मुंबई -पावसाच्या जोरदार तडाख्याचा फटका रेल्वेला मोठ्या प्रमाणात बसला असून वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील ९ गरोदर महिलांसह सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
काल संध्याकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळीसुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे ट्रकवरही पाणी आल्यामुळे अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. पावसामुळे मुंबईत येणारी 17 विमान उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत.
वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये जवळपास 700 प्रवासी अडकले होते, आता त्या सर्वांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले होते. या प्रवाशांध्ये 9 गरोदर महिलांचाही समावेश होता. दरम्यान, एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी प्रशासनाने विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. कल्याणवरुन ही विशेष ट्रेन निघेल.
शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या काळात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात प्रशासनाने सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.






