Home Blog Page 146

शाश्वत भविष्यासाठी एआयचा वापर करावाअभिजित अटले यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘एचएसडब्ल्यू टेक-२०२५ परिषदेचे’ उद्घाटन

पुणे, ३ सप्टेंबरः” हवामान अनुकरण, हवेची गुणवत्ता, त्याची देखरेख, अचूक शेती आणि ऊर्जा ऑप्टिमायझेशनमधील अनुप्रयोगद्वारा एआय हा शाश्वतेला पुढे नेत आहे .त्यामुळे या संधीचा लाभ घेतांना एआयच्या नैतिक आव्हानाबद्दल सावधगिरी बाळगावी. शाश्वत भविष्यासाठी एआय वापरासाठी नाविन्यपूर्ण परंतु जबाबदार मार्गांची कल्पना करणे गरजेचे आहे. तसेच डेटा संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे.” असे विचार आयबीएमचे लिड क्लाइंट पार्टनर अभिजित अटले यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग विभागाच्या वतीने ‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबिलिटी टेक्नॉलॉजी फॉर ह्यूमिनिटी अ‍ॅण्ड स्मार्ट वर्ल्ड’ (एचएसडब्ल्यू टेक-२०२५) या विषयावर आयोजित तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. सुब्रा कांती दास, आईईआई पुणे विभागाचे सचिव डॉ. अभिजित खुरापे, ब्रॉडकॉचे वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक सुनील खराटे हे उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत काळे, अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एमआयटी डब्ल्यूपीयू आणि तांत्रिक कार्यक्रम समितीचे वरिष्ठ प्रा. डॉ. भरत चौधरी, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाच्या कार्यक्रम संचालक डॉ. पारूल जाधव व प्रा. डॉ. सुनिल सोमाणी उपस्थित होत्या.
सुनील खराटे यांनी, तंत्रज्ञान आणि सोशल डिझाइनमधील नवीनतम प्रगतीवर एक आकर्षक विचार मांडले. सेमीकंडक्टर स्केलिंग कामगिरी, कार्यक्षमता आणि एकत्रीकरण कसे चालवते हे स्पष्ट केले. डिझाइन, पडताळणी आणि ऑप्टिमायझेशनमधील आव्हानांवर प्रकाश टाकला. आयओटी, ५जी, आरई सर्किट डिझाइनच्या वाढत्या भूमिकेवर भर देऊन चिप इनोव्हेशनला चालना देण्यात ब्रॉडकॉमच्या नेतृत्वाची भूमिका सामायिक केली. सेमीकंडक्अर डिझाइनमध्ये एआय आणि ऑटोमेशनचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगितले.
एलटीआय माइंडट्रीचे उपाध्यक्ष आणि जागतिक वितरण प्रमुख निखिल दातार यांनी ग्रीन एआय आणि तंत्रज्ञानाचे अध्यात्माशी एकत्रीकरण यावर भाष्य केले. नवोपक्रमाला चालना देताना ऊर्जेचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर शाश्वत एआय पद्धतींच्या गरजेवर अधिक भर दिला.
डॉ. सुब्रा कांती दास यांनी भविष्य निर्मितीसाठी एआयचा वापर किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो यावर भाष्य केले. त्यांनतर डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. भरत काळे, डॉ. भरत चौधरी, डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी शाश्वत उपयांना दैनदिंन जीवनामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. अक्षय ऊर्जा प्रणाली, स्मार्ट ग्रिड, एआय चलित हवामान मॉडेलिंग, आयओटी आधारित अचूक शेती आणि हरित साहित्य ही पर्यावरणीय प्रणाली नाजूक राहिल्यास विज्ञान आणि इंजिनियरिंग कशी लवचिकता मजबूत करू शकते यावर भाष्य केले.
डॉ. पारुल जाधव यांनी प्रस्तावनेत परिषदेच्या माध्यमातून नवीन कल्पनांवर केवळ चर्चा केली जाणार नाही तर त्याला बळकटी देऊ. याचा उपयोग मानवतेसाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या आयईईच्या दृष्टिकोनात योगदान देऊ शकतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सुनिल सोमाणी यांनी केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. गिरीश बापट यांच्या जयंती कार्यक्रमात उपस्थित राहून वाहिली आदरांजली

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२५ : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वर्गीय गिरीशजी बापट यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड, शिवाजीनगर येथे पार पडला. यावेळी पत्नी गिरीजा बापट, सून स्वरदा बापट, मुलगा गौरव बापट हे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी स्व. बापट यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “गिरीशजी बापट हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिले. त्यांची कार्यशैली, साधेपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, “त्यांच्या कार्यातून समाजसेवेचा नवा आदर्श पुढे आला. त्यांनी राजकारण हे जनसेवेसाठीच असते हे दाखवून दिले.”

कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. गिरीशजी बापट यांना आदरांजली अर्पण केली.

‌‘नादब्रह्मांजली‌’तून उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांना मानवंदना

पुणे : तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे ‌‘नादब्रह्मांजली‌’ या गायन-वादनाच्या कार्यक्रमातून सांगितीक मानवंदना अर्पण करण्यात आली.
गोखलेनगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सलीम अख्तर यांचे शिष्य देवेंद्र भावे यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीन तालमध्ये पेशकार, कायदे, रेले सादर केला. त्यानंतर पेशकार आणि द्रुतलयीत गत आणि चक्रदार सादर केले.
विश्वास जाधव यांचे शिष्य जितेश झंवर यांनी आपल्या तबला वादनाची सुरुवात तीन ताल सादर करून केली. यात तुकडे, कायदे, रेले तसेच उ. अमीर हुसैन खाँ, उस्ताद जहाँगीर खाँ यांच्या रचना प्रभावीपणे सादर केल्या.
उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांची शिष्या युवा व्हायोलिनवादक श्रुती राऊत हिच्या वादनाने मैफलीत रंग भरले. तिने आपल्या वादनाची सुरुवात पुरिया धनाश्री या रागाने केली. ‌‘पायलिया झंकार मोरी‌’ या तीन तालातील रचनेने सादरीकरणाची सांगता केली.
मैफलीचा कळसाध्याय ठरले ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अर्शद अली खान यांचे सादरीकरण. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात पुरिया कल्याणमधील विलंबित तालातील ‌‘आज सोबन‌’ या रचनेने केली. त्यानंतर द्रुत तराणा ऐकविला. ‌‘कारी बदरिया छायी‌’ ही गौड मल्हार रागातील बंदिश सादर केल्यानंतर ‌‘मोरे आए कुंवर कन्हाई‌’ ही बंदिश ऐकविली.
कलाकारांना सलीम अख्तर (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा कुरेशी यांनी केले.

“जुळ्यांचा क्लब” स्थापन करणार

पुणे-“आजवर मी अनेक संमेलने अनुभवली, परंतु जुळ्यांचे संमेलन हा माझ्यासाठी आगळावेगळा आणि विलक्षण अनुभव आहे. या संमेलनातून संविधानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला जात आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन हा अभिनव उपक्रम मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला. या अनोख्या कार्यक्रमात १२५ हून अधिक जुळ्यांची नोंदणी झाली होती, तर ५० हून अधिक जुळ्या जोड्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. मंचावर लव कुश यांचे भव्य चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमात “जुळ्यांचा क्लब स्थापन करीत असल्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडात करून प्रतिसाद दिला. बालगंधर्व रंगमंदिर पालक व प्रेक्षकांनी खाचाखच भरले होते.

कार्यक्रमाला माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. केरळमधील ‘जगाची जुळ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना या विशेष निमंत्रित होत्या. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी  मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, बालगंधर्व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू व बाबू नायर उपस्थित होते.

बालगंधर्व येथे रॅम्बो सर्कसचे विदूषकांनी जुळ्यांचे अनोखे स्वागत करून वातावरण रंगवले. तसेच सर्वांना आग्रहाने नाष्टा दिला. या संमेलनात जगभरातील जुळ्यांवरील माहितीपट, राम और शाम जुडवा दो कालिया अशी जुळ्यांवरील चित्रपटातील गाण्यांची चित्रफित आणि  कोडीन्ही गावाची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आल्या. या फिल्म्स माध्यम समितीच्या श्रुती तिवारी, मधुरा नातू वर्धे, सागर बाबर, रोहिणी अद्वैत  तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी केल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या जुळ्या बहिणी पुष्पा देसाई आणि स्नेहलता आठलेकर यांचा विशेष सत्कार पुणे फेस्टिव्हल तर्फे साडी व पेढे देऊन करण्यात आला. जुळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पद्मजा जोशी आणि तनुजा जावडेकर या हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या बहिणींनी मनोगत व्यक्त करताना अनेक गमतीशीर आठवणी सांगितल्या.या संमेलनासाठी आलेली अनेक लहान जुळी मुलं विदुशकांसमवेत मनसोक्त खेळली. या विदुशकांसमवेत पालकांनी जुळ्यांचे फोटो काढून घेतले तसेच मोठ्या जुळ्या भावंडांनी देखील विदुशकांसमवेत फोटो काढण्याचा आनंद लुटला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना कोडिन्ही गावाच्या सरपंच तसलीना म्हणाल्या, “केरळमधील कोडिन्ही गाव जगभरात जुळ्या जन्मांसाठी प्रसिद्ध आहे. यामागील वैज्ञानिक कारण आजवर स्पष्ट झालेले नाही. १९४९ मध्ये पहिला जुळा जन्म नोंदवला गेला, त्यानंतर यावर अनेक संशोधन झाले, मात्र ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत.”

अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “जगभरात पुणे फेस्टिव्हलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक घटकाला आपलंसं करणारे आणि जनजागृती वाढवणारे हे फेस्टिव्हल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.”

वैद्यकीय व ज्योतिषीय अंगानेही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. अरुण गद्रे यांनी “जुळी होण्याची वैद्यकीय कारणमीमांसा”, डॉ. मिलिंद दुगड यांनी “जुळ्यांच्या संगोपनात घ्यावयाची काळजी” आणि ज्योतिषतज्ज्ञ आभा करंदीकर यांनी “जुळ्यांचे भविष्य वेगळे का?” या विषयांवर आपले विचार मांडले.

डॉ. गद्रे यांनी जुळ्या गर्भधारणेत वाढलेल्या ताणतणावाविषयी पालकांना जागरूक केले ते म्हणाले की जुळ्यांच्या बाळंतपणाच्या काळात रक्तदाब व मधुमेह यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते असे सांगितले,  डॉ. दुगड यांनी “गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून नियमित तपासणी आवश्यक असून जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे,” असे सांगितले. ते म्हणाले की मुलं मुलींची लग्नाची वय वाढत आहेत तसेच प्लानिंग मुले बलाचा जन्म देखील लांबवली जात आहे हे योग्य नाही. ज्योतिषा आभा करंदीकर यांनी जुळ्या मुलांचे भविष्य आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करताना ज्योतिष शास्त्राच्या मर्यादा अधोरेखित केल्या.

या कार्यक्रमाची संकल्पना पुणे फेस्टिव्हलचे माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे यांची होती. केरळच्या कोडिन्हीच्या सरपंच श्रीमती तसलीना आणि थबशीर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पुणे फेस्टिव्हल व माध्यम समितीचा विशेष गोरव केला. प्रवीण प्र वाळिंबे यांनी प्रास्ताविकात पुणे फेस्टिव्हलच्या ३७ वर्षांच्या परंपरेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन नीलिमा बोरवणकर यांनी केले, तर श्रुती तिवारी यांनी आभार मानले. श्रीकांत कांबळे व अतुल गोंजारी यांनी व्यवस्थापन पाहिले.

महिला या उत्तम व्यवस्थापन गुरु-ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे

 मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे:  ‘बांगड्या भरल्यात का?’ असे पूर्वी पुरुषांबाबत म्हटले जायचे. तो समज खोडून काढणाऱ्या आणि बांगड्या नसतानाही मनगटांमध्ये किती सामर्थ्य आहे हे सिद्ध करणाऱ्या महिला आज आपल्या समोर आहेत. महिला या उत्तम व्यवस्थापन गुरू आहेत. असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तुळशीबाग गणपती उत्सवमंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या विश्वस्त अभिनेत्री वाळके, अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते.

मुक्ताबाई नाटिकेच्या क्षेत्रात सलग ३० वर्षे योगदान तसेच आयुर्वेदिक वैद्यकात कार्यरत डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी,  वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली भागवत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा पुणतांबेकर, सुर्यदत्ता संस्थेच्या संस्थापक सुषमा चोरडिया, पत्रकार अंजली खमितकर यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, केवळ स्वतःपुरते न बघता. वैश्विक दृष्टिकोन ठेऊन काम करणाऱ्या महिलांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंडळाने केला. स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी सत्याग्रही स्त्रिया बाहेर आल्या, लढा दिला. आपल्या कार्याचा गाजावाजा करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जाणीव नाही असा नाही; हीच जाणीव आज पुरुषांनी पुढे आणली आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला.

नितीन पंडित म्हणाले, गणेशोत्सवात प्रामुख्याने पुरुष हे मोठ्या संख्येने मंडळांमध्ये कार्यरत असतात. तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवात दरवर्षी एक दिवस महिला उत्सवाचे नियोजन करतात आणि सर्व कामकाज पाहतात.  याच दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांचे असामान्य कार्य समाजापुढे पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून आणले जाते, असेही त्यांनी सांगितले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड’

0

मुंबई, दि. ०३ सप्टेंबर २०२५: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन चालू असून त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे हा सन्मान झाला आहे. महावितरणच्या कामगिरीत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या पुरस्काराचे श्रेय महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे, असे मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले. 

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे प्रमुख पाब्लो स्टॅन्ले व अध्यक्ष हेन्री आर. यांच्या स्वाक्षरीने मा. लोकेश चंद्र यांना पुरस्कारस्वरूप प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ही इंग्लंडमधील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे.

प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, ऊर्जा क्षेत्रातील असामान्य नेतृत्व, प्रशासनातील दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या वीजवितरण क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल मा. लोकेश चंद्र यांना एनर्जी लीडरशीप अॅवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्षमता, कल्पकता आणि सेवेबद्दलच्या समर्पित वृत्तीमुळे मा. लोकेश चंद्र यांनी अक्षय्य ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासोबतच लाखो नागरिकांना भरवाशाचा वीज पुरवठा करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

अक्षय्य ऊर्जेचा वापर करून वीजखरेदी खर्चात मोठी बचत करून वीजदरात कपात करण्याची ऐतिहासिक कामगिरी महावितरणने केली आहे. अशा प्रकारे वीजदरात कपात करणारी महावितरण ही देशातील पहिलीच सार्वजनिक वीज वितरण कंपनी आहे. पुढील पाच वर्षात वीज खरेदीमध्ये अक्षय्य ऊर्जेवर भर दिल्यामुळे महावितरणची सुमारे ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने पाच वर्षे वीजदरात कपात शक्य झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मा. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यावर ४५ लाख कृषी पंप चालविण्याची ही १६,००० मेगावॅट क्षमतेची गेम चेंजर योजना आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्यातील ग्राहकांनी नुकताच एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी महावितरण करत आहे. 

शेतकऱ्यांना हक्काची सिंचन व्यवस्था मिळण्यासाठी शेतात सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात सर्वाधिक पंप बसविले आहेत.

गडांचा राजा : राजगड

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.

प्राचीन इतिहास

आजचा राजगड किल्ला मुळात “मुरुंबदेव” या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला “राजगड” म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.

या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था

राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे, तर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.

किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी “नेढे” नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.

राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :

•पद्मावती माची – गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान, राणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.

•संजीवनी माची – पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

•सुवेळा माची – पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त, अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.

या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पाली, गुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.

गडाचे वैशिष्ट्य

राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटा, धान्यकोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.

सांस्कृतिक वारसा

आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्ये, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.

जागतिक ओळख

इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.

राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलात, तर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाही, तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहे, चला निघा “गडांच्या राजाला” भेट द्यायला!

संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई

पुणे जिल्ह्यातील 99 गाव आदिवासी बहुल ; 17420 कुटुंब पात्र लाभार्थी

पुणे, दि. ३ : आदिवासी समाजासाठी तळागाळातील नेतृत्व घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत पुणे जिल्ह्यात आज जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यात शासकीय अधिकारी आदिकर्म योगी असतील तर युवक नेतृत्व, शिक्षक, डॉक्टर्स आणि समाज सेवक हे आदि सहयोगी असतील. आदि साथी म्हणून आदिवासी नेते, स्वयं सेवक, बचत गटातील महिला कार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील 99 गावे आदिवासी बहुल असून यातील कुटुंब संख्या 17,420 एवढी आहे तर हीं लोकसंख्या 85 हजार 304 एवढी आहे. यासाठी आदिवासी नागरिकांमध्ये 17 विभागाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रत्येक गटा मध्ये 30 प्रशिक्षणार्थी तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून एकूण 9 अधिकारी असणार आहेत. त्यात प्रामुख्याने जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व सोनु कोतवाल, मोमीन अस्मा बेगम या दोन प्रशिक्षकांनी माहिती दिली.
या अभियानाचे मूलभूत मूल्ये सेवा, संकल्प आणि समर्पण ही असून देशभरात २० लाख “आदी कर्मयोगी” घडविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून १० लाख आदिवासी गावे, ५५० पेक्षा अधिक जिल्हे तसेच ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोच साधली जाणार आहे. एकूण १०.५ कोटी आदिवासी नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणे हा अभियानाचा उद्देश आहे.
अभियानात “आदी कर्मयोगी” म्हणजे शासकीय अधिकारी, “आदी सहयोगी” म्हणजे शिक्षक, डॉक्टर व व्यावसायिक मार्गदर्शक तर “आदी साथी” म्हणजे स्थानिक स्वयंसेवक, महिला बचतगट सदस्य आणि आदिवासी नेते अशी तीन स्तरांवरील कार्यकर्त्यांची संरचना करण्यात आली आहे.
या अभियानात शासन व आदिवासी समाजातील विश्वास दृढ करणे, सहभागी नियोजनाद्वारे सर्वसमावेशक विकास घडविणे तसेच दुर्गम भागांमध्ये शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविणे या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी शासनाच्या विविध राष्ट्रीय मोहीम व योजनांशी अभियानाचे एकत्रिकरण केले जाणार असून ग्रामदृष्टिकोन २०३० कृती आराखडे तयार केले जातील.
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव, आंबेगाव, खेड, मावळ, हवेली व पुरंदर तालुक्यातील ९९ गावे या अभियानात निवडण्यात आली आहेत. एकूण १७,४२० कुटुंबे व सुमारे ८५ हजार लोकसंख्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होणार आहे.

जिल्हास्तरीय उन्मुखीकरण कार्यशाळेनंतर ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान जिल्हा प्रक्रिया प्रयोगशाळा, १५ सप्टेंबरपासून तालुका कार्यशाळा आणि १८ सप्टेंबरपासून गावपातळीवरील कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. विशेष ग्रामसभेद्वारे २ ऑक्टोबर रोजी गाव कृती आराखड्यांना अंतिम मान्यता दिली जाईल.

या अभियानासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी “जिल्हा मास्टर ट्रेनर” म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ११५ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

पुणे, दि. ३ सप्टेंबर :
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मेळाव्यात अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ४४ विभागांतील एकूण १२६ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी प्रतिक्षा यादीतील १६५ उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ११५ उमेदवारांचा पसंतीक्रम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने संबंधित विभागांकडे नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. सर्व विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून या उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

मेळाव्यात तहसीलदार उमाकांत कडनोर, विविध विभागांचे प्रतिनिधी, तसेच अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार उपस्थित होते. यावेळी उमेदवारांना शासन निर्णय आणि अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना उत्कृष्ट ग्रंथालयीन सेवा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागातून निवडलेल्या उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाईल.
इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहीत मुदतीत तीन प्रतींमध्ये आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची गुणयादी पुन:श्च प्रसिद्ध

पुणे, दि. ३: ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५’ च्या निकालाची गुणयादी व गुणपत्रक उमेदवारांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर पुन:श्च उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांपैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी तर राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी. एल. एड. परीक्षेतील ६ हजार ३२० उमेदवारांपैकी २ हजार ७८९ उमेदवारांचा निकाल २८ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
0000

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा – अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर

▪️ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. ३ :
जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, अनुराधा भंडारे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अपघातांचा आढावा देताना श्री. बाविस्कर यांनी सांगितले की, वार्षिक ९०० पेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्त अपघाती भागांचा सर्वेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २३ जून २०२५ रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविल्या असून त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. हिंजेवाडी आणि चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व परिवहन विभागाने विशेष उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी हेल्मेट उपलब्ध करून देण्यासाठी वाहन विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही निर्देश श्री. बाविस्कर यांनी दिले. रस्ते सुरक्षा सुधारणा आणि अपघातांची नोंद करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या एकात्मिक रस्ते अपघात डेटाबेस (आयआरएडी) मध्ये वस्तुनिष्ठ माहिती भरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात येत्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीत श्रीमती अर्चना गायकवाड, श्री. संदेश चव्हाण व श्री. सुरेंद्र निकम यांनी ब्लॅकस्पॉट सर्वेक्षण व उपाययोजनांची माहिती दिली. तर श्री. संजय कदम यांनी महामार्गावरील उपाययोजनांचा आढावा सादर केला. सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी बारामती शहरात २७ जुलै रोजी झालेल्या अपघाताचे निरीक्षण व त्याअनुषंगाने आवश्यक उपाययोजना यावर सादरीकरण केले.
या बैठकीत एनएचआयटी संस्थेच्यावतीने रस्ते सुरक्षा नियमांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले साहित्य व प्रसिद्धीपत्रकाबाबत माहिती दिली.

राज्य शासनाचा पुढाकार: कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून निर्माण होतोय रोजगार

देशासह राज्यात वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्रोत लक्षात घेता देशात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी आणि विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींचा तरुण वयोगटातील उमेदवारांना लाभ घेता यावा, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्यादृष्टीने “कौशल्य विकास” कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून राष्ट्रीयस्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ संकल्पनेनुसार राज्य शासनाने “कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र” हे ध्येय समोर ठेवले आहे. यामाध्यमातून बेरोजगारांना रोजगारक्षम करणे, उद्योगांना प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या उद्देशाने बेरोजगार युवक-युवतींना, कामगार वर्गाला उद्योगधंद्यात लागणारी कौशल्य विकसित करण्याकरिता कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक-युवतींच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास आणि त्यामाध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. कुशल मनुष्यबळ असलेल्या क्षेत्रांमध्ये लागणारे मनुष्यबळ उपलब्धीकरिता बेरोजगार युवक-युवतींकरिता जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्यावतीने अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने समाजातील अनुसूचित जाती-जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्यांक आदी घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येत आहे. या प्रशिक्षण संस्थेद्वारे उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणाअंती उमेदवारांना विविध खाजगी आस्थापनांमध्ये ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ची सुविधा प्रशिक्षण संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्याउद्देशाने जिल्ह्यातील महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण ५० महाविद्यालये यामध्ये सहभागी असून त्यापैकी १३ महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ७५८ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत, ३० उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे तसेच प्रशिक्षण कालावधीत एकूण २४ उमेदवारांनी आंतरवासिता पूर्ण केली आहे.

ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरिता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे कामकाज करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ८७६ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत तर ९६७ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

युवकांनो, राज्य शासनाच्यावतीने रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने कौशल्य विकासाअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदी कौशल्य विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे आयोजनाच्यामाध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी सहाय्य करण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे तसेच कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा punerojgar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र :

  • सुरेश वराडे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास
    ‘कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या ध्येयानुसार तसेच सद्यस्थितीत कुशलतेला प्राप्त झालेल्या महत्त्वानुसार, जिल्ह्यातील रोजगार शोधक युवक-युवतींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक विविध योजना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेऊन आपली रोजगार क्षमता वाढवावी.’

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहात प्रवेश सुरु

पुणे, दि. ३: राज्य शासनाच्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या योजनेंतर्गत इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड यांनी केले आहे.

पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी योजनानिहाय वेळापत्रकानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गायकवाड यांनी केले आहे.

गणेश कला क्रीडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा

▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उदघाटन

पुणे, : पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ४ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कला क्रिडा, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेवून चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम असून त्याचे प्रमुख घटक सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे असे आहेत.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम पंचायत राज संस्थांच्या सामर्थ्यवर्धनासाठी, विविध योजनांचा समन्वय व अंमलबजावणीसाठी तसेच स्थानिक लोकांच्या सक्रिय सहभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे ग्रामीण भागातील विकासाला नवे बळ मिळेल.