भासते. पैशांअभावी कोणाचे शिक्षण किंवा चांगल्या सामाजिक कार्यात खंड पडू नये,” असे प्रतिपादन पद्मश्री जितेंद्र सिंह शंटी यांनी केले. जाती-धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सुरु असलेला दिशा परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १९ वा शैक्षणिक शिष्यवृत्ती व दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात जितेंद्र सिंह शंटी बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात २२५ गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ‘दादाची शाळा’ या  उपक्रमाचे संस्थापक अभिजित पोखरणीकर यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी उद्योजक रावसाहेब घुगे, प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, पौर्णिमा जानोरकर, मकरंद कुलकर्णी, नंदकिशोर रोजेकर, अरुण कुलकर्णी, चिन्‍मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार उपस्थित होते.

जितेंद्र सिंह शंटी म्हणाले, “देशसेवा व मानवतेसाठी चांगले कार्य करणाऱ्या संस्‍था पैशाअभावी बंद पडू नयेत. त्यांना मुबलक सीएसआर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्‍याकडे पाठपुरावा सुरु आहे. गरजूपर्यंत हा निधी पोहोचावा. सामाजिक संस्‍थांना देगणी दिल्‍यानंतर गरजूपर्यंत पैसे पोहोचतो की नाही, अशी शंका असते. अशा स्थितीत दिशा परिवाराचे कार्य पारदर्शी पद्धतीने सुरु असून, ते कौतुकास पात्र आहेत.”

“कोरोना काळात जवळचे नातेवाईक सोबत येत नव्हते. कुठला नेता नाही, प्रशासन, हाॅस्पिटल सहकार्याला नाही. अशावेळी कोणताही जात-धर्म न पाहता चार हजार २६६ जणांवर मोफत अंत्‍यसंस्‍कार केले. आजवर ७० हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अत्‍यंसस्‍कार केले. त्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ज्‍याठिकाणी सरकारने काम करायला हवे, तिथे हा सरदार काम करीत होता, याचे समाधान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

भाऊसाहेब जाधव म्‍हणाले, “हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम दिशा परिवाराने केले आहे. आज त्यातील अनेक मुले मिळालेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी घेत आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्‍यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते.”


रावसाहेब घुगे म्‍हणाले, “राज्‍य सरकारच्‍या प्रशाासन यंत्रणेत मोठे दोष आहेत. चूक नसताना आणि योग्य पद्धतीने काम करीत असतानाही यंत्रणेकडून सहकार्य मिळत नाही. समाजात ८० टक्‍के लोक चांगले आहेत. त्‍यांना एकत्र आणावे लागेल. त्‍यांच्‍या सहकार्यातून मोठी चळवळ पुढे येईल. त्‍यातून मोठी क्रांती करणे शक्‍य आहे. सीएसआरचा वचिंत मुलांच्‍या शिक्षणासाठी वापरला जावा.”

यावेळी पोखरणीकर यांनी पुरस्‍कारामुळे आणखी चांगले काम करण्याचा प्रेरणा मिळाली आणि यापुढे सामाजिक कार्य सुरुच ठेवणार असल्‍याचे सांगितले. दिशा परिवारामुळे जीवनाला दिशा मिळाल्‍याची भावना विद्यार्थ्यांनी व्‍यक्‍त केली. राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवाराच्या कार्याविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. बी. एल. स्‍वामी यांनी आभार मानले.

शिक्षण हेच खरे लंगर

लोक धर्मासाठी, स्वतःच्या नावासाठी जो खर्च करतात. त्यांनी तो शिक्षणासाठी द्यायला हवा. शिक्षण हेच खरे ’लंगर’ आहे. यामुळे मुलांची आयुष्य घडतात, अनेक परिवार चालतात. धर्माच्या नावाने कोणालाही प्रभावित करता येते, परंतु शिक्षण आणि सेवा याचे नाव काढल्यास लोक शंका घेतात. ही मानसिकता बदलायला हवी, असे जितेंद्र सिंह शंटी म्हणाले.