Home Blog Page 145

भारताचा आत्मा खेड्यांत; खेडी सक्षम करण्यासाठी शासनाचा समृद्ध पंचायतराज उपक्रम

पुणे, दि. ४ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर , आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, माजी सनदी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह राज्यातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने येत्या १६ सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिनापासून पुढील १०० दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे प्रत्येक गावाने स्वतःचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. शासनाने या अभियानासाठी तब्बल २४५.२० कोटी रुपयांची बक्षीस योजना आखली आहे. यातून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील स्पर्धा होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. स्वच्छता, शाश्वत विकास, हरित उपक्रम, महिला व बालकांच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकार आदी निकषांवर गावांचे मूल्यमापन होईल.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेऊन चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम आहे. त्याचे प्रमुख घटक म्हणजे सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण साधणे, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणे, उपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे हे आहेत.

आज प्रत्येक गावाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. तो योग्य ठिकाणी खर्च करणे, गावांच्या गरजांनुसार प्राधान्य ठरविणे आणि कामांचा दर्जा उंचावणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. पारदर्शकतेसह जनतेच्या विश्वासास पात्र राहून ग्रामविकासाची कामे झाली पाहिजेत. प्रत्येक गावाने स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आदर्श ग्राम म्हणून घडविण्याची संधी या अभियानातून मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आणि १५० दिवसांचा डिजिटल सुधारणा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला. यातून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातूनही मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहेत, असे अजित पवार यांनी अधोरेखित केले.

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवूनच शासन कार्य करते. या अभियानातून गावं आणि त्या गावांतील सामान्य नागरिक डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची संधी सरपंच व ग्रामपंचायतींना मिळेल. काम केलेल्या लोकांनाच जनता स्मरणात ठेवते, त्यामुळे गावासाठी उत्तम काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, राज्यातील ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गतचा हिस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असून, तो लवकरच वितरित होईल, अशी माहितीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या कार्यशाळेचा उद्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविकातून सविस्तर मांडला. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेत पंचायतराज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे, निधीचा प्रभावी वापर आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकास यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहात विद्यार्थ्यांनींची गर्भतपासणी होत नाही आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी करू नका

पुणे, दि. 4 सप्टेंबर:: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्या अधिनस्त आश्रमशाळा व पुणे शहरातील वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यानींना प्रवेश घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करताना गर्भतपासणी (युपीटी टेस्ट) करावी लागते. ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्यानींची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयांचे वृत्त विविध प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत, याबाबत शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहात विद्यार्थ्यांनींची गर्भतपासणी होत नसल्याबाबत प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी खुलासा केला आहे.अशा वृत्तामुळे शासनाची पर्यांयाने आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी झाली आहे, असेही श्री. देसाई यांनी खुलासामध्ये नमूद केले आहे.

घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा व २४ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींकरिता ११ वसतिगृह आहेत. आदिवासी विकास विभागाच्या ११ नोव्हेंबर २०११ मधील परिशिष्ट-ड मधील मुद्दा क्र.५ अन्वये वसतीगृह प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी करण्यात यावी, इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि यामध्ये गर्भतपासणीबाबत कोणतेही निर्देश किंवा सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

या कार्यालयाचे पत्र क्र. शावगृ-२०२३-२४/प्र.क्र./का.३(६)६२०० दि. ३ सप्टेंबर २०२४ अन्वये पत्रातील परिशिष्ट ‘ड’ अनु क्रमांक ५ नुसार वस्तीगृह प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणेबाबत वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, औंध यांना देण्यात आलेल्या गर्भतपासणीबाबत कुठेही नमूद केलेले नाही.

गृहपाल,आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह वाकड यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, औंध यांना विद्यार्थ्यांची विनामुल्य वैद्यकीय तपासणी करुन मिळण्याबाबत पत्र देण्यात आलेल्या पत्रामध्ये गर्भतपासणीबाबत कुठेही नमुद केलेले नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्याबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये गर्भतपासणीबाबत उल्लेख नाही. यामध्ये ‘मेंटली आणि पिझीकली फीट’ असा उल्लेख आहे

या प्रकरणाच्या अनुषंगाने गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह वाकड यांनी २८ ऑगस्ट २०२५ च्या पत्रान्वये याकार्यालयास खुलासा सादर केलेला आहे. त्यामध्ये वसतीगृह प्रवेशावेळी किंवा प्रवेशानंतर गर्भतपासणी केली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनींच्या पालक अथवा विद्यार्थ्यांनीची पूर्वपरवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातील वृत्ताच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनीची आरोग्य तपासणी केवळ आरोग्य तपासणी केली जात असून गर्भतपासणी केली जात नाही.

या प्रकरणाच्या अनुषंगाने झी-२४ तास या वृत्तवाहिनीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीची ‘युपीटी टेस्ट’ केली जात असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले. या कार्यालयाच्या अधनिस्त असलेल्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा असून याशाळेत अशाप्रकारची तपासणी केली जात नाही. आश्रमशाळा संहिता सन २०१९ मधील १.२.२.३ नुसार अधिक्षक,अधीक्षिका मधील “क” अधीक्षिका यांच्या स्वतंत्र जबाबदाऱ्यांमध्ये मासिक पाळी नोंदवही अद्यावयत ठेवण्याबाबत नोंद आहे. त्यानुसार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींची गोपनीय नोंदवही अधिक्षिका ठेवतात. तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून आश्रमशाळेतील विदयार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व आश्रमशाळाच्या ठिकाणी एएनएम परिचारिका (नर्स) कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या आहेत, फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते.

प्रकल्प अधिकारी स्वतः तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत आश्रमशाळा व वसतिगृहांना दिलेल्या भेटीच्यावेळी याबाबत विद्यार्थ्यांनींनी तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही. सर्व आश्रमशाळांमध्ये विशाखा समिती व शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित असून याअनुषंगाने कुठल्याही प्रकारची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. अशा वृत्तामुळे शासनाची पर्यांयाने आदिवासी विकास विभागाची नाहक बदनामी झाली आहे, असेही श्री. देसाई यांनी खुलासामध्ये नमूद केले आहे.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी योजना

पुणे, दि. ४ सप्टेंबर : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पिंक ई रिक्षा या योजनेमुळे महिलांना रोजगार निर्मितीस चालना मिळण्यासोबतच त्या स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेशित तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना लाभाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बँकेकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यशासन २० टक्के आर्थिक भार उचलणार असून लाभार्थी महिलांवर १० टक्के आर्थिक भार असणार आहे. या योजनेकरिता पात्र महिलांना रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ २० ते ५० वयोगटातील ३ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसलेल्या महिलांना होणार आहे.
पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरु उदयोग केंद्र परीसर, गोल्फ क्लब रोड, डॉ. आंबेडकर चौकाजवळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई – पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश

पुणे, दि. ४ सप्टेंबर- : गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल आदी जलस्त्रोतामधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या मुर्त्यांचे छायाचित्रण करून धार्मिक भावना दुखावतील व सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. विसर्जनानंतर गणेश मुर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन व प्रसारण यावर बंदी घालण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

हा आदेश दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अंमलात राहील.

सदर आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

‘फार्मर कप’ द्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

मुंबई, दि. ४ : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात “सत्यमेव जयते फार्मर कप” ची घोषणा करण्यात आली. “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. “फार्मर कप” या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
पाणी फाउंडेशनने २०२१ पासून “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे. यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळे, हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्या, हा उपक्रम महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात विस्तार करण्याची क्षमता आणि गरज आहे.
‘फार्मर कप’ ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील – आमीर खान
राज्य शासनासोबतची भागीदारी पाणी फाउंडेशनला राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी देत आहे. ज्ञान, प्रशिक्षण आणि सामूहिकीकरणाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. ‘फार्मर कप’ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांची उपजीविका उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे मत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी व्यक्त केले.
‘फार्मर कप’ ची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
राज्यात सर्व तालुके आणि गावांमध्ये ‘फार्मर कप’ या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करणार आहे. राज्यभरात ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, एटीई चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित चंद्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे परिमल सिंह, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांची या समितीमध्ये समावेश आहे. उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर ही समिती त्यांचा पहिला कृति अहवाल तीन महिन्यात सादर करेल.
उच्चस्तरीय समितीच्या कार्यकक्षा
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ‘फार्मर कप’चा विस्तार करण्यासाठी सविस्तर कार्ययोजना तयार करणे. शेतकरी सहजपणे सामूहिक शेती आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्वीकारतील यासाठी सोपी व उपयोगी कार्यपद्धती तयार करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीवर आधारित उद्योगांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांना आवश्यक साहाय्य उपलब्ध करून देणे. हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे. कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करणे, तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार करणे. शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी ठोस अंमलबजावणी योजना तयार करणे. ‘फार्मर कप’ अंतर्गत प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक आखणे. अंमलबजावणी करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांना प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. योजनांच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करणे. विविध शासकीय विभागांमध्ये सशक्त समन्वय सुनिश्चित करणे असे असेल.
गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होईल : सत्यजित भटकळ
सन २०२२ पासून ‘फार्मर कप’च्या माध्यमातून पाणी फाउंडेशन शेतकऱ्यांच्या उपजीविकेत बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. यामध्ये विशेषतः अल्पभूधारक शेतकरी आणि महिला शेतकरी सक्षम होत आहेत. गटशेतीमुळे प्रति एकर लागवड खर्चात सुमारे २० टक्के बचत होईल आणि नफ्यात १०० टक्के वाढ होईल अशी आमची अपेक्षा आहे. राज्यातील प्रत्येक शेतकरी या संधीचा लाभ घेऊन आपले उत्पन्न व उत्पादकता वाढवू शकेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सांगितले.

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

पुणे, दि. ४ सप्टेंबर : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने “पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव” दिमाखदार पद्धतीने पार पडला.

दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब रंगारी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घेतले.गणेश दर्शनानंतर त्यांनी अस्सल श्रेयस हॉटेलची मराठी पुरणपोळी थाळी व उकडीचे मोदक यांचा मनमुराद आस्वाद घेतला. या अविस्मरणीय अनुभवाच्या स्मरणार्थ सर्व पर्यटकांना विशेष स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

या सोहळ्यास सहाय्यक संचालक (पर्यटन विभाग) श्रीमती शमा पवार, तसेच अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात व दिशा टुरिझमचे मालक तुषार शिंदे व सौ. सुजाता शिंदे, यांसह मधुरा बोडस, स्नेहल हरपळे, विदुला जवंजाल, विक्रम खन्ना, विश्वास भोर, कृष्णा शिंदे, वेदांत चोरघे, वेदांग महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पुण्याचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविणेस निश्चितच हातभार लागला.

रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी सदिच्छा भेट

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२५: राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. पुण्यातील गणपती दर्शनासाठी आलेल्या गोगावले यांनी या भेटीत डॉ. गोऱ्हे यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा केली. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.

या प्रसंगी गोगावले यांनी डॉ. गोऱ्हे यांना राज्यातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला चालना देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी गोगावले यांच्या कार्याचे कौतुक करत पुणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेच्या कामाला उत्तेजन मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामात महिला मजुरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यादृष्टीने हिताचे निर्णय घेतले जात असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होत असल्याची चर्चा दोघांमध्ये झाली.

ही भेट राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

बिबट प्रवण भागातील हिवरे पंचक्रोशीतील शेतीपंपाना आता दिवसा वीजपुरवठा

तेजेवाडी येथील ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ

१० गावातील २ हजार शेतकऱ्यांना फायदा

पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२५- ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत तेजेवाडी येथील १२ एकर गायरानावर उभारलेल्या ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा बुधवारी (दि.३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील हिवरे बु. सह पंचक्रोशीमधील दहा गावांतील शेतीपंपाना आता दिवसा वीज पुरवठा सुरु झाला असून, येथील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी यापुढे रात्री-अपरात्री  शेतीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. 

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ हाती घेतली आहे. या योजनेतून राज्यात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प राज्यात होत असून, त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांना दिवसा दिली जात आहे. या योजनेतूनच जुन्नर तालुक्यातील हिवरे बु. ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत ५ किमी परिघातील तेजेवाडी येथे १२ एकर गायरान जमिनीवर ४ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौर प्रकल्पात तयार झालेली वीज हिवरे बु. उपकेंद्राला जोडून त्यांतर्गत येणाऱ्या १० गावांना आता दिवसा विजेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी (दि. ३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे अधीक्षक अभियंते युवराज जरग, अनिल घोगरे व संजीव नेहते, कार्यकारी अभियंते राहूल गवारे, केशव काळुमाळी, धनंजय अहेर व प्रवीण पंचमुख, तेजेवाडीचे सरपंच संपत सखाराम नायकोडी व उपसरपंच राजू विश्वासराव यांचेसह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच मे. आवाडा कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

या गावांना होणार फायदा

या सौर प्रकल्पामुळे बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी, ओझर, हिवरे बु., हिवरे खु., शिरोली खु.,शिरोली बु., कुरण, ढोळवाडी, भोरवाडी आदी १० गावांतील २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध- राजेंद्र पवार

तेजेवाडी हा मंचर विभागातील तिसरा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी पेठ (ता. आंबेगाव) व नेतवड (ता. जुन्नर) येथे अनुक्रमे ४ व ८ मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करुन तेथील स्थानिक शेतकऱ्यांना महावितरणने कायमस्वरुपी दिवसा वीज उपलब्ध करुन दिली आहे. ह्या भागात बिबट्यासह अनेक जंगली श्वापदे आहेत. पूर्वी रात्री-अपरात्री मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता सौर वाहिनी योजनेतील प्रकल्प पूर्ण झाल्याने या भागात शेतीला दिवसा वीज मिळणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

महावितरणच्या ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘आयएसओ’

पुणे परिमंडल कार्यालयासह, ३ मंडल, १ उपविभाग व ग्राहक तक्रार निवारण मंचाचा समावेश

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२५- आजवर महावितरणच्या पुणे परिमंडातील अनेक वीज उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन मिळालेले आहे. आता प्रथमच महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयासह रास्तापेठ, गणेशखिंड व स्थापत्य मंडल कार्यालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच आणि हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘ISO-9001-2015’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

बुधवारी (दि. ३) रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयात हा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार होते. तर प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, ‘आयएसओ’चे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख व मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय कामकाजासह विविध योजनांची केली जाणारी अंमलबजावणी, ग्राहक सेवा, सुसज्य इमारत, वीजबिल वसुली आदी निकषांच्या आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले, महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप क्षमता आहे. वेळोवेळी आलेल्या आपत्कालिन परिस्थितीमध्ये ती पहायला मिळते. मात्र त्याच क्षमतेने आपण ग्राहकसेवेप्रती झोकून देऊन कामे केले तर निश्चितच चांगले बदल होऊ शकतात. पुणे परिमंडलात ‘आयएसओ’ एक चळवळ बनली आहे. मात्र मानांकन मिळविण्यापेक्षा ते टिकवणे व त्यात सातत्य राखणे तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येकाने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, महिलांना, ज्येष्ठांना सन्मान द्यावा. तसेच नियामक आयोगाने घालून दिलेल्या कालमर्यादेच्या आत काम करावे असा कानमंत्रही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

याप्रसंगी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, आयएसओचे नंदकुमार देशमुख आदींचीही भाषणे झाली. यावेळी पावर हाऊस मधील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यालयांना मिळाले ‘आयएसओ’

महावितरण पुणे परिमंडल कार्यालय, स्तापेठ शहर मंडल कार्यालय, गणेशखिंड शहर मंडल कार्यालय, स्थापत्य मंडल कार्यालय, ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय व हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ISO-9001-2015 या प्रमाणपत्र मिळाले.  कार्यालय प्रमुख म्हणून अनुक्रमे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानेश्वर पडळकर, सिंहाजीराव गायकवाड व संजीव नेहते, ग्राहक मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर, हडपसर उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता विष्णू पवार यांनी मानांकन प्रमाणपत्र स्विकारले.

ग्राहक तक्रार निवारण मंचाला प्रथमच ‘आयएसओ’

आजवर अनेक कंपन्यांनी, शासकीय कार्यालयांनी आयएसओ मानांकन मिळवले आहे. मात्र ग्राहकांच्या तक्रारींची जिथे सोडवणूक होते त्या ‘ग्राहक तक्रार निवारण मंचा’ला देशात प्रथमच आयएसओ मानांकन मिळाले आहे. मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांनी ग्राहक तक्रार निवारणासह ग्राहक जागरुकतेवर भर दिल्याचेही आयएसओचे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख यांनी नमूद केले.

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’

0

परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

मुंबई, दि. ०४ सप्टेंबर २०२५: पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या ऊर्जा परिवर्तनासाठी देशाच्या विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे रोल मॉडेल आहे, असे गौरवोद्गार भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि. ४) काढले.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्र व विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती घेण्यासाठी भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई येथील महावितरण व महानिर्मितीच्या सांघिक कार्यालयास भेट दिली. यामध्ये योजना पटेल (न्यूयॉर्क), प्रतिभा पारकर राजाराम, पारमिता त्रिपाठी, अन्कन बॅनर्जी, सी. सुगंध राजाराम तसेच बिश्वदीप डे (टान्झानिया), स्मिता पंत (ताश्कंद) यांचा समावेश होता. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा विभागाने राज्यातील विजेची वाढती मागणी व पुरवठ्याच्या नियोजनासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यासह पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे येत्या पाच वर्षांत सर्वच वर्गवारीतील वीज दर कमी होत जाणार आहे. सोबतच हरित ऊर्जेला प्राधान्य दिल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे (सीओटू) उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाला बळ मिळेल.  

श्री. लोकेश चंद्र म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० अंतर्गत कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. जगातील ही सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे. या योजनेमुळे राज्यात ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून ग्रामीण भागात सुमारे ७० हजार रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेमुळे देशामध्ये सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रातील ४५ लाख कृषिपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. आतापर्यंत कार्यान्वित झालेल्या १९७२ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ३६९ उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. सोबतच क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक वीज दरात घट होण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिली.

या बैठकीमध्ये महावितरणचे संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), महापारेषणचे संचालक श्री. स‍तीश चव्हाण (संचालन), महानिर्मितीचे संचालक श्री. अभय हरणे (प्रकल्प) तसेच कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल, श्री. किशोर पाटील, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट व श्री. संतोष सांगळे यांची उपस्थिती होती.

उत्सवाचा प्राण म्हणजे लोककला

कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे : माणसाच्या शरीरात जसे रक्त वाहते, तसे आपल्या भारतीय संस्कृतीत लोककलेचे दर्शन घडते. आज गणेशोत्सवात ढोल-ताशा वादन, लेझीम पथक, दारासमोरील रांगोळी किंवा तोरण हे सर्व काढून टाकले, तर उत्सवातील जिवंतपणा नाहीसा होईल. त्यामुळे आपली संस्कृती आणि लोककला हा उत्सवाचा प्राण आहे, असे मत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र एज्युकेशन कौन्सिलचे सदस्य अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.शिक्षक दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण होते.हे पुरस्काराचे अठरावे वर्ष आहे.यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ कला अध्यापक व चित्रकार दत्तात्रय वेताळ यांना महात्मा फुले पेठेतील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. 

यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, रंगावलीकार अमर लांडे, वंदना वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सनई चौघड्याचे मंगल वादन, दारात  रांगोळी, दाराला तोरण बांधून हा सोहळा साजरा करण्यात आला.

पराग ठाकूर म्हणाले, लोककलेची पारंपरिकता व शुद्धता जतन करणे हे लोककलावंतांचे काम आहे. पुढच्या पिढीमध्ये देखील ही कलाप्रवाहित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी त्यांनी आपले वडील शशिकांत ठाकूर यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

दत्तात्रय वेताळ म्हणाले, प्रत्येकामध्ये एक तरी कला असतेच ती कला जोपासण्यासाठी तुम्हाला सातत्याने सराव हा महत्त्वाचा असतो. कला अंगी असली तरी ती सरावानेच खुलते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व आभार प्रदर्शन शिरीष मोहिते यांनी केले.

स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना जाहीर.

पुणे-
दरवर्षी स्टेशनरी,कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा संस्थेच्या जेष्ठ व्यापारी सभासदांना जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.
या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना संस्थेच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ,देऊन सुरेश प्रभुणे व रवींद्र रणधीर यांना नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री सभागृह” येथे आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये सन्मानित करण्यात येईल.अशी माहिती संस्थेचे सचिव किशोर पिरगळ यांनी दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी,उपाध्यक्ष संजय राठी,सचिव किशोर पिरगळ यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे

‘श्री गणेश रत्न रथा’तून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून

0

सायंकाळी सहा वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा ‘श्री गणेश रत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल. त्यानंतर

दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने ‘श्री गणेश रत्न रथ’ सजविण्यात आला असून या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाचे जोरदार वादन करणार आहेत, यानंतर रात्री अकरा वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे करण्यात येईल. ” पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवू असा आमचा मानस असल्याचेही बालन यांनी सांगितले.


‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’

  • पुनीत बालन
    (विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

उजासकडून शिक्षकांना मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याच्या घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यास प्रशिक्षण

·         पहिल्‍या टप्‍प्‍याला पुरंदरमध्‍ये सुरूवात होण्‍यासह ४ सप्‍टेंबर रोजी एमएमएममध्‍ये १०० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्‍यात आले; पुण्‍यातील सर्व १३ ब्‍लॉक्‍समध्‍ये या उपक्रमाचा विस्‍तार करण्‍यात येईल, ज्‍याचा ३,००० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्‍याचा मनसुबा आहे.

·         आदित्‍य बिर्ला एज्‍युकेशन ट्रस्‍टचा उपक्रम उजास जागरूकता, शाश्वता आणि मोफत सॅनिटरी पॅडच्‍या माध्‍यमातून किशोरवयीन मुली, महिला व समुदायांमध्‍ये मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी व स्‍वच्‍छतेला चालना देतो. 

·         २०२१ मध्ये सुरू झाल्यापासून उजासने ५ लाखांहून अधिक किशोरवयीन मुली व मुलांना शिक्षण दिले आहे आणि संपूर्ण महाराष्‍ट्रात शाश्वत मासिक पाळी व्यवस्थापनासाठी ५० लाखांहून अधिक पॅड्सचे मोफत वाटप केले आहे.

पुणे सप्टेंबर २०२५ – अद्वैतेश बिर्ला यांनी स्थापन केलेला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम उजासने आज पुणे जिल्हा परिषदेसोबत दोन वर्षांच्या सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत पुरंदर, पुणे येथे मेन्‍स्‍ट्रुअल हेल्‍थ अँड हायजिन मॅनेजमेंट (एमएचएम) शिक्षक प्रशिक्षण उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू केला. या दोन तासांच्या ऑनलाइन सत्रात ३० शाळांमधील १०० हून अधिक शिक्षकांना किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व स्वच्छता व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी माहिती आणि कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यात आले. हा पहिला टप्पा मोठ्या प्रयत्नांची सुरुवात आहे, ज्याद्वारे उजासचा पुणे जिल्ह्यातील सर्व १३ ब्लॉकमधील ३,००० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा मनसुबा आहे.

शिक्षक प्रशिक्षणाचा मूळ सामंजस्य करारात समावेश नव्हता, पण शाळांमध्ये मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याच्या घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत माहिती देण्‍यासाठी उजासने हा उपक्रम सुरू केला. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रबळ पाठिंब्‍यासह या उपक्रमाने पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करून महाराष्‍ट्रातील शालेय यंत्रणांमध्‍ये एमएचएमचा समावेश करण्‍यासाठी पाया रचला आहे.

दोन तासांच्‍या कार्यशाळेमध्‍ये पुढील गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले:

  1. एमएचएम प्रशिक्षणाद्वारे क्षमता निर्माण करणे: शिक्षकांना उजासच्या मेन्‍स्‍ट्रुअल हेल्‍थ मॅ‍नेजमेंट (मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन) सत्रांचे ज्ञान, साधने आणि पद्धतींसह सुसज्ज करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना वर्गात अध्‍यापन करताना आणि दैनंदिन शालेय संवादात मासिक पाळीबाबत आत्‍मविश्वासाने माहिती देता येईल.
  2. विद्यार्थ्यांना सतत पाठिंबा देणे: वर्गात शिकवण्याव्यतिरिक्‍त शिक्षक प्रश्नांची उत्तरे देण्यास, गैरसमज दूर करण्यास आणि सतत मार्गदर्शन करण्यास सुसज्‍ज होते, कार्यशाळा संपल्यानंतर देखील किशोरवयीन मुलींसाठी ते दीर्घकालीन सहयोगी म्हणून सक्षम झाले.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत उजासच्‍या प्रमुख पूनम पाटकर म्‍हणाल्‍या, “शिक्षक हे परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. भारतात जवळपास २३ टक्‍के किशोरवयीन मुली मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शाळा सोडतात, ज्याचे मुख्य कारण कलंकाची भावना, जागरूकतेचा अभाव आणि अपुरी आधार व्यवस्था आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन आम्ही खात्री घेत आहोत की, शाळेमध्‍ये मुलींना त्यांच्या मासिक पाळीदरम्यान वगळण्याऐवजी आधार वाटेल असे सुरक्षित वातावरण असेल. शिक्षकांना अचूक, मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज दूर करणारे ज्ञान देऊन सक्षम केल्याने शाळेमधून विद्यार्थीनींची गळती कमी होण्‍यास मदत होईल, तसेच उत्तम व उत्‍साहपूर्ण वर्ग निर्माण होतील, जेथे वि़द्यार्थीनींना पाहिले जात असल्‍याचे, काळजी घेतली जात असल्‍याचे व आत्‍मविश्वासपूर्ण वाटेल. ही कार्यशाळा मासिक पाळीबाबत सामान्‍य संवादांना चालना देण्‍यासाठी आणि कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांना सुसज्ज करण्यासाठी जिल्‍हा स्‍तरावरील चळवळीची फक्‍त सुरूवात आहे.” 

आपले मत व्‍यक्‍त करत पुणे जिल्हा परिषदेचे आयएएस श्री. गजानन पाटील म्हणाले, “पुणे मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचा हा उपक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासाला सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणात समाविष्‍ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. किशोरवयीन मुलींना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने त्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल असे सुरक्षित व सहाय्यक वातावरण प्रदान करण्याचा या उपक्रमाचा मनसुबा आहे. हा उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करेल, शाळांमध्ये सॅनिटरी पॅडची उपलब्धता सुनिश्चित करेल आणि शिक्षकांना प्राथमिक आधार म्हणून प्रशिक्षित करेल. जिल्हा परिषदेच्या इतर उपक्रमांसह हा उपक्रम वि़द्यार्थीनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल.” 

कार्यशाळेच्या शेवटी शिक्षकांना मासिक पाळीबद्दल खुला, गैरसमज दूर करणारा संवाद करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अचूक माहिती व सहाय्यक पद्धतींसह मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज करण्यात आले. स्वच्छता, पोषण, वेदना व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्‍य या क्षेत्रातील कौशल्यांसह शिक्षक आता त्यांच्या शाळांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन समर्थक म्हणून काम करण्यास सक्षम आहेत. किशोरवयीन मुलींना त्यांच्या शिक्षणादरम्यान आत्मविश्वासपूर्ण, काळजी घेत असल्‍याचे आणि सक्षम वाटावे यासाठी ही शाश्वत प्रयत्‍नांची सुरूवात आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त१३ सप्टेंबर रोजी कँडल मार्चचे आयोजन

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबचा पुढाकार

पुणे: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता पुणे येथून निघणार आहे. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/candlemarch2025 यावर आपले नाव नोंदवावे किंवा कनेक्टिंग ट्रस्टच्या connecting_ngo या इन्स्टा पेजला भेट द्यावी, असे आवाहन कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांनी केले आहे. या कँडल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज या क्लबचे सहकार्य लाभले आहे.

आत्महत्या हा आपल्या समाजासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न आहे. अनेकदा मनातील वेदना, ताण, एकटेपण बोलून दाखवता येत नाही आणि त्यातून मोठे निर्णय घेतले जातात. या वेदना ऐकल्या जाव्यात, आधार मिळावा आणि प्रत्येकाला हे जाणवावे की तो एकटा नाही, यासाठी जनजागृतीची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून अर्नवाज दमानिया यांनी २००५ मध्ये कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था सुरू केली. गेली दोन दशके ही संस्था सतत आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य जनजागृती आणि जीव वाचविण्याचे कार्य करत आली आहे. या प्रवासात हजारो लोकांना आधार, समज आणि जीवनाची नवी दिशा मिळाली आहे. या प्रवासात आता रोटरी क्लबनेही साथ देण्यासाठी हात पुढे केला असल्याचे कनेक्टिंग ट्रस्टच्या गायत्री दामले यांनी नमूद केले.

रोटरी सदस्यांसह रोटरॅक्टर आणि तरुण मंडळी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होतील. निराश व्यक्तींना आशा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा कॅन्डल मार्च महत्वपूर्ण ठरणार आहे. हा कँडल मार्च म्हणजे आत्महत्येमुळे आपले जीवन गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सध्या संघर्ष करत असलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी एक गंभीर आणि अर्थपूर्ण पाऊल आहे. आपली एक छोटीशी मेणबत्ती आणि काही पावले, कोणाच्या तरी जीवनात प्रकाशाचा किरण ठरू शकतात. चला, आपण सारे मिळून या उपक्रमात सहभागी होऊन संवेदनशीलता, आशा आणि आधाराचा संदेश पोहोचवूया, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष आशुतोष वैद्य यांनी केले.