पुणे- महापालिकेमार्फत हडपसरमधील रामटेकडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. हा कचराडेपो रामटेकडी येथे होऊ नये या मागणीसाठी आज ससाणेनगर येथील रेल्वे गेटपासून कचरा प्रकल्पापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयाला कुलूप असल्याने , आंदोलनकर्त्यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोर कचरा फेकून निषेध नोंदवला.आणि आमदारांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी ,ढकलाढकली झाली .
पारंपरिक वेशभूषा परिधान करत अनेक विद्यार्थ्यांनीही मार्चात सहभाग घेतला होता. त्यामुळे ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत घेत होते. मार्चेकऱ्यांकडून यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते चेतन तुपे, खासदार शिवाजीराव आढळराव , माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.
यावेळी चेतन तुपे म्हणाले, पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे टाकला जातो. हा कचरा प्रकल्प बंद व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ आजही लढा देत आहेत. त्यानंतरही आता पुन्हा याच भागात रामटेकडी येथे कचराप्रकल्प सरकार उभारणार असल्याने त्याला सर्वपक्षीयांचा विरोध राहणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अशाप्रकारे भूमिका घेऊन सरकार हडपसर येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळतअसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, हडपसर भागातील कचरा प्रकल्पाला आमचा विरोध असून हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आज ज्या प्रकारे सर्वपक्षीय लोक रस्त्यावर उतरले आहेत, हा लढा असाच शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहणार आहे. या भागात कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही.
भाजपचे नेते वगळता हडपसरमधील सर्व पक्षीय नेते आणि नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.