पुणे – शेतक-यांनी आता हे लक्षात घेतले पाहिजे की, फक्त शेती करून आपला विकास
होणार नाही. उद्योजकांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त औद्योगिकीकरणामुळे
ग्रामीण जनतेते जीवनमान उंचावणार नाही. ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी
शेतीला औद्योगिक विकासाची जोड देणे आवश्यक आहे. हेच मॉडेल आता शिरूर तालुक्यात
आकाराला येत असल्यानेच या तालुक्याचे चित्र झपाट्याने बदलत आहे असे राज्याचे
अन्न व नागरी पुरवठी आणि पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज येथे सांगितले.
सणसवाडी येथील रेनडियर इंडिया कंपनीसाठी उत्पादनपूरक सुविधा देणारा प्रकल्प
कंपनीच्या समोरच युजीसी सप्लाय चेन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या कंपनीने सुरू
केला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन आज पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले
त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर ऑईल इंजिनच सहव्यवस्थापकीय
संचालक आऱ. आर.देशपांडे होते. यावेळी व्यासपीठावर शिरूरचे आमदार बाबूराव
पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकूश काकडे, माजी आमदार अशोक पवार,
एसव्हीसी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अनिल बापट, रेनडियर इंडिया कंपनीचे
वरिष्ठ सरव्यवस्थापक देवेंद्र राणे, सणसवाडीच्या सरपंच वर्षा कानडे, पंचायत
समितीचे अध्यक्ष मंगलदास बांदल, जिल्हा बँकेचे संचालक आण्णा गव्हाणे आदी
मान्यवर उपस्थित होते. युजीसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुहास ढोले यांनी
कंपनीच्यावतीने पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकमंत्री
बापट यांनी फित कापून व इतर मान्यवरां सोबत दीप प्रज्वलन करून प्रकल्पाचे
औपचारिक उदघाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे संचालक अमीत ढोले
यांनी केले.
बापट पुढे म्हणाले, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध उपक्रम सुरू
केले आहेत. त्यातील स्कील इंडियामध्ये कुशल तंत्रज्ञ निर्माण कऱण्याचा एक
उपक्रम असून रेनडियरसारख्या कंपन्यांनी ग्रामीण भागात प्रकल्प उभा करताना
तेथील तरूणांची शैक्षणिक पात्रता न विचारता त्यांना कुशल तंत्रज्ञ करण्यासाठी
प्रशिक्षणाची सुविधा तयार करावी. त्यामुळे त्यांनाच कुशल मनुष्यबळ कंपनीच्या
परिसरातच मिळून कंपनीला त्याचा फायदा होईल.
शिरूर पट्ट्याकडे कंपन्यांचा ओढा वाढतो आहे कारण येथे असलेली शांतात असे
सांगून बापट म्हणाले, कोणाही उद्योजकाला त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत
कऱण्यासाठी शांतता हवी असते. पण सध्या संघटित कामगार शक्तीच्या जोरावर अन्याय
करण्याची नवीच प्रथा काही ठिकाणी सुरू झाली आहे. पण हा प्रकार भीमा
कोरेगावपासून ते सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अद्याप दिसत
नाही. त्यामुळे कंपन्यांचा ओढा या भागाकडे जास्त आहे. ही शांतता अशीच टिकवून
ठेवली तर तालुक्याचा कायापालट पुढील काही वर्षातच झालेला बघायला मिळेल. य़ेथील
स्थानिक नेतृत्वाने आणि जनतेने औद्योगिक शांतता भंग होणार नाही याची खबरदारी
घेतली उद्योग आणि शेतीच्या विकासासाठीच्या पायाभूत सुविधा देण्याचे काम सरकार
नक्कीच प्राधान्याने करेल.
किर्लोस्कर ऑईल इंजिनचे सहव्यवस्थापकीय संचालक देशपांडे म्हणाले, युजीसी
कंपनीच्या व्यवसायाची सुरूवात आमच्या कंपनीपासून झाली आहे. त्यानंतर मात्र
सुहास ढोले आणि त्यांच्या टीमने केलेले परिश्रम कौतुकास्पद असून त्याचे दृष्य
परिणाम म्हणजे आजचा हा प्रकल्प आहे. ढोले यांनी किर्लोस्कर कंपनीबरोबर कागल
तालुक्यातही काम केले पण आज पर्यंत त्यांच्या कामाबद्दल एकही तक्रार आलेली
नाही. तसेच अन्य मोठ्या कंपन्यांबरोबर ढोले आणि त्यांची टीम करते तेव्हा
त्यांच्याकडून नक्कीच काही तरी शिकण्यासारखे असते. सणसवाडीच्या या प्रकल्पाचे
काम सुरू असताना जेव्हा त्यांनी मला साइटवर बघायला बोलवले आणि प्रकल्पाचे काम
दाखवले. ही नविन संकल्पना मला फारच आवडली आणि नंतर हीच संकल्पना मी आमच्या
कंपनीतही मांडून त्याचे काम सुरू झाले आहे.
आमदार पाचर्णे म्हणाले, या पट्ट्यात कंपन्या येत असतानाच वाहतूक कोंडीची
समस्या नव्याने तयार झाली आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही आमदार, औद्योगिक
पट्य्यातील सर्व कंपन्यांची असोसिएशन आणि ग्रामपंचायती मिळून दोन प्रमुख रस्ते
काँक्रीटचे करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याच बरोबर चार गावांमध्ये
उड्डाणपूलाचे 600 कोटी रूपयांचे प्रकल्पही राज्य सरकारने मंजूर केले आहेत.
पालकमंत्र्यांनी आता त्याला अंतिम मान्यता मिळवून द्यावी. अंकूश काकडे यांनी
सांगितले की, अगदी प्रतिकूल परिस्थितीतून सुहास ढोले यांनी उद्योग कसा सुरू
केला व कसा वाढवला याचे मी व गिरीष बापट साक्षीदार आहोत. प्रामाणिकपणे, व
जिद्दीने काम करत नाविन्याचा शोध घेत ढोले यांनी आज त्यांच्या उद्योगाची
उलाढाल 250 कोटी रूपयांवर नेली आहे. ते आता या तालुक्यात आलेले असल्याने
आजीमाजी आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनीधींनी त्यांना सहकार्य करावे अशी सूचनाही
त्यांनी केली. माजी आमदार अशोक पवार म्हणाले, आमच्याकडे आजीमाजी कोणी नाही. मी
आणि पाचर्णे गेली काही वर्षे या तालुक्यात काम करत आहोत. आमचे नेहमीच सहकार्य
सर्वांना असते. जर कोणती समस्या आली तर ती सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तयार
आहोत.
यावेळी कंपनीच्यावतीने कमी वेळेत काम केल्याबद्दल आणि या प्रकल्पासाठी नवी
संगणक प्रणाली तयार केल्याबद्दल सुहास इमानदार आणि बलप्रितसिंग यांचा तसेच
प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रमेश भुजबळ यांचा सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्ते कऱण्यात आला. त्याच प्रमाणे पालकमंत्री बापट यांचा
सणसवाडी ग्रामपंचायत, तालुका पंचायत समितीच्यावतीने तसेच भाजपचे नूतन तालुका
अध्यक्ष भगवान शेळके, पंचायत समिती सदस्य गव्हाणे, मिटगुले यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दुरिया शिपचांडलर यांनी तर आभार प्रदर्शन युनायटेड
कॅस्केटचे संचालक विक्रम किराड यांनी केले.