Home Blog Page 153

गणेशोत्सवानिमित्त मंत्री चंद्रकांतदादांकडून कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

कोथरुड, बाणेर-बालेवाडी, पाषाण सूस मधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे-गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवा यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे कोथरुडकरांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

गणेशोत्सव महाराष्ट्रातील महत्वाचा आणि प्रत्येकाच्या आवडत्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो.गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमन झाल्यानंतर, घराघरात भजन किर्तन सारखे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोथरुड हे पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर असल्याने, गणेशोत्सव अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत कोथरुड मतदारसंघातील कोथरुड, बाणेर-बालेवाडी, पाषाण सूस मधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विनोदी एकपात्री प्रयोग, सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीते, पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा ढोल-ताशा पथकांचे वादन आदींचा समावेश असून, यामुळे कोथरुडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद मिळणार आहे.

या महोत्सवाबद्दल ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक असून; या उत्सवाच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने इतरत्र स्थायिक झालेले आप्त मंडळी एकत्रित येत असतात. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी गेल्या वर्षीपासून कोथरुड मतदारसंघात गणेशोत्सव काळात सोसायटी भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गेल्या वर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. अनेक अहवाल-वृद्ध या सोहळ्यात अतिशय उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते. यंदाही कोथरुडकरांसाठी अशाच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, कोथरुडकरांचा आनंद यामुळे नक्कीच द्विगुणित होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

“सदावर्ते अजून भुंकलात तर मराठा समाज तुमचं अस्तित्व मातीमोल करेल”

नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि शिवछत्रपती ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत मानसिंग जाधव यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदावर्ते मराठा समाजाला सातत्याने लक्ष्य करत असल्याचा आरोप करत, जाधव यांनी त्यांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे.


नव्या पनवेल उपविभाग प्रमुख असलेल्या जाधव यांनी सदावर्ते यांना उद्देशून म्हटले आहे, “तुमचे कामच समाज फोडणे आणि मराठ्यांच्या हक्कावर कुरघोडी करणे आहे.” मराठा समाज शांत आहे, याला कमजोरी समजू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. “आमच्या आरक्षणावर तोंड चालवले, तर जीभ ओढून काढू,” असे ते म्हणाले. याशिवाय, “समाजाची थट्टा केली तर थोबाड फोडून रस्त्यावर ओढत नेऊ,” अशा धमक्याही जाधव यांनी दिल्या.जाधव यांनी मराठा आरक्षणाची मागणी हा हक्क आहे, उपकार नाही असे ठामपणे सांगितले. या हक्कासाठी लढताना मराठा समाजाची ताकद काय असते, हे महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या निवेदनात जाधव यांनी सदावर्ते यांना थेट आव्हान दिले आहे. “अजून भुंकलात तर मराठा समाजाचा राग तुमचं अस्तित्व मातीमोल करेल,” असा इशारा त्यांनी दिला. मराठा तरुणाई पेटली तर महाराष्ट्र हादरून जाईल आणि सदावर्ते यांचा आवाज कायमचा बंद होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.जाधव यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे, राज्य सरकारवर मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी दबाव वाढू शकतो.

मनोज जरांगेंचे आझाद मैदानात उपोषण सुरू:गोळ्या घातल्या तरी मागे न हटण्याचा निर्धार; फडणवीस सरकारवरील दबाव वाढला

मुंबई -मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मुंबईत पोहोचलेत. त्यांनी येथील आझाद मैदानावरील आपल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. याठिकाणी खबरदारी म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन – तेरा वाजलेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरील दबाव कैकपटीने वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिला.मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते? ते पाहा

मराठा आंदोलनामुळे मुंबईत झालेल्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करत आझाद मैदान परिसरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळवली आहे. तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.

कोणते मार्ग बंद राहतील?

वाशीकडून फ्रीवेकडे जाणारा मार्ग. वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध असल्याचं सांगण्यात आलं आहे. वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणारा मार्ग. छेडानगरवरून फ्री वेकडे जाणारा मार्ग.

पर्यायी मार्ग कोणते?

वाशीहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने जाणारी वाहने छेडानगर मार्गाने मुंबईत प्रवेश करतील. छेडानगरवरून फ्रीवेकडे जाणारी वाहने अमरमहल, नेहरूनगर ब्रीजमार्गे जातील.

सदर आदेश आजपासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वेत प्रचंड गर्दी

मराठा आंदोलक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत आहेत. त्यामुळे रेल्वे ओसंडून वाहत आहेत. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन आंदोलकांनी भरल्या आहेत.‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा दिल्या जात आहेत. भगवे टी शर्ट आणि टोपी घातलेले कार्यकर्ते घोषणा देत आहेत.महिन्याभराचा किराणा घेऊन मराठा आंदोलक मुंबईत 

मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईत दाखल झालेले मराठा आंदोलक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. एक महिन्याभराचा किराणा साहित्य घेऊन ते मुंबईला धडकलेत. ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. आझाद मैदानात मुलभूत सुविधा न पुरवल्यावरूनही त्यांनी बीएमसीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

पायाभूत सुविधेसाठी नवनिर्मिती, धोरण व ज्ञानाचे एकत्रीकरण गरजेचे

डॉ.प्रसाद यांचे मत ःनिकमार विद्यापीठात ९ वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

पुणे, २८ ऑगस्टः” भविष्यात एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक नवोन्मेष, शाश्वत प्रशासन आणि संशोधन यांना व्यवहाराशी एकत्रित करणे आवश्यक आहे. ज्ञानावर आधारित निर्णय घेणे भारताच्या विकासाचा पुढील टप्पा निश्चित करेल” असे मत हरियाणाचे माहिती प्रमुख आयुक्त आणि माजी मुख्य सचिव डॉ.टी.व्ही.एस.एन.प्रसाद यांनी व्यक्त केले.

बांधकाम क्षेत्रात देशातील आघाडीचे विद्यापीठ निकमार ने आयोजित केलेल्या कंस्ट्रक्शन, रियल एस्टेट, इफ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट वरील नव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी आणि परिषदेचे संयोजक व विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.

या वेळी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्टतेला देखील येथे मान्यता देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. प्रसाद म्हणाले, शहरीकरण, हवामान बदल आणि संसाधान कार्यक्षेमतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षण जगत आणि उद्योग यांच्यात अधिक सधन सहकार्य असले पाहिजे. सध्याच्या युगात, पायाभूत सुविधांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचबरोबर ड्रोन आणि रोबोट्सचा देखील वापर होतांना दिसतो. या क्षेत्रात शाश्वत बांधकाची आवश्यकता आहे. यासोबतच, संशोधन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, नियोजन आणि वेळापत्रक, शाश्वत साहित्य आणि तंत्रज्ञान आणि काळानुसार डिजिटल परिवर्तन आवश्यक आहे.

डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी सर्व सहभागींच्या योगदानाचे कौतुक केले आणि बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि सहकार्य पुढे नेण्यासाठी विद्यापीठाच्या वचनबद्धतेवर भर दिला.

या वर्षी परिषदेमध्ये १८ देशांमधील २०० हून अधिक शोधनिबंधांचा सहभाग होता. ज्यामध्ये सहा प्रमुख विषयांचा समावेश होता. संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर इनसाइटस, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉन.

डॉ. रजनीकांत राजहंस यांनी परिषदेला यश मिळवून देण्यासाठी उद्योग व धोरणकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला. तसेच सर्वांचे आभार मानले.

अरुण गवळीला सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन

आमदार असताना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कुख्यात अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. यामुळे गवळीचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे.कमलाकर जामसंडेकर यांची 18 वर्षांपूर्वी 2 मार्च 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. जामसंडेकर त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आपल्या घाटकोपर येथील घरात टीव्ही पाहत असताना अरुण गवळी गँगचे गुंड त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामुळे मुंबईत तेव्हा मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर अरुण गवळीला अटक केली होती. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने गवळीसह इतर 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर सुरेश पांचाळ, दिनेश नारकर व गणेश साळवी या सहआरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अरुण गवळी आमदार होता. त्यामुळे एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची ती पहिलीच वेळ होती.तेव्हापासून अरुण गवळी तुरुंगात बंदिस्त आहे. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी त्याने अनेकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळली. अखेर आज न्यायमूर्ती एम एम सुंदरेश व न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्याच्या वाढत्या वयाचा विचार करत त्याला जामीन मंजूर केला. गवळी सध्या 76 वर्षांचा आहे.

2 मार्च 2007 रोजी सायंकाळी कमलाकर जामसंडेकर आपले नियमित काम संपवून घरी परतले होते. ते घाटकोपरच्या असल्फा व्हीलेज येथील रुमानी मंझील चाळीत राहत होते. ते आपल्या घरात निवांत टीव्ही पाहत असताना अरुण गवळीचे गुंड त्यांच्या घरात शिरले. त्यांनी जामसंडेकर दिसताच त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, सदाशिव सुर्वे व साहेबराव भिंताडे यांनी जामसंडेकर यांच्या हत्येची गवळीला 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणात सुर्वे व भिंताडे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर 21 मे 2008 रोजी अरुण गवळीच्याही भायखळा येथील दगडी चाळीतून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. 27 जुलै 2008 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे याचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर नगरसेवक म्हणून काम करत असतानाच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

ईद ए मिलादुन नबीसाठी ८ सप्टेंबरला शासकीय सुट्टी द्या.

काँग्रेस वर्किंग कमिटाचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांची मागणी

मुंबई, दि. २८ ऑगस्ट..
मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी आहे तर ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे, त्यामुळे ५ तारखेची मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने घेतलेला आहे, याची नोंद घेऊन ५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीची सदस्य व माजी मंत्री, नसीम खान यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात की, राज्यात बंधुभाव व हिंदू मुस्लीम एकोपा अबाधित राखण्यासाठी मुंबईत विविध मुस्लीम संघटनांनी गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया खिलापत कमिटीमध्ये बैठक घेतली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मुंबईत काढण्यात येणारी मिरवणूक ही सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही धर्माचे पवित्र सण हे प्रेम व सद्भावनेने साजरा करता येतील, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.

अनाधिकृत बांधकामे संबंधितांनी काढून घ्या अन्यथा पीएमआरडीएकडून कठोर कारवाई

0

पिंपरी (दि.२९) : सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अतिक्रमणांचा सर्वे करण्यात येत असून संबंधितांनी अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. आगामी आठवड्याभरात या भागातील अनाधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाढत्या अतिक्रमानामुळे चाकण एमआयडीसीसह परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या भागातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागेवर मार्किंग करण्यात येणार आहे. आगामी आठवड्याभरात संबंधित अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणावर निष्कासणाची कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समांतर रस्त्यांचे जाळे विकसित करण्याच्या अनुषंगाने भर देण्यात येत आहे. काही रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्याचे अनुषंगाने नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत आहे. पुणे नाशिक रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, नगरपालिका क्षेत्र व नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या परिसरातील अस्तित्वातील नाले बुजवण्यात आले आहे, ते संबंधितांनी खुले करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधितांवर गुन्हा नोंदवणार
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते यावर भर देण्यात येत आहे. या भागातील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात येणार असून संबंधित अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली अतिक्रमणे तर संबंधितांनी पुन्हा केली तर संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

“टाटा AIA हेल्थ बडी” : तुमचा नवा व्हर्च्युअल आरोग्य आणि स्वास्थ्य भागीदार

 टाटा AIA सादर करत आहे आरोग्य एसआयपी — संपत्ती निर्मितीसोबत दीर्घकालीन आरोग्य संरक्षण यांना एकत्र आणणारी एक अद्वितीय आरोग्य विमा योजना

मुंबई, 28 ऑगस्ट 2025 – आरोग्याच्या समस्या काळ वेळ, सवड बघून येत नाहीत. त्या अनपेक्षितपणे उद्भवू शकतात. त्यावेळी कुटुंबियांना मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी किंवा वेळेवर उपचारांसाठी धडपड करावी लागते. भारतात, अनेक व्यक्तींना योग्य मदत योग्य वेळी मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे उपचारात विलंब, खर्चात वाढ आणि अस्वस्थता, तणाव वाढतो.

टाटा AIA लाईफ इन्शुरन्स मध्ये आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की जीवनाचे संरक्षण हे फक्त आर्थिक मदतीपुरते मर्यादित नाही. ते प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आपल्या ग्राहकांसोबत असण्याबद्दल आहे. म्हणूनच आम्हाला “टाटा AIA हेल्थ बडी” सादर करताना अभिमान वाटत आहे. जीवन विमा कंपनीकडून सादर झालेली ही भारतातील पहिली 24×7 आरोग्य आणि स्वास्थ्य सहयोगी योजना असून यात आरोग्य, स्वास्थ्य आणि जीवन विमा यांचा आजवर कधीही झाला नव्हता एवढा अद्वितीय संगम आहे.

हेल्थ बडी ला भेटा: तुमचा विश्वासू वेलनेस सहयोगी

ही नाविन्यपूर्ण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टाटा AIA ने हेल्थ बडी मॅस्कॉट सादर केला आहे. विश्वास, काळजी आणि आपुलकीचे प्रतीक असलेली ही एक मैत्रीपूर्ण आणि सुसंगत ओळख  आहे. हा मॅस्कॉट सातत्यपूर्ण आरोग्य सहकार्याची संकल्पना सोपी करतो. त्यामुळे ती कुटुंबांसाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनते.

हेल्थ बडीसोबत, टाटा AIA आपली भूमिका फक्त आर्थिक रक्षक म्हणून नाही तर दैनंदिन स्वास्थ्यामध्ये खरा सहयोगी म्हणून मजबूत करते, ग्राहकांना जीवनातील अनिश्चिततेला तोंड द्यायला तयार ठेवते आणि अधिक निरोगी, आनंदी जीवनशैलीला प्रोत्साहन देते.

आरोग्य आणि वेलनेससह विम्याची पुनर्रचना

टाटा AIA हेल्थ बडी संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी एक व्यापक दृष्टीकोन दर्शवते. वैयक्तिकृत आरोग्य सेवांची जीवन विम्याच्या सुरक्षिततेसोबत जोड देत टाटा AIA हेल्थ बडी ग्राहक आणि त्यांचे प्रियजन केवळ गरजेच्या काळातच नव्हे तर निरोगी जीवन जगण्याच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात सुरक्षित राहतील हे सुनिश्चित करते.

टाटा AIA हेल्थ बडीच्या साथीने हे सादरीकरण पारंपरिक विम्यापलीकडे जाते. हे ग्राहकासोबत विकसित होणारे एक सहायक भागीदारीचे नाते निर्माण करण्याबद्दल आहे. प्रतिबंधात्मक काळजीपासून ते गंभीर आरोग्य व्यवस्थापनापर्यंत, टाटा AIA हेल्थ बडी प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीं सोबत राहण्यासाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे ते निरोगी राहतील आणि जीवनात जे काय वाढून ठेवले आहे त्यासाठी सज्ज राहतील. हे कुटुंबांना एकत्रितपणे निरोगी जीवनशैलीचे फायदे स्वीकारण्यास सक्षम करते. त्यायोगे सर्वांना त्यांच्या स्वास्थ्य प्रवासात सातत्याने आधार मिळतो.

टाटा AIA हेल्थ बडीच्या सादरीकरणाबद्दल बोलताना टाटा AIA चे चीफ ऑफ ऑपरेशन्स संजय अरोरा म्हणाले, “टाटा AIA मध्ये आमचे मुख्य मूल्य हे ग्राहक सेवा असून त्याआधारे प्रत्येक गोष्ट आकाराला येते. टाटा AIA हेल्थ बडी ही जीवन विमा कंपनीकडून भारतातील पहिली 24×7 हेल्थ आणि वेलनेस सहकार्य योजना सादर करत असताना आम्हाला अभिमान वाटत आहे.  आरोग्य, स्वास्थ्य आणि जीवन विमा यांचा अनोखा मिलाफ करून आम्ही ग्राहकसेवेत एक नवा मापदंड निश्चित करत आहोत. टाटा AIA हेल्थ बडी आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या उपाय सुविधांची उपलब्धता देत असून त्यामुळे केवळ त्यांचे आरोग्य संरक्षण होत नाही तर त्यांना अधिक निरोगी, समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करतात. आम्ही त्यांच्या आरोग्य आणि स्वास्थ्य प्रवासात खरे भागीदार आहोत आणि त्यांना आत्मविश्वास व आर्थिक सुरक्षिततेसह खऱ्या अर्थाने हर वक्त के लिए तय्यार (कोणत्याही प्रसंगासाठी तयार) ठेवतो. ही सेवा म्हणजे आमच्या या बांधिलकीची पावती आहे.”

हेल्थ बडीमध्ये काय काय आहे?

फक्त टाटा AIA लाईफ इन्शुरन्स अ‍ॅप वर उपलब्ध असून हेल्थ बडी विविध सेवा देते. यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

·         प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या (थायरॉईड, HbA1C, अ‍ॅनिमिया, पीसीओएस चाचण्या इ.)

·         गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच HPV, हीपेटायटीस यांसारखी इतर शिफारस केलेल्या लसी

·         महिला वैद्यकीय सेवा : पीसीओडी, आयव्हीएफ, रजोनिवृत्ती (मेनोपॉज), वंध्यत्व इत्यादीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांशी प्रत्यक्ष सल्लामसलत

·         दंत आरोग्य : दंतचिकित्सकांशी प्रत्यक्ष सल्लामसलत

·         24 हून अधिक म्हणजेच पेडिअॅट्रिक्स पासून डर्माटोलॉजी, न्यूरोलॉजी, यूरोलॉजी आणि इतर स्पेशॅलिटींमध्ये डॉक्टर सल्लामसलत

·         लॅब चाचण्या आणि औषध ऑर्डर्सवर सवलती

·         गंभीर आजाराचे निदान झालेल्या प्रकरणांत वैद्यकीय सेकंड ओपिनियन आणि समर्पित केस सपोर्ट

·         वैयक्तिक आरोग्य उद्दिष्टांनुसार डिझाइन केलेली फिटनेस आणि आहारतज्ञाची सल्लासत्रे

हेल्थ बडीवर आधारित टाटा AIA हेल्थ एसआयपीचे सादरीकरण

हेल्थ बडीला पूरक आणि सर्वांगीण स्वास्थ्याबाबतच्या आमच्या बांधिलकीस बळकट करण्यासाठी टाटा AIA कंपनी टाटा AIA हेल्थ एसआयपी हीएक नाविन्यपूर्ण नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट-लिंक्ड आरोग्य विमा योजना सादर करत आहे.

हेल्थ बडी काळजी आणि सहाय्यावर लक्ष केंद्रित करत असताना हेल्थ एसआयपी दीर्घकालीन आर्थिक तयारीची ताकद आणि जोड देत आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आरोग्य संरक्षणाला संपत्ती निर्मितीसोबत जोडते. त्यामुळे ग्राहकांना आणीबाणीच्या वेळी संरक्षण मिळते आणि त्याचबरोबर भविष्यासाठी सुरक्षितता मिळते.

कोणतेही प्रीमियम अलोकेशन चार्जेस नसल्याने आणि फंड व्हॅल्यू वाढवण्यासाठी अतिरिक्त मॅच्युरिटी बूस्टर्समुळे, हेल्थ एसआयपी वाढीसह संरक्षण देते. योजनेच्या 6व्या वर्षापासून यात  ग्राहकांना आरोग्यसंबंधित खर्चासाठी टॅक्स-फ्री विड्रॉवल्स करण्याची परवानगी देते. त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी आर्थिक लवचिकता मिळते. तसेच हे दीर्घकालीन गंभीर आजारांसाठी संरक्षण  देते. यात 30 वर्षांसाठी प्रीमियम फिक्स करण्याची क्षमता आहे.

ग्राहकांच्या विविध गरजांसाठी, हेल्थ एसआयपी दोन प्रकारात येते:

·         हेल्थ एसआयपी प्लस : यात अंगभूत ॲक्सिडेंटल टोटल अ‍ॅण्ड पर्मनंट डिसॅबिलिटी (ATPD) लाभ समाविष्ट आहेत.

·         हेल्थ एसआयपी प्लस प्रो: ATPD लाभांसोबत टर्मिनल इलनेस विथ टर्म बूस्टर (TTB) संरक्षण सुध्दा समाविष्ट आहे. त्यामुळे अतिरिक्त संरक्षण मिळते.

विम्याचे भविष्य म्हणजे आरोग्य आणि स्वास्थ्य प्रथम

टाटा AIA हेल्थ बडी आणि टाटा AIA हेल्थ एसआयपी सारखी उत्पादने सादर करून कंपनी जीवन विम्याची नवी व्याख्या करत आहे. हे फक्त कठीण काळात संरक्षण देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर हे कुटुंबांना प्रत्येक दिवशी अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करण्याबद्दल आहे.


तुमच्या आरोग्यास आता एक नवा साथीदार मिळाला आहे जो नेहमी तुमच्या सोबत, नेहमी मदतीस तयार आहे.

टाटा AIA हेल्थ बडी सेवा टाटा AIA च्या टाटा AIA पीआर लाईफ प्रो +, टाटा AIA पीआर लाईफ प्रो, टाटा AIA पीआर लाईफ मॅक्सिमा +, टाटा AIA पीआर लाईफ अॅडव्हांटेज +, टाटा AIA पीआर लाईफ ग्रोथ +, टाटा AIA पीआर लाईफ प्रो अॅडव्हान्स, टाटा AIA स्मार्ट संपूर्ण रक्षा फ्लेक्सी, टाटा AIA पीआर 2.0, टाटा AIA प्रीमियर एसआयपी, टाटा AIA सुपर एसआयपी, टाटा AIA स्मार्ट एसआयपी 360, टाटा AIA स्मार्ट संपूर्ण रक्षा +, टाटा AIA प्रीमियर पेन्शन सिक्युअर, टाटा AIA प्रो-फिट, टाटा AIA शुभ शक्ती, टाटा AIA शुभ शक्ती सिलेक्ट, टाटा AIA शुभ रक्षक आणि टाटा AIA शुभ रक्षक सिलेक्ट या विविध योजना सुविधांसोबत उपलब्ध आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहलीचे आयोजन

पुणे, दि. २८: : पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत देशी-विदेशी पर्यटकांकरिता पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या दर्शनाकरिता गणेश दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे; अधिकाधिक पर्यटकांनी या सहलीचा सहभाग लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गंत वय 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहल आयोजित करण्यात येत आहे. 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती व अखिल मंडई मंडळ या गणपतींच्या थेट दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. इच्छुकांकरिता दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत कात्रज डेपो, हडपसर (गाडीतळ), कोथरुड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) व येरवडा (गुंजन टॉकीज) या आगारामधून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांच्या 5 वातानुकूलीत बसेस (प्रती बस 35 प्रवासींकरीता) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाव्दारे मार्गदर्शक, अल्पोपहार, पाणी व आरोग्य सेवक (प्रथमोपचार संचासह) आदींची सोय करण्यात आली आहे. नाव नोंदणीकरणेरिता गणेश बेंद्रे (संपर्क क्रमांक 9730993282) करावा तसेच गुगल फार्म- https://forms.gle/BbE36QZDyasCGH2SA व क्युआर कोड वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

मुंबई, दि.२८ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता
शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.

गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती
नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

बिल्डरांनी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी -पुणे महापालिकेचे निर्देश

पुणे- पुण्यातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन पुणे महापालिकेने आज पर्यावरण विषयक बैठक बोलावून बांधकाम व्यावसायिकांनी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी असे निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी येथे दिली .या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण विभागाचे उप आयुक्त संतोष बरुळे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर तसेच बांधकाम परवाना विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस डब्ल्यूआरआय इंडिया, क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन, नारेडको, संस्थेचे प्रतिनिधी आणि सेन्सर उत्पादक उपस्थित होते.

राज्यातील अनेक शहरांमध्ये पी.एम २.५ आणि पी. एम. १० या धुलीकणांमुळे बायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांच्या दि.२/११/२०२३ रोजी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, कलम ५ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशानुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. प्रदूषणाची पातळी निर्देशित केलेल्या मयदिपेक्षा जास्त होते तेव्हा त्यास नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व बांधकाम परवाना विभाग आणि डब्ल्यू.आर. आंय. इंडिया (WRI India) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यन्वित करण्याकरिता चर्चा करण्यासाठी क्रेडाई (CREDAI), मराठी बांधकाम व्यावसायिक, नारेडको आणि सेन्सर उत्पादक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या कमी करण्याकरिता बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दिलेल्या निर्देशानुसार बैठकी दरम्यान संतोष वारूळे, उपआयुक्त, पर्यावरण विभाग यांनी प्रास्ताविक केले. डब्ल्यूआरआय इंडियाचे संचालक श्रीकुमार कुमारस्वामी यांनी सेन्सर-आधारित बायू गुणवत्ता तपासणी प्रणालीवावत सादरीकरण केले.
बैठकीदरम्यान शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी पुणे शहर हे राहण्यायोग्य शहर (livable city) आहे परंतु सद्यस्थितीत बांधकाम सेक्टर तसेच रोड डस्टचे प्रमाण अधिक आहे यामुळे बांधकाम व्यावसायिक यांनी तातडीने बांधकामाचे मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी असे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सेत्सर आधारीत बायू गुणवत्ता तपासणीं प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधितांच्या सूचना व शिफारसींचा समावेश करण्यासाठी Task Force Committee स्थापन करून बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित बापू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारून केंद्रीकृत डॅशबोर्डशी एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. या प्रणालीच्या साहाय्याने वास्तविक वेळेतील (real-time) माहिती उपलब्ध होईल आणि धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करता येईल.

छायाचित्रकार नसते तर कळला नसता देशाचा इतिहास– खासदार प्रणिती शिंदे


पुणे-

छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे,असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाल्या, समाजमाध्यमांमुळे वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांची सत्यता अनेकदा कमी असते; मात्र वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना एकेक छायाचित्र टिपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. ते समाजातील भावना टिपतात. अनेक छायाचित्रे बोलकी ठरतात, हीच त्यांची खरी कला आहे. पुढील पिढी जेव्हा ही छायाचित्रे पाहील, तेव्हा तिला आपले भविष्य आणि समाजाची दिशा समजू शकेल.
उल्हास पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे.
प्रा. डॉ. पराग काळकर यांनी सांगितले,वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजमन ओळखून त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. छायाचित्रांचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हल यंदा ३७व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा पुणे श्रमिक पत्रकार संघ आमच्या उपक्रमात सहभागी झाला असून, त्यानिमित्ताने छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रे यामध्ये प्रदर्शित केली आहेत. पुण्यातील संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तसेच व्यवस्थापन सचिन आडेकर व आबा जगताप यांनी केले.हे छायाचित्र प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

आंबेडकरी चळवळीचे आशिष विजय वाकोडेंचा शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५

लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत असा भारत उभा करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे परंतु भाजपा मात्र हे संविधानच संपवायला निघाले आहे. मनुवादी व संविधानवादी अशा दोनच जाती आहेत, तोडा फोडा व राज्य करा ही भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची निती आहे तर काँग्रेस पक्ष मात्र सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. एकिकडे संविधान संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना हे संविधान अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी परभणीत येऊन या कुटुंबियांची भेट घेतली. आंबेडकरी समाजावर अत्याचार झाला तर काँग्रेस पक्ष खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहिल हा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.

राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राज्यघटना घराघरात पोहचवली. भाजपा सरकार राज्य घटनेनुसार काम करत नाही हेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लढाई काँग्रेस पक्ष व राहुल गांधी लढत आहे आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन खासदार हंडोरे यांनी केले.

या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजाहिद खान, परभणी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार, सुहास पंडित आदी उपस्थित होते.

नितीन गडकरींच्या मुलाला सोन्याची खाण सापडली ? :20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांची अफलातून वाढ; अंजली दमानिया यांनी उपस्थित केला सवाल

सोन्याची खाण हाती लागली का?ज्या कंपनीच्या शेयर ची किंमत जुलै 2024 पर्यंत, ₹42 होती त्या कंपनीत असे काय झाले की त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत एका वर्षात ₹701 झाली? सोन्याची खाण सापडली का? ही जादूची कंपनी Cian Agro आहे आणि त्या कंपनीच्या मालकांच्या बाबांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांनी इथेनॉल वापरायला आपल्याला भाग पाडले आणि मुलाच्या कंपनी ला भरमसाठ प्रॉफिट, असेही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल निर्मिती कंपनीच्या शेअरचा भाव 20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निखील गडकरींची कंपनी इथेनॉल निर्मिती करते. त्यामुळेच त्याचे बाबा (नितीन गडकरी) आपल्या डोक्यावर E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथेनॉल हे उसासारख्या पिकांपासून तयार केले जाते, ते पेट्रोलमध्ये मिसळल्याने जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट होते. पर्यायाने हवेची गुणवत्ता सुधारून हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात, इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.

निखील गडकरींचे बाबा म्हणत…

अंजली दमानिया गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, Cian Agro ह्या कंपनीचा भाव 5 ऑगस्टला ₹398 होता, तो आज 28 ऑगस्ट ला ₹701 कसा झाला? 20 दिवसात 60% वाढ? इतकी अफलातून वाढ कशी झाली? ही कंपनी निखिल गडकरी ह्यांची आहे. त्याचे नाव पूर्वी Umred Agro ह्या नावाने होती. ही कंपनी इथेनॉल निर्मिती करते आणि म्हणून ह्या निखिल गडकरींचे बाबा, आपल्या डोक्यावर E20 म्हणजे, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत.

जितके इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपण वापरू, आपल्या गाड्यांचे एवरेज कमी होणार व मेंटेनेंस चा खर्च वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेकदा नितीन गडकरी व त्यांच्या पूर्ती उद्योग समुहावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांच्यात मोठा वाद रंगला होता.

जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू

पुणे, दि.२८:: पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.

श्री. पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.