Home Blog Page 150

व्यवसायातून उन्नती साधू या.. जीवनाचा उत्कर्ष घडवू या

राज्यातील युवक-युवतींमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेला दिशा देण्यासाठी व स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील मागास घटक, बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत असून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येत आहेत.युवकांच्या हाताला रोजगार दिला तर ते इतरांसाठीही रोजगार निर्माण करतील. याच विचाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यरत आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी व उद्योग-व्यवसायात तरुणांना संधी देण्यासाठी या महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ आहे. हे महामंडळ प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या महामंडळाची स्थापना 27 नोव्हेंबर 1998 रोजी मराठा समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत अल्प व्याजदर कर्ज सुविधा, अनुदानावर आधारित आर्थिक योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन आणि तरुणांसाठी व्यवसाय योजना अशा आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांचा मुख्य उद्देश मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी लागणारी भांडवली मदत पुरवून त्यांना स्वावलंबी बनवणे. यामुळे अनेक तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. या महामंडळाच्या मदतीमुळे ग्रामीण भागातसुद्धा उद्योजकतेचा विकास होताना दिसत आहे.

अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय 15 जुलै 2025 रोजी निर्गमित केला आहे.

या महामंडळा मार्फत वैयक्तिक कर्ज आणि गट कर्ज व्याज परतावा या योजना राबवल्या जातात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना(IR-I)

या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही बँकेमार्फत 15 लाख रुपयाच्या मर्यादेत कोणत्याही व्यवसाय / उद्योगाकरीता लाभार्थ्यांनी कर्ज घेतल्यास, त्या कर्जावरील व्याज परतावा जास्तीत-जास्त 7 वर्षाकरीता, 12 टक्केंच्या कर्ज दर मर्यादेत अथवा 4.5 लाख रुपये रक्कमेच्या मर्यादेत देण्यात येतो. 2 फेब्रुवारी 2018 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण निर्माण झालेले पात्रता प्रमाणपत्र (LOI) 1,89,318 तर एकूण बँक कर्ज मंजुरी लाभार्थी संख्या 1,53,726 असून

बँकांनी वितरित केलेली कर्ज मंजूर रक्कम 13,169.99 कोटी आहे.
व्याज परतावा सुरु झालेली लाभार्थी संख्या (Claim) 1,75,836 असून
व्याज परतावा झालेली रक्कम 1,361.58 कोटी रुपये आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रुपयाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. 2 फेब्रुवारी 2018 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण निर्माण झालेले पात्रता प्रमाणपत्र (LOI) 1014 असून एकूण बँक कर्ज मंजुरी लाभार्थी गट संख्या 969 आहे. एकूण बँकेने वितरित केलेली कर्ज मंजूर रक्कम 361.87 कोटी आहे.

व्याज परतावा सुरु झालेली लाभार्थी संख्या (Claim) 589 आहे. व्याज परतावा झालेली रक्कम 34.03 कोटी आहे.
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I):
FPC (Farmer Producer Company) गटांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी देण्यात येते व 7 वर्षे वसुली करण्यात येते. सद्यस्थितीत गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) ही गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महामंडळामार्फत 29 ऑगस्ट 2025 पर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण 1,398.96 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

महामंडळाच्या योजनांकरिता अटी व शर्ती

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. (जे 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I.T.R. (पती व पत्नीचे) लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय क्र. अपाम 2017/प्र.क्र.189/रोस्वरो-1, दिनांक 21 नोव्हेंबर, 2017 नुसार करण्यात येईल.

योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपध्दती

महामंडळाकडून ‘Letter of Intent (LOI) काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करावी लागतात.
पात्रता प्रमाणपत्र (LOI) करीता महत्वाची कागदपत्रे :

  1. आधार कार्ड (अपडेटेड मोबाइल क्रमांक व स्वतःचा ई-मेल आयडीसह)
  2. रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला / लाईट बिल / रेशनकार्ड / गॅस बिल / बँक बुक)
  3. उत्पन्नाचा पुरावा
    (उत्पन्नाचा दाखला / आयकर रिटर्न जर लग्न झाले असल्यास, नवरा-बायकोचे व लग्न न झालेल्या सदस्यांचे स्वतःचे आयकर रिटर्न आवश्यक)
  4. जातीचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला/General Register उतारा नंबर १ किंवा जातीचा दाखला.
  5. लग्न झालेल्या महिलांसाठी Pan Card / Marriage Certificate / गॅझेट आवश्यक.
  6. एक पानी प्रकल्प अहवाल (वेब प्रणलीवर उपलब्ध आहे)
  7. स्वतः घोषणापत्र (वेब प्रणलीवर उपलब्ध आहे)
    (जर आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला यामधील जन्म तारखे मध्ये तफावत असल्यास)
    ही कागदपत्रे अपलोड करताना त्यांची स्कॅन केलेली प्रत स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावी. अर्ज करताना तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज भरावा लागतो. यानंतर तुम्हाला ‘LOI’ मिळते, जे बँकेत कर्ज मंजुरीसाठी सादर करावे लागते.
    तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात (वैयक्तिक किंवा गट) त्यानुसार काही कागदपत्रे बदलू शकतात. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी, महामंडळाच्या वेबसाइटला भेट देणे किंवा जवळच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा.

अर्ज प्रक्रिया

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करून ‘Letter of Intent (LOI)’ घेणे आवश्यक आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतर LOI समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पुर्ण प्रक्रीया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट).

त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. लाभार्थ्यांने EMI विहित कालमर्यादेत भरला असेल तरच त्याला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात येईल. या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्याकरिता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हा निहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती / संस्थेच्या आमीषाला बळी पडू नये.
या महामंडळाच्यावतीने तरुणांना व उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी केवळ भांडवली मदतच नव्हे तर सर्वांगीण मार्गदर्शन आणि आवश्यक प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत राज्यातील हजारो तरुणांनी व्यवसाय, सेवा क्षेत्र, उत्पादन उद्योग, लघु व मध्यम उद्योग, तसेच शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवला आहे. या तरुणांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांमुळे केवळ स्वतःचा रोजगार निर्माण झाला नाही, तर इतर अनेकांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
राज्य शासनाच्या धोरणांतर्गत महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या या योजना ही फक्त लाभार्थ्यांच्या हितासाठी नसून महाराष्ट्राच्या भविष्याच्या पायाभरणीसाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना संधी देऊन त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर उभे करण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. या योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवणारी नसून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि मराठा समाजातील घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक प्रभावी साधन ठरल्या आहेत.

शैलजा पाटील ,
विभागीय संपर्क अधिकारी.

“तुम्ही गांधींना मारलं, तुकारामांना मारलं… आता जरांगेंनाही मारणार का?: शरद पवार गटाच्या राज राजापूरकरांचा घणाघात

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद वाढला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.राज राजापूरकर म्हणाले की, तुम्ही गांधींना मारले, तुकारामांना मारले, आता तुम्हाला जरांगे यांना मारायचे आहे का? असा सवाल करत त्यांनी आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा मुख्यमंत्री व्हावे, फक्त भाजपचा नाही. समाजात दंगली घडवण्याचे काम आता व्हायला नको.

जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतल्यानंतर राजापूरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी देशाचा नागरिक आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपुस करायला, भेटायला गेलो होतो, मात्र याचा चुकीचा अर्थ घेत ओबीसी मराठ्यांच्या भेटीला, असे वाद लावले जात आहेत. भाजपला हेच पाहिजे आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात बांगड्या तर भरल्या नाहीत ना? असा खोचक सवाल राजापूरकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नाराज झाल्यावर ते मोदींकडे जातात, मग आता मराठा समाज नाराज असताना त्यांची अडचण का सोडवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही गांधींना मारलं, आता जरांगेना मारणार आहात का? काय चाललय महाराष्ट्रात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता होणार कार्यक्रम

पुणे -हिदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. २) सायंकाळी पाच वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या देखावा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे.

ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदा भारतातील अध्यात्म आणि धार्मिक संगीताच्या जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पंडित रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतून हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत रसराज महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे सखोल आणि सुमधुर पठण आणि धार्मिक गीते आणि श्लोक सादर करण्यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या विविध धार्मिक सादरीकरणांमध्ये, सुंदरकांड मार्ग विशेष लोकप्रिय आहे. अनेक उच्चभ्रू आणि सेलिब्रिटीं वर्गात त्यांचा चाहता वर्ग आहे. पंडितजींची ख्याती देश विदेशात पसरलेली आहे. विविध धार्मिक समारंभ आणि कार्यक्रमांसाठी त्यांना विविध देशांमध्ये आमंत्रित केले जाते, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि आशीर्वाद जागतिक पातळीवरील भाविकांपर्यंत पोहोचतात. पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंडीत रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतील हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील उद्यापासून पाणी बंद करणार, म्हणाले- राज ठाकरे कुचक्या कानाचे

मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मराठा प्रश्नाबद्दल राज ठाकरेंनी बोलू नये. ते मराठवाड्यात का येतात, नाशिकमध्ये का जातात आम्ही विचारले का? राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत. फडणवीस त्यांच्या घरी जाऊन चहा पिले की इकडे पक्ष संपला तरी त्यांना काही फरक पडत नाही. दोन्ही ठाकरे बंधू चांगले आहेत.आंदोलन संपल्यावर नीतेश राणे यांच्यामध्ये कीती दम आहे, मी बघतो. नारायण राणेंना मी समजून सांगितले होते पण ते ऐकत नाही.असेही ते म्हणालेत

मुंबई-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार मागण्या करत नाही म्हणून मी आता उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे.

मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे नुकसान- शाह
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी केली आहे.आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका येथील व्यापारी आणि व्यावसायिकांना बसत आहे. शनिवार आणि रविवार सारख्या सुट्टीच्या दिवसांत हे आंदोलन सुरू असल्यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षीच कर्करोगाने निधन..

मुंबई -अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (रविवार) पहाटे कर्करोगामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रिया मराठे यांनी शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, “आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यामुळे मालिकेच्या शूटिंग आणि आरोग्यात समतोल साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘मोनिका’ ही भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला असला तरी, मला हा प्रवास इथेच थांबवावा लागत आहे.”

प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ‘कसम से’ या मालिकेद्वारे पाऊल ठेवले. त्यानंतर त्या ‘पवित्र रिश्ता’ मध्ये ‘वर्षा’ची भूमिकेत आणि ‘बडे अच्छे लगते है’ मध्ये ‘ज्योती मल्होत्रा’च्या भूमिकेत दिसल्या. या भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या.

प्रिया मराठे यांनी 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते. शंतनु मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपे म्हणूनही यांच्याकडे पाहिले जात होते. प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील अनेकांना धक्का बसला असून, चाहते आणि सहकलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

370 हटवणारे गृहमंत्री मराठा आरक्षणावर गप्प का?:शहा ‘बीएमसी’साठी लालबागच्या राजाकडे पण मराठ्यांकडे दुर्लक्ष

मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन काय केले? त्यांनी केवळ मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे म्हणजे, गुजराती, अमराठी झाला पाहिजे हे भाजपच्या नेत्यांना सांगितले आहे. गृहमंत्री लालबाग च्या राजाकडे जात प्रार्थना करतात की मुंबईचा महापौर हा एक उपरा भाजपचा होऊ देत, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. पण त्यांना मराठा समाजाचे दु:ख विचारण्यासाठी वेळ नव्हता.

संजय राऊत म्हणाले की, भर पावसात मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील अनेक भागात मराठा बांधव आल्याने तो परिसर विस्कळीत झाला आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांच्याबरोबर भाजपचे सर्व लोक उपस्थित होते. इतका गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. तो प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहे. तर आमची अपेक्षा होती देशाचे गृहमंत्री तिथे जातील आणि दिलासा देतील. तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. 370 हटवून काश्मीर प्रश्न जर गृहमंत्री सोडवू शकतात त्यासाठी घटनेत बदल करु शकतात ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घटनेत बदल करु शकतात. 370 कलम हटवण्याचे श्रेय जसे ते घेतात तसेच हे श्रेय त्यांना घेता आले असते. पण त्यांनी ते केले नाही.

संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मराठी आम्हाला मिळावी ही प्रार्थना करण्यासाठी लालबाग च्या राजाच्या दर्शनाला गेले होते.म्हणून ज्या संख्येने मराठी बांधव मुंबईत जमत आहे त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. आम्हाला त्यांचा काहीच त्रास होत नाही. आम्ही त्यांचे स्वागत करु. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे, की मराठा बांधवांना जी काही मदत शक्य आहे ती आपण करावी. अमित शहांनी जो प्रकार केला तो अत्यंत क्रुर आहे.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे मराठी माणूस नाहीत. ते अमित शहा यांच्या मागे फिरत होते पण त्यांनी मराठा बांधवांसाठी काहीही केले नाही. मराठा बांधवांनी मुंबई आपली आहे हे लक्षात घेऊन मुंबईत मुक्काम केला पाहिजे. आमचा पक्ष त्यांच्या सोबत आहे आम्ही त्यांना सर्व काही सहकार्य करू. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठी माणसांना मारायला निघाले आहे. हे बोलतात एक आणि करतात एक असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याचे सरकार मराठी माणसांना संपवण्यासाठी आलेले आहे. महायुतीतील तिघे एकमेकांना संपवण्याच्या नादात मराठी माणसांना संपवत आहेत. एकनाथ शिंदेंना शहांच्या मागे फिरायला लाज वाटायला हवी होती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊ नका.

संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणाला बसण्याची गरज आहे. पण ही सर्व लोकं भाजपच्या दबावाखाली आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. लोक प्रश्न विचारतील म्हणून शिंदे गावाकडे लपून बसले आहे. त्यांना महत्त्वाच्या क्षणी गावाकडे काय करत आहे.

पुणे महापालिकेने महावितरणला पिंपरी चिंचवड प्रमाणे रस्ते खुदाई शुल्क आकारावे-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश

पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती बैठक

पुणे, दि. ३१ ऑगस्ट, २०२५- पुणे शहर व जिल्ह्यात महावितरणमार्फत विविध योजनेतून विजेची पायाभूत कामे सुरु आहेत. मात्र भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महावितरणला जादा खुदाई शुल्क आकारले जात असल्याने अनुमानित रकमेत प्रकल्पाची कामे होत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्याप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रस्ते खुदाई घेते त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेनेही रस्ते खुदाई शुल्काची आकारणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.

            शनिवारी (दि. ३०) दुपारी सर्किट हाऊस सभागृहात जिल्हा विद्युत संनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला आ. योगेश टिळेकर, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, आ. शंकर मांडेकर, आ. शंकर जगताप, आ. सिद्घार्थ शिरोळे, आ. चेतन तुपे, आ. बापुसाहेब पठारे यांचेसह जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे व धर्मराज पेठकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            या बैठकीत महावितरणतर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या आरडीएसएस, पीएम सूर्यघर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदींसह जिल्हा विकास निधीतून मिळणाऱ्या योजनेतील कामाचे सादरीकरण करण्यात आले. आरडीएसएस योजनेतून विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी १७८ कोटींचा निधी मिळाला आहे. यामध्ये जिल्ह्यात ११ नविन उपकेंद्रे व १७ उपकेंद्राची क्षमतावाढीसह इतर कामे होणार आहेत. वितरण हानी कमी करण्यासाठी पुणे शहरात १३२० किमी उच्चदाब वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. तर १४६ ठिकाणी नविन रोहित्रे उभारली जाणारआहेत. तसेच ग्रामीण भागासाठी ५०५ कोटी निधी मिळाला असून यानिधीतून २४०८ किमी उच्चदाब व २०६४ किमी लघुदाब वाहिन्यांची कामे होणार आहेत. याशिवाय २९८४ वितरण रोहित्रेही उभारली जाणार आहेत.

आरडीएसएस योजनेतील कामांची व्याप्ती पाहता यामध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने व जादा खुदाई शुल्कामुळे या कामांच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्तांना खुदाई शुल्क आकारणी करताना पिंपरी चिंचवड मनपाची कार्यपद्धती अवलंबावी. पिंपरी मनपा १०० रुपये प्रतिमिटर इतके पर्यवेक्षण शुल्क घेते. यामध्ये खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची असते. तर पुणे महानगरपालिका प्रतिमिटर ६६०० रुपये इतकी आकारणी करते. ज्यामध्ये रस्ते दुरुस्तीचा अंतर्भाव आहे.

जिल्हा विकास निधीतूनही महावितरणला गतवर्षी ४० कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित होता. त्यापैकी २१ कोटी निधी महावितरणला प्राप्त आहे. तर चालू २०२५-२६ वर्षासाठी महावितरणने जिल्हा विकास निधीतून ९४ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलेला आहे.

पीएम-सूर्यघर योजनेला गती द्या

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा आतापर्यत २० हजार ७६ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्याची स्थापित क्षमता जवळपास ९४ मेगावॅट इतकी आहे. या योजनेला महावितरणने अधिक गती द्यावी. त्याचा प्रचार प्रसार करुन वीज ग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करावे असेही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सांगितले.

महापारेषणला उपकेंद्राची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात महापारेषण कंपनीची ११ अतिउच्चदाब उपकेंद्रे मंजूर आहेत. तर ११ अतिउच्चदाब केंद्रे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ज्या उपकेंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत व ती वेळेत पूर्ण करावीत असे निर्देशही उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांनी महापारेषणचे अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ यांना दिले.

राजकीय आरक्षणासाठी आंदोलन सुरू, तामिळनाडूचे उदाहरण चुकीचे,मराठा समाजाला OBC आरक्षण देणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य- चंद्रकांत पाटील

पंढरपूर -मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असताना, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असतानाही सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे आंदोलन राजकीय असून, येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कधीही खोटे बोलत नाहीत, पण काही लोक नेहमीच ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असे करतात

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, असे ते म्हणाले. त्यांनी EWS आरक्षणालाच मराठा समाजाचे खरे आरक्षण म्हटले. एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीय आयोगाला आहे, तो शिंदे समितीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाच्या कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आता वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पितृसत्ताक पद्धतीनुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात, आणि आता लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे. त्यांनी शरद पवार यांच्या तामिळनाडूच्या उदाहरणावरही टीका केली. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते टिकणारे नाही, असे पाटील म्हणाले.

40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील?:पहिला नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले – विश्वास पाटील

मराठवाड्याच्या सलग चाळीस वर्षांच्या ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारल्या जातील, असा सवाल ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार ‘इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स’च्या नोंदींना कायदेशीर दर्जा असून, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगापासून ते शेड्यूल्ड कास्ट कमिशनपर्यंत या आकडेवारीचा अधिकृत वापर झालेला आहे. अशा वेळी “मराठा कुणबी” समाजाचे स्पष्ट पुरावे समोर असूनही, त्याकडे डोळेझाक का केली जाते, असा थेट प्रश्न विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. सध्या मुंबई सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रिटिशकालीन जनगणना नोंदीची माहिती दिली.

विश्वास पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट जशास तशी…

मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता ्र येतील? भारताच्या पहिल्या नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले होते. Indian Evidence Act 1872 नुसार “द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स”च्या नोंदी सुद्धा ग्राह्य धराव्याच लागतील, असे ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील म्हणालेत.

1881 मध्ये ब्रिटिशांनी शास्त्रशुद्ध सर्वच जाती व धर्मीयांची जनगणना पहिल्यांदा पार पाडली. . पुणे जिल्ह्याची जनगणना तर स्वतः महात्मा फुले यांच्या डोळ्यासमोर व सहकार्याने पार पडली. कारण ब्रिटिशांनी तेव्हा महात्मा फुले यांना पुणे मुनिसिपल कौन्सिलवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून नेमले होते.

आज 1870 पासून ते साधारण 1908 पर्यंतचे मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील जनगणनेचे सर्व जाती, उपजाती, पोटजाती, धर्म, भटके, विमुक्त या सर्वांच्या नोंदी या ब्रिटिशांनी नोंदवल्या. त्या उपलब्ध आहेत.

त्यानुसार तत्कालीन औरंगाबाद (जालना सह) लोकसंख्या किती होती?

1881/ 7,3 0380 1901/ 7,26407

पैकी 1901 च्या जनगणनेनुसार व तसेच इतर सर्व जनगणनानुसार, त्यामध्ये “मराठा कुणबी” अशी स्पष्ट 2,88,825 लोकांची नोंद झाली असून त्या नोंदीनुसार पुरुषांची संख्या 1,47,542 तर स्त्रियांची संख्या एक लाख 41 हजार 283 आहे.

नांदेड जिल्हा

1881. 636023 1901. 503684

यामध्ये “मराठा कुणबी” किंवा कापू या शीर्षकाखाली एक लाख 29 हजार 700 लोकांची नोंद आहे. ज्यामध्ये the purely agriculture casts number is 171 600 or about 34% , the most important among them being Maratha kunbi or kapus are 129700” अशी नोंद पान क्रमांक 226 वर केलेली आहे.

बीड जिल्हा

1881 558345 1901. 492258

पैकी “मराठा कुणबी” अशी स्पष्ट नोंद 196000 अशी आहे. तसेच पान क्रमांक 234 वर the most numerous caste is the “Maratha kunbi” 39% of the total population असे स्पष्ट म्हटले आहे.

नळदुर्ग उर्फ उस्मानाबाद जिल्हा (सध्याच्या लातूर मधील काही तालुक्यांसह)

1881. 583,402 1901. 535027

वरील पाच लाखांपैकी दोन लाख पाच हजार म्हणजे 38% लोकसंख्या ही कापू तथा “मराठा कुणबी” अशीच नोंदवली गेलेली आहे. पान क्रमांक 262 वर तशी इंग्रजीमध्ये स्वयंस्पष्ट नोंद आहे.

परभणी 1881. 685099 1901. 645765

पैकी कुणब्यांची संख्या दोन लाख 60 हजार 800 आहे. म्हणजे 40% असल्याची पान क्रमांक 216 वर नोंद आहे.

बिदर

1981. 788827 1901. 766129

तेव्हाच्या बिदर जिल्ह्यामध्ये कारी मुंगी, औराद, निलंगा, उदगीर, वारावल, राजुरा व काही जहागिरी अंतर्गत मधला हा भाग आहे. त्यानुसार तेव्हा बिदर जिल्ह्यामध्ये कुणबी तथा कापू एक लाख 13 हजार 800 राहत होते. धनगरांची संख्या 52 हजार तर महार 68 हजार व मांग तथा मातंग समाज 60000 अशी नोंद आहे.

पहिल्या ब्रिटिशांच्या जनगणनेवेळी हैदराबाद मध्ये Sir Richard Meade नावाचे ब्रिटिश रेसिडेंट होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात हजारो इंनोमीटर नेमून म्हणजेच पर्यवेक्षकांची फौज तयार करून ही जनगणना झालेली आहे. 1881 च्या आधीही Dr Bradley and company नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीने गावोगाव जाऊन घोड्यावरून सर्व जाती व धर्मीयांचा सर्वे केलेला आहे. 1891 चे जनगणनेचे आकडे सुद्धा माझ्याकडे आहेत. त्यानुसार वरील सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यात किती जातीचे धर्माचे शेड्युल कास्ट शेड्युल tribe, भटके , विमुक्त, वडार, फासेपारधी अशा सर्व जातींचा पूर्णता सर्वे झालेला आहे.

याचा दुसरा अर्थ असा की 1870 ते साधारण 1910 पर्यंतचे प्रत्येक तालुक्यातील उपविभागातील कुणबी मराठा समाजाचे आकडे व नोंदी स्पष्ट आहेत . ब्रिटिशांनी 1891 मध्ये The Imperial Records keeper हे कायदेशीर पद निर्माण केले होते. तसेच इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या नुसार या सर्व रेकॉर्डला कायदेशीर दर्जा आहे. एक दोन वर्षांच्या नव्हे तर 40 वर्षांच्या नोंदी कोणालाही नाकारता येणार नाहीत.

जर सार्वजनिक बांधकाम विभागात एखाद्या नदीवरचा पूल ब्रिटिशकालीन 1880 च्या दरम्यानचा असेल तर त्याची मोजमापे आजही इव्हिडन्स म्हणून गृहीत धरली जातात. मुद्रा विभाग तुरुंग कोषागार सर्व ठिकाणी जर हा पुरावा चालत असेल तर तुम्ही कायद्याच्या कोणत्या कसोटीवर गोरगरिबांच्या या नोंदी नाकारू शकता?

मी स्वयंप्रेरणेने ह्या गरीब, दरिद्री व “राजकीय दृष्ट्या नेतृत्वहीन मराठा समाजासाठी” स्वतःच्या खर्चाने गेली दीड वर्ष दिल्लीची पार्लमेंट लायब्ररी, मुंबईतील अभिलेखागार, हैदराबाद येथील लेखागार, सर्व काही अनेक वेळा जाऊन तपासले आहे. माझे वरील रेकॉर्ड व मी दिलेले आकडे हे अनेकदा टॅली केलेले आहेत.

मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन जनगणनेचे मदर रेकॉर्ड सुद्धा बघितले आहे. मी ही आकडेवारी याआधी आंदोलक आणि शासन यांना समक्ष भेटून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मी जमा केलेली जी सत्याधीष्टीत आकडेवारी आजपर्यंत कुठल्याही कोर्टामध्ये दाखल केली गेलेली नाही. जेव्हा महाराष्ट्रात डोळे झाकून “मंडल आयोग” लागू केला. तेव्हा तर ही आकडेवारी कोणी बघण्याचा प्रश्नच नव्हता.

जे लोक मराठवाडा किंवा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहत होते ते त्याच गावात पुढे शंभर वर्षेही राहिले आहेत. हिरोशिमा किंवा नागासाकी सारखे बॉम्ब पडले म्हणून कोणी गावे सोडलेली नाही. फक्त सामाजिक दृष्ट्या बोलायचे तर मराठवाड्यातला मागासवर्ग हा 1972 च्या भीषण दुष्काळावेळी मात्र आपली गावी सोडून पुणे मुख्यतः आणि मुंबईकडे स्थलांतरित झाला होता.

या निमित्ताने माझे सर्वांना व्यक्तिगत असे आव्हान आहे की, जी ब्रिटिशकालीन आकडेवारी भारताचे पहिले प्लॅनिंग कमिशन किंवा शेड्युल्ड कास्ट कमिशन किंवा पार्लमेंट मधील मागासवर्गीय सदस्यांची संख्या निश्चित करताना डॉक्टर आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा घटना तज्ञांनी सुद्धा अनेकदा गृहीत धरली होती. तिचा नियोजनासाठी वापर केला होता . ही आकडेवारी फक्त मराठा किंवा कुणबी किंवा मागासवर्गीयांची नसून ब्राह्मण, जैन तेली, ख्रिश्चन, त्या काळात भारतात येऊन राहिलेले चिनी डॉक्टर या सर्वांचे आकडेवारी आहे. तिचा आज गांभीर्याने का विचार होत नाही?

केवळ बोगस बोगस म्हणून ती बाजूला कशी ठेवता येईल ? केवळ “लागू पुरते सत्य” आणि “अर्धसत्य” स्वीकारून आदरणीय महात्मा फुले यांनी दाखवून दिलेल्या “सार्वजनिक सत्यधर्मा”कडे कसे पोहोचता येईल, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा.

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा

0

“सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ३० ऑगस्ट २०२५ — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती आणि श्री गणेश केसरी वाडा येथे भेट देत दर्शन घेतले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “सन्माननीय लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही समाजात भक्तिभाव, सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवण्याचे कार्य करत आहे. पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो गणेशभक्त या निमित्ताने एकत्र येतात, आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना श्री गणेश आपल्याकडून चांगले कार्य घडवण्यासाठी प्रेरणा देतात.”

केसरी वाडा गणपती मंडळाचे दर्शन घेतले त्यावेळी केसरीचे सरव्यवस्थापक श्री. रोहित टिळक हे आवर्जून उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या फिजिओथेरपी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विविध गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे पुस्तक भेट दिले व त्यांचा सत्कारही केला. सामाजिक सेवेच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी, “गणपती मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी योजना आखण्याचा माझा मानस आहे व त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्या सोबत भगिनी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी प्रमुख उपस्थित होत्या. तसेच, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा कदम पाटील, अनिता परदेशी, कांताताई पांढरे, सारिका पवार, मनीषा परांडे, मीनल धनवटे, वैजयंती पाचपुते व किरण साळी (सचिव युवा सेना, महाराष्ट्र राज्य), आनंद गोयल (शहर संघटक, पुणे), राजू वीटकर (झोपडपट्टी विकास प्रमुख), नितीन पवार (उपशहर प्रमुख, कोथरूड) आणि शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राज्य सरकार व केंद्र सरकार या प्रश्नावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहेत. कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता सर्व समाजघटकांना न्याय मिळावा हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे.”
तसेच, येत्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धनकवडीतही १० किलो गांजा पकडला, २५ वर्षीय विक्रेत्याला पकडले..

पुणे- वाघोली पाठोपाठ पुणे पोलिसांनी धनकवडी येथेही १० किलो गांजा पकडला आणि तो विक्रीसाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली .

पोलिसांनी सांगितले कि,’दि.२९/०८/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस अंमलदार हे हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करीत असताना रांका ज्वेलर्स पुणे सातारा रोड पुणे येथील मोरे वस्ती परिसरात आले असता पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजीत वालगुडे यांना सहकारनगर पोलीस स्टेशन कडील एन.डी.पी.एस. अभिलेखावरील जामीनावर असलेला आरोपी प्रसाद गणेश हारगुडे हा एका खोलीमधुन संशयीत रित्या बाहेर येताना दिसला. त्यावेळी तो पोलीसांना पाहुन पळुन जावु लागल्याने पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजीत वालगुडे यांनी त्यास थोड्याच अंतरावर पाठलाग करुन पकडुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे समक्ष हजर केले. त्यास पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचा अंमली पदार्थाचे अनुषंगाने अधिक संशय आल्याने त्यास त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रसाद गणेश हारगुडे वय २५ वर्षे रा. शंकर महाराज वसाहत, ज्ञानेश्वर सोसायटी मागे, एस.आर.ए. बिल्डिंग तीसरा मजला, धनकवडी पुणे असे असल्याचे सांगितले. पोलीस स्टाफ व पंचाना आरोपी ज्या खोलीमधुन बाहेर आला त्या खोलीमध्ये घेवुन गेला असता खोलीमध्ये अंमली पदार्थाचा उग्र वास आल्याने खोलीच्या मध्यभागी एका कापडी पिशवीमध्ये काहीतरी असल्याचे व त्यामधुन अंमली पदार्थाचा उग्र वास आल्याने सदरच्या पिशवीची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या एकूण ६ प्लॅस्टीक पिशव्या त्या प्रत्येक पिशवीमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला, त्याबाबत सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने सदर गांजाचा माल हा त्याचे साथीदाराचा असुन मी त्याचेकडे कामाला असुन मी सदरचा गांजाचा माल पॅकींग करून चोरून विक्री करणार होतो असे सांगतिल्याने सदर ठिकाणाहुन एकुण ३,००,०००/- रु. किं.चा १० किलो १३८ ग्रॅम वजन असलेला गांजा हा अंमली पदार्थ सदर आरोपीच्या ताब्यात मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परि.२, मिलींद मोहीते सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोउपनिरी सद्दाम हुसेन फकीर, पोलीस अंमलदार बापु खुटवड, अमोल पवार, अभिजीत वालगुडे, बजरंग पवार, सागर सुतकर, निखील राजीवडे, किरण कांबळे, संजय म्हस्के, अशोक ढावरे, अमित पदमाळे, महेश भगत, सत्यवान बाठे व रवी कदम यांनी केली आहे.

राहुल यांच्यासमोर मोदी जिंदाबादचे नारे:BJP कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले; फ्लाइंग किस देत निघून गेले राहुल गांधी

आज बिहारमध्ये राहुल गांधींच्या मतदार हक्क यात्रेचा १४ वा दिवस आहे. भोजपूरमधील यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. त्यांनी नरेंद्र मोदी झिंदाबादचे नारे दिले. राहुल गांधी निदर्शकांना फ्लाइंग किस देत पुढे सरकले.

शनिवारी आरा येथील वीर कुंवर सिंह स्टेडियममध्ये एक जाहीर सभा झाली. जिथे तेजस्वी यादव म्हणाले, ‘नितीश कुमार यांची आश्वासने ही कागदी होड्या आणि विमानांसारखी आहेत जी मुले बनवतात आणि उडवतात. तुम्ही असे सरकार बनवावे जे शिक्षण, औषध, उत्पन्न आणि सिंचन पुरवते. तुम्हाला मूळ मुख्यमंत्री हवा आहे की डुप्लिकेट? तुम्ही ठरवावे लागेल.’

त्याच वेळी, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, ‘बिहारच्या लोकांना कळेल की भाजपचा रथ येथे आधी थांबला आहे. यावेळीही येथील लोक त्यांचा रथ थांबवतील.’

‘ते आधी मतदानाचा अधिकार हिसकावून घेतील, नंतर रेशनचा अधिकार. नंतर नोकरीचा अधिकार. ते तुम्हाला रस्त्यावर आणू इच्छितात. अन्यायाविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे.’

पीएम मोदींचे चीनमध्ये शानदार स्वागत ..ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी चीनला भेट

पंतप्रधान मोदी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी चीनला पोहोचले आहेत. ते सात वर्षांनी चीनला पोहोचले आहेत. एससीओ शिखर परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. या दरम्यान, डिसेंबरमध्ये राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमावर देखील चर्चा केली जाईल. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा संपूर्ण जग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांशी झुंजत आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50 आणि चीनवर 30 टक्के टॅरिफ लादला आहे. एससीओ शिखर परिषद 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये होणार आहे. 20 हून अधिक देशांचे नेते त्यात सहभागी होतील.गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भेट दिली होती, जिथे त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. जयशंकर यांनी जलसंपदा डेटा शेअर करणे, व्यापार निर्बंध, एलएसीवरील तणाव कमी करणे आणि दहशतवाद आणि अतिरेकांविरुद्ध कठोर भूमिका घेणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीमुळे मोदींच्या चीन दौऱ्याचा रोडमॅप तयार झाला होता.

मोदी आणि जिनपिंग यांची शेवटची भेट रशियामध्ये
मोदी आणि जिनपिंग यांची शेवटची भेट ऑक्टोबर 2024 मध्ये रशियातील काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चाही झाली. 50 मिनिटांच्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ‘सीमेवर शांतता आणि स्थिरता राखणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता हा आपल्या संबंधांचा पाया राहिला पाहिजे.

जिनपिंग 2019 मध्ये भारताला भेटले
शी जिनपिंग यांनी 2019 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांची तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे भेट झाली. ही भेट भारत-चीन संबंध मजबूत करण्यासाठी आणि परस्पर मतभेदांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल होते. दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यासही सहमती दर्शविली.

एससीओची स्थापना 2001 मध्ये झाली
शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) ही 2001 मध्ये चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापन केलेली एक प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. नंतर 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान त्यात सामील झाले. 2023 मध्ये इराणही त्याचा सदस्य झाला. एससीओचे उद्दिष्ट सदस्य देशांमधील सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवणे आहे. ही संघटना दहशतवाद, अतिरेकीपणा, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यासारख्या मुद्द्यांवर एक समान रणनीती तयार करते.

“पर्यावरणपूरक गणेशोत्सवाने विमाननगरच्या गंगा नेब्युला सोसायटीत पसरवली आनंदाची लहर”

पुणे- विमाननगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. हा वार्षिक उत्सव सोसायटीतील रहिवाशांच्या हृदयात विशेष स्थान राखतो आणि सर्वांना एकत्र आणणारा, जपणीय असा सोहळा ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवात भक्तिभाव व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत आहे. तसेच, सोसायटी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देते व पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उपक्रम राबवते.

उत्सवाची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली, ज्यात सुंदररित्या सजविलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे सोसायटीच्या परिसरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि रहिवाशांच्या जल्लोषात ही मिरवणूक पार पडली. सोसायटीतील सर्व रहिवासी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होतात. दररोज आरतीचे आयोजन करून गणरायाच्या चरणी प्रार्थना आणि आशीर्वाद मागितले जातात.

नृत्यप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक विशेष उत्साहाने या कार्यक्रमांत सहभागी होतात.

गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा व संस्कृतीचा उत्सव न ठरता गंगा नेब्युला सोसायटीत एकतेचे बंध अधिक दृढ करणारा आणि समाजासाठी एक आदर्श ठरणारा सोहळा ठरतो.गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा व संस्कृतीचा उत्सव न ठरता गंगा नेब्युला सोसायटीत एकतेचे बंध अधिक दृढ करणारा आणि समाजासाठी एक आदर्श ठरणारा सोहळा ठरतो.

वाघोलीत पकडला २८.८०२ किलोग्रॅम गांजा, २२ वर्षीय विक्रेत्याला अटक

पुणे – गणेशोत्सव काळात शहरामध्ये विक्रीसाठी आलेला २८ किलो गांजा जप्त करून पोलिसांनी गांजा विक्रेत्या आरोपीला पकडले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणेकरीता अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटण करणेबाबत आदेशीत केले असल्याने दि.२८/०८/२०२५ रोजीवरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना टिटॉज हॉटेल जवळ, वाघोली, पुणे येथे पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांना संशयित कार दिसल्याने त्यांना हटकले असता वाहन चालकाचे शेजारी बसेलला इसम हा घाईगडबडीने उतरुन पळुन गेला. त्यावेळी त्यांचेवर अधिक संशय आल्याने वाहन चालकास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विलेश धारासिंग पावरा वय २२ वर्षे रा. महादेव दोंदवाडा ता. शिरपुर जि. धुळे असे असल्याचे सांगितले. त्यावेळी विलेश धारासिंग पावरा याचे ताब्यातील चारचाकी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ५,७६,०४०/-रू.कि.चा २८.८०२ किलोग्रॅम गांजा, १०,०००/-रू.कि.चा मोबाईल, ५,००,०००/-रू.कि.ची चारचाकी गाडी असा एकूण १०,८६,०४०/- रू. किं. चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४५८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुमनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परी.४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पु श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आसाराम शेटे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे व सिध्दनाथ ढवळे यांनी केली आहे.