पुणे : ‘पुणे चॅप्टर ऑफ आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन’तर्फे प्रतिष्ठेच्या ग्लोबल ‘स्टुडंट्स आंत्रप्रेन्युअरशिप अवॉर्ड्स’ (जीएसईए) स्पर्धेचे नुकतेच येथे आयोजन करण्यात आले. ‘आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन’ (इओ) ही नवउद्योजकांची ग्लोबल कम्युनिटी असून तिचे चॅप्टर्स जगभर आहेत. त्यातील पुणे चॅप्टर हा गेल्या ३ वर्षांपासून सक्रिय असून त्याचे ५० हून अधिक सदस्य आहेत.
‘ग्लोबल स्टुडंट्स आंत्रप्रेन्युअरशिप अवॉर्ड्स’ (जीएसईए) ही अशा विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा आहे, जे महाविद्यालय अथवा विद्यापीठात शिक्षण घेत असताना स्वतःचा नफा तत्त्वावरील व्यवसाय चालवत आहेत. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी नवउद्योजक जगभरातील त्यांच्या स्पर्धकांशी स्पर्धा करतात व स्थानिक, तसेच विभागीय स्पर्धांच्या मालिकांतून अंतिमतः ‘जीएसईए ॲवॉर्ड्स’ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना पुढील निकष पूर्ण करावे लागतात. अर्ज करताना तो महाविद्यालय अथवा विद्यापीठात विद्यार्थी असला पाहिजे आणि तो ५०० डॉलर्स ते १००० डॉलर्स गुंतवणूक करुन किमान सहा महिने नफ्यासाठी व्यवसाय चालवत असला पाहिजे.
स्पर्धेत पहिले पारितोषिक ‘एफव्हिला.इन’च्या अंकित सिंग याला, दुसरे पारितोषिक ‘रेंटस्टेक.कॉम’च्या संकेत संपारा याला, तर तिसरे पारितोषिक ‘द एंडेव्हर’च्या कुणाल देखणे याला मिळाले. या तिघा विजेत्यांना ‘इओ’च्या पुणे चॅप्टरतर्फे मान्यता व मेंटॉरशिप पुरस्कार मिळाला आहे. हे विजेते चेन्नईमध्ये येत्या ११ व १२ मार्च रोजी होणाऱ्या विभागीय अंतिम स्पर्धेत मुकाबला करतील आणि त्यातील विजेते बँकॉकमध्ये मे २०१६ मध्ये होणाऱ्या ‘जीएसईए फायनल्स’ या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
‘इओ पुणे चॅप्टर’चे अध्यक्ष रोहित मोरे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना या चॅप्टरच्या कामाबाबत माहिती दिली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संघटनेचे सदस्य असलेल्या अतुल गोयल, विशाल चोरडिया, राहुल अरोरा, राहुल राठी, समीर लडकत, मानव घावलेवाल, आशीष चौधरी, चेतन वालावलकर यांचा समावेश होता, तर सदस्य नसलेल्या परीक्षकांत रोहन वैद्य, मनीष हरोदिया व ऋषी कपाल यांचा समावेश होता.