Home Blog Page 149

मराठा बांधवांच्या पोटाची चिंता आपली जबाबदारी:अन्न, पाणी, औषध, सुरक्षा काहीही कमी पडू देऊ नका, मनसेचे मनसैनिकांना आवाहन

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. ते कुचक्या कानाचे असल्याचे ते म्हणाले होते. पण आता राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे मनसैनिकांना राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेले मराठा बांधव आपलेच आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या पोटाची चिंता दिसू नये ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गत 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यांच्या पोटापाण्यासाठी राज्यभरातून अन्नाची रसद पाठवली जात आहे. पण त्यानंतरही मुंबईत काहीही कमी पडू नये यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्नपाणी पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत.

अमित ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.

ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.

मनोज जरांगे हे पुन्हा मुंबईत का आले? या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते, राज्यातील समाजाचे म्हणणे आहे की, हे दोन्ही भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का की, 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला?तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे, तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारले का? देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझा पोरगा त्यांनी पाडला. त्यानंतरही तू त्यांची री ओढतो. राज ठाकरे कुचक्या कानाचा आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात, असे ते म्हणाले होते.

राज ठाकरे शनिवारी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, मराठा मोर्चा व आरक्षणाच्या मुद्यावर सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले? याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले? या प्रश्नांची सगळी उत्तरे एकनाथ शिंदे देतील.

धर्माच्या नावाखाली राजकारण करणे समाजासाठी हानिकारक

0

नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी लोकांना आवाहन केले की मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवावे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणे समाजासाठी हानिकारक आहे.नागपूरमध्ये महानुभाव पंथाच्या परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, राजकारणी जिथे जिथे प्रवेश करतात तिथे तिथे आग लावल्याशिवाय ते निघून जात नाहीत. जर धर्माला सत्तेच्या हाती दिले तर ते फक्त नुकसानच करेल.

गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगळे आहेत. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. काही राजकारणी त्याचा वापर करतात. यामुळे विकास आणि रोजगाराचे प्रश्न दुय्यम बनतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची शिकवण प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रेरणादायी आहे, असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, व्यक्तीमध्ये बदल त्याच्या मूल्यांमधून येतो. चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता ही मूल्ये शिकवली.

ते म्हणाले की, जीवनात सत्याचे अनुसरण करावे आणि कोणालाही दुखवू नये. गडकरी म्हणाले की, समाजात प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि समर्पण यासारख्या मूल्यांना खूप महत्त्व आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

पुणे (दि. ३१ ऑगस्ट २०२५) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड चे अध्यक्ष डॉ. मनिष कुमार व उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) यांचेकडे प्रदान केले. यावेळी संस्‍थानचे प्र. उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्र. प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज, मुख्‍य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे आदी उपस्थित होते.

या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक, सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे असे संस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

‌‘नाचून नाही, तर वाचून‌’च गणेशोत्सव साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार

पुणे : ‌‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे आणि वृद्धी रिॲलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा आज (दि. 31) समारोप झाला. ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’ असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी ‌‘नाचून नाही, तर वाचून‌’च गणेशोत्सव साजरा करू असा निर्धार केला.

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, श्रीगणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला असंख्य पालकांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. यात पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धांची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण कलादालनात झाल्यानंतर पारितोषिक वितरण बालसाहित्यकार राजीव तांबे, वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

राजीव तांबे यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी गोष्टी सांगत संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दाद द्या, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमाचे अमोल शहा यांनी कौतुक केले. या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत मुलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे नवी उर्जा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बाल गणेश फेस्टिव्हलचे यंदाचे पहिलेच वर्ष असले तरी कोथरूड परिसरातील जवळपास तीस शाळांमधील पाच हजार विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यंदाचा प्रतिसाद बघता पुढील वर्षीपासून शहर पातळीवर उपक्रम राबविण्याचे नियोजन करू.

अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सहसंवाद पुणेच्या केतकी महाजन-बोरकर, छत्रपती संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर, देवेंद्र भिडे, दिपाली गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘गजानना तू’ काव्यसंग्रहात शास्त्र आणि कलेची उत्तम सांगड : स्मिता महाजन

डॉ. ज्योती रहाळकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : ‘गजानना तू’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत शास्त्र आणि कला यांची उत्तम सांगड साधली आहे. तत्त्वज्ञान, पंचमहाभुते, निसर्गाची महती या विषयीचा सांगोपांग विचार संवेदनशील मनाच्या कवयित्रीने मांडला आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेला गेयता, मधुर शब्द लाभले असून त्या सादरीकरणासाठी देखील पोषक आहेत, असे विचार ज्येष्ठ नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी व्यक्त केले.
सिग्नेट प्रकाशनतर्फे डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘गजानना तू’ या कविता संग्रहाचे आणि ‘कबीर वाणी’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी (दि. ३१) स्मिता महाजन आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महाजन बोलत होत्या. डॉ. जयेश रहाळकर मंचावर होते. डॉ. रहाळकर्स हेल्थकेअर अँड प्रेगकेअर, कोथरूड येथे कार्यक्रम झाला.
स्मिता महाजन पुढे म्हणाल्या, डॉ. ज्योती रहाळकर यांचे व्यक्तिमत्व अत्यंत गुणी असून त्यांच्या मनात येणारे तरल, संवेदनाक्षम विचार त्या कवितेतून प्रकट करीत असतात.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, स्वत:ला आनंदीत ठेवण्यासाठी तसेच वेगळेपण दर्शविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सतत काहीतरी कर्म करत राहणे आवश्यक आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांची बैठक वाङ्‌मयीन विचारांची व अभ्यासाची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे.
लेखनाविषयी बोलताना डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, मी गेली अनेक वर्षे प्रसंगानुरूप काव्य करत आहे. माझ्या हातून अनेक पुस्तकांचे अनुवाद घडले आहेत. गणेशोत्सवानिमित्त मी केलेल्या गणेशावरील कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्याचा योग जुळून आला आहे. मला आजेसासुबाईंचा लाभलेला मऊ सहवास स्मरणात ठेवून त्यांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पण करीत आहे.
सुरुवातीस ऋचा खरे यांनी भरतनाट्यम्‌ नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या डॉ. सानिका मोडक यांचा विशेष सत्कार स्मिता महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुजा रहाळकर यांनी केले तर आभार डॉ. जयेश रहाळकर यांनी मानले.

खराडीमध्ये मार्वल सिट्रिन या उच्चभ्रु सोसायटीमध्ये संग्तानी व कक्कर यांच्या जुगार अड्ड्यावर छापा -२६ जणांना पकडले

पुणे- खराडीमध्ये मार्वल सिट्रिन या उच्चभ्रु सोसायटीत लपून छपून चालणा-या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी 24 जुगाऱ्यांना पकडले .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वल सिट्रिन या उच्चभ्रु सोसायटीमध्ये एका बंद फ्लॅटमध्ये अवैधरित्या पोकर हा जुगार चालू असल्याबाबतची माहिती खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना प्राप्त झाल्यानंतर दि ३०/०८/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय चव्हाण व त्यांचे पथकातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, व तपास पथक यांनी मार्वल सिट्रिन सोसायटीमधील फ्लॅट क्र से १२०२ सातव वस्ती खराडी, पुणे या ठिकाणी पंचासमक्ष जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन मोठे टेबल त्यापैकी एका टेबल वरती १२ इसम समोरा समोर खुर्ध्यावरती तर दुस-याटेबल वरती १२ इसम समोरा समोर खुर्ध्यावरती बसलेल्या अवस्थेत प्रत्येकाचे हातातध्ये प्लेईंग कार्ड (पत्ते) तर त्यांचे समोरील टेबलावरती कॉईन त्यावरती आकडे असलेले कॉईन तसेच प्लेइंग कार्डचे बॉक्स असा सामान ठेवलेल्या अवस्थेत पोकर हा जुगार खेळताना एकुण २४ जण मिळून आले तसेच सदर सदानिका जुगाराचा अड्डा चालविणेसाठी वापर करून पोकर हा जुगार खेळ बेकायदेशीररित्या, विनापरवाना चालवून जुगारासाठी वापरण्यासाठी श्लोक संजय संग्तानी वय २९ वर्षे रा. सातववस्ती खराडी पुणे २) सिध्दांत संजीव कक्कर वय ३५ वर्षे यांनी दिला म्हणुन इतर एकुण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले.
सदर ठिकाणी जुगार खेळणारे वर यांचे हातामध्ये चौकट, इस्पिक , बदाम व किल्व्हर असे पत्ते व समोरील पुढयात वेगवेगळ्या रंगाचे कॉईन/चिप्स त्यावर पोकर असे असे इंग्रजीत लिहीलेले मिळुन आले. ६००/- रू. कि.चे प्लेइंग कार्डचे (पत्ते) ६ जम्बो कार्डस , ६५००/- रू. रोख रक्कम , ४०,०००/- रू कि.चा एक आयफोन-१२ काळया रंगाचा मोबाईल ३०,०००/- रू. कि.चा अशा एकूण ७७,१००/- रु.कि.चे मुद्देमालासह मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र १८९ / २०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ अन्वये दि ३०/०८/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे, व पोलीस उप निरीक्षक श्री गणेश घुले, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, जयवंत श्रीरामे, विकास केदारी, महिला अंमलदार श्रीमती वर्षा कडीले यांनी केली.

ऑल इंडिया मुशायरा रंगला फेस्टिव्हलमध्ये

पुणे- विज्ञान, उद्योग व तंत्रज्ञानासोबतच भाषेच्या आधारेच “मानवी सभ्यता” घडली आहे. भाषा ही ओळख निर्माण करते, संस्कृतीला जोपासते आणि काव्य हे परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे.” पुणे फेस्टिव्हल सारख्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवात मुशायराच्या माध्यमातून एकोपा जोपासला जातो हे मी खूप महत्वाचे मानते असे उदगार राज्यसभेच्या खासदार व महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या सदस्या  डॉ. फौजिया खान यांनी  काढले. ३७व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये आयोजित ऑल इंडिया मुशायराचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. रात्री उशिरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती.

एम. सी. ई. सोसायटीच्या डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये ऑल इंडिया मुशायरा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. गेल्या ३७ वर्षांपासून सलगपणे साजरा होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डॉ. पी. ए. इनामदार आणि सौ. आबिदा इनामदार यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. उर्दू मुशायरा हा या फेस्टिव्हलचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

माजी गृह राज्यमंत्री  रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड,कृष्णकुमार गोयल,सतीश देसाई या प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा व परस्पर प्रेमाचा संदेश देणे हा आहे. यामुळे पुणे शहरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम राखले गेले आहे. गेली २७ वर्ष आम्ही या मुशायराचे आयोजन करीत आहोत असे ऑल इंडिया मुशायराच्या निमंत्रक   सौ. आबिदा इनामदार यांनी सांगितले.  

देशभरातील नामवंत शायरांनी या मुशायऱ्यात आपली गझल व कविता सादर करून रंगत आणली. हा मुशायरा न्यूज 24 चॅनेल, तसेच आझम कॅम्पसच्या फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूबवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला. मुख्य अतिथी डॉ. फौजिया खान यांची ओळख श्री. अब्दुल हमीद इनामदार (विश्वस्त, हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्ट) यांनी करून दिली.

ऑल इंडिया मुशायरात गोविंद गुलशन (गाझियाबाद), इरशाद अंजुम (मालेगाव), आरिफ सैफी (हैदराबाद), निकहत अमरोही (अमरोहा), सज्जाद झंझट (उत्तराखंड), मेहक कैरान्वी (हैदराबाद), जुबेर अली ताबिश (जळगाव), डॉ. इफ्तेखार शकील (रायचूर), अब्बास कमर (दिल्ली), कलीम जावेद (उत्तर प्रदेश) आणि स्थानिक शायर हिसामुद्दीन शोला (पुणे) आदींचा समावेश होता.

डॉ. इफ्तेखार शकील यांनी डॉ. पी. ए. इनामदार यांच्या सन्मानार्थ एक विशेष कविता सादर केली.
 

मुशायऱ्याचा समारोप मनमोहक शायरीने झाला.

“जंगल से न दुनिया में किसी टापू से आये हैं
ज़मीन की गोद में हम अर्श की पहलू से आये हैं
हमें रोज़ी तो हिन्दी और अंग्रेज़ी ने दी बेशक!
मगर आदाब जीने के हमें उर्दू से आये हैं”

“जिस तरह चाँद सितारों में नज़र आता है
मेरा महबूब हज़ारों में नज़र आता है

सब में होता नहीं क़ुर्बानी का जज़्बा
ये तो बस इश्क़ के मारों से नज़र आता है ”

“जो हलाल रिज़्क है वो निवाले चूम लो
छोड़ दो सारे अंधेरे उजाले चूम लो

कर रहे हैं आप के राहों को रोशन ये चराग़
जाओ अपने बाप के हाथों को चूम लो

सौदा पुरानी ज़िन्दगी का आसान कर दिया
जो बिक नहीं रहा था उसे दान कर दिया

पूरी ग़ज़ल का लुत्फ़ उठा ही नहीं सके
मतले ने इस क़दर हमें हैरान कर दिया”


डॉ. मोहम्मद सलीम अब्दुर्रहमान लाहोरी (कुलगुरू, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ) यांनी शायरांचा सन्मान करून त्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अजमत दलाल यांनी पुणे फेस्टिव्हलमधील ऑल इंडिया मुशायराचे संयोजक डॉ. पी. ए. इनामदार  आणि निमंत्रक  सौ. आबिदा इनामदार,  कृष्णकुमार गोयल, ॲड. अभय छाजेड, रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई यांचे आभार मानले. तसेच आझम कॅम्पसचे शिक्षकवृंद, तांत्रिक सहकारी आणि सर्व आयोजकांचे विशेष कौतुक केले.

नृत्य-संगीताच्या बहारदार मेजवानी ने पुणेकर मंत्रमुग्ध

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स पुणे च्या वतीने पुणे फेस्टिवल मध्ये आविष्कार भारती  कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे ः भक्तिरसाने नटलेले अभंग, ठुमरीच्या माधुर्यात गुंफलेली शब्दांची आणि संगीताची सुरेल मेजवानी, तर गझलेतील कोमल शृंगाराचा सुरेल आविष्कार…रसिकांना भुरळ घालणारे नाट्यसंगीत आणि यासोबतच भरतनाट्यम, कथक आणि सत्रिय नृत्याच्या मोहक सादरीकरणाने  पुणेकर मंत्रमुग्ध झाले. नृत्य व संगीताच्या या अद्वितीय कलाविष्कारातून रसिकांनी एक आगळावेगळा कलोत्सव अनुभवला. कार्यक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स चे संचालक  प्रा. शारंगधर साठे यांचे होते.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट पुणे आयोजित आविष्कार भारती या कार्यक्रमाचे सादरीकरण बालगंधर्व येथे सुरू असलेल्या ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये झाले. यावेळी स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्टचे विद्यार्थी श्रृती विश्वकर्मा -मराठे, भाग्येश मराठे, नागेश आडगावकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. तर स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींनी नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड  , मोहन टिल्लू, डॉ प्रवीण कासलीकर, डॉ. देविका बोरठाकूर हे उपस्थित होते. विनायक कुडाळकर, ऋषिकेश जगताप (तबला),  स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम), स्वप्निल सूर्यवंशी (पखवाज), ओंकार ओजागरे (कीबोर्ड ) यांनी साथसंगत केली. 

‘गणपत विघ्न हरण गजानन’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मंदारमाला या नाटकातील ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही तोडी रागावर आधारित बंदिशीने रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. ‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’, ‘आओगे जब तुम ओ सजना’ या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचा मध्यांतर ‘युवती मना’  या गीताने झाला. त्यानंतर कथक, भरतनाट्यम, मोहिनीहट्टमआणि सत्रिय नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचे  शिखर गाठले. 

देशी झाडांचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्तांना दिले देशी झाडांचे प्रसादरुपी बीजगोळे


पुणे : पूर्व भागातील कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने वेगळा उपक्रम राबवत गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे बीज गोळे दिले. यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी देशी झाडांचे रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचे महत्त्व पटवून दिले.

मंडळातर्फे १ हजार हून अधिक बीज गोळे आणि देशी झाडांच्या बिया गणेश भक्तांना देण्यात आले आहेत. यावेळी राजेश होनराव, वनेश गोरले, अभिजित मानकर, दिपक कोंढरे, बाबा सट्टे, सुयश भगत, योगेश येनपुरे, धनराज राठी, ऍड.उमेश झाडे, बंटी मोटे, संजय धांडे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष राजेश होनराव म्हणाले, सध्या  देशी झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. शोभेची झाडे लावली जातात; पण पिंपळ, वड, आंबा, बाभूळ, कडुलिंब, चिंच यांसारखी उपयुक्त देशी झाडे सहसा कोणी लावत नाही. ही झाडे केवळ सावली, ऑक्सिजन आणि औषधी गुणधर्मासाठीच नव्हे तर पक्षी व प्राण्यांसाठीही उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे देशी झाडांचे बीज गोळे देण्यात आले आहेत.

पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही

पुणे-मुंबई येथील काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे गाडीत बसल्यावर त्यांच्या गाडीवर पण्याच्या बॉटल फेकल्याची घटना घडली. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे.पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही अशी वक्तव्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना केली आहेत .

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असताना सुद्धा सत्तास्थानी नसणाऱ्या 85 वर्षाच्या पवारांनी आपले प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा जर पवारांकडूनच केली जात असेल तर याचा अर्थ फडणवीस यांचा नाकर्तेपणा अधिक सिद्ध करणारी आणि 85 व्या वर्षी सुद्धा पवारांकडून अपेक्षा सकारात्मकता दाखवणारी आहे. खरेतर या आंदोलन स्थळी सत्तेत असलेले एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जायला हवे, मात्र या आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. अशावेळी आपल्या भावंडांची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे तिथे पोचत असतील तर हे स्वागतार्ह आहे.सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी गेल्या असता काही लोकांनी त्यांना घेराव घातल्याची बातमी मोठी करून दाखवली जात आहे. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली “पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले” अशी ही एक बातमी दाखवली जात आहे. खरंतर मी पवारांची अनेक वर्ष टीकाकार राहिले आहे. मात्र पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. महाराष्ट्रात संस्थात्मक काम उभा करण्यामध्ये पवारांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सहकार क्षेत्राचे कार्य जाळे पवारामुळेच महाराष्ट्रात गावा खेड्या पर्यंत पोहोचू शकले.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या मराठा समुदायाच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, ऑइल मिल, डाळ मिल, पेपर मिल, दूध डेरी हे उभे करण्यात नक्कीच पवारांचे योगदान आहे. आज घडीला भाजपने ज्या अनेक नेत्यांना मांडीवर घेतले आहे हे नेते सुद्धा पवारांनीच उभे केले आहेत. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आणून भाजपासोबत सत्तेत बसलेले अजित पवार हे शरद पवारांनीच घडवलेले आहेत. अजित पवारांना राजकारणात तयार करणे म्हणजे मराठ्यांचे वाटोळे करणे असे असेल तर मग अजित पवारांच्या सत्तास्थानी असल्याचे लाभ घेणारे सगळे कोण आहेत ते एकदा शोधले पाहिजेत.

मराठा आरक्षणाची मागणी पवारांच्या ऐन उमेदीच्या काळात कधीही झाली नाही. या मागणीने जोर धरला तो साधारण 1992 नंतर. पण तोपर्यंत पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. आणि या पक्षाची केंद्रात कधीही सत्ता आली नाही. इतरांच्या मदतीने केंद्रातल्या सत्तेचे एखादे पद नक्की मिळालेले असेल. मात्र संपूर्ण पक्षाची अशी सत्ता केंद्रात कधीही मिळाली नाही, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 1995 ते 2005 या काळामध्ये विविध मराठा संघटनांची आरक्षणांवर चर्चा आणि बैठका जेव्हा सुरू झाल्या विशेषतः संभाजीनगर येथे क्रांती सेनेच्या शालिनी पाटील, मराठा संग्रामचे विनायक मेटे, छावाचे अण्णा जावळे किंवा अनेक संघटना जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्या मंचावर शरद पवारही होते. पण तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा सुरू झाली होती. आरक्षणाची जी आजची मागणी आहे ती ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे आणि ही मागणी एका तांत्रिक पेचात अडकलेली आहे.

50 टक्के पेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या फेरबदल करण्याची क्षमता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाशी समक्ष असणारी दुसरी संस्था म्हणजे संसदेची. संसदेत सत्ता पवारांची नाही तर ती भाजपाची आहे. मग तरीसुद्धा सुप्रिया सुळेंना घेराव का घातला जावा? तर याचे उत्तर सोपे आहे. आपल्याला भूक लागली तर आपण शेजाऱ्यावर चिडचिड करत नाही आपल्या घरातल्या आई किंवा बाबाकडे हक्काने मागतो, असे अंधारे यांनी म्हटले.

गेल्या तीन दिवसांपासून मराठ्यांची अन्ना-पाण्याची रसद फडणवीस यांनी तोडली. आझाद मैदानावरची वीज बंद ठेवली. तरीही मराठी लढत आहेत. अशावेळी आपल्या संयमाचा बांध फुटला तर आपली सगळी भडास निश्चितच आपल्याच माणसांवर निघेल. संसदेत आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार भूमिका मांडणाऱ्या सुप्रिया सुळे या अर्थाने जर त्यांना आपली हक्काची बहीण वाटत असेल तर हे अत्यंत सकारात्मक आहे.

अजित पवार सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारे उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर फक्त शरद पवार यांच्या हस्तेच झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने उरुळी ग्रामपंचायतीचे कामकाज साकारण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी उपस्थित राहावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तसेच, नवीन महानगरपालिका उभारण्याच्या प्रक्रियेत उरुळी कांचनचा समावेश होणार आहे. गावासाठी अनेक प्रस्ताव अजित पवार यांनी केले आहेत. यापूर्वी उरुळी कांचनमधील शाळा, रस्ते आणि इतर विकासकामे शरद पवार यांच्या हस्तेच झालेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार आणि अजित पवार यांच्या संयुक्त हस्ते व्हावे, अशी मागणी केली होती. परंतु गेल्या अनेक कार्यक्रमांत अजित पवार, शरद पवारांसोबत मंचावर येणं टाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही शरद पवारांच्या शेजारी बसणं अजित पवार टाळत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दोघे एकत्र आल्यावर नेहमीच राजकीय चर्चांना उधाण येते.दरम्यान, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणता निकाल लागतो किंवा मनोज जरांगे यांना काय दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरसकट कुणबी संबोधण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे, मात्र मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या मागणीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही न्यायालयांचे निकाल हा या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. हा पेच सोडवण्यासाठी उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावली आहे.

यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांमुळे ‘सरसकट कुणबी’ असा उल्लेख करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी उपसमितीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीनंतर नेमका कोणता तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिले प्रकरण

जगन्नाथ होले यांनी बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या 2001 च्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याने हा वाद सुरू झाला. यावर दाद न मिळाल्याने होले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

17 ऑक्टोबर 2003 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एच. मार्लापल्ले आणि ए.एस. बग्गा यांच्या खंडपीठाने निकाल दिला. या निकालातील परिच्छेद 17 मध्ये नमूद केले आहे की, जर हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले, तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल, जे एक ‘सामाजिक मूर्खपणा’ ठरेल.

या निर्णयाविरोधात बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतु, 15 एप्रिल 2005 रोजी न्यायमूर्ती बी.एन. अग्रवाल आणि पी.के. बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि चव्हाण यांची याचिका फेटाळून लावली.

दुसरे प्रकरण

सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या आणखी एका प्रकरणातही उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. 6 ऑक्टोबर 2002 रोजी न्यायमूर्ती मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती एन. व्ही. दाभोळकर यांच्या खंडपीठाने यावर निकाल देताना परिच्छेद 46 मध्ये म्हटले की, जर जात पडताळणी समितीकडे मांडलेली भूमिका स्वीकारली, तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल.

न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केले की, असे केल्यास ते महाराष्ट्रातील ‘वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या’ विरोधात जाईल. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालांनुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, हाच सध्या सरकारपुढील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.

सुप्रिया सुळेंना नेमके घेरलं कोणी ? शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली,मुंबई पोलीस सतर्क..

मुंबई- जरांगेंना भेटून परत जाताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. या घटनेनंतर आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलीस आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी मनोज जरांगे यांची भेट घेऊन येत आहेत. पण सुप्रिया सुळे यांनाच अशाप्रकारे वागणूक का दिली गेली? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांची कुमक आझाद मैदानात आहेच, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.दरम्यान, आझाद मैदानात आता गर्दी वाढताना दिसत आहे. राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहे. आंदोलनासाठी आलेले आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी फिरताना देखील बघायला मिळत आहेत. अनेक आंदोलक मरीन ड्राईव्ह परिसरात बघायला मिळाले. विशेष म्हणजे काही जण थेट समुद्रात उतरलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समुद्राच्या बाहेर काढलं. समुद्रापासून लांब उभं राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून आंदोलकांच्या सुरक्षेसाठी देखील सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती…

पुणे : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, सोमवार १ सप्टेंबर, मंगळवार २ सप्टेंबर, बुधवार ३ सप्टेंबर, गुरुवार ४ सप्टेंबर, शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली होती.मात्र आता त्यात दुरुस्ती करण्यात आली असून दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत सन २०२५ मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश क्र. पगक/कावि/२५८/२०२५ दि. १८ ऑगस्ट २०२५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हांडाधिकारी, पुणे जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

शरद पवार राजकीय पोळी भाजत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

mumbai मराठा आरक्षणाचा प्रश्नाबाबत जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर उपसमितीने चर्चा केली असून,यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत.सरकारला प्रश्न सोडवायचा आहे,मात्र महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधान करीत आहे. घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात मंत्री असताना गप्प का बसले? असा सवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला मंत्री गिरीष महाजन मंत्री, दादा भुसे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तसेच अन्य मंत्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमिती काम करीत असून, काल त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत चर्चा सकारत्मक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबाद आणि सातारा गॅजेटिअर बाबत विस्ताराने आजच्या बैठकीत चर्चा झाली. यातील त्रृटी विचारात घेवून अंमलबजावणी करताना कायदेशीर अडचणी येवू नयेत म्हणून राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

काल बीड जिल्ह्यातील आमदारांनी भेट घेवून केलेल्या मागण्यांबाबत विचार करू, समितीकडे अशा अनेक सूचना येत असतात, त्याचे स्वागत करून समितीचे सदस्य विचारही करीत असल्याचे विखे पाटील सांगितले.

जरांगे पाटील यांना कोणी भेटायला जावे यावर आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. मात्र जे फक्त या विषयाचे राजकारण करून पोळी भाजण्यासाठी येत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांना जरांगे पाटलांनी कधीतरी प्रश्न विचारून आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली पाहिजे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

शरद पवारांनी ज्ञानदानाचे काम करू नये

शरद पवार यांनी घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना मंडल आयोग स्थापन करण्यापूर्वी हे लक्षात का आले नाही. त्याचवेळी मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये करण्याचे का सुचले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही. दहा वर्ष केंद्रात मंत्री राहिले तेव्हा जबाबदारी पूर्ण केली नसल्याचा थेट आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देता येते किंवा देवू नये यावर कधी तरी त्यांनी भाष्य केले पाहिजे उगाच ज्ञानदानाचे काम करू नये, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.