Home Blog Page 141

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

मातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरण अशा एका पेक्षा एक वैशिष्ट्यांनी सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘नाच मोरा…’ या श्रवणीय गीताने रसिकांच्या मनावर गारूड केल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादांची सुरेल किनार जोडलेला हा टिझर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हिंदीत काम केलेले आलोक जैन यांनी केले आहे. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेच्या मुखातून उमटणारा “जन्म आपल्या हातात नसतं, असतं ते फक्त जगणं…” हा जीवनाचा तत्त्वज्ञान सांगणारा संवाद टिझरची सुरुवात करतो. त्यानंतर टिझर जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मांडतो. याच दरम्यान मानसी नाईकची एन्ट्री होते आणि तिच्या संवादातून नायकाला सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा मिळते. उत्कंठावर्धक शेवटामुळे टिझर अधिक प्रभावी ठरतो. सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची केमिस्ट्री, सुबोधचा नवा लुक आणि मानसीचे ग्लॅमर यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटाचे संगीत गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी दिले असून गीतकार अभिषेक खणकर यांची प्रभावी गीते हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली संगीतप्रेमींना सादर केली जात आहेत. ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी संवादलेखन केले आहे, तर छायांकन सुनील पटेल यांचे आहे. वितरणाची जबाबदारी सिनेपोलीसने सांभाळली आहे.

टिझरमुळे आधीच उत्सुकतेची लाट उसळली असून, प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ प्रेक्षकांना केवळ कथानक नाही तर भावनांचा प्रवास, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी आणि पडद्यावर घडणारा काव्यमय अनुभव देईल, असा विश्वास अधिकच दृढ होत आहे.

‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’मधील सुबोध भावेचा हटके लूकही रिव्हील करण्यात आला आहे. लांब केस, वाढलेली दाढी अशा लुकमधील सुबोध या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. सुबोध भावेच्या हटके लूकसोबत आणि गुलाबी साडीतील मानसी नाईकच्या लयबद्ध ठेक्यांसह साकारलेली त्यांची केमिस्ट्री या गाण्याचे मुख्य आकर्षण ठरते. मध्य प्रदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बॉलिब्रदर्सचे फिरोज खान यांनी केले आहे. या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर, संगीतकार रोहित राऊत (इंडियन आयडल ११ चे रनर-अप) असून, गायिका जुईली जोगळेकर हिने आपल्या सुमधुर आवाजाने गाण्याला अधिक उठावदार बनवले आहे.

शीर्षक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असलेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटातील वैशिष्ट्ये एकामागून एक प्रेक्षकांसमोर उलगडत आहेत, आणि ‘नाच मोरा…’ हे गाणे त्यातील पहिले आणि आकर्षक पाऊल ठरते.

हा चित्रपट वेगळ्या आशयावर आधारित असून, मराठी प्रेक्षकांना नवी झलक देण्यास सज्ज आहे. आलोक जैन दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावेच्या खास लूकची चर्चा रंगली आहे, तर मानसी नाईकसोबतची त्यांची जोडी कथेला नवा रंग भरते. या चित्रपटाचे संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून, छायांकनाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे.

सिनेपोलीस वितरित करणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अजित पवार सिंचन घोटाळ्याचे मुख्य भ्रष्टाचारी :त्यांचे पाप लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले

विजय पांढरेंचा गंभीर आरोप
मुंबई-अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार तुरुंगात गेले असते, असे वक्तव्य विजय पांढरे यांनी केले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात विजय पांढरे हे जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे.

विजय पांढरे यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट करत अजित पवारांवर आरोप केले आहेत. विजय पांढरे म्हणाले, अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार होते. त्याप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी कॉंग्रेसने अजित पवारांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले. जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली होती. पण त्यावेळी चितळेंनी पळपुटेपणा केला. त्यांनी अहवालात गोष्टी होत्या तशा नीटपणे मांडल्या नाहीत. त्यामुळे सरकारला या प्रकरणात संधी मिळाली, असे पांढरे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना विजय पांढरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीनचिट देण्याचे काम केले. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीनचिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही, ही खरी अडचण असल्याचे पांढरे यांनी म्हटले आहे.

माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमूद केल्या होत्या. माधवराव चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, या प्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे, अशी माहिती विजय पांढरे यांनी दिली आहे. तसेच सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र अजित पवारांचे जलसिंचन घोटाळ्याचे काम लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यात शंका नाही, असा आरोप पांढरे यांनी केला आहे.

स्वच्छता कर्मचारी हे पुणे शहराचे खरे हिरो-पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले 

 अखिल मंडई मंडळाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’
पुणे : गणपती विसर्जनाच्या उत्साही सोहळ्यानंतर जी स्वच्छता आपल्याला दिसते ती आपोआप होत नाही. त्याच्या मागे सफाई कर्मचाऱ्यांची  रात्रंदिवस केलेली मेहनत असते. पावसामुळे झालेली घाण, दुर्गंधी, कचरा यांना तोंड देत पहाटेपासून त्यांचे काम सुरू होते. त्यांच्याकडून होणारे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या श्रमाचा मान राखून सफाई कर्मचाऱ्यांचा आपण आदर करायला हवा, शहराचे ते खरे हिरो आहेत, असे मत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणूकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सवातील सजीव देखावा क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान देखील करण्यात आला.  लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजेश कराळे, तुषार शिंदे, सुरज थोरात, विकी खन्ना, नारायण चांदणे यावेळी उपस्थित होते. भेटवस्तू, मानाचे उपरणे, मिठाईचा डबा असे सन्मानाचे स्वरूप होते.

किरण ठाकूर म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. सण हे केवळ उत्साहाचे नव्हे तर राष्ट्रभक्ती जागवण्याचे माध्यम आहेत. हिंदुस्तान विश्वरूप बनण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज दुर्दैवाने सुशिक्षित लोकसुद्धा रस्त्यावर कचरा करतात. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अण्णा थोरात म्हणाले, विसर्जन मिरवणुकीनंतर शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसते. रस्त्यांवर फुलांचे हार, प्लास्टिक व खाण्याची पाकिटे, रिकाम्या बाटल्या पडलेले दिसतात मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळे काही तासांतच पुण्याचे रस्ते पुन्हा चकचकीत होतात. या कर्मवीरांचा सन्मान राखणे आणि त्यांचे मनापासून आभार मानणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

वी ने पुण्यात ५जी सेवांचा केला शुभारंभ

पुणे –-वी उद्यापासून पुण्यामध्ये ५जी सेवा सुरु करत आहे. गेल्या महिन्यात वी ने नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या ५जी सेवा सुरु केल्या. वी च्या अत्याधुनिक कनेक्टिविटीचा अनुभव आता पुणेकरांना देखील घेता येणार आहे. वी ने भारतामध्ये आपल्या ५जी नेटवर्कची सुरुवात मुंबईपासून मार्च २०२५ मध्ये केली. आता पुणे हे वी ची ५जी कनेक्टिविटी असलेले महाराष्ट्रातील पाचवे शहर आहे. वी ला जिथे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे त्या १७ प्रायॉरिटी सर्कल्समधील २३ शहरांमध्ये ५जी विस्तार करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे, त्याचाच हा एक भाग आहे.

पुणे शहराच्या आधी वी ने आपल्या ५जी सेवा मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगलोर, म्हैसूर, नागपूर, चंदिगढ, पटना, जयपूर, सोनिपत, अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मेरठ, मलप्पुरम, कोझिकोडे, विशाखापट्टणम, मदुराई, आग्रा, कोची आणि थिरुवनंतपूरममध्ये सुरु केल्या आहेत.

ज्यांच्याकडे ५जी-सक्षम डिव्हायसेस आहेत असे पुण्यातील वी युजर्स उद्यापासून वी ५जी सेवा वापरू शकतील. शुभारंभाच्या निमित्ताने वी आपल्या युजर्सना २९९ रुपयांपासून पुढील किमतीच्या प्लॅन्सवर अनलिमिटेड ५जी डेटा पुरवत आहे. हाय-डेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअल-टाईम क्लाऊड ऍक्सेस यांचा आनंद वी ग्राहक घेऊ शकतील.

वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर, श्री रोहित टंडन यांनी सांगितले, “पुण्यामध्ये वी ५जी सुरु करत असताना, आम्ही दक्खनच्या राणीला कनेक्टिविटीच्या भविष्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमचे अत्याधुनिक ५जी आणि सर्वत्र पसरलेल्या ४जी सेवा यांच्यासह आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय व प्रगत अनुभव मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या मागण्या आणि ५जी हॅन्डसेट्सचा वाढता वापर यांना अनुसरून, आमच्या ५जी सेवा अतिशय पद्धतशीरपणे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट ५जी अनुभव मिळवून देण्यासाठी वी ने एरिक्सनसोबत हातमिळवणी करून, प्रगत, ऊर्जा बचत सक्षम पायाभूत सोयीसुविधा तैनात केल्या आहेत व नेटवर्क कामगिरी स्वयंचलित पद्धतीने ऑप्टिमाइज करण्यासाठी एआय-सक्षम सेल्फ-ऑर्गनायजिंग नेटवर्क्स कार्यान्वित केली आहेत.

५जी सेवा सुरु करण्याबरोबरीनेच, वी ने महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये त्यांचे ४जी नेटवर्क देखील लक्षणीयरीत्या अपग्रेड केले आहे. त्यामुळे वाढलेले कव्हरेज, जलद डेटा स्पीड आणि एकूणच उत्कृष्ट युजर अनुभव मिळेल. मार्च २०२४ पासून, त्यांनी ७,९०० हून अधिक साइट्सवर ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम यशस्वीरित्या तैनात केले आहे, त्यामुळे इनडोअर कव्हरेज मजबूत झाले आहे. ७,००० हून अधिक साइट्सवर २१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम क्षमता वाढेल. याव्यतिरिक्त, २२०० शहरांमध्ये २१०० हून अधिक नवीन साइट्स जोडल्या गेल्या आहेत. हे अपग्रेड शहरी आणि ग्रामीण भागात सातत्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या वी च्या वचनबद्धतेवर भर देतात.

ग्राहक आणि व्यवसायांच्या विकसित होत असलेल्या डिजिटल गरजा पूर्ण करणारे भविष्यासाठी तयार नेटवर्क तयार करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि पूरक डिव्हाइसेसबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.myvi.in/5g-network ला भेट द्या.

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेऊ-पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे-
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन ढोल ताशा पथक यांच्याकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी पत्रकार यांच्या वार्तांकनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांना वार्तांकन योग्य प्रकारे करता येईल तसेच पत्रकारांची सुरक्षा देखील राहील याची पुरेशी काळजी आगामी काळात घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकी दरम्यान ढोल ताशा पथक यांचे नियमन करण्यासाठी आगामी काळात विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाईल. पथकातील सदस्य संख्या मर्यादित राहावी यासाठी ढोल ताशा पथक संघटना आणि गणेश मंडळे यांना देखील सूचना दिल्या जातील. महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई देखील तात्काळ करू असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले. पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जे पोलीस पासेस दिलेले असतात त्यानुसार, नियमित वार्तांकन करण्याची मुभा देखील असते याची कल्पना संबंधितांना दिली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात योग्य प्रकारे वार्तांकन पत्रकारांना करता यावे यादृष्टीने कार्यक्रमांपूर्वीच योग्य प्रकारे चर्चा विनिमय करून आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.

ॲड. आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज : भारत सासणे

आडकर फौंडेशनतर्फे डॉ. संजय चोरडिया यांचा ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने गौरव
पुणे : सर्वांगिण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नैतिकता जपणे आवश्यक आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचले पाहिजे. ॲड. भास्करराव आव्हाड यांच्याप्रमाणे सामाजिकतेचा आग्रह धरत ज्ञान देण्याची वृत्ती असणाऱ्या प्रकाशवाटेची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांनी केले. सर्वांगिण विकास साधताना संवेदनशीलता आणि बंधुता जपत दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य डॉ. संजय चोरडिया करीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांचा सोमवारी (दि. 8) गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण भारत सासणे यांच्या हस्ते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, डॉ. सुषमा चोरडिया महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
भारत सासणे पुढे म्हणाले, आजच्या सामाजिक नैराश्येच्या वातावरणात आपण सर्वच पातळींवर विभाजित होत आहोत. अशा परिस्थितीत सुसंवाद, शांतता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दर्जेदार, आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले पाहिजे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संविधानातील तरतुदी, मुलभूत अधिकार याविषयी ज्ञान मिळणे आवश्यक आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, कायद्याचे देव समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या नावे मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. ॲड. आव्हाड यांनी समाजासाठी अखंडितपणे कार्य केले. ते आदर्श शिक्षकही होते. त्यांच्या संकल्पनेनुसार मूल्याधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ॲड. आव्हाड हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा पुरस्काररूपी आशीर्वाद मी आनंदाने स्वीकारत आहे.
सचिन ईटकर म्हणाले, ॲड. आव्हाड हे वैचारिक दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या संवेदनशील डॉ. चोरडिया यांना पुरस्कार देण्यात आला ही अभिनंदनीय बाब आहे. ॲड. आडकर यांनी आपले गुरू ॲड. आव्हाड यांचा कृतज्ञतेचा वारसा जपत गुरूंच्या नावे पुरस्कार सुरू केला याचा विशेष आनंद आहे.
ॲड. अविनाश आव्हाड म्हणाले, माझे वडिल व ॲड. आडकर यांचे नाते कौटुंबिक होते. वडिलांमधील अनेक पैलू मला त्यांच्यामुळे समजले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ॲड. आडकर यांनी वडिलांच्या नावे पुरस्कार सुरू करून आदर्श निर्माण केला आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. ॲड. आव्हाड हे फक्त कायद्याच्या क्षेत्रातच नव्हे तर समाजकारण, साहित्य, काव्य अशा अनेकविध क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पुरस्काराचे वितरण केले जात आहे.
परिचय राजकुमार सुराणा यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन वैजयंती आपटे यांनी केले. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांचे होते.

करसल्लागारांची सरकारकडे आर्त हाक; ITR व टॅक्स ऑडिट रिपोर्टसाठी मुदतवाढीची मागणी

पुणे/पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी), : पिंपरी-चिंचवड भाजपा चार्टर्ड अकाउंटंट्स सेल (BJPCA Cell) तर्फे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देऊन आयकर विवरणपत्रे (ITR) आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TAR) सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या करदात्यांची संख्या, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, तसेच पावसामुळे विस्कळीत झालेले कामकाज या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुणे विभागात 2018-19 मध्ये सुमारे 75 लाख करदाते होते. सततच्या वाढीमुळे 2024-25 या आर्थिक वर्षात हा आकडा दीड कोटींवर पोहोचल्याचा अंदाज आहे. इतक्या प्रचंड संख्येतील करदात्यांचे काम सांभाळण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सना अधिक वेळ मिळणे गरजेचे असल्याचे सनदी लेखापाल बबन डांगले यांनी सांगितले.

सध्या नॉन-ऑडिट आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही मुदत ठरविण्यात आली असून ऑडिट प्रकरणांतील आयटीआर 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरायचे आहेत. मात्र, प्रत्यक्षात या तारखा पूर्ण करणे कर व्यावसायिकांसाठी कठीण ठरत असल्याचे भाजपा सनदी लेखापाल आघाडीचे (सीए सेल) पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष बबन डांगले यांनी स्पष्ट केले.

भाजपा CA सेलचे सचिव शैलेश बोरे म्हणाले की, आयटीआर युटिलिटीज आणि टॅक्स ऑडिट स्कीमा उशिरा प्रसिद्ध झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले. पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे लॉगिन फेल्युअर, अपलोड एरर्स, ई-व्हेरिफिकेशनमधील अडचणी कायम आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत येणारे सण-उत्सव आणि अलीकडील अतिवृष्टीमुळे उपलब्ध कामाचे दिवस मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. याशिवाय जीएसटी, एमसीए यांसारख्या इतर अनुपालनांचा वाढलेला भारही मोठा अडथळा ठरत आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून नॉन-ऑडिट ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरवरून 30 सप्टेंबरपर्यंत, टॅक्स ऑडिट रिपोर्टची तारीख 30 सप्टेंबरवरून 30 नोव्हेंबरपर्यंत आणि ऑडिट प्रकरणांतील आयटीआरची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरवरून 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित मुदतवाढ मिळाल्यास करदाते आणि करसल्लागार दोघांनाही दिलासा मिळेल. तसेच कर अहवालांची अचूकता आणि दर्जाही सुनिश्चित होईल. या मागणीवर वित्त मंत्रालयाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या वरदहस्ताने बाजार समितीमध्ये 200 कोटींचा भ्रष्टाचार:आमदार रोहित पवार यांचा थेट आरोप

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात

पुणे-पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातूनही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या गैरव्यवहारावर पांघरून घातलं जावं म्हणून अधिकारी आणि मंत्र्यांपर्यंत हप्ते जातात अशी चर्चा, असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी सरकारला 15 दिवसांची मुदत देखील दिली आहे. अन्यथा शेतकऱ्यांसोबत मोठं आंदोलन केलं जाईल, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि सदस्य यांच्या संगनमताने इथं सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाऱ्यांना मा. अजितदादा यांचा वरदहस्त असल्याचं तेच सांगत असल्याने अजितदादांनीही याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी प्रवक्ते विकास लवांडे हे उपस्थित होते.

श्री. विकास लवांडे हे गेल्या अनेक दिवसांपासून या भ्रष्टाचारावर आवाज उठवत आहेत. बेकायदा भाडे वसुली (जी ५६ गैरव्यवहार), ४ हजार लोकांना अनधिकृत परवाना, अनधिकृतपणे बाजार समितीच्या जागा भाड्याने देणे, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत भ्रष्टाचार, गाळ्यांचे अनधिकृत वाटप, शेतकऱ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे बंद करुन त्या जागा अनधिकृतपणे सलून किंवा गुटखा विक्रीसाठी देणं, संचालकांकडूनच पार्कींगच्या नावाखाली केली जाणारी लूट, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार, गुंडांचा सर्रास वापर, यातून व्यापाऱ्यांना होणारा त्रास, स्वच्छता कंत्राटात गैरव्यवहार असे अनेक प्रकारचे गैरव्यवहार या बाजार समितीत सर्रासपणे सुरु आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी डीडीआर जगताप यांची नेमणूक केली असली तरी तेच गैरव्यवहारात अडकले आहेत. गैरव्यवहाराच्या या प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला असतानाही पणन संचालकांकडून पारदर्शकपणे चौकशी होत नाही.

कळस म्हणजे गैरव्यवहारावर पांघरून घातलं जावं म्हणून अधिकारी आणि मंत्र्यांपर्यंत हप्ते जातात अशी चर्चा आहे. त्यामुळं पुढच्या १५ दिवसांत सरकारकडून याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांसोबत मोठं आंदोलन केलं जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी.

“कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाल्याची भावना – डॉ. नीलम गोऱ्हे”

0

कोणार्क (ओडिशा) : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या इतिहास, शिल्पकला व सांस्कृतिक वारशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “कोणार्क मंदिरातील हजारो शिल्प, प्रभात सूर्याचे अप्रतिम चित्रण, हत्तींची सुमारे दोन हजार शिल्पे आणि महिलांच्या, सामान्य जनतेच्या तसेच राजघराण्यांच्या जीवनाशी संबंधित शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचे अनमोल वैभव आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, १९०१ साली ब्रिटिशांच्या लक्षात आलेले हे मंदिर तेव्हा ‘पॅगोडा’ म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याचे खरे स्वरूप समोर आले. १९८४ मध्ये भारत सरकारने या मंदिराचा संपूर्ण कारभार पुरातत्त्व विभागाकडे सोपविला. महाराष्ट्रातुन मराठा राजे ओरिसात आले तेंव्हा मंदिराची मोठ्या प्रमाणात भग्नावस्था झाल्याचे पाहुन कोणार्क मंदिरातील ‘अरुण स्तंभ’ त्यांनी जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरात हलविला होता असेही तेथील गाईडने आम्हाला सांगितले.
“आपल्या पूर्वजांनी केलेल्या या कर्तृत्वाचा अभ्यास इथल्या लोकांनी उत्तम रीतीने जपून ठेवला आहे. तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच आज आपण जे कार्य करत आहोत, त्याचा इतिहासात काय ठसा उमटणार आहे, याचाही विचार इथे आल्यावर मनात जागृत होतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी भारत सरकारच्या जी-२० परिषदेच्या वेळी या मंदिराचा घेतलेला संदर्भ व त्यातून परराष्ट्र संबंध दृढ करण्याच्या झालेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

हजरत महंमद पैगंबर यांची जयंती:डिजे विरहीत मिरवणुकीचे सर्वत्र स्वागत

पुणे : सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने  साजरी करण्यात आली . यंदाची वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सिरत कमिटीच्या वतिने आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून झाली. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार , पोलिस उपायुक्त विवेक मासाळ , मौलाना ज़मीरुद्दिन, मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना खालिद निजामी, मौलाना गुलाम अहमद खान , रफीउद्दिन शेख ,माजी आमदार मोहन  जोशी, रिपब्लिकन सोशालिस्ट पाक्षाचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत जगताप , माजी नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, सिराज बागवान, जावेद खान, आबिद सय्यद , जावेद शेख , हाजी नजीर तांबोळी , आसिफ शेख , सूफियान कुरैशी आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुण्यातील सिरत कमिटी पदाधिकारी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पदमजी पोलिस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशिद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद विंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गांनी मिरवणूक निघून शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे समाप्त झाली. 

यावेळी जवळपास सर्च प्रमुख चौकांत विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतिने मिरवणुकीचे सावागत करण्यात आले. डि जे विरहीत हि मिरवणुक निघाल्याने नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले.

दरम्यानपैगंबर जयंतीचे १५०० वे वर्ष लक्षात घेवुन सिरत कमिटीच्या वतिने शहरातील विविध भागात वरिषभर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जाणार असल्याचे सिरत कमिटीचे सिराज बागवान व जावेद शेख यांनी सांगितले.

काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

मंडल आयोग, कालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले

मुंबई- ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. उपाध्ये यांनी काँग्रेसच्या ओबीसी विरोधी चेहऱ्याचा पर्दाफाश केला. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या कल्याणाला विरोध करणारे काँग्रेसचे राहुल गांधी, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते आज ओबीसी समाजाला भडकवण्याचे पाप करीत आहेत असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी 6 सप्टेंबर 1990 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात विरोध दर्शविला होता, याची आठवणही श्री. उपाध्ये यांनी यावेळी करून दिली. काँग्रेसच्या ओबीसी विरोधी इतिहासाचे वेगवेगळे दाखले देत श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, 1955 मध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी काका कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीपुढे आणलाच नाही. हा अहवाल धूळ खात कुजवत ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले. मंडल आयोगाबाबत काँग्रेसने याच पद्धतीचे राजकारण केले. मंडल आयोगाच्या शिफारशी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कधीच अंमलात आणल्या नाहीत. हे दोन्ही अहवाल कुजवत ठेवून काँग्रेसने आपण ओबीसींचे विरोधक आहोत हेच दाखवून दिले होते. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस मध्येच होते. त्यांनीही काँग्रेसचे ओबीसी विरोधी राजकारण मुकाटपणे सहन केले, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.
भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाच्या विकासाचा आग्रह धरला आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने केली. मोदी सरकारच्या काळातच ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला, असेही श्री. उपाध्ये यांनी निदर्शनास आणून दिले.

जीएसटी दर कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मिळणार चालना-भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम

0

मुंबई- केंद्र सरकार ने वस्तू व सेवा करात (जीएसटी) केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, देशाच्या व्यापार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होऊन, नवीन रोजगार निर्मिती होईल, सर्वसामान्य जनतेवरचा बोजा कमी होईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
श्री. इस्लाम म्हणाले की, 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा युपीए सरकारच्या कृपेने अर्थव्यवस्था डबघाईला आली होती, त्यात वाढ होण्याची चिन्हे नव्हती,धोरण लकवा, भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. करसंकलानाची प्रक्रिया क्लिष्ट होती, पारदर्शक नव्हती. अशा कमकुवत स्थितीतील अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने उभारी दिली आहे, जगातल्या सर्वात पाच दुबळया अर्थव्यस्थेतून भारतीय अर्थव्यवस्था ‘टॉप फाइव्ह’ मधील एक बनली आहे, हे मोदी सरकारचे यश आहे. नुकत्याच केलेल्या जीएसटी सुधारणा अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणार आहेत. सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय, त्यांच्या मूलभूत गरजा आणि आकांक्षा हे जीएसटी सुधारणांचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. जीएसटी दरांच्या सुलभतेमुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकाळात फायदा होऊन महागाई नियंत्रणात राहण्यासही मदत होईल असे श्री. इस्लाम म्हणाले.

मोदी सरकार विकासाचे राजकारण करणार
जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला मग तिथे सरकार कोणाचेही असो, तिथल्या प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना, लहानमोठ्या सर्व उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. जीएसटी सुधारणेर्वरून बीडी आणि बिहार हे दोन्ही शब्द ‘बी’ नी सुरू होणारे आहेत असे कुत्सितपणे म्हणत हिन दर्जाचे राजकारण करणा-या काँग्रेसवर ही त्यांनी ताशेरे ओढले. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला जडली आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यांचे हीन दर्जाचे राजकारण लखलाभ, मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत रहाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाहीत मग ४०० कोटीच्या अनामिक जाहिरातींचे रहस्य काय?

पुणे- अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेताना फोटो असणारी एक जाहिरात नुकतीच विविध वर्तमान पत्रांतून आणि टीव्हीवरील विविध वाहिन्यांवरून झळकली आहे. त्यात फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहेत. या जाहिरातीत ती देणाऱ्यांचे नाव नाही, या अनामिक जाहिरातीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा सुरु झाली आहे,औचित्य काय , कोणी , कोणासाठी या जाहिराती गणेश विसर्जनाच्या दिवशी दिल्या अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता.
रोहित पवार या प्रकरणी सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, बावनकुळे साहेब, तुम्ही रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटींच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?

https://twitter.com/RRPSpeaks/status/1964532762184208406

या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?

या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर, असे ते म्हणाले होते.

मालेगावहून पुण्याचे गणपती पाहायला आले आणि १३ जणांचे मोबाईल चोरले -दोघांना पोलिसांनी पकडले

पुणे- गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश भक्तांचे खिशातील मोबाईल फोन गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणा-या दोन भुरट्याना पोलिसांनी शिताफिने अटक करुन,त्यांच्याकडून १३ वेग-वेगळ्या कंपनीचे महागडे फोन जप्त केले ज्यांची किंमत सुमारे पावणेदोन लाकाहाच्या आसपास आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०६/०९/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत रोजी पुणे शहरामधील मध्यवर्ती भाग बेलबाग चौक, लक्ष्मीरोड, बुधवार चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुक बधण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यादरम्यान दिनांक ०७/०९/२०२५ रोजी रात्रौ ०२.३० ते ०३.३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे व त्यांचे दोन मित्र यांचे खिशातील मोबाईल फोन अज्ञात इसमाने चोरी केल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये दाखल होताच फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे तसेच तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्यानंतर तपास अधिकारी महेबुब मोकाशी व तपापथकातील पोलीस अमंलदार तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, मनिषा पुकाळे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार व चेतन होळकर यांचेसह अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना तपास पथकातील पोलीस अमंलदार तानाजी नांगरे व गजानन सोनुने यांचे गोपनीय बातमी वरुन, दिनांक ०७/०९/२०२५ रोजी मोठ्या प्रमाणात गर्दीतुन शिताफीने पासोड्या विठोबा मंदीराजवळ पुणे येथुन तपास पथकातील पोलीस स्टाफचे मदतीने अलीम मुस्ताक शेख वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. ६ समोर, अमिन किराणा दुकानाजवळ, मालेगांव जिल्हा नाशिक , अत्तर अहमद एजाज अहमद वय २५ वर्षे, रा. मुस्लीम नगर, बी-गल्ली नं. ५. सर्व्हे नं. १५९ प्लॉट नं. १६ बडे कब्रस्थान जवळ, मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेवुन, त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन, त्यांचे ताब्यातुन एकुण १३ नग वेग-वेगळ्या कंपनीचे महागडे फोन जप्त करुन, असा सर्व मिळुन १,७८,०००/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्हयाचा तपास सहा. पोलीस उप-निरीक्षक महेबुब मोकाशी, हे करीत आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परि-१ कृषिकेश रावले, सहा. पो. आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) उत्तम नामवाडे, पो.नि. (गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, सहा. पोलीस-उप निरीक्षक महेबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर तसेच पोलीस अमंलदार तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिदे, प्रशांत पालांडे, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, वशिम शेख, म.पो. अंमलदार मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केलेली आहे.