Home Blog Page 140

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मराठीतील  नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी  फुटली  हा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोहळा  नुकताच संपन्न झाला. नामवंतांची उपस्थिती, सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव  आणि वेगवेगळ्या धमाकेदार  परफॉर्मन्सच्या सादरीकरणाने  या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत.

‘आतली बातमी फुटली’ हा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा एका खूनाच्या  सुपारीच्या रहस्यभेदाभोवती  फिरते. ही  खूनाची सुपारी नेमकं कोणतं वळण घेणार? या वळणावर कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा म्हणजे आतली बातमी  फुटली हा सिनेमा नातेसंबधावर भाष्य करतानाच प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट उलगडून दाखवतो. जीवनात प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो. त्यामुळे दुसऱ्याचा दृष्टीकोन हा आपल्याला नेहमीच वेगळा वाटतो. हा दृष्टीकोन कधी पटतो तर कधी पटत नाही. यावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ चित्रपट धमाल आणणार आहे.

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक  विशाल पी. गांधी  सांगतात, ‘माझा जन्म मुंबईतला  त्यामुळे मराठी कलाकार आणि  मराठी  चित्रपटाचे विषय या सगळ्याबद्दल मला कायमचं आकर्षण राहिलं आहे.  चित्रपटाचा आशय  हे  मराठी  चित्रपटाचं बलस्थान  राहिलं आहे.  त्यामुळे  मनोरंजक आणि तितकाच दर्जेदार आशय आणताना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी ‘आतली बातमी  फुटली’  या चित्रपटातून केला आहे. हा  चित्रपट  सिच्युएशनल  कॉमेडी असून प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेला हा धमाल मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास  निर्मात्या  ग्रीष्मा अडवाणी,  सहनिर्माते अम्मन अडवाणी यांनी व्यक्त केला.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेश करणारं झालंय. या चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेसं संगीत प्रत्येकाला नक्कीच आवडेल असं आहे. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, जालीम सरकार, ‘आतली बातमी फुटली’ हे रॅप अशी वेगवेगळ्या मुडची चार गाणी या सिनेमात आहेत. ही चारही गाणी सध्या सोशल माध्यमावर ट्रेंडिंग आहेत. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेल्या चित्रपटातली गाण्यांना जावेद अली, सुनिधी  चौहान, प्रेमराज  सोनाली सोनावणे,  एग्नेल रोमन  यांचा स्वरसाज लाभला असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील,  असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक  विशाल पी. गांधी  यांनी व्यक्त केला.

या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत.  चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

 १९ सप्टेंबरला  ‘आतली बातमी  फुटली’  हा चित्रपट  प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.  

‘शिवसंस्कार महोत्सव २०२५’चे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन 

0

‘शिवसंस्कार महोत्सव २०२५’चे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन — छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत विचारांना समर्पित ऐतिहासिक सांस्कृतिक महोत्सव मुंबईत सुरू

मुंबई, 9 सप्टेंबर २०२५ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन’ या आगळ्या-वेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार  यांच्या हस्ते संपन्न झाले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांचा ऐतिहासिक समावेश झाल्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीकडे जागतिक स्तरावर सर्वदूर अभिमानाने आणि औत्सुक्याने पाहिले जात आहे. रायगड, विजयदुर्ग, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, जिंजी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बारा दुर्ग ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ या संकल्पने अंतर्गत युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कालातीत मूल्ये भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दि. ८ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान विविध उपक्रमांसह मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई यांनी “शिवसंस्कार महोत्सव २०२५” आयोजित केला होता. हा महोत्सव इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचा एक सुंदर संगम ठरला.

शिवसंस्कार महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण म्हणून नव्हे, तर आजच्या नागरिकांसाठी, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकता या मूल्यांची आठवण करून देणारा एक जिवंत अनुभव असेल. सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई गेली १५ वर्ष हा अनमोल वारसा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे.

लेखक, गीतकार आणि या उपक्रमाचे अनिल नलावडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन केवळ लढाया आणि विजयांपुरते मर्यादित नाही; त्यात दूरदृष्टी, नीतिमत्ता, नेतृत्वाचे आणि राष्ट्राप्रती आपल्या कर्तव्याचे अमूल्य धडे आहेत. शिवसंस्कार महोत्सवाद्वारे आम्हाला ही मूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचवायची आहेत, जेणेकरून ते एक मजबूत आणि एकसंघ भारत घडविण्यास मोलाची भूमिका बजावतील.”

शिवसंस्कार महोत्सव २०२५ मध्ये मुंबईकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंना अनुभवण्याची संधी मिळाली. महोत्सवाची सुरुवात ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनाने’ झाली असून हे कलादालन दिनांक ७ ते १३ सप्टेंबरदरम्यान रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळ मजल्यावरील आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले होते. यात श्री. अनिल नलावडे यांनी अनेक वर्ष अभ्यास करून लिहिलेल्या व त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या १५० पेक्षा जास्त चित्रकाव्यरूप कलाकृतींचा समावेश होता. यातील काही व्यक्तिचित्र चित्रकार राम देशमुख यांच्याकडून तयार करून घेतली गेली होती, तर काही AI न्यूरल रेंडरिंगच्या माध्यमातून सईशा प्रोडक्शन्स, मुंबईने तयार केली होती.

 “सईशा प्रोडक्शन्स मुंबई यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आवाहन केलं आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसहित ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनाला’ नक्की भेट द्यावी. या प्रदर्शनातून त्यांना भारताचा समृद्ध इतिहास आणि राष्ट्रीय वारसा अनुभवता येईल.”

कार्यक्रम संचालक, दिग्दर्शक व निवेदक पद्मश्री राव म्हणाल्या, “हा महोत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांना पुन्हा नव्याने जाणून घेण्याची संधी – फक्त एक शूर योद्धा म्हणून नव्हे, तर दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि नैतिक शक्तीचा आधारस्तंभ म्हणूनही. कविता, गाणी आणि संवाद यांच्या माध्यमातून आम्ही इतिहास आणि आजचा काळ यांच्यातला संबंध अजून जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”

दि. ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान दररोज आयोजित होणाऱ्या ‘युद्धापलीकडले शिवराय ’ या चर्चा मालिकेचा विशेष भाग असेल. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आणि नेतृत्वावर प्रकाश टाकण्यात येईल. पद्मश्री राव आणि अनिल नलावडे हे महाराजांच्या विविध पैलूंवर माहितीपर सत्र घेणार आहेत. या माहितीपर सत्रासाठी दररोज ५० मर्यादित आसने असणार आहेत.

या चर्चासत्रांत पुढील विषयांवर सखोल विचारमंथन केले जाईल: बालपणी आईवडिलांनी दिलेल्या संस्कारातून शिवराय काय शिकले?, शिवरायांचे ⁠नेतृत्वगुण, ⁠युद्धनीती, रणनीती, दुर्गनीती, ⁠स्वराज्य आणि सुराज्य याचं महत्व, ⁠चारित्र्य आणि शीलवान व्यक्तिमत्त्व, ⁠शिवरायांचे व्यवस्थापनकौशल्य आणि माणसांमधली गुंतवणूक.

१४ सप्टेंबर रोजी ‘शिवराय जगतांना’ या कार्यक्रमात कविता, संवाद आणि अनप्लग्ड संगीत एकत्र आणून सह्याद्री, राजमाता जिजाऊ, किल्ले, दूरदृष्टी आणि स्वराज्य यांसारख्या विषयांचा शोध घेतला जाईल. तसेच, कला अकादमीच्या मिनी सभागृहात शिवचरित्रावर आधारित श्री. अनिल नलावडे यांनी लिहिलेल्या पाच नवीन गाण्यांचे प्रकाशन होईल. यात कलाकार श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, पद्मश्री राव आणि अनिल नलावडे  सहभागी होतील.

महोत्सवाचा समारोप १४सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या संगीतमय ऐतिहासिक कार्यक्रमाने होईल. ४३ नवीन रचनांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन सादर करणाऱ्या या पुरस्कारविजेत्या संगीतमय कार्यक्रमात नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, अनिल नलावडे आणि पद्मश्री राव सहभागी होतील. हा कार्यक्रम फक्त सशुल्क रू. १५०/- इतका असेल. याची तिकिटे बुकमायशो वर उपलब्ध आहेत. बाकी सर्व उपक्रम विनामूल्य आहेत.

हा महोत्सव फक्त कार्यक्रमांची मालिका नाही, तर विचार जागवणारा, प्रेरणा देणारा आणि समाजमनाला घडवणारा शिवसंस्कार आहे.

या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, शिवसंस्कारांची ऊर्जा स्वतः अनुभवा, सोबत इतरांना ही अनुभवण्यासाठी घेऊन या.. कारण ‘शिवचरित्र हा राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे.’

रामेश्वर रुई येथील एकमेवाद्वितीय मानवतातीर्थ भवनाचे महाद्वार व पवनपूत्र श्री हनुमान मूर्तीची स्थापना

  विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून साकार

पुणे, ९ सप्टेंबरः रामेश्वर रुई या गावाचे नुकतेच ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ’ असे नामकरण झाले. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’ या वास्तूची निर्मिती होय. विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे या भवनाचा लोकार्पण सोहळा ५, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई येथे होणार आहे. यावेळी देशभरातील विविध धर्मांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

त्याची पूर्व तयारी या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ च्या  ऐतिहासिक स्वरूपाचे संपूर्ण नक्षीदार लाकडी बांधकाम उभारण्याचा कार्यक्रम तसेच सदरील भवनाच्या आवारात पवनपुत्र श्री हनुमान यांचा भव्य व देखणा ११ फूट उंचीचा पुतळा स्थापन करण्याचे काम नुकतेच संपन्न झाले.
यावेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, रामेश्वर-रुईचे माजी सरपंच तुळशीराम दा कराड, काशीनाथ दा कराड, राजेश कराड आणि पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील ‘ विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनात’ विविध धर्माचे संस्थापक, जगाच्या इतिहासातील मान्यवर संत, सज्जन, वैज्ञानिक, विचारवंत, दार्शनिक यांचे सचित्र दर्शन माहितीद्वारे भवन सजविण्यात येऊन जगाला शांती व मानवतेचा संदेश देण्याचे कार्य करण्यात येणार आहे.
यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” महाराष्ट्रातील मराठवाड्यातील रामेश्वर रुई हे गांव यज्ञभूमी म्हणून परिचित आहे. याच गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जवळपास २७५ वर्षापूर्वी उध्वस्त केलेले श्रीराम मंदिर व सुमारे ६३ वर्षापूर्वी उध्वस्त करण्यात आलेली जामा मस्जिद व ख्याजा जैनुद्दिन चिश्ती दर्गा यांची पुनर्बांधणी केली. भारताच्या इतिहासातील सांप्रदायिक सद्भावनेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन यांची उभारणी केली आहे. अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध उपक्रमांमुळे हे गाव खर्‍या अर्थाने मानवतातीर्थ म्हणून जागतिक स्तरावर उदयास आले आहे.”
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६वीं तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान व साधी राहणी व उच्च विचार सरणी याचे मुर्तीमंत प्रतिक असलेले भारतरत्न श्री लाल बहाद्दुर शास्त्री यांची १०१वीं जयंती याचे औचित्य साधून सदरील विश्वशांती मानवता तीर्थ भवनाचे लोकार्पण योजण्यात आले आहे.
पंचक्रोशितील नागरिकांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक असणार्‍या या भवनाचा सद्उपयोग करावा, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

कृत्रिम वाळू निर्मितीसाठी अधिकाधिक व्यवसायिकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️ रिंगरोड, पुरंदर विमानतळासह विकासकामांना होणार मदत

पुणे, दि.९:
नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीचे शासनाचे धोरण लागू करण्यात आले असून, जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या मागणी-पुरवठा तुटवड्याचा विचार करता कृत्रिम वाळू निर्मितीकरिता अधिकाधिक व्यवसायिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कृत्रिम वाळू धोरण व अमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी उद्घाटन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, शार्या इन्फोटेकचे पदाधिकारी, पर्यावरण सल्लागार, प्रायव्हेट टेकचे प्रतिनिधी, खाणपट्टाधारक, क्रशरधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले की, महसूल व वन विभाग यांच्या २३ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये प्रथम पुढाकार घेणाऱ्या राज्यातील अधिवास असलेल्या आणि नोंदणी केलेल्या ५० संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्याकरिता उद्योग व महसूल विभागाच्या विविध सवलती मिळणार आहेत. महसूल व वन विभागाच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील रिंगरोड, पुरंदर विमानतळासह विकासाची विविध कामे वेगाने पूर्ण होऊ शकतील. मागणी व पुरवठा यामध्ये ताळमेळ बसविण्याकरिता प्रयत्न करता येतील. एम-सँड प्रकल्पाकरिता स्वामित्वधनामध्ये ४०० रुपये प्रति ब्रास इतकी सवलत शासनाने दिली असल्याचेही श्री. डुडी यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत सर्व संबंधित विभागांच्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. खाणपट्टाधारक व क्रशरधारक यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेत साधारणतः २०० इच्छुक व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे देखील दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

शेतकऱ्यांना ६.२५% जमीन परताव्याच्यासुलभतेसाठी पीएमआरडीएकडून संवाद मेळावा

पिंपरी (दि.९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आकुर्डीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात मंगळवारी ६.२५% जमीन परताव्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद मेळावा घेण्यात आला. सन १९७२ ते १९८३ या कालावधीत तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना ६.२५% परतावा कसा, मिळणार याबाबत जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित योजना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होण्याकडे एक महत्वाचे पाऊल आहे. यावेळी ६.२५% जमीन परताव्याची कार्यपद्धती व अर्ज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ज्या मूळ जमीनमालक मयत आहेत, त्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्रासह अर्ज करणे बंधनकारक आहे. १४ मार्च २०२४ या शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने पात्र शेतकऱ्यांना परतावा मिळावा, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार संबंधित बैठक घेण्यात आली.

संबंधित १०६ शेतकऱ्यांना ६.२५% जमीन परताव्याचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून पीएमआरडीएतर्फे वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. यात आतापर्यंत १७ शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला असून २ प्रकरणे पेपर नोटीसवर, १ सुनावणीसाठी तर ५ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. यात २९ प्रकरणात संबंधितांना त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, तहसीलदार अभिजित जगताप, विशेष भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले, व्हिडिओ कॉन्फरद्वारे भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, संगीता राजापूरकर-चौगुले आदी अधिकारी उपस्थित होते. शासन निर्णयाचा लाभ घेऊन संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा परतावा मिळवून देण्यासाठी पीएमआरडीए कटीबद्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अर्जदारांसाठी विशेष शिबिर
या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दाखले वितरित करण्यात आले असून उर्वरित अर्जदारांसाठी २५ व २६ सप्टेंबरला विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याचे भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले. यावेळी निगडी, चिखली, मोशी, रहाटणी, रावेत, आकुर्डी आदी गावातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची कार्यपद्धती समजून घेत त्यासाठी लागणारे कागदपत्रे, आपल्या अडचणी आणि त्यावर नियमानुसार काय उपाय आहेत यावर चर्चा करण्यात आली.

संबंधितांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
१. विहीत नमुन्यात अर्ज.
२. संपादनापुर्वी व नंतरचा ७/१२ उतारा व फेरफार
३. मुळ जमिन मालक मयत असल्यास मृत्युचा दाखला व दिवाणी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र
४. विशेष भूसंपादन अधिकारी यांचेकडील भूसंपादन दाखला.
५. भूमीसंपादन कायदा १८९४ चे कलम १८,२८,३० नुसार मोबदल्यात वाढ करणेबाबत संपादनाबाबत कोणत्याही कोर्टात दावा दाखल केले नसलेबाबत व वारसाबाबत रु.१००/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
६. रु.५००/- च्या स्टँप पेपरवर केलेले क्षतीपुर्ती बंधपत्र.

नेपाळसारखी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते:सावध रहा, संजय राऊतांचे ट्विट

मुंबई-भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे नेपाळ सरकारला जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. या अभूतपूर्व जनक्षोभामुळे नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळमधील या घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला एक इशारा दिला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1965372762178134074

संजय राऊत यांनी नेपाळमधील परिस्थितीचा दाखला देत, अशी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते, असे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, “Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”, यासोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, “आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवू पळवू मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय राऊत यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये हा व्हिडिओ शेअर करत, ही घटना कोणत्याही देशात होऊ शकते, असा इशारा दिला आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही टॅग केले आहे.

नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाले, यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणांचा रोष वाढला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले.

या हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. याशिवाय, पंतप्रधान ओली, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या खाजगी निवासस्थानांची तोडफोड केल्यानंतर जाळपोळ करण्यात आली. माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांनाही आग लावली.

माजी पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना मारहाण

निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना घरात घुसून मारहाण केली. त्याच वेळी, अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना काठमांडू येथील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली.

आतापर्यंत 22 मृत्यू, 400 जखमी

या हिंसक घटनांमध्ये, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. लष्कराने त्यांना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी नेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

युती सरकार तुटण्याचा धोका वाढला

प्रचंड दबावादरम्यान, नेपाळमध्ये युती सरकार तुटण्याचा धोका वाढला आहे. शेर बहादूर देउबा यांची नेपाळी काँग्रेस 88 जागांसह आणि केपी शर्मा ओली यांची सीपीएन (यूएमएल) 79 जागांसह जुलै 2024 पासून देशात एकत्रितपणे सरकार चालवत आहेत. आतापर्यंत सर्व राजीनामे नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0

मुंबई, दि. ९ : ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे. पर्यावरणपूरक मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

“व्हील्स ऑफ चेंज – अंडरस्टँडिंग ईव्ही ॲडॉप्शन फॉर मुंबई ऑटो अँड टॅक्सी ड्रायव्हर्स” कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री श्री. सरनाईक बोलत होते.

या कार्यक्रमास परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश ढाकणे, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पाई तसेच मान्यवर उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबईसह महाराष्ट्राला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

*दीड लाखाहून अधिक नागरिकांची जिल्ह्यात आरोग्य तपासणी

पुणे, दि.९:: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२५ राबविण्यात आले; या अभिनयात एकूण १ लाख ६५ हजार ७१८ महिला व पुरुषांनी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कालावधीत सुमारे २ हजार ५२५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याममध्ये ४ हजार ३०४ नागरिकांचे रक्तदान,५ हजार २५५ नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी, ३ हजार ६१३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
या शिबिरांत नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, महिलांचे आरोग्य, रक्त तपासणी, सर्वरोग निदान, रक्तदान शिबिरे तसेच आजाराविषयी मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.
या अभियानाचा उद्देश “गणेशोत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला प्राथमिक तपासणी व उपचाराची संध उपलब्ध करून देणे हा होता.
या अभियानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा, एमजेपीजेएवाय, सीएमआरएफ व धर्मादाय रुग्णालयांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समनव्यक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भिती आहे. नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही पण सरकार अदानी सारख्या भांडलदारांसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात कोणीही आंदोलन करु नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून १० सप्टेंबर व त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही.

0

बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ.

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू: अतुल लोंढे

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई दि.९ : – पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी – सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामाचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना २.० ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. मुंबईतील बी.डी.डी. चाळींच्या धर्तीवर बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत,असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नेरे,रोहकल, शिरूर बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल येथे प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

खराडी, पुणे येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.दापोडी येथील अशोक गृहनिर्माण संस्थेमधील पात्र सदस्यांना तेथील म्हाडाच्या २० टक्के आरक्षणानुसार सोडत न काढता योजनेत समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास (१) व गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे,म्हाडा पुणे चे मुख्याधिकारी राहुल साकोरे हे मंत्रालयातून तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम हे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते.

लोकअदालतीत जास्तीत जास्त सवलतीने वाहतूक दंड भरण्याची संधी

पुणे:हेल्मेट-सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे… अशा अनेक छोट्या वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून शनिवारपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या पुढाकारातून यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
….

खालील वाहतूक नियमभंगांचा दंड भरता येईल सवलतीत

  • विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
  • सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे
  • सिग्नल तोडणे
  • वेगमर्यादा ओलांडणे
  • चुकीचे पार्किंग
  • वाहन चालविताना मोबाइलचा वापर
  • विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
  • फिटनेस प्रमाणपत्र नसणे
  • चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
  • नंबरप्लेट नसणे
    ….

खालील गंभीर स्वरुपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड माफ होणार नाही

  • मद्यपान करून वाहन चालविणे
  • अपघात करून पळ काढणे
  • निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे
  • अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे
  • अनधिकृत शर्यत
  • गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
  • न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे
  • अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने
    …..

राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.

  • न्या. महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे
    ….

या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील; तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.

  • न्या. सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
    …..

PM पळाले ,आंदोलकांनी अर्थमंत्री व माजी PM ना पळवू-पळवू मारले; राष्ट्रपती, गृहमंत्र्यांची घरे जाळली-भारतातील नेपाळ दूतावासाची सुरक्षा वाढवली

0

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर केपी शर्मा ओली काठमांडूतून पळून जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या २ दिवसांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, भारतातील नेपाळ दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील नेपाळचा दूतावास बाराखंभा रोडवर आहे.

नेपाळमधील हिंसक घटनांदरम्यान पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा सादर केला. राजधानीतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नेपाळचे लष्करप्रमुख (सेनाप्रमुख) अशोक राज सिग्देल लवकरच राष्ट्राला संबोधित करणार आहेत. लष्करप्रमुखांचे हे भाषण अशा वेळी होत आहे जेव्हा पंतप्रधानांसह देशातील जवळजवळ सर्व उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

देशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवरही हल्ला केला आणि तोडफोड केली आणि जाळून टाकले.

संतप्त तरुणांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून ठार मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथ मारताना दिसत आहे. दरम्यान, निदर्शकांनी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, शेर बहादूर देऊबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांनाही आग लावली.

काठमांडू विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द-नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TIA) येथे आज सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गंभीर परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमानतळ प्राधिकरणाने माफी मागितली आहे.TIA च्या महाव्यवस्थापक हंसा राज पांडे म्हणाल्या की, कोटेश्वरजवळ धुराचे लोट उठल्याने दुपारी १२:४५ वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली.त्यांनी जोर देऊन सांगितले की – विमानतळ बंद नाही. आम्ही तेही बंद करणार नाही. क्रू मेंबर्सना प्रवास करण्यात अडचण येत आहे, ज्यामुळे विमाने उड्डाण करू शकत नाहीत. देशांतर्गत विमान कंपनी बुद्ध एअरनेही सुरक्षेच्या कारणास्तव सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

नेपाळमध्ये मंत्र्यांची घरं पेटवली, 10 मंत्र्यांचा राजीनामा! PM पळून जाऊ शकतात,फेसबुक, यु ट्यूब, व्हाटसअप वर बंदी आणल्याने हिंसाचार

0

Nepal Banned Apps List : बंदी आणण्यात आलेले नेपाळमध्ये 26 लोकप्रिय अॅप्स जसे Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वी Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro इत्यादींवर बंदी लागू करण्यात आली आहे.

पीएम ओली यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितले, “मी सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या कठीण काळात शांतता राखावी, अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो.”

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीविरोधात Gen-Z अर्थात तरुणाईने आक्रमक पवित्रा घेतला आहे. Gen-Z ने थेट संसद, राष्ट्रपती भवनवर आक्रमण केल्यानंतर आज थेट कायदेमंत्र्यांचं घरच पेटवून दिलं. इतकंच नाही तर नेपाळमधील के पी ओली सरकारमधील १० मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सरकारची ध्येयधोरणं आणि सोशल मीडियाबंदीविरोधात तरुणाईची भूमिका यावरुन हे राजीनामासत्र सुरु आहे. तिकडे नेपाळमधील बीरगंज इथं नेपाळ सरकारचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. नेपाळमधील या आक्रमक आंदोलनानंतर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत 25 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण मंत्री , आरोग्य मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, लोकशाहीवर निर्बंध आणले जाऊ शकत नाही असं या मंत्र्यांचे म्हणणं आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी
नेपाळ सरकारने (Nepal Government) एक नवीन विधेयक संसदेमध्ये आणलं आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (Social Media Platforms Regulation) स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी (Registration Rule), आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, त्या देशातील युवकांना, तरुणांच्या गटांना हा नियम म्हणजे सेन्सॉरशिप (Censorship in Nepal) वाटते.

काठमांडूमध्ये आंदोलन चिघळलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये युवकांचे सरकारविरोधी आंदोलन चिघळलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत.

46 वर्षांनंतर रजनीकांतसोबत काम करणार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन आणि रजनीकांत ४६ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दुबईमध्ये झालेल्या नेक्सा सिमा अवॉर्ड्स २०२५ दरम्यान कमल हासन यांनी याची घोषणा केली.

कमल हासन म्हणाले, आम्ही खूप आधी एकत्र आलो होतो, पण वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. कारण ते आम्हाला एक बिस्किट वाटून अर्धा-अर्धा देत असायचे. आम्हाला दोघांनाही एक पूर्ण बिस्किट हवे होते आणि आम्ही ते मिळवले आणि त्याचा आनंद घेतला. आता आम्ही अर्ध्या बिस्किटाने समाधानी आहोत आणि म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.

रजनीकांत यांच्याशी स्पर्धा करण्याबाबत कमल हासन म्हणाले, अशा संधी मिळणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही खूप आधी ठरवले होते की आम्ही असेच राहू आणि एक आदर्श निर्माण करू. तोही असाच होता आणि मीही असाच होतो. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने हे पुनर्मिलन आश्चर्यकारक असले तरी, आम्हाला तेवढे आश्चर्य वाटत नाही. आम्हाला आनंद आहे की, जे खूप पूर्वी व्हायला हवे होते ते आता घडत आहे.

सध्या कमल हासन यांनी या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अलिकडेच ओटीटीप्लेच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कमल हासन आणि रजनीकांत यांच्यात एका नवीन अ‍ॅक्शन चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तमिळ चित्रपटसृष्टीतील हे दोन मोठे स्टार जवळजवळ ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील. लोकेश कनागराज यांचा हा आगामी चित्रपट राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली बनवला जाईल. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. यापूर्वी दोघेही १९७९ मध्ये आलेल्या ‘रा अलाउद्दीनम अलभुथा विलाक्कम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.