Home Blog Page 155

‘मथुरेतील वृंदावनात’ तुळशीबागेचा गणपती विराजमान

पालखीतून तुळशीबाग महागणपतीची पारंपरिक आगमन मिरवणूक; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट  शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष
पुणे : फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. मंडळाने यंदा साकारलेल्या मथुरेतील वृंदावनात ‘तुळशीबागेचा महागणपती’ विराजमान झाला.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करत आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.१५ वाजता आळंदी देवाची प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते झाली. श्रींच्या आगमन सोहळ्याचा शुभारंभ उद्योजक पुनीत बालन यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी उत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, वसंत नगरकर, परिसरातील व्यापारी वर्ग तसेच मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

सकाळी १० वाजता  गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली.  मिरवणूक गणपती चौकातून नगरकर चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक, लक्ष्मी रोड मार्गे पुन्हा गणपती चौक ते उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारा वादन झाले.  रुद्रांग व तालगर्जना वाद्यपथकांनी देखील वादन केले.

नितीन पंडित म्हणाले,  तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने  मथुरेतील ‘वृंदावन’ या संकल्पनेवर आधारित देखावा सादर केला आहे. तब्बल ८० फूट रुंद, १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असा भव्य देखावा असून देखाव्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराचे १४ पॅनल आणि सुमारे ३० मोर वृंदावनात विहार करताना साकारले आहेत. राधाकृष्णांचे मंदिर आणि २० फूट लांब, ४० फूट उंच भव्य प्रवेशद्वार या देखाव्याचे प्रमुख आकर्षण आहे. उत्सव काळात अभिषेक, गणेश याग, बृहस्पती याग, सत्यविनायक पूजा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्य-देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

पुणे, दि. २७ ऑगस्ट २०२५ : गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी श्रीमती जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई-वडिलांनी – डॉ. दिवाकर गोऱ्हे व सौ. लतिका गोऱ्हे – यांनी सुरू केली होती आणि आजही ती भावपूर्णपणे पुढे नेली जात आहे.

या प्रसंगी घरातील आरास पर्यावरणपूरक ठेवण्यात आली होती. सोनेरी मोदकाद्वारे भारताच्या समृद्धीचे प्रतीक मांडले गेले, तर पाठीमागील धनुष्यबाण व त्रिशूलाच्या सजावटीतून सामर्थ्य आणि श्रद्धेचा संगम व्यक्त करण्यात आला. ही आरास केवळ सजावट नसून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रगतीची प्रार्थना असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची मनोकामना केली. “या वर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला सुख-समाधान मिळो, शेतीच्या उत्पादनास योग्य भाव मिळो आणि नवी उभारी घेण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत. तसेच विद्यार्थी, महिला आणि कामगार यांचे जीवन सुजलाम-सुफलाम व्हावे,” असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची दिशा आहे. गावपातळीवर महिलांना सुरक्षितता, नेतृत्व आणि प्रगतीची संधी मिळावी, ही आमची गणरायाकडे प्रार्थना आहे.”

राज्याच्या महायुती सरकारसाठी प्रार्थना करताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहे. या तिघा नेत्यांमध्ये कायम जिव्हाळा , मैत्री आणि सलोखा टिकून राहावा, जेणेकरून ते एकसंघपणे कार्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील.” त्याचबरोबर, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक पातळीवर प्रगती व सामर्थ्य प्राप्त होवो, अशीही त्यांनी प्रार्थना केली.

गणरायाच्या आगमनानंतर लवकरच गौरी पूजनाचा मंगल सोहळा होणार असून कौटुंबिक ऐक्य आणि समाजातील स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून तो साजरा केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन, म्हणाले- सर्व संकट दूर व्हावेत अशी मी प्रार्थना करतो

मुंबई-मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- सर्व संकट दूर व्हावेत अशी मी प्रार्थना करतो
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून, घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीगणेश आपले आराध्य दैवत आहेत, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे आपल्या देशावर येणारे सर्व संकट दूर करण्यासाठी मी प्रार्थना करतो.

मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 3 ठार:बर्थडे गर्लसह तिच्या आईचा करुण अंत

मुंबई-अवघ्या राज्यात गणेशोत्सवाचा आनंद असताना मुंबईतील विरार परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून वाढदिवस असणाऱ्या एका चिमुकलीसह तिच्या आईचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा बळी गेला आहे. गंभीर म्हणजे ढिगाऱ्याखाली चिमुकलीच्या वडिलांसह अजून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्युचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा मंगळवारी रात्री उशिरा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत 3 जण ठार झाले असून, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. ही घटना घडली तेव्हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका 1 वर्षीय चिमुकलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण अचानक इमारतीचा एक भाग कोसळल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. त्यात बर्थडे गर्लसह तिची आई व अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या इथे अग्निशमन दल, पोलिस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) व स्थानिक प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू आहे. त्यात आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ही इमारत फार जुनी होती. तिच्या भिंतीना तडे गेले होते. सलग होणाऱ्या पावसामुळे या भेगा अधिकच रुंद झाल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक मदतीसाठी हाक देत असल्याचेही निदर्शनास येत आहे. सदर अपार्टमेंटमध्ये 12 च्या आसपास कुटुंब वास्तव्यास होती. दुर्घटना कोसळल्या नंतर इमारतीच्या दुसऱ्या विंगला तातडीने रिकामे करून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी इमारत सील केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे महापालिकेने 10 वर्षांपूर्वीची ही इमारत अतिधोकायक घोषित केली होती. पालिकेकडून अनेकदा त्यांना या प्रकरणी नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही नागरिकांनी ही इमारत रिकामी केली नव्हती. सदर इमारतीच्या भोवती मोठ्या प्रमाणात चाळी आहेत. त्यामुळे घटनास्थळी जेसीबीसारखी यंत्रणा पोहोचवण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर संजीवनी हॉस्पिलट, प्रकृती हॉस्पिटल बोलिंज, सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा, जीवदानी हॉस्पिटल चंदनसर आदी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जात असल्याचे सांगण्यात येते . राज ठाकरे यांनी गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचे फोन करून निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार सहकुटुंब उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले .

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दरवर्षी बसवला जातो. अनेक सिनेकलाकार व राजकीय नेते मंडळी यावेळी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तसेच आरतीसाठी जमतात. यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे हे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात देखील आता दोन्ही ठाकरे बंधू युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विजयी मेळावा घेतल्यानंतरच शिवसेना आणि मनसे एकत्र येत युती करतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अद्याप तरी त्यांनी अधिकृत युतीची घोषणा केलेली नाही. परंतु, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘दगडूशेठ’ गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूक

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्रीमध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात फुलांनी सजविलेल्या रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, विनायक रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात आली होती. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.

ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांसह अनेक उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

भव्य मयूर रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक

अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष : कृष्णकुंज मध्ये मंडईचे बाप्पा विराजमान
पुणे: गणपती बाप्पा मोरया… आले रे आले गणपती आले आणि शारदा गणपतीचा जयघोष करत फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघाली आणि निसर्गाच्या सानिध्यातील ‘कृष्णकुंज’ मध्ये मंडईचे बाप्पा विराजमान झाले.

गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर, स्नेहल नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते झाली. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, अध्यक्ष मिलिंद काची, विश्वास भोर, राजेश कराळे, सुरज थोरात, विकी खन्ना यावेळी उपस्थित होते.

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक – गोटीराम भैया चौकातून उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग होता.

 मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक यांनी वादन केले.

कृष्णकुंज’ मध्ये विराजमान झाले शारदा गजानन

गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट मंडळातर्फे साकारण्यात येणार आली आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण आहेत. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती आहे. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.  

अण्णा थोरात म्हणाले, झोपाळ्यावर विराजमान शारदा गजानन यंदा भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. दर तीन वर्षांनी  शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. झोपाळा राजस्थानी शैलीने फुलांनी सजवण्यात आला आहे.  उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आयुक्तांची मोहम्मदवाडी–उंड्रीला भेट; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने कारवाईचे आश्वासन

पुणे, – उंड्री-मोहम्मदवाडी येथील नागरिकांना मंगळवारी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या अचानक भेटीने दिलासा मिळाला. महापालिकेच्या प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांसह आलेल्या आयुक्तांनी परिसरातील विविध नागरी समस्या पाहणी करून त्यांचे तातडीने निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले. पाणीपुरवठ्याची कमतरता ही सर्वात गंभीर समस्या असल्याचे त्यांनी मान्य केले आणि ती तातडीने सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

राम यांच्यासोबत रस्ता, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभागाचे अधिकारी होते. मोहम्मदवाडी–उंड्री रहिवासी कल्याण विकास फाउंडेशन (MURWDF) यांनी नुकतेच आयुक्तांना निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केल्यामुळे ही भेट आयोजित करण्यात आली.

पाहणी दरम्यान संघटनेच्या सदस्यांनी अनेक समस्या मांडल्या. यात न्याती इस्टेट ते कंट्री क्लब आणि न्याती इस्टेट ते डीपीएस स्कूल या रस्त्यांची दयनीय स्थिती, कडनगरमधील ओव्हरहेड केबल्सचे योग्य व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रणालीतील त्रुटी, रस्त्यांवरील अपुरी प्रकाशयोजना, सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आणि काही ठिकाणांचे सौंदर्यीकरण या प्रमुख होत्या.

पाणीपुरवठ्याच्या समस्येवर राम यांनी जलपुरवठा विभागप्रमुख नंदकुमार जगताप यांना अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय तत्काळ राबवण्याचे निर्देश दिले. तसेच रस्त्यांची दुरुस्ती, जलनिस्सारण सुधारणा व स्ट्रीटलाइट बसविण्याचे कामही वेगाने करण्यास सांगितले.

रहिवाशांनी न्याती एस्तेबानजवळील सुविधा जागेला उद्यानात रूपांतरित करण्याची मागणी केली असता आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले, “ही भेट ही वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी केलेले सकारात्मक पाऊल आहे. आम्हाला विश्वास आहे की पीएमसी ठोस कृती आराखड्याद्वारे मोहम्मदवाडी आणि उंड्रीतील नागरिकांच्या जीवनमानात लवकरच सुधारणा करेल.”

बैठक एमयूआरडब्ल्यूडीएफच्या सदस्यांनी आयोजित केली होती – सुनील अय्यर, संदीप कोल्हटकर, रेणुका सूर्यवंशी, नदिम इनामदार, सुनील कोलोटी, आशिष गुप्ता, दीपा चीमा, कौस्तुभ पानसरे, उमेश राजमाने आणि सजीव नायर.

सजीव नायर, उंड्रीतील रहिवासी म्हणाले,
“आपल्या सकारात्मक प्रतिसादासाठी आणि नागरी पायाभूत सुविधा व घरगुती पाणीपुरवठा यासंबंधी त्वरित दिलेल्या सूचनांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत.
आपला दौरा हा केवळ औपचारिकता नाही – तर आमच्या परिसरातील ठोस व कृतीशील बदलांची हमी आहे. त्यामुळे आमच्यात आशा आणि विश्वास निर्माण झाला आहे की आमचे जुने प्रश्न आता निकाली निघतील.
आमच्या समस्या ऐकण्यासाठी, त्यावर उपाययोजना आखण्यासाठी आणि स्वतः भेट देण्यासाठी वेळ, ऊर्जा आणि नेतृत्व दिल्याबद्दल आपले आभार.”

उमेश राजमाने, उंड्रीतील आणखी एक रहिवासी म्हणाले,
“आमच्या उंड्री-मोहम्मदवाडी परिसराला भेट देऊन मूळ पातळीवरील समस्या जाणून घेतल्याबद्दल आम्ही राम साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या भागाकडे दुर्लक्ष होत असताना इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथमच भेट दिली आहे. त्यांनी नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांची गंभीरता आणि गरज त्वरित ओळखली. विविध विभागातील अधिकाऱ्यांसह ते स्वतः परिसरात फेरफटका मारत परिस्थितीचे मूल्यांकन करताना पाहणे खूप आनंददायी होते.
रस्ता विभागातील अनिरुद्ध पावसकर यांनी आम्हाला संयमाने ऐकले, तात्काळ उपाययोजना आणि काही दीर्घकालीन कामांची नोंद घेतली. आमच्या गरजांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून आम्ही खूश आहोत. अशा अर्थपूर्ण आणि परिणामकारक कामाची आम्ही अपेक्षा करतो, जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल आणि शहर अभिमानास्पद होईल.”

सुनील कोलोटी, मोहम्मदवाडी-उंड्री रेसिडेंट्स वेल्फेअर डेव्हलपमेंट फाऊंडेशन (MURWDF) म्हणाले,
“आयुक्त नवल किशोर राम यांनी संपूर्ण पथकासह उंड्री आणि मोहम्मदवाडीला दिलेल्या भेटीसाठी आम्ही मनापासून आभार मानतो. नागरिकांना अद्याप टँकरवर अवलंबून राहावे लागणाऱ्या पाणीपुरवठा समस्येची त्यांनी केलेली दखल व स्थळावरची पाहणी यामुळे अल्पकालीन दिलासा व दीर्घकालीन उपाय यांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास वाटतो. त्यांनी खड्डेमय उंड्री मार्ग, जो हजारो प्रवाशांचा जीवनवाहिनी आहे, त्याच्या दुरुस्तीबाबत तसेच ड्रेनेज, रस्त्यावरील दिवे आणि इतर नागरी सुविधांच्या उन्नतीबाबत त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. नागरिक आणि पीएमसी नेतृत्व यांच्यातील हा रचनात्मक संवाद हा सकारात्मक आरंभ आहे आणि आपल्या समुदायाच्या उन्नतीसाठी केलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आम्ही अपेक्षा करतो.”

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांसाठी एसईबीसी-ओबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा तीन महिने मुदतवाढ

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई, दि. २६ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यापूर्वी प्रेवश घेतल्यानंतर सुरुवातीला सहा महिने व त्यानंतर
तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही काही विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पुन्हा तीनमहिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मुदतवाढ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतु ठराविक कालावधीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.आणि दिलेल्या वाढीव कालावधीतही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही.या विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.आणि यानंतरही वाढीव मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित विद्यार्थीच जबाबदार राहतील.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला आहे.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
000

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ:610 किलोमीटरचे अंतर 9 ते 9.30 तासात होणार पूर्ण


नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखी आरामदायी सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे.

नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

नांदेड येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

नांदेड-मुंबई वंदे भारतचे तिकीट दर आणि वेळापत्रक

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट 1610 रुपये आहे. जेवण न घेतल्यास त्यातून 364 रुपये कमी होतील. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 2930 रुपये असून जेवन न घेतल्यास त्यातून 419 रुपये वजा होतील. नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस पहाटे 5 वाजता सुटेल ती दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट बुकिंग 28 ऑगस्टपासून तर मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट 27 तारखेपासून बुक करता येईल.

मुंबई ते नांदेड वंदे भारतच्या एसी चेअर कार प्रवासाचे तिकीट 1775 रुपयांना असेल. यातून 530 जेवणाचे वजा केल्यास ते 1240 रुपयांवर येईल. तर, एक्झ्युकेटिव्ह चेअर कारचे तिकीट 3125 रुपये आहे. त्यातून 613 वजा केल्यास ते 2512 रुपयांवर येईल. मुंबईतून नांदेडला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1 वाजता सुटेल ती रात्री 10.50 वाजता पोहोचेल.

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी

मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.
नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 9 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा.
हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
नियमित प्रवास करणारे प्रवासी, भाविक, अधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.
पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.

मोदींनी ट्रम्प यांचा फोन उचलला नाही:चार वेळा बोलण्यास नकार, अमेरिकन शिष्टमंडळालाही दिल्लीत येण्यापासून रोखले

जर्मन वृत्तपत्राचा दावा-
नवी दिल्ली:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना टॅरिफबाबत चार वेळा फोन केले, परंतु पंतप्रधान मोदी त्यांच्याशी एकदाही बोलले नाहीत. यामुळे दोन्ही नेत्यांमधील तणाव वाढला. हा दावा जर्मन वृत्तपत्र FAZ ने केला आहे. तथापि, हे फोन कधी केले गेले, याचा उल्लेख वृत्तपत्राने त्यांच्या अहवालात केलेला नाही.
वृत्तपत्रानुसार, ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणामुळे आणि भारताला “मृत अर्थव्यवस्था” म्हटल्यामुळे मोदी संतापले आहेत. पूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध होते, परंतु आता भारताने अमेरिकेसोबत व्यापार करारासाठी चर्चा रद्द केली आहे. अमेरिकन शिष्टमंडळाला नवी दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आले.

ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लादला आहे, ज्यापैकी २५% दंड आहे, जो उद्यापासून लागू होईल. ट्रम्प म्हणतात की, भारताने रशियन तेल खरेदी केल्याने पुतिन यांना युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यास मदत होत आहे.
अहवालात तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की- सहसा ट्रम्प यांची पद्धत अशी असते की ते प्रथम व्यापार तूटसाठी एखाद्या देशावर हल्ला करतात, नंतर उच्च शुल्काची धमकी देतात. यानंतर, भीतीपोटी वाटाघाटी सुरू होतात आणि शेवटी ते उच्च शुल्क लादून आणि नंतर काही सवलती देऊन स्वतःला विजेता घोषित करण्याचा प्रयत्न करतात.

हे अनेक देशांसोबत घडले आहे आणि ट्रम्प यांनी अमेरिकन बाजारपेठेवर त्यांची पकड किती मजबूत आहे हे दाखवून दिले, परंतु मोदींनी यावेळी झुकण्यास नकार दिला.

न्यूयॉर्कमधील न्यू स्कूलमधील इंडिया-चीन इन्स्टिट्यूटचे सह-संचालक मार्क फ्रेझियर म्हणतात की, चीनविरुद्ध भारताचा वापर करण्याची अमेरिकेची रणनीती अपयशी ठरत आहे. भारताने कधीही चीनविरुद्ध अमेरिकेसोबत पूर्णपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले नाही.

ट्रम्प यांच्या या वागण्याने मोदींना दशकापूर्वीच्या अपमानाची आठवण झाली.

ट्रम्प यांच्या वागण्याने पंतप्रधान मोदींना खूप वाईट वाटले आहे, असे वृत्तपत्राने लिहिले आहे. ते मोदींना जवळजवळ एक दशकापूर्वी जिनपिंगकडून मिळालेल्या जुन्या अपमानाची आठवण करून देत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तेव्हा गुजरातमध्ये आले होते आणि मोदींना मैत्रीचे आश्वासन दिले होते, परंतु त्याच वेळी चिनी सैन्य हिमालयातील भारतीय हद्दीत घुसले होते.

यानंतरही मोदींनी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांशी झटापट झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. असे म्हटले जाते की, त्या घटनेनंतर मोदींचे मन खूप दुखावले गेले होते.

आता ट्रम्प यांचेही वर्तन असेच झाले आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी मोदींना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आणि त्यांचे कौतुक केले आणि त्यांना एक फोटो अल्बम भेट दिला. दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले चालले होते.

दिल्लीजवळ ट्रम्प यांच्या नावाने आलिशान टॉवर्स देखील बांधले गेले होते, ज्यांचे ३०० फ्लॅट (१०८ कोटी रुपयांपर्यंत किमतीचे) एकाच दिवसात विकले गेले होते, परंतु अलीकडील घटनांनी वातावरण बदलले. ट्रम्प यांनी भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधून त्यांचा अपमान केला. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.

न्यूज सोर्स लिंक- https://www.faz.net/aktuell/wirtschaft/zollstreit-wie-modi-trump-die-stirn-bietet-110653695.html

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले?

नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान: हर्षवर्धन सपकाळ.

नांदेड, दि. २६ ऑगस्ट २०२५

स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, कमलकिशोर कदम, माधवराव किन्हाळकर, खासदार रविंद्र चव्हाण, खा. शिवाजीराव काळगे, खा. कल्याण काळे, खा. शोभा बच्छाव, खा. अजित गोपछेडे, आ. प्रताप चिखलीकर, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर यांच्यासह विविध पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा म्हणजे पांग फेडण्याचा कार्यक्रम आहे. वेगळवेगळे पक्ष, धर्म, जात असली तरी सर्वांना सोबत घेऊन जावे हे आपले संस्कार आहेत. पण आज राज्यात अत्यंत खालच्या पातळीवर बोलले जाते, जात व धर्माच्या नावावर काय चालले आहे त्यावर तर बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे परंतु या पावन भूमितील समाज जर जातीपातीत विभागला जात असेल, किराणा माल घेतानाही जात बघितली जात असेल तर कुठे नेऊन ठेवला आहे मराठवाडा माझा, असे विचारावे वाटते. पुढील काळात सद्भावना व सद्भावनाच जोपासा व विषारी वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाचा मिळावे असा कायदा महाराष्ट्र विधिमंडळात एकमुखाने झालेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती तर आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो अशी वल्गणा केली होती, त्याचे काय झाले असा प्रश्न विचारून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे जाती पातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन बघितले पाहिजे असे म्हटले आहे.

पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

बुधवारी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २६ ऑगस्ट २०२५) वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष विनायक कुलकर्णी व मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त प्रवीण कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
वमंडळाची धार्मिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखत या वर्षी गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ, निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि महिला भगिनींचा आवडता “खेळ पैठणीचा” अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष केतन जाचक, खजिनदार समीर कुदळे आणि उपखजिनदार सौरभ कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. सर्व स्पर्धा मोफत असून स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील या जुन्या आणि नामांकित या मंडळाची स्थापना १९७६ साली झाली होती. माजी नगरसेवक नगरसेवक नंदकुमार जाधव, प्रदीप कुदळे, राजेंद्र परदेशी, दिपक उत्तेकर, गजानन गवळी, प्रवीण कुदळे अशा मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्ष पद भूषवून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून या वर्षीचा गणेशोत्सव विशेषत्वाने साजरा होणार आहे. गेल्या पाच दशकांपासून सुवर्ण मित्र मंडळाने समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेबरोबरच सामाजिक प्रबोधन करणे हा मंडळाचा प्रमुख हेतू आहे. सर्व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, तरुणाईचा उत्साह आणि महिला भगिनींच्या सहभागाने या वर्षी पंचक्रोशीत आदर्श ठरेल असे उपक्रम यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राबवून गणेशोत्सव अधिक उपयुक्त व आदर्शवत करण्याचा संकल्प केला आहे, सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुवर्ण मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, पिंपरीगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :- बुधवारी, दि.२७ ऑगस्ट, रात्री नऊ वाजता, “श्रीं” चा आगमन सोहळा आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उदघाटन; गुरुवारी (दि.२८ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, जेष्ठ नागरिकांचे भजन आणि “श्रीं”ची आरती आठ वाजता; शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, विठ्ठल रुक्मणी भजनी मंडळ ,काळेवाडी यांचे भजन नंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती; शनिवारी ( दि. ३० ऑगस्ट) दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत जेष्ठ नागरीक कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा, रात्री ८ वाजता “श्रीं”ची आरती; रविवारी (दि.३१ ऑगस्ट) सकाळी ११ ते दुपारी ३, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी सहा वाजता, सावतामाळी भजन मंडळ, पिंपरीगाव यांचे भजन, ७:३० वाजता युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ त्यानंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती;
सोमवारी (दि.१ सेप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता, तुळजाभवानी भजनी मंडळ यांचे भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती; मंगळवारी (दि.२ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल;

बुधवारी (दि.३ सप्टेंबर) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, रात्री आठ वाजता “श्रीं”ची आरती होईल; गुरुवारी (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल आणि महिला भगिनींचे विशेष आकर्षण असणारा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.५ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे त्यानंतर “श्रीं”ची आरती होईल या सर्व कार्यक्रमाला गणेश भक्तांनी, मंडळाचे हितचिंतक, देणगीदार आणि पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २६ : जिल्ह्यातून २७ ते २९ ऑगस्ट दरम्याण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळेफाटामार्गे ओतूर ते बनकर फाटामार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरुन नारायणगाव मार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यसस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्याण मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार नगर कल्याण मार्गावरील वाहतूक १४ नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे जातील.
नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.

नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र.५० व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन-नागापूर-रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे.

नारायणगावकडून येताना बायपास क्र.६० मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे.

खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील.

जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र.४८ वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील.
जुना मुंबई ते पुणे मार्गावरुन पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील.

लोणावळा शहर परिसरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरुन न जाता वलवण पुलावरुन द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे जातील.
या आदेशाची अंमलबजावणी २७ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून २९ ऑगस्टच्या रात्री १२ पर्यंत लागू राहील.
०००००

शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २६ : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे.

आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००००