Home Blog Page 152

ई-गव्हर्नन्स सुधारणांबाबत पुणे महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर

पुणे महापालिका ई-गव्हर्नन्स सुधारणांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात अव्वल!

पुणे-महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्स सुधारणांच्या अंतरिम आढाव्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम आढाव्यात पुणे महानगरपालिकेने (PMC) सर्व महानगरपालिकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या आढावा बैठकीत, प्रत्येक विभागाच्या एका निवडक कार्यालयाने आपापल्या कामाची प्रगती सादर केली, ज्यामध्ये राज्यभरातील सर्व महानगरपालिकांमधून केवळ पुणे महानगरपालिकेची निवड झाली.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महानगरपालिकेने राबवलेल्या विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर केला या प्रसंगी अतिरिक्त महापलिका आयुक्त (ई) – पृथ्वीराज बी.पी उपस्थित होते . या सादरीकरणात प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिक सेवा सुधारण्याच्या उद्देशाने यशस्वीपणे सुरू केलेल्या डिजिटल उपक्रमांवर भर देण्यात आला.

ई-गव्हर्नन्स उपक्रमांमधील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे:

  • वेबसाइट आणि मोबाईल ॲप्स: पुणे महानगरपालिकेने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ३६ मायक्रो-साइट्ससह एक नवीन, मोबाईल-फ्रेंडली वेबसाइट विकसित केली आहे. या वेबसाइटला वर्षाला ६७ लाखांहून अधिक नागरिक भेट देतात. तसेच, पीएमसी केअर, रोड मित्र आणि पीएमसी आयएसडब्ल्यूएम यांसारखी अनेक नागरिक-केंद्रित मोबाईल ॲप्लिकेशन्सही विकसित करण्यात आले आहेत.

लोकसेवा हक्क (RTS) आणि ऑनलाइन सेवा: लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत एकूण ९७ सेवा अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आल्या आहेत. यापैकी ८९ सेवा ऑनलाइन उपलब्ध असून, सर्व नागरिकांना सेवा विहित मुदतीत देण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी २.२५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सेवाप्रदान करण्यात आल्या आहेत.

  • तक्रार निवारण प्रणाली: नागरिकांना मोबाईल ॲप्स, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियासह १० वेगवेगळ्या माध्यमांतून तक्रारी नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. गेल्या वर्षात एकूण १.१५ लाख तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
  • ई-ऑफिसची अंमलबजावणी: जून २०२५ पासून संपूर्ण पालिकेचेकामकाज ई-ऑफिस प्रणालीवर स्थलांतरित करण्यात आला आहे. या प्रणालीवर पालिकेचे २५०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय वापरकर्ते आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर: पालिकेनेत्यांचा रोड ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम (RAMS) आणि इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम (IWMS) साठी जीआयएस (GIS) चा प्रभावी वापर केला आहे.

  • डेटा आणि ॲनालिटिक्स: ४० विभागांमधील ५०० प्रमुख कामगिरी निर्देशकांसह (KPIs) एक केंद्रीय डॅशबोर्ड विकसित करण्याचे काम सुरू आहे, ज्यामध्ये निर्णय घेण्यासाठी २० डॅशबोर्ड आधीच तयार आहेत. आयुक्तांनी “पीएमसी स्पार्क” नावाचा वॉर रूमही सुरू केला आहे, जिथे ५० प्रकल्पांचा पंधरवड्यातून एकदा आढावा घेतला जातो.
  • एआय आणि तंत्रज्ञान: वेबसाइट आणि व्हॉट्सॲपवरील पीएमसी चॅटबॉट नागरिकांना सहजपणे माहिती मिळवून देतो. तसेच, व्हॉट्सॲपचा वापर नागरिकांना माहिती प्रसारित करण्यासाठी केला जातो. व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर मिळकत कराची बिले आणि नोटिसा वितरीत करण्यासाठी देखील केला जातो. पीएमसीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करत थकबाकीदार करदात्यांकडून मिळकत कर वसुलीसाठी व्हॉइस बॉट (voice bot) चा वापर सुरू करणार आहे. तक्रारींचे भाकित करणारे विश्लेषण (Predictive Analysis), सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे विश्लेषण (Sentiment Analysis) आणि इतर एआय उपक्रमांसाठी प्रतिष्ठित संस्थांसोबत भागीदारी करण्याची योजनाही आखली आहे.

या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पीएमसी महाराष्ट्रातील ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये एक अग्रणी बनली आहे. महानगरपालिका १५० दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी कटिबद्ध आहे.

मुंबईतील गणेशोत्सवात पॉलीकॅबकडून लोकांना प्राधान्य देणाऱ्या सुविधांची लालबागचा राजा आणि जुहू बीचवर व्यवस्था

मुंबई,गणेशोत्सवाच्या काळात मुंबई भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणाने भारलेली असतानाच, पॉलीकॅबने आपल्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाची प्रचिती दिली. शहरातील दोन सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाची उत्सव स्थळे – लालबागचा राजा आणि जुहू बीच येथे भाविकांची सोय लक्षात घेत योग्य व्यवस्था करत मजबूत बंध निर्माण केले आहेत.

भाविकांच्या गरजा ओळखून पॉलीकॅबने आराम, सुरक्षा आणि सुलभतेला प्राधान्य देणाऱ्या कार्यात्मक, भाविकांच्या सोयीसाठी जागा तयार करून त्यांचे स्थान अधिक भक्कम केले आहे. मुंबईतील भाविकांच्या गर्दीच्या गरजा ओळखून त्यांनी आपले उपक्रम तयार केले आहेत. या माध्यमातून पॉलीकॅब सामाजिक भान जपत आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले स्थान भक्कम करते आहे.

लालबागचा राजा येथे दर्शन प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी करण्यासाठी, पॉलीकॅबने दर्शन मार्गावरील स्थानिक बस स्टॉपचे रूपांतर कम्फर्ट झोनमध्ये केले आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना जरा विसावा घेता येईल. त्यांचे मोबाइल रिचार्ज करण्यासोबतच ऊन तसेच पावसापासून बचावासाठी हा बस स्टॉपचा उपयोग करता येईल. याशिवाय भाविक तसेच स्वयंसेवकांची कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून पॉलीकॅबने पंडालमध्ये मोबाइल चार्जिंग स्टेशन, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या पोलिसांसाठी कम्फर्ट झोन, तसेच हवा खेळती राहणारे पॉलीकॅब पंख्यांनी सुसज्ज अशा  वॉकवे झोनची व्यवस्था केली आहे.

प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या जुहू बीचवर विसर्जनादरम्यान गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पॉलीकॅबने ब्रँडेड सेफ्टी वॉच टॉवर्स बसवले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना देखील गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. अशा प्रयत्नांमुळे लाखो भाविकांशी असलेले पॉलीकॅबचे नाते अधिक दृढ होते आहे.

“गणेश चतुर्थी हा एकता आणि भक्तीचा उत्सव आहे. या व्यवस्थेद्वारे आम्ही समाजाला आराम देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. केवळ उत्पादनांच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, ग्राहक प्रथम कनेक्शन तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” असे पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या ब्रँड आणि मार्कॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष श्वेताल बसू म्हणाल्या.

पुणे आणि हैदराबादमधील सक्रियतेच्या नियोजनासह पॉलीकॅबचा उत्सवी सहभाग मुंबईच्या पलीकडेही विस्तारला आहे. पुण्यात गेट इन्स्टॉलेशन सोबतच प्रमुख मंडपांमध्ये पॉलीकॅब प्रभावी बॅनरद्वारे उच्च-दृश्यमानता निर्माण करेल. तर हैदराबादच्या प्रतिष्ठित खैरताबाद गणेश मंडपात, भाविक आणि अन्य लोकांना डिजिटल एलईडी आर्च आणि पाणी तसेच मोबाइल चार्जिंग सुविधांनी सुसज्ज अशा ब्रँडेड पोलीस बूथचा फायदा होईल. लाखो भाविक, स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांची सोय होण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव म्हणजे केवळ उत्सवाचे क्षणच नाहीत तर समाजाची अर्थपूर्ण सेवा करण्याची संधी आहे, असा पॉलीकॅबचा विश्वास आहे.

पॉलीकॅबच्या भारतातील यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमांवर हा उपक्रम आधारलेला आहे. पुरीमधील रथयात्रेपासून मुंबईतील गणेश चतुर्थीपर्यंत पॉलीकॅब स्थानिक परंपरांशी जुळवून घेताना आराम, काळजी आणि मजबूत बंधाद्वारे लोकांना प्राधान्य देत उत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहे.

इंग्रजांपेक्षा हे सरकार वाईट, मुख्यमंत्र्यांना आमच्या वेदना कळत नाहीत

एकाचे काढून दुसऱ्याला आम्ही मागतच नाही-मराठ्यांच्या पोरांशी वाईट वागू नकाखूप मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार आहेत-आता फायनल फाईट होणार
मुंबई-मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असून आणखी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरातून लाखो मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आज सायंकाळी ६ पर्यंतची वेळ होती. परंतु आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तूफान फटकेबाजी केली.

मनोज जरांगे म्हणाले, इंग्रजांपेक्षा हे सरकार बेकार. सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करा, असली खेळ खेळा. सरकारने जेवण आणि पाणी मिळू दिले नाही. सरकार आडमुठे गेले तर मराठे आडमुठे घुसणार. एक एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी दिली. तुम्ही आमच्या जिल्ह्यात आल्यावर अशी वागणूक देतो का? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक दिली न फडणवीस साहेब तर आमच्याकडे आल्यावर आम्ही पण तुम्हाला त्रास देणार. कशाला त्या लफड्यात पडता?

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुमचे खरे आणि आमचे खरे नाही, असे कसे होऊ शकते? आमचे मराठ्याचे पोरं चावतेत का रस्त्याने चालताना? तुमच्या दारात आलो तर एक एक दिवसाची परवानगी देता, काय राव? २७ तारखेला सकाळी पण जेवलो नाही, तसाच पुढे निघालो. २८ ला सकाळी जेवलो ते पण थोडेच जेवलो आणि त्यात मी जागाच होतो. मला हे सरकारला सांगायचे आहे की मराठ्यांच्या पोरांशी वाईट वागू नका, गरिबाचे लेकरे आहेत ते. आमचे लोक माज घेऊन नाही आले इकडे. आमच्या पोरांचे खूप हाल आहेत, तुम्हाला नाही कळणार मुख्यमंत्री साहेब. तुम्हाला आमचे वेदना कळत नाही.

मी बलिदान द्यायला तयारच झालो आहे, पण तुम्ही आमच्या मराठ्यांच्या पोरांसाठी दुकाने बंद करू नका. नाहीतर जशास तसे होणार. पोरांनो तुम्ही कुठेही गेले तरी संयम पाळा. आपापल्या गाड्या व्यवस्थित मैदानावर जाऊन लावा. तिथून इथे मैदानात येता येईल. चेंबूरच्या मैदानावर गाड्या लावा. पार्किंगची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने नाही ऐकले तर आणखी खूप मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार आहेत. मी खोटे सांगत नाही. तुम्ही जेवढा विलंब कराल तेवढे मराठे मुंबईमध्ये येत राहणार. आम्ही लोकशाहीचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी त्याला तयार आहे, तुम्ही जे कराल त्यासाठी मी तयार आहे. माझ्या मागण्या तुम्हाला माहीत आहे, आता पुन्हा सांगणार नाही.

मनोज जरांगे पाटील पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले, या सरकारला मराठ्यांच्या पोरांचे भले होऊ द्यायचे नाही. त्यांना मराठा समाजाचे वाटोळे करायचे आहे म्हणून कोणी चर्चेला आले नाही. एक दिवसाची परवानगी देऊ शकतात तर कायमस्वरूपी परवानगी सरकार देऊ शकते. सरकार असून खूप चुकीचे करत आहेत. त्यांनी गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे. एकाचे काढून दुसऱ्याला आम्ही मागतच नाही, हे सरकारचे काम आहे. आमच्या जुन्या नोंदी आहेत.

ओबीसी १६ टक्के आरक्षण खातात. ओबीसीला ३२ टक्के त्यातले २० टक्के कमी करा आणि आम्हाला द्या असे आम्ही म्हणालो का? आमच्या नोंदी आहेत त्यातले आरक्षण मागत आहोत. आता महाराष्ट्राला सगळे कळले आहे. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचे घेत नाही. हे ओबीसी लोकांना पण माहीत आहे, काही लोक सोडले तर. आता फायनल फाईट होणार. आरक्षण होणार नाहीतर मी तरी उपोषण करून मरणार. त्यांच्या आडमुठेपणामुळे केंद्र सरकारलाही दाग लागणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

आंदोलनाची तीव्रता कमी होऊ शकत नाही. मराठ्यांना माहीत आहे की मी त्यांच्यासाठी लढतोय. मराठे त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. आता मराठे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यांना फसवण्यात आले आहे. आम्ही खंबीर आहोत. उंटावर बसून काडीने औषध देण्याचे काम सरकार करत आहे.

प्रारूप प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी  

पुणे:-दिनांक २९ ऑगस्ट २०२५,

सत्ताधारी पक्षाला लाभ पोहचवण्यासाठी कशाप्रकारे महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत, याचे उदाहरण पुणे महानगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरून दिसून आले आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

यासंदर्भात शुक्रवारी (ता.२९) डॉ.चलवादी यांनी बसप शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त वसंत काटकर यांना निवेदन सादर करीत हरकत नोंदवली. पक्षाचे जिल्हा महासचिव प्रविण वाकोडे, अनिल त्रिपाठी तसेच शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी किशोर अडागळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुणे मनपाच्या प्रारुपानूसार सर्वच प्रभागांच्या रचना नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीने पुर्णपणे चुकीची असल्याचा बसपाचा आक्षेप आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनूसार प्रभागामध्ये मतदारांची संख्या ३० ते ४० हजारांनी कमी-जास्त दिसून येते. यानूसार प्रारूप प्रभागांची रचना कायद्या विरूद्ध आहे, असा युक्तिवाद डॉ.चलवादी यांनी केला आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात स्थित पेठांमध्ये प्रारुप प्रभागांची रचना छोटी करून संख्या वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या सत्ताधारी पक्षाला फायदा करून देण्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रारुप प्रभाग त्यांच्या सोयीचे करण्यात आले आहे.ही रचना पुर्णत: मतदारांच्या हक्काचे हनन करणारी असून देशद्रोहासारखे आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.

उलटपक्षी मनपाच्या उपनगरातील गावांचे रचनेनुसार २ किंवा अधिक तुकडे करून गावाच्या विकासामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न प्रभाग रचनेच्या माध्यमातून होत असल्याचे निरीक्षण डॉ.चलवादी यांनी नोंदवले. चुकीच्या पद्धतीने प्रभागांची रचना करण्यात आली आहे. प्रारुप प्रभागाची नावे निश्चित करतांना गावाप्रमाणे आणि नैसर्गिक नियमाने करणे अपेक्षित आहे. पंरतु, प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूपात चुकीचे नामकरण करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या सक्षम उमेदवारांना अडचणीचे ठरू शकतात, अशा पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सुशिक्षित, प्रामाणिक, कष्टकरी, मध्यमवर्गीय, आणि सर्व जातीधर्माचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. सर्व नागरिकांचा सन्मान करीत देशाच्या संविधानाच्या अधिन राहून, घटनेला अभिप्रेत प्रभाग रचना करणे प्रशासनावर बंधनकारक आहे. अशात चुकीची प्रभाग रचना रद्द करीत योग्य प्रभाग रचना करण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली.

स्वराज ट्रॅक्टरने 25 लाख उत्पादनांचा टप्पा गाठला

·         2002 मध्ये गाठलेल्या 5लाख युनिट्सच्या पहिल्या महत्त्वाच्या टप्प्यापासून उत्पादनात पाच पट वाढ

·         ताकददर्जा आणि लवचिकतेचा उत्सवशेती यांत्रिकीकरणाच्या भारताच्या मोहिमेला चालना

·         या माइलस्टोनमुळे भारतीय शेतकऱ्यांचे स्वराज सोबतचे खोल भावनिक संबंध आणि कायमस्वरूपी विश्वास समोर येतो

मोहाली29 ऑगस्ट 2025महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या स्वराज ट्रॅक्टरने आज पंजाबमधील मोहाली येथील त्यांच्या उत्पादन कारखान्यातून 25 लाख ट्रॅक्टरचे उत्पादन झाल्याची घोषणा केली. 2022 मध्ये स्वराजने 20 लाख उत्पादनाचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात कंपनीने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे स्वराज ट्रॅक्टर हा देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात वेगाने वाढणारा ट्रॅक्टर ब्रँड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

20-25 एचपी श्रेणीतील पहिले मॉडेल ‘स्वराज 724’ लाँच करत स्वराजचा प्रवास 1974 मध्ये सुरू झाला. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन असलेले आणि स्वदेशात उत्पादित ट्रॅक्टर बनवले. हरित क्रांतीच्या काळात स्वावलंबनाच्या भावनेतून जन्मलेले ‘स्वराज’ हे नाव स्वातंत्र्य आणि स्वयंपूर्णतेच्या शक्तिशाली भावनेतून निर्माण झाले आहे. भारतीय अभियंत्यांनी भारतीय शेतीसाठी बनवलेला एक मजबूत, विश्वासार्ह आणि परवडणारा ट्रॅक्टर म्हणजे स्वराज. गेल्या काही दशकांपासून, स्वराज आपल्या मुळांशी प्रामाणिक आहेच पण बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या बदललेल्या गरजांचा विचार करत  ट्रॅक्टर आणि शेती यांत्रिकीकरणात सातत्याने बदल केले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे या ब्रँडसोबत असलेले नाते अधिक घट्ट होते आहे.

2002 मध्ये 5 लाख उत्पादनाचा टप्पा गाठल्यानंतर, केवळ 23 वर्षांत स्वराजने उत्पादनात पाच पट वाढ करून ते 25 लाख युनिट्सपर्यंत नेले आहे. भारतीय शेतीमधील स्वराजच्या मजबूत उपस्थितीचे हे द्योतक आहे.

स्वराज पोर्टफोलिओमधील ट्रॅक्टर असे आहेत, जे साधेपणा आणि अत्याधुनिकतेसह उत्कृष्ट निकाल देते. या श्रेणीमध्ये स्वराज 855, 735, 744, 960, 742, 963, स्वराज टार्गेट आणि अलीकडेच लाँच झालेल्या नया स्वराज श्रेणीसारखे प्रतिष्ठित मॉडेल समाविष्ट आहेत. नव्याने विकसित होणारी क्षेत्रे तसेच हलक्या वजनाच्या शेती उपायांना पूर्ण करण्याची ब्रँडची क्षमता यातून समोर येते.

या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल एम अँड एम लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणालेस्वराजने गाठलेला 25 लाख उत्पादन टप्पा म्हणजे शेतकऱ्यांच्या पिढ्यांनी या ब्रँडवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. भारताच्या स्वावलंबन आणि स्वयंपूर्णतेच्या भावनेतून जन्मलेला स्वराज शेतकऱ्यांना तर सक्षम करत आहेच पण शेतीत परिवर्तन घडवून आणण्याच्या आमची वचनबद्धता अधिक दृढ करतो आहे.”

एम अँड एम लिमिटेडच्या स्वराज विभागाचे सीईओ श्री. गगनजोत सिंग म्हणाले, ट्रॅक्टर हे आमच्यासाठी फक्त एक मशीन नाहीतर तो शेतकऱ्यांच्या प्रगतीतील भागीदार आहे. जो कमी ऑपरेटिंग खर्चामध्ये विश्वासार्ह कामगिरी करतो आणि त्यांच्या गरजांवरील एक महत्त्वाचा उपाय आहे. शेतकरी समाजाच्या आकांक्षाआव्हाने आणि जीवनशैली समजून घेतल्याने आमचे त्यांच्याशी घट्ट नाते जोडले गेले आहे. 25 लाखांचा टप्पा गाठणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या समृद्धीच्या प्रवासात अधिक भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी प्रेरणा आहे.”

एखाद्या शेतकऱ्याने आपला पहिला ट्रॅक्टर खरेदी केल्याचा अभिमान ते पालकांकडून मुलांपर्यंत पोहोचणारा पिढ्यांचा विश्वास यापर्यंत, स्वराज हा ग्रामीण भारताच्या रचनेत पूर्णपणे सामावलेला आहे. स्वराज ट्रॅक्टर श्रेणी विविध भूप्रदेशांमध्ये विश्वासार्ह कामगिरी करते, त्याचे योग्य मूल्य देते, ज्यामुळे ते भारतातील शेतीचा अविभाज्य भाग बनले आहे.

गड किल्ले ही महाराष्ट्र भूमीची ओळख-छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह भोसले

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  देखाव्याचे उद्घाटन
पुणे: एकाच देशातून एकाच वेळी बारा वास्तूंना हेरिटेजचा दर्जा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे केवळ शिवाजी महाराजांशी किंवा इतिहासाशी संबंधित आहेत असे नाही, तर महाराष्ट्र  भूमीची ते ओळख आहेत. म्हणून त्यांना हेरिटेज दर्जा मिळणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी व्यक्त केली.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवात युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट १२ किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणारी ध्वनी चित्रफीत असा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेविका गायत्री खडके, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष अनंत कावणकर, सचिव पराग ठाकूर, कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले, गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पराग ठाकूर म्हणाले,  युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित केले आहे.  त्यानिमित्त शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा प्रवास किल्ल्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. रायगड स्मारक मंडळ, कात्रज शिवसृष्टी आणि नारळकर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने हा देखावा साकारण्यात आला आहे.

मोहन शेटे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते हे आपल्याला माहित आहे, परंतु जगाला त्याचा परिचय नव्हता. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश झाल्यानंतर महाराजांचे कर्तृत्व जगाला कळले आहे. त्याचप्रमाणे शिवचरित्र सुद्धा जगभर पोहोचले पाहिजे. शिवाजी महाराजांची आठवण करून देणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळात साकारण्यात आल्या आहेत. हे गड किल्ले जिवंत शाहीर आहेत.

काकडे हाउसवर तोबा गर्दी …

पुणे- माजी खासदार संजय काकडे यांना वाढदिवसाच्या शुभेछ्या देण्यासाठी आज सकाळपासून त्यांच्या हजारो चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती . काही सर्वपक्षीय माजी लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी यांच्याहून अधिक गर्दी होती ती तरुणाईची नाव युवकांची … राजकारणापेक्षा अधिक समाजकारणाला महत्व दिलेल्या संजय काकडे यांना शुभेछ्या द्यायला इथे येणारे सर्व केक आणि पुष्पगुच्छ घेऊन येत होते .हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेता धर्मेंद्र यांनी काकडे यांना व्हिडीओ कॉल करून शुभेछ्या दिल्या .

माती गणपती मंडळातर्फे ‘गोंद्या आला रे आला’ सजिव देखावा

नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट : डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते देखाव्याचे उद्धाटन
पुणे: ‘गोंद्या आला रे आला’ हे सांकेतिक शब्द वापरुन दिनांक २२ जून १८९७ रोजी पुण्याच्या मातीने एक अभूतपूर्व क्रांतिकारी घटना अनुभवली. क्रांतिवीर चाफेकर बंधूंनी प्लेग आयुक्त रॅंडचा वध करून ब्रिटिश साम्राज्याच्या दडपशाहीला थेट आव्हान दिले.  आपल्या कृत्याचा शेवट फाशीमध्ये होईल, याची पूर्ण जाणीव असूनही त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यासाठी पुढे पाऊल टाकले. एवढेच नव्हे, तर यातील दोन भावंडांना बायका-मुलं असतानाही त्यांनी मातृभूमीच्या प्रेमासाठी आपल्या संसाराला व प्राणाला तिलांजली दिली. स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारी ही घटना पुन्हा जिवंत करण्याचे काम माती गणपतीच्या यंदाच्या देखाव्यात करण्यात आले आहे.

नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘गोंद्या आला रे आला’ हा सजीव देखावा सादर करण्यात येत आहे. देखाव्याचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते झाले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. निवेदिता एकबोटे, परेश हराळे, विशाल नांगरे, महेश हराळे, शुभम आदवडे, निखिल देशपांडे व मंडळाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते. मारवा क्रिएशन यांनी देखाव्याची निर्मिती केली असून लेखन दिग्दर्शन राहुल गाजरे प्रज्ञा दंडवते यांचे आहे.

रोहित टिळक म्हणाले, माती गणपती मंडळ नेहमीच अतिशय चांगले उपक्रम राबवत असते. वर्षभर आयोजित शिबिरे आणि कोविड काळात केलेले कार्य हाच लोकमान्य टिळकांना अपेक्षित गणेशोत्सव आहे. अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी निर्माण होते. ‘गोंद्या आला रे आला’ या देखाव्यातून इतिहासाची ओळख तर होतेच, पण समाजात सामाजिक जाणीवही दृढ होते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बलिदान विसरतो, तसे होऊ नये.

कौस्तुभ खाकुर्डीकर म्हणाले,  माती गणपती मंडळाचा उद्देश केवळ धार्मिक सण साजरा करण्यापुरता मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीवा जनमानसात रुजवणे हाही आहे. या देखाव्याद्वारे आम्ही चाफेकर बंधूंचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘गणेशोत्सव हा लोकशिक्षणाचा उत्सव असावा’, ही लोकमान्य टिळकांची कल्पना होती, त्याच धर्तीवर आमचे उपक्रम राबवले जातात. या देखाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.

अखिल मंडई मंडळाने साकारले राधा कृष्णाचे कृष्णकुंज

उत्सवाचे १३२ वे वर्ष ;  हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.

अखिल मंडई मंडळाचे उत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे.  हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात ‘कृष्णकुंज’ ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात आली आहे. तब्बल ९० फूट बाय ६० फूट आकारात  राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती आहे. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय ५ ते ६ मोठी झुंबरे सजावटीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

अण्णा थोरात म्हणाले, दर तीन वर्षांनी  शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. यावर्षी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान झाले असून तो झोपाळा राजस्थानी शैलीने तसेच फुलांनी सजवण्यात आला आहे.  या सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल ४० कारागीर महिनाभर काम करत होतें संपूर्ण कलादिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांचे आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल,इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, २९ ऑगस्ट २०२५: शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिकस्तरावर नोंद घेत इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान करण्यात आला. या अभियानाचे मार्गदर्शक आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनाही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल (लंडन), प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका), ज्येष्ठ संपादक व माजी मंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराच्या निवड समितीकडून महावितरणच्या विद्युत सुरक्षेच्या लोकाभिमुख अभियानाचे कौतुक करण्यात आले. यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष श्री. हेनरी आर (युरोप), प्रमुख श्री. पाब्लो (इंग्लंड), उपाध्यक्ष श्री. संजय पंजवानी, परीक्षक चंद्रशेखर शिंदे यांचा समावेश आहे.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानातील विक्रमी लोकसहभागाची दखल जागतिकस्तरावर घेण्यात आल्याबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छोटेखानी बैठकीत कौतुक केले. शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट हे महावितरणच्या कामाचा दैनंदिन भाग आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांद्वारे सातत्याने लोकसंवाद साधून विद्युत सुरक्षेची माहिती देत राहावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत, मुख्य महाव्यवस्थापक श्री. भूषण कुलकर्णी, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांची उपस्थिती होती.

‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ही इंग्लंडमधील जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेने महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभाग आंतरराष्ट्रीय विक्रम असल्याची घोषणा केली व मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला. यावेळी युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेपाळ आणि भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे तर ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत इमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांसाठी महावितरणला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी नुकतेच गौरविले आहे. आता या अभियानाच्या लोकसहभागावर आंतरराष्ट्रीय विक्रमाचा शिक्कामोर्तब झाला आहे.

कसबा गणपतीची महाआरती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न; महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार

पुणे, दि. २९ ऑगस्ट २०२५ — पुणे शहराच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या महाआरतीचा सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने तसेच सौ. सोनाली डांगे यांच्या ‘श्री शक्ती प्रतिष्ठान’च्या नियोजनातून आयोजित करण्यात आला होता.

या महाआरतीत शिवसेना महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, माजी नगरसेविका प्रतिभा रवींद्र धंगेकर, उपशहरप्रमुख श्रद्धा शिंदे, सुरेखा कदम, अभिनेत्री मीरा सारंग तसेच कार्यकर्त्या साक्षी रायकर, जानवी घंटी, प्रीती मेरवाडे, पूनम कुरपे आणि लता लेंबे यांचा समावेश होता. सर्व भगिनींनी एकत्र येऊन श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

समारंभात बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांची सुरक्षितता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले सामूहिक कर्तव्य आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम उपाययोजना आवश्यक आहेत.” तसेच कसबा गणपती मंडळाच्या विकासकामांसाठी शासनाने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

त्यांनी पुढे महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा आणि जनतेच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, अशी प्रार्थना केली. तसेच महायुती सरकारवर विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रीशक्तीला चालना मिळत असल्याचे नमूद केले.

“मी स्वतः २५ वर्षांपासून गणेश आरतीत सहभागी होत आहे. आजही याच श्रद्धेने आणि विश्वासाने सांगू इच्छिते की आपण सर्वजणी एकत्र राहून समाजातील प्रश्न सोडवण्याचा संकल्प पाळू. जय महाराष्ट्र!” अशा निर्धारपूर्ण शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या भव्य महाआरतीचा समारोप महिलांच्या एकजुटीचा, श्रद्धेचा आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवत करण्यात आला.

जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी, छोटे नदी-नाल्यांच्या पाण्यावरही समन्वयाने प्रक्रिया करू– नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

▪️ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून कचरा प्रक्रियासाठी 10 प्रकल्प सुरु होणार

पुणे, दि. 29 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे. यासाठी लवकरच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. मोहोळ म्हणाले की, पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी असून जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. परंतु, फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या, नाले व गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांनी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून 10 नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे.
पुणे शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा वाटा वाढत असून जुलै मध्ये एक लाख 92 हजार प्रवासी तर ऑगस्ट मध्ये हा आकडा वाढून 2 लाख 13 हजार प्रवासी असा झाल्याचे पुणे मेट्रो कडून सांगण्यात आले. पुढचा टप्पा दोनचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्यावर आहेत. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच त्याचे काम सुरु होईल. त्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. मोहोळ यांनी दिले.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मीनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरु करण्यात आले असून मार्किंगचे काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्याचे निर्देश बैठकीतून देण्यात आले.
जिल्ह्यातील नदी स्वच्छता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा निर्मिती, ग्रामीण विकास आणि शहरी भागातील मूलभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यक्षम व पारदर्शक अंमलबजावणी होणे हीच जिल्हा विकास समितीची प्राथमिकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पीएमआरडीए कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

पिंपरी (दि.२९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी मुख्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, भक्तीभावासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीसाठी नैसर्गिक फुलांना प्राधान्य देण्यात आले आहे. गुरुवारी ज्ञानप्रबोधिनीने पारंपरिक बर्ची नृत्य तसेच ढोल-ताश्याचे प्रात्यक्षिक सादर करून गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घातली.

या गणेशोत्सवनिमित्त तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने एकदिवसीय शिवकालीन शस्त्रे, चिलखते, अमुक्त आणि मुक्त शस्त्रे यांचे ऐतिहासिक प्रदर्शन पीएमआरडीएमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे रवींद्र जगदाळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून शिवकालीन वारसा, युद्धकला आणि शस्त्रांची ओळख करून दिली. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रदर्शनास भेट देऊन शस्त्रसंग्रहाचे निरीक्षण केले.

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीत १२ गड किल्ल्यांचा समावेश केला असून त्यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत. याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने पीएमआरडीएमध्ये गणेशोत्सवानिमित्त फलकाद्वारे संबंधित गड किल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जरांगेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारचे काम गोळ्या घालण्याचे नाही

मुंबई-मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघी मुंबई स्तब्ध झाली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला जे काही देणे शक्य आहे ते, कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत बसवून विशेषतः कुणाचेही आरक्षण कमी न करता व कुणाचेही नुकसान न करता दिले जाईल, असे ते म्हणालेत.

मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मुंबईतील वातावरण तंग झाले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले होते. आजही ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी आपण शिंदे समिती स्थापन केली होती. त्यात हजारो नोंदी सापडल्या होत्या. ही समिती आजही काम करत आहे. सारथीच्या माध्यमातून आपण विविध कोर्सेस सुरू केले. त्याचाही मराठा समाजाला लाभ होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही हजारो तरुणांना रोजगारासाठी 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा लाभही त्यांना मिळत आहे. मराठा विद्यार्थ्यांना हॉस्टेलचीही सुविधा दिली जात आहे. विशेषतः ज्या ठिकाणी हॉस्टेल नाहीत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दरमहा भाडे दिले जात आहे. या विविध योजनांतून मराठा समाजाची मुले यूपीएससी, एमपीएससीच्या माध्यमातून पुढे जात आहेत. स्वतःच्या पायावर उभे टाकत आहेत. त्यामुळे शासन म्हणून आम्ही आमच्या अडीच वर्षांच्या काळात जे जे काही प्रयत्न केले, ते सर्व प्रयत्न मराठा समाजापुढे आहेत.

पूर्वी 2016-17 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. ते हायकोर्टातही टिकले होते. पण काही जणांनी त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या सरकारने तिथे योग्य ती भूमिका घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले नाही. पण त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या समाजाला पुन्हा 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे माझी मराठा समाजाला नम्र विनंती आहे की, जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही समाजासाठी केले आहे. यापुढेही ते करत राहू. पण समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसीचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला मिळावे अशी मराठा समाजाचीही इच्छा नाही. ती नसावीही. तसे करताही येणार नाही. त्यामुळे जे योग्य आहे, कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत बसणारे आहे, जे काही न्याय हक्क आहेत ते देण्याची भूमिका सरकारची आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला ओबीसींचे विविध लाभ मिळत आहेत. यासाठीच आमच्या सरकारने त्यांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते टिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. याउपर या प्रकरणी ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचाही स्वीकार केला जाईल. पण जे काही योग्य आहे, कायदेशीर आहे, नियमात बसणारे आहे त्यावर सरकार आजही सकारात्मक आहे.

आमची व मुख्यमंत्र्यांची या प्रकरणी चर्चा झाली. त्यानुसार मराठा समाजाला जे काही देणे शक्य आहे ते, पण कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत बसून कुणाचेही आरक्षण कमी न करता, कुणाचेही नुकसान न करता ते दिले जाईल, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब:पवार समाजाचं नुकसान करत आहेत

भाजप आमदार संजय केनेकरांचा हल्लाबोल
मुंबई-मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शरद पवार यांचा सुसाइड बॉम्ब म्हणून पाहिले जाते. पवारांनी व्यक्तिगत द्वेषापोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे. तो बुमरँग होणार आहे. पवार समाजाचे नुकसान करत आहे, असा आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील.

संजय केनेकर पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता मनोज जरांगे यांच्यासारखे सुसाइड बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात हे दुर्दैव आहे. शरद पवार यांनी कुणालाच कायम मुख्यमंत्रिपदी बसू दिलेले नाही, हा त्यांचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे विकास करणारे नेतृत्व आहे.संजय केनेकर म्हणाले की, शरद पवारांकडून जातीजमातीमध्ये तणाव पसरवणे, राज्यात आराजकता पसरवण्याचे काम करत आलेले आहे. वसंत-दादापासून तर वसंतराव नाईक यांच्या काळातही त्यांनी महाराष्ट्रात दंगल घडवली. इतिहास काढा शरद पवार नावाचा माणूस माणसांना एकत्र राहू देत नाही. त्यामुळे निश्चितपणे मनोज जरांगे पाटील गाव गाड्यातले मराठे वापरून या वाड्यातील मराठा नेत्याला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे.संजय केनेकर म्हणाले की, हा जातीय आणि व्यक्तिगत द्वेष असून शरद पवारांना हे सातत्याने खुपत असून हा जरांगे नावाचा सुसाइड बॉम्ब शरद पवार यांच्याकडून वापरला जात आहे, असा हल्लाबोल केनेकरांनी केला आहे.

गोळ्या घाला, तुरुंगात डांबा, मागे हटणार नाही – जरांगे

मनोज जरांगे यांनी यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, मायबाप सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेमुदत उपोषण करण्याची परवानगी द्यावी. आमची तुम्हाला सहकार्य करण्याची तयारी आहे. अन्यथा मंगळवारपासून आणखी कोट्यवधी मराठे मुंबईला येणार आहेत. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा. इथे कोट्यवधी लोक घेऊन आलेत. आम्ही मजाक करत नाही. मुख्यमंत्र्यांच्या हातून अजूनही संधी गेली नाही. मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. मराठ्यांची नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण हवे आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करत असाल, तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे इथून हटत नाही. मी याच ठिकाणी मेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये नेऊन टाकले, तरी मी जेलमध्ये उपोषण करेन. पण मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. त्यामुळे सरकारने आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी ही आमची विनंती आहे, असे जरांगे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना म्हणाले.