Home Blog Page 142

गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग: ढोल-पथकाच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-पुण्यातील अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान बुधवार चौक याठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक वार्तांकन करत असताना, एका नवोदित महिला पत्रकाराचा विनयभंग त्रिताल ढोल ताशा पथकाच्या दोन अनोळखी सदस्यांनी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुढाकार घेऊन याबाबत पाठपुरावा केल्यानंतर अखेर फरासखाना पोलीस ठाण्यात संदर्भात त्रिताल ढोल ताशा पथकाच्या दोन अनोळखी सदस्यांवर फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 (1), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या एका मित्रासोबत गणपती मिरवणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:15 ते 7:40 दरम्यान बुधवार चौक याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील एका 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्रिताल ढोल ताशा पथकाच्या लोखंडी ट्रॉलीचे चाक तक्रारदार यांच्या पायावर घातले. त्यावेळी तक्रारदार यांनी सदर बाबत त्याला विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदार यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्या छातीला स्पर्श करून मागे ढकलले त्यामुळे तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा मित्र शोएब तडवी यांनी आरोपीला सदर बाबत विचारणा केली. याचा राग येऊन सदर अनोळखी व्यक्तींनी त्यांना ढकलून दिले व त्यातील एकाने तक्रारदार व त्यांच्या मित्राला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यामुळे याबाबत संबंधित आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील याबाबत पुढील तपास करत आहे.

सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध संसदेत घुसले १२ हजारांहून अधिक तरुण:१८ जणांचा मृत्यू ,२०० जखमी नंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू

0

सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारी भ्रष्टाचाराविरुद्ध सोमवारी सकाळी १२ हजारांहून अधिक निदर्शक तरुण नेपाळच्या संसद भवनाच्या आवारात घुसले, त्यानंतर लष्कराने अनेकदा गोळीबार केला. नेपाळच्या इतिहासात संसदेत घुसखोरीची ही पहिलीच घटना आहे.नेपाळमध्ये ३ सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबसह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जण जखमी आहेत. अनेक ठिकाणी निदर्शकांनी सैन्यावर दगडफेक केली सकाळपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर सोशल मीडिया पुन्हा सुरू करण्यात आला. या निदर्शनात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या निदर्शनाचे नेतृत्व जेन-झी म्हणजेच १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी केले होते.

निदर्शकांनी संसदेच्या गेट क्रमांक १ आणि २ वर कब्जा केला होता. त्यानंतर संसद भवन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान निवासस्थानाजवळील भागात कर्फ्यू लागू करण्यात आला. काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणाऱ्यांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नेपाळ सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना ७ दिवसांच्या आत नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. सरकारने असा युक्तिवाद केला की नोंदणीशिवाय, देशात बनावट आयडी, द्वेषपूर्ण भाषण, सायबर गुन्हे आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे.

४ सप्टेंबर रोजी सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुदतीत नोंदणी न केल्याबद्दल बंदी घातली. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, यूट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा समावेश होता. टिकटॉक, व्हायबर सारख्या प्लॅटफॉर्मवर वेळेवर नोंदणी झाली असल्याने बंदी घालण्यात आली नाही.

नियमांनुसार, प्रत्येक कंपनीला नेपाळमध्ये स्थानिक कार्यालय असणे, चुकीची सामग्री काढून टाकण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि कायदेशीर नोटिसांना प्रतिसाद देणे बंधनकारक करण्यात आले होते. यासोबतच, वापरकर्त्यांचा डेटा सरकारसोबत शेअर करण्यासाठी नियमांचे पालन करणे देखील आवश्यक करण्यात आले होते.

या अटी कंपन्यांना खूप कडक वाटत होत्या. विशेषतः डेटा-गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत. अहवालांनुसार, भारत किंवा युरोपसारख्या मोठ्या देशांमध्ये कंपन्या स्थानिक प्रतिनिधी ठेवतात कारण तेथे बरेच वापरकर्ते आहेत. पण नेपाळमध्ये वापरकर्ता वर्ग कमी आहे, त्यामुळे कंपन्यांना ते खूप महाग वाटले.

जर कंपन्यांनी नेपाळची ही अट मान्य केली असती, तर त्यांना प्रत्येक लहान देशासाठी समान धोरण स्वीकारावे लागले असते. हेच कारण होते की पाश्चात्य कंपन्यांनी नेपाळ सरकारची अट मान्य केली नाही आणि वेळेवर नोंदणी केली नाही.

स्वतःच्या नातवाची हत्या करवली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता- पोलीस आयुक्त

पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.

गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. 

या हल्ल्याचा कट तब्बल एक वर्षांपासून रचला जात होता. आंदेकर टोळीतील काही सदस्यांवर पूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पोलिसांच्या वॉचमुळे तो हल्ला वाचला होता. मात्र, यावेळी गणेश कोमकरचा मुलगा आयुष्य कोमकर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. टोळीतील चार सदस्यांनी आयुष्यवर गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन आरोपी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे यांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत.आंदेकर टोळीतील या दोघांवर यापूर्वी भादवी कलम 324, 323, 406, 32 अंतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघे टोळीचे सक्रिय सदस्य असून, त्यांना शस्त्रे पुरवणारा अमन युनूस पठाण याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता. आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्यांच्यावर कारवाई करणार. कोणत्याच गँगला आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही.”पुण्यातील 20 वर्षीय आयुष कोमकर याची हत्या ही टोळी युद्धातून झाली असून याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना त्याच्या आदल्या रात्री आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासवरून परत आल्यानंतर बिल्डिंगच्या खाली त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.गेल्या वर्षी, 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि तिचा दीर गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहेत. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगने आयुष कोमकरची हत्या केली.वनराज आंदेकरच्या हत्येचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्लॅन केला होता. त्यांनी कोमकर टोळीमधील काही लोकांची रेकीही केल्याचं समोर आलं. यासंदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदेकर गँगमधील गुंडांना अटक केली आणि त्यांचा प्लॅन फसला. पण त्याच्या चारच दिवसानंतर आंदेकर गँगकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.

तब्बल ३१ तास चालली पुण्याची विसर्जन मिरवणूक

पुणे-यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने विक्रमी वेळ गाठला आहे. तब्बल ३० तासांहून अधिक काळ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३१ तासांनंतर विसर्जन मिरवणुक संपली आहे. शेवटचा महाराष्ट्र्र तरुण मंडळाचा गणपती 4.30 टिळक चौकातून विसर्जेन घाटावर मार्गस्थ आहे. यावर्षी विक्रमी 3१ तास चालली आहे. दरम्यान, यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे.

पुण्यातील सर्व गणेश मंडळाणी सहकार्य केले. मोठा बंदोबस्त 12 दिवसांपासून लावण्यात आला होता. सगळा सोहळा शांततेत पार पडला. सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन. गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश आल्याचे मत यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाचं नाही. तर मधल्या वेळेत काही मंडळांचा मंडळांशी आक्षेप होता ते सोडवण्यात आलं. प्रत्येक मंडळांना योग्य वेळ मिरवणुकीसाठी मिळाला पाहिजे हि आमची भूमिका होती. उत्साहात मिरवणूक पार पडली पाहिजे हि भूमिका होती असे मत कुमार यांनी व्यक्त केले.

मानाच्या गणपतींचे विसर्जनाला गेला पूर्ण दिवस

मानाचा पहिला कसबा गणपती
-3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
 -4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम- 
4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती 
-4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.

-तर दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक सायंकाळी 4 वाजता सुरू झाली..विसर्जन 8 वाजून 23 मिनिटांनी म्हणजेच 4 तास 23 मिनिटांनी झाले.भाऊ रंगारी गणपती पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मनाच्या कसबा गणपतीला अर्पण केला पुष्पहार

0

पुणे | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यंदाच्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. पुण्याच्या पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपतीला त्यांनी पुष्पहार अर्पण करून प्रसाद अर्पण केला तसेच दुसऱ्या मानाच्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद अर्पण केला.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भावनिक बाब आहे. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरीच्या कृपेने पुणेकरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी माझी प्रार्थना आहे. हा उत्सव केवळ भक्तिभावाचा नाही, तर सामाजिक ऐक्य, परंपरेची जपणूक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन देणारा आहे. सर्व पुणेकरांनी सुरक्षिततेचे भान ठेवून, भक्तिभावाने आणि आनंदाने उत्सवाचा समारोप करावा.”

यावेळी पुणे उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी विशेष विनंती करून डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते कसबा गणपतीला प्रशासनाच्या वतीने हार अर्पण करण्यात आला.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह महापालिका, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना उपशहरप्रमुख नितीन पवार तसेच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मानाच्या कसबा गणपती मंडळाच्या वतीने व तांबडी जोगेश्वरी मंदिर गणेश मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महिलांसाठी त्यांनी केलेल्या उपक्रमांचा विशेष गौरव केला.

लालबागच्या राजाचे आज रात्री 10.30 च्या सुमारास होणार विसर्जन; समुद्राला भरती असल्याने विलंब

0

मुंबई-लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. थोड्याच वेळात बाप्पाला निरोप दिला जाणार असून, या विसर्जन सोहळ्यासाठी चौपाटीवर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावर्षी लालबाग राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी आल्या. परिणामी, लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले होते. आता मुर्तीला या गुजराती तराफ्यावर बसवण्यात यश आले आहे.

मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले, मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगौलिक परिस्थिती पाहता यावेळी अरबी समुद्राला भरती लवकर आली. लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते. आम्ही इथं पोहोचायच्या अगोदर भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळं तो प्रयत्न थांबवला.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालं असून लालबागच्या राजाच्य विसर्जन अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कारणांमुळे विसर्जनाला उशीर होत असल्याची माहिती आहे.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर मुंबईचा लाडका गणपती, लालबागचा राजा, शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी मंडपातून निघाला. आज, 7 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यानंतर आरती होऊन लालबागच्या राजाला तराफ्यावर बसवून समुद्रात विसर्जन केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि नियोजनातील त्रुटींमुळे विसर्जन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप

पुणे – ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करण्यासोबतच आपल्या मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांना व नाटकांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्याच पारंपारिक ‘शिवराय’ या ढोलपथकाच्या आकर्षक वादनाने विसर्जन मिरवणुकीला इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रांगणातून सुरुवात झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर काही क्षणांत चित्र रेखाटून आपल्या कलेची चुणूक दाखवली. मनसोक्त गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी अखेर सायंकाळी विद्यापीठातील विसर्जन घाटावर भावूक होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ व्या जयंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज, उद्योग-व्यवसायासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ७ सप्टेंबर) :
रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, दौलत शितोळे, अंकुश जाधव, मोहन मदने आदी उपस्थित होते.इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज, तर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलिस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने ओबीसी मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, ४२ वसतीगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले, त्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, उमाजी नाईक हे इंग्रजांच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवणारे पहिले नेते होते. रॉबर्टने ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात “उमाजी नाईक गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच लढतात” असा उल्लेख आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहत त्यांनी सामान्यांसाठी अज्ञापत्र काढले. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी १० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. रामोशी-बेडर समाजाला घाबरवण्यासाठी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली; तरीही हा समाज स्वातंत्र्यलढ्यात मागे राहिला नाही. इंग्रजांच्या कारस्थानामुळे समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, जो स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी पुसला गेला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे अनेक वंचित घटकांतील तरुण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वैमानिक होऊ शकले.

आमदार पडळकर यांनी आपल्या मनोगतात राज्य शासनाने इतर मागासांसाठी केलेल्या कामांची माहिती सांगून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्मारक होत असल्याचे आणि आता पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकरमध्ये स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले.

जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रास्ताविकात रामोशी-बेडर समाजाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री स्व. गिरीश बापट, माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे, स्व. रामभाऊ जाधव, स्व. सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार, तर बाबुराव जमादार, छगन जाधव व बाबुराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाने उभा केलेल्या कक्षाला भेट देऊन राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

गणेशोत्सवात स्वच्छ च्या कचरावेचकांनी राबवलेल्या निर्माल्य टू निसर्ग उपक्रमातून ११४ टन निर्मल्याचे संकलन

पुणे-दरवर्षीप्रमाणे शहरातील सर्वात मोठ्या उत्सवादरम्यान स्वच्छ च्या कचरावेचकांनी २० वर्षांहून अधिक काळ पुण्याशी असलेली बांधिलकी जपत ५० हून अधिक विसर्जन घाट आणि केंद्रांवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा उपक्रम राबवला. यात दि. २ व ६ सप्टेंबर रोजी कचरा वेचकांनी नागरिकांकडून ११४ टन निर्माल्याचे संकलन व काटेकोरपणे वर्गीकरण केले. त्यासोबतच ३९ टन सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला गेला. संकलित निर्माल्य पुणे महानगरपालिकेकडे खतनिर्मितीसाठी देण्यात आले.

या उपक्रमासाठी शहरभरात स्वच्छचे ४०० हुन अधिक कचरावेचक सज्ज होते. २ व ६ सप्टेंबर रोजी गौरी व गणपती विसर्जनावेळी येणारे फुले, हार, नारळ, दुर्वा यासारखे निर्माल्य आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, सजावटीचे साहित्य, मिठाईचे बॉक्स इ. सुका कचरा यांचे वर्गीकरण करून संकलन करण्यात आले. २००९ साली काही निवडक घाटांपासून सुरू झालेला हा उपक्रम, गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून आता पुण्याच्या गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग ठरला आहे.

यावर्षी पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी कचरावेचकांना या उपक्रमासाठी विशेष सहाय्य केले. तसेच, नागरिकांनी, माजी नगरसेवकांनी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी कचरा वेचकांचे आभार मानत, या उपक्रमाचे कौतुक केले व कचरावेचकांना उत्सवात सहभागी करून घेतले.

आपले काम राहील की जाईल, आपल्याला नवीन व्यवस्था आलीच तर त्यात समाविष्ट करून घेतले जाईल की नाही, अशी उपजीविकेवर टांगती तलवार असून देखील, कोणत्याही परिस्थितीत कचरावेचकांनी निर्धाराने शहराप्रती, नागरिकांप्रती आपली बांधिलकी जपत, दोन्ही दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जन केंद्रांवर थांबत निर्माल्य संकलनाचे काम सुरू ठेवले. पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घंटा-गाडी आधारित कचरा संकलन प्रणालीमुळे हजारो कचरावेचकांचा रोजगार धोक्यात आहे. या प्रणालीमुळे स्वच्छ सहकारी संस्थेचे मॉडेल संपुष्टात येऊन, कचरावेचक पुन्हा व्यवस्थेतून बाहेर राहतील असा धोका आहे. अशा परिस्थितीतही ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारण्यासाठी जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा सहभाग यंदा अधिक प्रेरणादायी ठरला.

‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उपक्रम केवळ निर्माल्य संकलनापुरता मर्यादित नसून, पुण्याचा सर्वात मोठा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिक व कचरा वेचक यांच्यातील विश्वासाचे प्रतीक आहे.
__

गणेशोत्सव हा आम्ही नागरिकांसोबत मिळून साजरा करतो. त्यामुळे जरी आमच्या कामाची शाश्वती आम्हाला स्पष्टपणे दिली जात नसली तरी शहरासाठी पुणे मनपाच्या साथीने आम्ही विसर्जन केंद्रांवर उपस्थित होतो. लोक दरवर्षी आम्हाला प्रसाद देतात, आरतीत सामील करतात, रोज दारावर कचरा घेताना घाईमध्ये भेट होते, विसर्जनाच्या वेळी मात्र आम्हाला उत्सवात सहभागी करून घेतले जाते. आपल्या शहराच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा वारसा जपणारी परंपरा निर्माल्य संकलनाच्या उपक्रमामुळे बळकट झाली आहे.

  • सारिका काराडकर, बोर्ड मेंबर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था

जमीन परतावाबाबत पीएमआरडीएकडून शेतकऱ्यांनी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

पिंपरी (दि.७) : तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी सन १९७२ ते १९८३ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा जमिनीकरिता संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के जमीन परतावा देण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती अवगत व्हावी, यासाठी मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पीएमआरडीएच्या माध्यमातून ग.दी. माडगूळकर सभागृहात संवाद साधण्यात येणार आहे.

प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा देण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही लाभार्थ्यांनी अर्ज केले असून त्यावर कार्यवाही होत आहे. मात्र अद्यापही काही पात्र लाभार्थ्यांनी पीएमआरडीएकडे अर्ज सादर केलेले नाही तसेच काही जणांचे अर्ज कागदपत्रांअभावी त्रुटीमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे ६.२५ टक्के परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे, परतावा अर्ज, कार्यपद्धती व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी केले आहे.

‘श्री गणेश सुवर्णयान’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप

अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष

पुणे : रथाच्या माथ्यावर फडकत असलेला भगवा ध्वज आणि हायड्रोलिक पद्धतीने उंच होत असलेली प्रभू श्रीराम यांची मूर्ती असलेल्या श्री गणेश सुवर्णयान रथात विराजमान होऊन अखिल मंडई मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली. शारदा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बेलबाग चौकापासूनच पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. जहाजासारखे स्वरूप असलेल्या रथाचा आकार  २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा होता. रथावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. जहाजाच्या वर सर्च लाईट तसेच आकर्षक कंदील लावण्यात आले होते.  मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणूकीत झाले.

गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्य मंडपापासून निघाली. रात्री ११ च्या दरम्यान  मिरवणूकीच्या मुख्य रथाचे आगमन बेलबाग चौकात झाले होते. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता श्रीं चे विसर्जन झाले.  

ऑन ड्यूटी’ वीज कर्मचाऱ्यांमुळे गणेशोत्सावाची निर्विघ्नपणे सांगता

पुणे, दि. 7 सप्टेंबर, 2025 : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महावितरणचे सर्व अभियंता व तांत्रिक कर्मचारी ‘ऑन ड्यूटी’ होते. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न येता गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची निर्विघ्नपणे सांगता झाली.

आनंदपर्व असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्योत्सव म्हणून साजरा झाला. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमधील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. शनिवार (दि. 6) विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकींना सुरवात झाली. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी मोठ्या मंडळांच्या व मिरवणुकीतील गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ ‘ऑन ड्यूटी’ राहण्याचे तसेच प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याची स्थिती व इतर माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिले होते.

तसेच संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार स्वतः पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासह अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग व शाखा अभियंते तसेच तांत्रिक नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटावर सज्ज होते. सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रामुख्याने वीजसुरक्षेसाठी अविश्रांत कर्तव्य बजावत होते. पुणे शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्त्यावर तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षातून इतर सर्व सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यात येत होता. वीज पुरवठा व सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवाची निर्धोक सांगता झाली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप

भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टीने मिरवणूक ठरली लक्ष वेधक

पुणे :
रत्नजडीत रथाला पुष्पांची आकर्षक सजावट, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, भंडाऱ्याची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्ठी आणि ढोल ताशांचा गजरात व मोरया मोरया जयघोषात दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
अनंत चतुर्दशीला शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता रत्न महालातून बाप्पा विराजमान झालेला ‘श्री गणेशरत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ‘श्री गणेशरत्न रथाचे सारथ्य केले. रात्री अकरा वाजता बेलबाग चौकात रंगारी बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगारा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ श्रीराम आणि रमणबाग यांच्या यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली.

पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ‘श्री गणेशरत्न रथ’ टिळक चौकात आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा व उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या हौदात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

श्री गणेश रत्नरथाची आकर्षक सजावट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक १३४ वर्षांपासून पारंपारिक रथात केली जात होती. मात्र, गतवर्षी पासून विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी आकर्षक रथ तयार केला जातो. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रस्टने श्री गणेशरत्न रथ’ तयार केला होता. रत्नजडीत रथावर पिंक वेलवेट फुलांची करण्यात आलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि त्यावरील रंगारी बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे हा रथही भाविकांचे लक्ष वेधून घेत होता, हजारो भाविकांनी त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली.

“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. आमच्या मंडळासाठी जो मिरवणुकीचा कालावधी निश्चित केला होता, त्यापेक्षा कमी कालावधीत विसर्जन मिरवणूक संपवून आम्ही पोलिस प्रशासनाला दिलेला शब्द पाळला. मात्र, आम्हाला दिलेल्या वेळेनुसार मिरवणुकीत सहभागी होता आले असते तर बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नसती. मात्र, हा संपूर्ण गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!

– पुनीत बालन (विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)

न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

0

मुंबई,: मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, लोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थान, झारखंड, दिल्ली, अलाहाबाद, कर्नाटक व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. चंद्रशेखर यांचा जीवन परिचय

न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी सन १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर येथून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली आणि ९ डिसेंबर १९९३ रोजी दिल्ली राज्य बार कौन्सिलमध्ये वकिली व्यवसायासाठी नोंदणी केली.

दिल्ली येथे त्यांनी फौजदारी तसेच दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये वकिलीला सुरुवात केली.

१९ वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी विविध न्यायालयांमध्ये सुमारे ३५०० खटले लढविले, ज्यांपैकी बहुतेक सर्वोच्च न्यायालयात होते.

सर्वोच्च न्यायालयातील १४० निवाडे अहवालित झाले असून त्यामध्ये ते वकील म्हणून उपस्थित होते.

त्यांनी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि झारखंड राज्य यांचे सर्वोच्च न्यायालयात स्थायी वकील म्हणून काम केले. तसेच बिहार राज्य गृहनिर्माण मंडळ, बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, झारखंड राज्य वीज मंडळ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि इतर अनेक महामंडळे, संस्था यांचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते काही खासगी कंपन्यांचे कायमस्वरूपी वकील होते.

त्यांची नियुक्ती १७ जानेवारी २०१३ रोजी झारखंड उच्च न्यायालय, रांची येथे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली आणि २७ जून २०१४ रोजी झारखंड उच्च न्यायालय, रांची येथे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून करण्यात आली. त्यांनी २९ डिसेंबर २०२३ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

त्यानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.

मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला नोएडा येथून अटक

0

नोएडा -अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असे आहे, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. आरोपीला नोएडाच्या सेक्टर-११३ येथून पकडण्यात आले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

खरंतर, गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश मिळाला. त्यात दावा करण्यात आला होता की, लष्कर-ए-जिहादीचे १४ दहशतवादी शहरात आले आहेत. दहशतवादी ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स पेरून मोठा स्फोट घडवणार आहेत, ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला. गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इतर सुरक्षा संस्थांनाही सतर्क करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत २१,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

मुंबईतील विविध समुद्रकिनारे, इतर जलकुंभ आणि २०५ कृत्रिम तलावांमध्ये किमान ६,५०० सामुदायिक गणेशमूर्ती आणि १.७५ लाख घरगुती मूर्तींचे विसर्जन केले जाईल. पोलिसांनी मुंबई मनपाच्या मदतीने सुरक्षेची तयारी केली आहे, असे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.