विविध महोत्सवांमध्ये गाजत असलेल्या ‘हलाल’ चित्रपटाची निवड १६ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी झाली आहे. संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यातील प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या ११ चित्रपटांमध्ये ‘हलाल’ चित्रपटाचा समावेश आहे. या वर्षीचा चित्रपट महोत्सव ६ ते ७ एप्रिलदरम्यान रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार आहे.
‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.
लेखक राजन खान यांच्या ‘हलाल’ या कांदबरीवर आधारित हा सिनेमा मुस्लीम धर्मातील विवाहसंस्थेवर भाष्य करतो. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणीरंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचे सूर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.