मुंबई, ३ सप्टेंबर २०२२: गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. नादिर गोदरेज यांना ‘एक्झेम्पलरी इंडस्ट्रियालिस्ट ऑफ द नेशन‘ अर्थात ‘देशाचे आदर्श उद्योगपती‘ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतीय उद्योगक्षेत्रातील लक्षणीय योगदान व देशाचा मान उंचावण्यात त्यांनी बजावलेली अतुलनीय भूमिका यासाठी ‘सशक्त भारत २०२२‘ मध्ये श्री गोदरेज यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.
कर्तव्यनिष्ठ, आदरणीय आणि समृद्ध उद्योगपती म्हणून श्री. नादिर गोदरेज यांच्या कामगिरीची दखल घेऊन अतिथी संपादक मंडळाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारताच्या विकासाची गौरवगाथा आणि त्यामध्ये योगदान देणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी अभ्युदय वात्स्यलमने सुरु केलेला उपक्रम, सशक्त भारत 2022 मध्ये कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभात श्री. गोदरेज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. नादिर गोदरेज यांनी या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले, “हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खरोखरीच सन्माननीय बाब आहे. आम्हाला अभिमान आहे की गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये आमची नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवासुविधांमार्फत आम्ही देशाची सेवा करून देशाच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देत आहोत. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी अतिथी संपादक मंडळाचे आभार मानतो.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स अँड रुरल डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री बिर्ला उपस्थित होत्या. श्री. नादिर गोदरेज यांच्यासह एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष श्री दीपक पारेख हेही या समारंभाचे सन्माननीय अतिथी होते.
यंदाच्या वर्षीच्या अतिथी संपादक मंडळामध्ये शैलेश हरिभक्ती आणि असोसिएट्सचे अध्यक्ष श्री. शैलेश हरिभक्ती, सेबी आणि एलआयसीचे माजी अध्यक्ष श्री. जी. एन. बाजपेई, इंडएशिया फंड अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्री. प्रदीप शाह, एडेलगिव्ह फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती विद्या शाह, एचडीएफसी म्युच्युअल फंडचे एमडी आणि सीईओ श्री. नवनीत मुनोत, एसयूडी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री अभय तिवारी, ओसवाल इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक श्री रवी दोशी, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. शरद माथूर या मान्यवरांचा समावेश होता.