Home Blog Page 154

मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती,त्याचे काय झाले?

दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस इंग्रजांची तोडा ,फोडा, झोडा नीती अवलंबत आहेत

मराठा समाजाला आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे हास्यास्पद; तीन महिने सरकार झोपले होते काय?

सत्तेत येताच सात दिवसात मराठा आरक्षण देण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेचे काय झाले?

मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील समाजासह मुंबईत पोहचत असताना सरकारने या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता केवळ एक दिवसाची परवानगी दिली ती हास्यास्पद असून तीन महिन्याआधी आंदोलनाची घोषणा केली होती तर सरकार एवढे दिवस काय झोपा काढत होते का?

काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपा युती सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा ठराव पास केला त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. सत्तेत येताच ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचे काय झाले? धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणविसांनी दिले होते, त्याचे काय झाले? ‘सागर’ बंगल्यावर मंथन करून अमृत पिऊन विष मात्र समाजावर व विरोधी पक्षावर टाकण्याचे पाप फडणवीस व भाजपा करत आहे. फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नितीप्रमाणे भाजपा व फडणवीस काम करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आज जे तीन पक्ष सत्तेत आहेत तेच त्यावेळीही सत्तेत होते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून त्यासाठी त्यांचा आग्रहही आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे. भाजपा सरकारमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर त्यांनीही जातनिहाय जनगणना करावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठा मोर्चा दरम्यान जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्टअटॅकमुळे मृत्यू, मनोज जरांगे म्हणाले,’सतीश भैय्याचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही

पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे निघालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून, ते केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणसाठी याआधीही अनेकांनी बलिदान दिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मोर्चाचा जुन्नर येथे पहिला मुक्काम होता. सतीश देशमुख हे देखील मनोज जरांगेसोबत मोर्चात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये असताना सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडली. सतीश भैय्याचे आताच बलिदान गेले. हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी लातूरच्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात एका मराठा बांधवाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे मुंबईला निघण्याच्या एक दिवसआधी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. बळीराम मुळे (वय ३५) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बळीराम मुळे याने आपल्या खिशात एक चिठ्ठी ठेवून विष प्राशन केले. या चिठ्ठीत त्याने सरकारवर ‘मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा’ करत असल्याचा आणि ‘जरांगे पाटलांना वारंवार उपोषणाची वेळ आणत असल्याचा’ आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला तात्काळ लातूरच्या रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

भाजप कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार दिल्याने महिला इन्स्पेक्टरची वरिष्ठांनी केली बदली,न्यायाधिकरणाने दिला तडाखा

पुणे : एका भाजपा आमदाराच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्याने केलेल्या अश्लील स्पर्शामुळे त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिलेल्या महिला पोलीस इन्स्पेक्टरला वरिष्ठांकडून जाचक विनंत्या होऊ लागल्याने त्या रजेवर गेल्या आणि रजेवरून परत आल्यावर मागील तारखेचे पत्र बनवून त्या आधारे या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. या अन्यायाविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावल्यावर प्रशासकीय न्यायाधिकरणाने पोलिसांची कानउघाडणी करणरे आदेश दिले आहेत आणि या महिला इन्स्पेक्टर ची बदली करणारे वरिष्ठांचे आदेश रद्द केले आहेत. सुसंस्कृत पुण्याला आणि पुण्याच्या पोलीस दलाला या आदेशाने ‘आरसा ‘ दाखविण्याचे काम केले आहे.यामुळे एकीकडे पुरावे असल्याने संबधित कार्यकर्त्याला अटक केल्याचे म्हटलेल्या पोलिसांनी नंतर लगेचच या महिला पोलीस अधिकाऱ्यावरही बदलीची कारवाई करून दोन्ही बाजूंनी समजूत काढण्याचे जणू प्रयत्न केले होते असे निष्पन्न झाले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर करण्यात आलेला बदली आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केला आहे. हा बदलीचा आदेश ‘दंडात्मक’ स्वरूपाचा आणि ‘सूडबुद्धी’ने काढल्याचे दिसून येते,असे निरीक्षण न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे,या निर्णयामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची जुलै २०२४ मध्ये बदली होऊन पुणे शहरात नेमणूक झाली होती. जून २०२५ मध्ये त्या बंदोबस्त ड्युटीवर असताना शिवाजी रस्त्यावर त्यांचा विनयभंग झाला. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपी प्रमोद कोंढरे विरुद्ध गुन्हा नोंदवला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी महिलेला अन्य ठिकाणी बदली स्वीकारण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावर अधिकारी महिलेने ठामपणे नकार देत सांगितले, ‘मी गुन्हा दाखल केला आहे; आता बदली झाली, तर समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे सांगून त्यानंतर त्या रजेवर गेल्या.रजेवरून परत आल्यानंतर २१ जुलैला त्यांना वाहतूक शाखेत बदली झाल्याचा आदेश मिळाला. हा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या निर्णयानुसार घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात आदेश ‘मनमानी, दंडात्मक आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा’ असल्याचे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.
ठळक मुद्दे…
गुन्हा दाखल केल्यानंतर
,दोन दिवसांत काढला आदेश,अन्याय्य बदली आदेश,आदेश दंडात्मक व सूडबुद्धीने घेतल्याचे वाटते आदेश रद्द;
महिला पोलिस निरीक्षकाच्या बदलीचा आदेश आधीच्या तारखेचा आहे. ‘कारणे दाखवा नोटीस’ न देता आदेश प्रसिद्ध केला गेला. निरीक्षकाच्या विरोधात अहवाल शनिवारी तयार करून दोन दिवसांतच आदेश काढला गेला. त्यांच्या शिस्तीवर कधीही कारवाई झालेली नव्हती, उलट त्यांना प्रशस्तिपत्रके व पुरस्कार मिळाले आहेत, असे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.

माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव :दरम्यान यातील आरोपी कोंढरे यांनी माय मराठी ला फोन करून सांगितले कि, आता प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यालायावर माझा विश्वास आहे , मी यात पूर्ण निर्दोष आहे , कोणीतरी माझा राजकीय गेम केला आहे. आणि सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल मला आदर देखील आहे. मी कोणाची बदली करा म्हणून सांगितले नाही, प्रशासनाने त्यांची बदली केली आणि त्यांनी दाद मागितली या प्रकरणात पुन्हा माझे नाव त्याच प्रकरणाला उजाळा देत आणले गेले व पुन्हा बदनामीला मला सामोरे जावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे माझी निव्वळ राजकीय कारकीर्द नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही यामुळे परिणाम होत आहे.

अदानींनी 1000 कोटींना खरेदी केले 10वे जेट:32 कोटींमध्ये बनवले 5 स्टार हॉटेलसारखे इंटेरिअर

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी अमेरिकन विमान कंपनी बोईंगकडून ७३७-मॅक्स ८-बीबीजे मालिकेचे एक आलिशान बिझनेस जेट (व्हीटी-आरएसए) खरेदी केले आहे. त्याची किंमत सुमारे १००० कोटी रुपये आहे. ते लंडनला न थांबता उड्डाण करू शकते, तर ते एकाच इंधन भरण्यावर अमेरिका-कॅनडापर्यंत पोहोचू शकते.

अदानी यांच्या नवीन विमानाने स्वित्झर्लंडच्या बासेल शहरापासून ९ तासांत ६३०० किमी अंतर कापले आणि बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरले. पाण्याच्या तोफांच्या सलामीने त्याचे स्वागत करण्यात आले.

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही २४ ऑगस्ट २०२४ रोजी या मालिकेतील एक विमान खरेदी केले. तसे, बोईंग ७३७ मॅक्स २०० आसनी विमाने अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट देखील वापरतात. आता उद्योगपती देखील ते त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी वापरत आहेत.अदानींच्या बिझनेस जेटचे इंटीरियर ३५ कोटी रुपये खर्चून स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले आहे. हे अल्ट्रा-लक्झरी एअरक्राफ्ट सूट बेडरूम, बाथरूम, प्रीमियम लाउंज, कॉन्फरन्स रूमसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे आणि ३५ हजार फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या पंचतारांकित हॉटेलच्या बरोबरीचे आहे. विमानाचे इंटीरियर पूर्ण करण्यासाठी २ वर्षे लागली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कर्णावती एव्हिएशन कंपनीकडे नवीन विमानांसह १० व्यावसायिक विमानांचा ताफा आहे. यामध्ये अमेरिकन बोईंग-७३७ सर्वात महाग आहे. यासोबतच कॅनेडियन, ब्राझिलियन आणि स्विस मालिकेतील विमाने देखील आहेत. त्याच वेळी, अदानी यांनी बी-२००, हॉकर्स, चॅलेंजर मालिकेतील ३ जुनी विमाने विकली आहेत.
बिझनेस वेबसाइट गुड रिटर्न्सनुसार, गौतम अदानी सध्या मुकेश अंबानी नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $60.3 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी रुपये) आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते टॉप 30 मध्ये आहेत आणि सध्या ब्लूमबर्गच्या यादीत ते 21 व्या क्रमांकावर आहेत.

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

पुणे : ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४० वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणेशाचरणी लीन होत असताना बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे हे वर्ष जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

दाक्षिणात्य अभिनेता विजय व त्याच्या बाउन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल

तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) नेता आणि अभिनेता थलापती विजय आणि त्याच्या बाउन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी मदुराई येथे झालेल्या विजयच्या पक्ष सभेदरम्यान एक कार्यकर्ता जखमी झाल्याचा आरोप आहे.पोलिसांनी विजय आणि त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुद्ध बीएनएसच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शरत कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तो म्हणतो की तो विजय ज्या रॅम्पवरून चालत होता त्या रॅम्पवर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बाउन्सर्सनी त्याला ढकलले. शरतने सांगितले की त्याने पाईप धरून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी तो खाली पडला आणि त्याच्या छातीत दुखापत झाली.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये शरत रॅम्पवरून घसरताना दिसतो. तो प्रथम रेलिंग धरतो पण काही वेळाने त्याचा हात घसरतो आणि तो खाली पडतो.तक्रारदार शरत कुमार म्हणाला, “मला त्यांना पहायचे होते, म्हणून मी रॅम्पवर चढलो. बाउन्सर्सनी मला ढकलले आणि मला दुखापत झाली. म्हणूनच मी तक्रार दाखल केली आहे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

मदुराईतील परापाठी येथे झालेल्या या परिषदेत लाखो समर्थक जमले होते. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरणे, ध्वजारोहण आणि पक्षाच्या नेत्यांच्या संकल्पाने झाली.

विजय सुमारे ३०० मीटरचा रॅम्प चढून भव्य शैलीत स्टेजवर पोहोचला. यावेळी शरतने त्याला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला.

पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विजय राजकारणात सक्रिय आहे. तो ‘तमिलगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) चा संस्थापक अध्यक्ष आहे. विजयने २ फेब्रुवारी २०२४ रोजी या पक्षाची स्थापना केली होती.

मृतांमध्ये 34 वैष्णोदेवी यात्रेकरूंचा समावेश:जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर; 41 मृत्युमुखी, नद्या कोपल्या, रस्ते-पूल तुटले, 58 गाड्या रद्द

१९१० नंतरचा सर्वाधिक पाऊस,जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस-
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी जम्मू – कटरा येथून ये-जा करणाऱ्या ५८ गाड्या रद्द केल्या तर ६४ गाड्या मध्यावर थांबवण्यात आल्या. बुधवारी पाऊस थांबल्यानंतर मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. मुसळधार पावसामुळे अनंतनाग व श्रीनगरमधील झेलमने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी निवासी भागात घुसले. प्रमुख पूल व व्यावसायिक प्रतिष्ठानांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. किश्तवारमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे डोंगराळ भागात पूर आला. अनेक घरे, वाहने व दुकाने वाहून गेली. ढिगाऱ्यात व पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. २२ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर दूरसंचार सेवा अंशतः पूर्ववत करण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातही रात्रभर मुसळधार पाऊस पडला. जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागातून १०,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हवामान विभागाने सांगितले – जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस पडला. तो १९१० नंतरचा सर्वाधिक आहे. मंगळवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून २४ तासांत पाऊस पडला. उधमपूरमध्येही विक्रमी ६२९.४ मिमी पाऊस पडला. जुलै २०१९ मध्ये उधमपूरमध्ये ३४२ मिमी व ऑगस्ट १९७३ मध्ये जम्मूत २७२.६ मिमी पाऊस पडला.

लावैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवली, नातेवाइकांचा शोध सुरू..मंगळवारी, कटरा ते वैष्णोदेवी यात्रा मार्गादरम्यान अर्धकुनारीजवळ भूस्खलनात २० जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैष्णोदेवीकडील दोन मार्गांपैकी बुधवारी सकाळी हिमकोटी मार्गावरील यात्रा थांबवली होती. पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवली.
भारतीय हवाई दलाचे C-130 वाहतूक विमान बुधवारी जम्मूमध्ये पोहोचले, ते यात्रा मार्गावरील लोकांसाठी मदत – बचाव साहित्य घेऊन गेले.
माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अपघातानंतर, कटरा बेस कॅम्पमध्ये अस्वस्थता होती. तिथेच प्रियजनांच्या शोधात भटकणारे व्यथित नातेवाईक आहेत. शुभम साहू जबलपूरहून ११ जणांसह आला होता. परतताना रस्ता खचला. त्याचे तीन मित्र बेपत्ता आहेत.
पंजाबमधील सुभाष देखील चार साथीदारांचा शोध घेत रुग्णालय आणि मदत केंद्राच्या फेऱ्या मारत आहे. आतापर्यंत २० मृतांची ओळख पटली आहे,

यात्रा थांबवल्यानंतर कटरा येथे राहिलेल्या भाविकांत परतायचे की थांबायचे याबद्दल गोंधळ आहे. दिल्लीतील नैना म्हणाल्या, हेलिकॉप्टर तिकिटे बुक केली होती. परंतु सतत पाऊस, गाड्या थांबल्यामुळे सर्वकाही ठप्प आहे.

यात्रा का थांबवली नाहीजम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आश्चर्य व्यक्त करून हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही वैष्णोदेवी यात्रा थांबवली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यात्रेकरूंना का हलवले नाही? नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुर्घटना ढगफुटीने घडली. यात्रा थांबवली. पीडितांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जाहीर केले.

‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने ती उजळून निघाली आहे.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात आले आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात आली आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे.

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल.

पुण्यात शुक्रवारी ३२० पदक विजेत्‍यांचा गौरव,क्रीडादिनी मिशन लक्ष्यवेध योजनेचा शुभारंभ

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार २९ ऑगस्‍ट रोजी आंतरराष्ट्रीय पदकविजेत्‍यांसह राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील ३२० पदकविजेत्‍यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्‍स सेंटरचा शुभारंभही केला जाणार आहे.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात शुक्रवार २९ ऑगस्‍ट रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभ होईल. याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्‍या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्‍यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे जिल्‍हातील खासदार, आमदार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले आदी मान्‍यवर उपस्‍थित रहाणार आहे.

उत्तराखंड येथे फेबुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून, सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्‍पर्धेतील ३१४ पदकविजेत्‍या खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्‍यांना अनुकमे रू. ७, ५, ३ लाख रोख बक्षिस दिले जाणार आहे. मार्गदर्शकांना अनुक्रमे रू. ५०, ३० व २० हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्‍यांमध्ये ऑलिम्‍पिक पदक विजेता स्‍वप्‍नील कुसाळे, आशियाई पदक विजेती राही सरनोबत, आदिती स्‍वामी, ऑलिम्‍पिकपटू देवेंद्र वाल्‍मिकी, विश्व करंडक विजेती प्रियंका इंगळे या दिगज्‍ज क्रीडापटूंचा समावेश आहे. सर्वाधिक ८ पदकांचा विक्रम करणाऱ्या आदिती हेगडे हिला ३२ लाखांचे बक्षिस प्राप्‍त होणार आहे. राज्याच्या क्रीडा धोरण-२०१२ नुसार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांना रु.28.७० कोटी रकमेची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतराराष्ट्रीय स्‍पर्धेत पदकाची लयलूट करणाऱ्या ६ पदकविजेत्‍यांचाही गौरव केला जाणार आहे

कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ व बोधचिन्‍ह अनावरण केले जाईल. वार्षिक रु.१६० कोटी इतका खर्च मंजुर करण्यात आलेला या योजनेत १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आलेली असून, या सर्व क्रीडा प्रकारातून राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभ शुक्रवारी होईल. यामध्ये ॲथलेटिक्‍स, हॉकी, कुस्‍ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश असल्‍याची माहिती सहसंचालक सुधिर मोरे यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठी सुमारे ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक आणि १०० पदाधिकारी, क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षणार्थी असे एकूण ८०० जण उपस्थित राहणार आहेत.

मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना हमीपत्र:कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली 20 आश्वासने, पोलिसांची अटींसह आंदोलनाला परवानगी

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.

या आश्वासनांमध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश

मी, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर, त्यास दाखवण्यासाठी दिलेली परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगेल.
मी, पोलीस नियमित संपर्क करू शकतील अश्या पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची प्रतिनियुक्ती करेल.
मी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी विचारविनिमय करून, पिण्याचे पाणी (टँकरद्वारे पुरवठा करून) आणि प्रथमोपचार/वैद्यकीय मदत यांची देखील सभास्थळी आणि धरणे/निदर्शन कालावधीत पर्याप्त व्यवस्था करेल.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे,निदर्शने, इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येईल आणि वाहतुकीच्या सामान्य ओघामध्ये अडथळा आणणार नाही आणि वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल.
मी आणि इतर व्यक्ती,धरणे-निदर्शने, इत्यादीमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा,माझ्या निवेदनात विनिर्दिष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होऊ देणार नाही.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना त्या स्थळी आणि त्या स्थळाभोवती तैनात करण्यात येईल आणि तसेच संपर्काच्या तपशिलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरुपात पोलिसांना पुरवील.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शनं,सभा,इत्यादी विहित ठिकाणी/स्थळीच घेण्यात येईल.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने, इत्यादी विहित कालावधीत, म्हणजेच सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत घेण्यात येईल.
मी आणि इतर आयोजक, ध्वजांसाठी/फलकांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकाचा आकार 9 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी असे असेल. सहभाग घेणाऱ्या व्यक्ती, काठीवरील ध्वज/फलक, इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूनेच जवळ बाळगतील.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा संभव असतील अशा लाठ्या,अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत. मी याची खात्री करील की,सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती,ज्यामुळे मानवी जीवितास किंवा त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा दंगा उसळेल असे कोणतेही नकली किंवा इतर कोणतेही अग्निशस्त्र जवळ बाळगणार नाहीत.
मी आणि इतर आयोजक, याची खात्री करतील की, सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती,चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा, इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाही अथवा अशा गटांमधील सलोखा राखण्यास बाधक ठरणारी किंवा सार्वजनिक शांतता बिघडवणारी अशी कोणतीही कृती कोणत्याही रीतीने करणार नाही.
मी आणि इतर आयोजक, हमीपत्रातील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील आणि पोलिसांना सर्व परिस्थितीत सहकार्य करतील.

“म” मराठीच्या जयघोषाने 11 गणेश मंडळाची संयुक्त मिरवणूक

: मराठी भाषेचा गौरव रथाने गणेश भक्तांना केले आकर्षण
: मान्यवरांच्या हस्ते 500 मराठी शिक्षकांचा सन्मान
: 10 हजार पुस्तकांचे वाटप

पुणे, २७ ऑगस्ट: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे या यावर्षी “म” मराठीचा या जयघोषाने धनकवडी येथील ११ गणेश मंडळांची संयुक्त रूपाने निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित हजारो गणेश भक्तांना आकर्षित केले.
बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून भाषेच्या गौरव रथावर धनकवडी येथील 11 मंडळाचे गणपती विराजमान झाले होते. या एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ सहभागी झाले होते.
ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात आली.
ज्ञान प्रबोधनीचा एक सुर, एक तालात वाजवण्यात आलेल्या ढोल पथकाने गणेश भक्तांना आकर्षित केले.
मिरवणुकी दरम्यान 500 मराठी भाषा शिक्षकांचा सन्मान करण्यात आलं. तसेच मिरवणूक मार्गावर 10 हजार मराठी पुस्तकांचे वितरण करण्यात आले .

यावेळी आमदार भीमराव तापकीर, वर्षा तापकीर, माजी नगरसेवक विशाल तांबे, मोहिनी देवकर, धनकवडी येथील सहाय्यक आयुक्त सुरेखा बनगे, आणि इटली वरून आलेल्या ऍन मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच मंडळाचे अध्यक्ष संतोष धनवकडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप, विजय क्षिरसागर, सुनिल पिसाळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले, प्रतीक कुंभार, उदय गुंड पाटील, विकी सुबागडे, आनंद शिंदे, विशाल निगडे, उदय भोसले, सोमनाथ शिर्के, शंतनू येवले, मनोज शिंदे, विजय क्षीरसागर व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती, दि. २७: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मार्फत श्री छत्रपती मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळावा, त्याअंतर्गत ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, व्हाईस चेअरमन कैलास गावडे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कारखान्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जमिनीची घटती सुपीकता, खतांचा वाढता खर्च, पाण्याची कमतरता, उसाची घटती उत्पादकता, वातावरणीय बदल, घटता उतारा यामुळे शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले आहेत. या एआय तंत्रज्ञानाच्या वापराने उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांवर वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतीला किफायतशीर करण्यासाठी एआय तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. उसासोबतच फळबागा, कापूस, सोयाबीन पिकासाठीही एआयच्या वापराची तयारी करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.

वाढती लोकसंख्या, वाढते नागरिकरण, विकास कामांसाठी जमिनीचा वापर त्यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत असून, आहे त्या जमिनीत जास्तीचे उत्पादन काढल्याशिवाय देशाला आवश्यक कृषी उत्पादन मिळू शकणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असेही ते म्हणाले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपल्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येणार असून त्यापैकी ९ हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर कारखाना पावणेसात हजार रुपये अग्रिम म्हणून देणार असून शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये भरायचे आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान यापुढे वेळेवर मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. एआयच्या वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. हवामानात बदल होत असताना त्यावर मात करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे सांगून, उसाचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे, जमिनीची सुपीकता घटू नये यासाठी तणनाशकांचा वापर टाळावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरातील रस्त्यांच्या विकासकामांकरिता १० कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कारखान्याने रयत शिक्षण संस्थेला शाळा उभारण्यासाठी ८१ आर जमीन द्यावी. शाळा इमारत उभारणीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद ज्येष्ठ खासदार शरद पवार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याला राज्य शासन, जिल्हा बँकेच्या स्तरावर मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून आगामी काळातही कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, परिसरातील शेतकरी विविध पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक तो विचार करून कृषी विभागाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येतील. आता शेतीमधील पारंपरिक पद्धती बदलण्याची गरज आहे. खतांची, पाण्याची बचत कशी कमी होईल यासाठी एआयसारखे नवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल. राज्यातील शेतकऱ्यांचे २०२४ – २५ चे ठिबकचे अनुदान देण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चालू वर्षातील ५४ लाख रुपयांचे अनुदानही लवकरच देण्यात येईल. मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगावला आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे श्री. भरणे म्हणाले.

राजेंद्र पवार म्हणाले, कृषी विज्ञान केंद्र गेल्या २०- २५ दिवसापासून विविध गावांमध्ये एआयच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहे. एआय तंत्रज्ञान अजिबात अवघड नाही. हे तंत्रज्ञान नवीन असून ऊसातील खर्च वाढत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी या भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. जीवनमानाचा वाढता खर्च पाहता उत्पादन आणि उत्पन्न वाढले पाहिजे.

प्रास्ताविकात श्री. जाचक म्हणाले, एआय तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादनात ४० ते ४५ टक्के वाढ होऊ शकते. कारखान्याच्या सुमारे ६०० ऊस उत्पादक सभासदांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

यावेळी ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विशेषज्ञ मृदा शास्त्र आणि एआय तंत्रज्ञान ऊस शेती मार्गदर्शक डॉ. विवेक भोईटे, मध्यवर्ती न्यूज संशोधन संस्था पाडेगावचे वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. दत्तात्रय थोरवे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पीक उत्पादन आणि संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, प्रगतिशील शेतकरी संजीव माने आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात कृषी विभागाने आपल्या योजना, व्हीएसआय, विविध ठिबक संच उत्पादक, पाईप उत्पादक कंपन्या, ट्रॅक्टर तसेच अन्य कृषी यंत्रे, औजारे, ड्रोन तंत्रज्ञान, एआयसह अन्य आधुनिक तंत्रज्ञान पुरवठादार, अन्न प्रक्रिया स्टॉल आदी लावण्यात लावण्यात आले होते.

कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कारखान्याचे संचालक मंडळ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना:आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी; सरकारकडून चर्चेचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.

या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता.

…मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार आहोत. परंतु, हे आंदोलन एक दिवसाचे नाही, तर बेमुदत असणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मी उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असेल, तर कायद्याचे सर्व नियम आम्ही नक्की पाळू. माझा समाज देखील सर्व नियम पाळणार. कायद्याच्या नियमाबाहेर बाहेर जाणार नाही. ती ऑर्डर काय आहे ते मला माहीत नाही. पण मी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपोषणाला बसणार आहे. आम्ही हट्टी नाहीत, त्यांनी जे सांगितले त्या निर्णयांचे मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार. पण एक दिवसाचे नाही, तर बेमुदत. मी आता त्यावर प्रतिक्रिया देत नाही. संध्याकाळी शिवनेरी गडावर गेल्यानंतर पूर्ण ऑर्डर बघतो. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारचे आणि न्यायालयाचे मनापासून आभार देखील मानले.

…तर मागण्याही एका दिवसांत पूर्ण करा

एका दिवसात उपोषण कसे करायचे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. एका दिवसाची परवानगी दिली, तर आमच्या एका मागण्या एका दिवसांत मंजूर करा. तुम्ही जोपर्यंत मागण्या मंजूर करत नाहीत, तोपर्यंत मी उपोषणाला बसणार, असेही मनोज जरांगे म्हणाले. आमच्या मागण्या आत्ता मान्य करा, लगेच गुलालाच्या ट्रक भरतो. तीन लाख ट्रक आणण्याचा शब्द दिलेला आहे. नाही आणल्या तर नाव बदलून ठेवीन. तीन लाख ट्रक गुलालाने मुख्यमंत्र्यांचा बंगला बुजवून टाकतो, असेही जरांगे म्हणाले.

आंदोलनासाठी पोलिसांनी घातलेल्या मुख्य अटी आणि शर्ती

आमरण उपोषण अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना.

ज्याअर्थी, आपण दि.२९/०८/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांची राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून आपण आंदोलन/ आमरण उपोषण करणार आहात, त्याचे परवानगीसाठी दि. २६/०८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे विनंती केली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष ११, अंक ३०) मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५ भाद्रपद ४, शके १९४७, असाधारण क्रमांक ४५, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम २०२५ नुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (राखीव भाग), निश्चित करण्यात आला आहे. नमुद नियमावली मध्ये आझाद मैदान या ठिकाणाची निश्चिती रहिवाशांना, रहदारीला, कमीत कमी अडथळा होण्याचे आणि विनियमित केलेल्या रीतीने निदर्शकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेवून करण्यात आले आहे.

नमुद नियमावलीतीत खालील महत्वाचे नियम आहेत.

नियम क्र. ४ (६) (च) नमुद आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.
नियम क. ५ नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कंग करीता नेण्यात यावीत.
नियम क्र. ६ मध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठया संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे, त्यांचा आंदोलनाचा हक्क सुध्दा बाधित करता येणार नाही, त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचा सुध्दा समावेश असेल, त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
नियम क. ७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.
नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
नियम क. ११ (ज) नुसार सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतर सुध्दा नियम नमुद केलेले आहेत.
नियम क. ४ (ग) मध्ये आम्हांस असलेल्या अधिकारान्वये आपणांस सूचित करण्यात येत आहे की, आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार श्री. गणेश विर्सजन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपले आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे जनहित याचिका (L) क्र. २५६५६/२०२५ यामधील दि. २६/०८/२०२५ रोजीच्या अंतरिम आदेशामध्ये परिच्छेद क्रमांक ७ (iv) मध्ये स्पष्ट निर्देश आहेत की, प्रतिवादी क्रमांक ५, ६ व ७ आणित्यांचे सहकारी यांनी परवानगी प्राप्त आंदोलनाचे अनुषंगाने संबधित प्राधिकृत अधिकारी यांनी आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती हे पाळणे बंधनकारक आहे.

तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी केसमध्ये लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाहीत याबाबत दिलेल्या निर्देशांचा, मा. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये पुनरोच्चार केलेला आहे.

आपणास दिनांक २६/८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश व नियमावली प्रत देण्यात आलेली आहे. सदर नियमावलीचे अधीन राहून आपणांस शांततामयरित्या आंदोलन करण्यास सशर्त परवानगी देण्यात येत आहे.

परंतू आझाद मैदानामध्ये सुरु असलेले आंदोलना दरम्यान आंदोलकांनी उपरोक्त अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास अथवा इतर प्रचलित कायदयाचा भंग केल्यास सदरचे आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करुन उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर परवानगी दिनांक २७/०८/२०२५ रोजी माझ्या सही शिक्यानिशी देण्यात येत आहे

एक रूपयात गणेशमुर्ती उपक्रम, विघ्नहर्ता- बुध्दीदाता अमुल्य असल्याचे प्रतिक..! मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ‘मुर्तीसाक्ष विवेकाची समाजाला गरज’..

  • काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
    पुणे दि २७ ऑगस्ट –
    श्री गणेश देवता’ ही विघ्नहर्त्या, बुध्दीदात्याचे अमुल्य प्रतिक असून, श्री गणेश-मुर्तीचे मुल्य करता येत नसल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.
    मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ही ‘मुर्तीसाक्ष आत्म व नैतिक विवेकाची समाजाला खरी गरज’ असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
    नवी पेठेतील युवक काँग्रेस पदाधिकारी ‘कुणाल काळे मित्रपरीवार’ वतीने मात्र “०१रू देऊन गणेश मुर्तींचे वितरण” करण्याचा उपक्रम प्रसंगी गोपाळदादा तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    ते पुढे म्हणाले की, आपल्या देवा – धर्मा विषयीची आत्मियता, विश्वास व श्रध्दा जोपासतांना ईतर धर्मा विषयीचा दुस्वास नसला पाहीजे. देशाच्या स्वातंत्र्या करीता लोकमान्य टीळक, भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य प्रेमी नागरीकांचे संघटन, प्रबोधन व चळवळ ऊभी रहाण्यासाठी केले व त्यातुन प्रेरणा घेऊन विविध धर्मिय राष्ट्रीय नेते पुढे आले, स्वातंत्र्या करीता योगदान, बलीदान व जीवन समर्पित केले ही प्रजासत्ताक भारताची वास्तवता दुर्लक्षीत करता येणार नसल्याचे ही त्यांनी सागीतले.
    संयोजक व शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल सुरेश काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ३ वर्षा पासून चाललेल्या या उपक्रमा द्वारे सु ४५० कुटुंबीयांनी श्री गणेश मुर्ती नेल्याचे सांगीतले. या उपक्रमास काँग्रेस नेते मोहन दादा जोशी, गोपाळदादा तिवारी, राकाँ (शरद पवार) डॉ मदन कोठुळे, अनंत घरत, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, युकाँ अध्यक्ष सौरभ अमराळे, हेमंत राजभोज, सागर धाडवे, अक्षय माने, सोनिया ओव्हल, प्रवीण करपे, गोरख पळसकर, राजू नाणेकर, निलेश वैराट, मोहन शेडगे सर इ नी भेटी दिल्या. या प्रसंगी सुरेश काका काळे, सुनिल विधाते, राजू पोटे, सुपेकर बंधू, थोपटे इ उपस्थित होते.

हिंदुस्थानातील पहिला गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा

ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ

पुणे : – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.

दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही मिरवणूक आल्यानंतर बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन लक्षवेधक होते. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवी अशी वेगवेगळी ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. तसेच कलावंत पथकात वादन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव यांच्यासह अन्य कलाकार हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक-भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. ही लक्षवेधक मिरवणुक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा मिरवणूक रथ उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाताने ओढण्याची सेवा केली. डोक्यावर भगवा पांढरा कुर्ता परिधान केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा ‘रत्नमहाल’ येथे दाखल झाली. त्यानंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‘श्री’ची आरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

‘‘सर्व गणेशभक्त आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो आजचा सर्वांत आनंदाचा दिवस होता. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचं आज आगमन झालं. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या शुभहस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसांच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह वेगवेगळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी अधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती.’’
– पुनीत बालन
(उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला मी सलग दुसऱ्या वर्षी येत आहे. याठिकाणी भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम आहे. यावर्षी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पुनीत बालन यांची आभारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपला धर्म, आपली संस्कृती, देशभक्ती जिवंत ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. हे उत्सव त्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.’’
– जया किशोरी, प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या.