रसिकांनी घेतला सूर संगम मैफिलीचा आनंद
राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध
पुणे :- “कट्यार काळजात घुसली‘ या चित्रपटाच्या निमित्ताने घरोघरी पोचलेले सुरेल गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या नाट्यसंगीत, अभंग , फ्युजन अशा सांगीतिक मिलाफाने भरलेला कार्यक्रम अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना नुकतीच मिळाली. निमित्त होते ‘गोयल गंगा ग्रुप’च्या वतीने आयोजित ”सूर संगम” या कार्यक्रमाचे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नुकताच प्रेक्षकांनी या सुरेल मैफिलीचा आनंद लुटला. दोन तासांहून अधिक वेळ रसिक सांगीतिक आविष्कारात हरवून गेले होते.
‘सूर निरागस हो….’ या गाण्यापासून सुरु झालेली ही मैफिल फ्युजन बरोबरच ‘कट्यार’ सारख्या अव्वल संगीत नाटकातील इतर गाण्यांनी त्यानंतरच्या वेगवेगळ्या बंदिशींनी मग हिंदी गाण्यांच्या मेलडी अशा एका पेक्षा एक कलाकृतीने मैफिल अधिकच रंगली.’घेई छंद मकरंद…’, ‘बगळ्यांची माळ फुले…’ या रचनांनी रसिकांची दिलखुलास दाद मिळवली.
‘कानडा राजा पंढरीचा….’ या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.निखिल फाटक(तबला), अभिजित भदे (ड्रम),राहुल गोळे (हार्मोनिअम), अनय गाडगीळ (किबोर्ड् ) व रितेश ओव्हाळ (गिटार) यांनी महेश काळे आणि राहुल देशपांडे यांना सुयोग्य साथ दिली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.