अभिनेता गश्मीर महाजनीने मराठी चित्रपटसृष्टीत 2015 ला रिलीज झालेल्या ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमातून पाऊल ठेवलं. गेल्या दोन वर्षांत त्याचे चार मराठी सिनेमे रिलीज झाले. आणि आता लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘रूबिक्स क्यूब’ आणि समीर विव्दंस दिग्दर्शित आगामी चित्रपट यंदा रिलीज होणार आहेत.
अमोल शेटगे दिग्दर्शित ‘वन वे तिकीट’ चित्रपटासाठी गश्मीर महाजनीने इटली, स्पेन आणि फ्रान्स ह्या तीन देशांमध्ये चित्रीकरण केले आहे. तर ‘रूबिक्स क्यूब’ स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड येथे चित्रित केला आहे.
सूत्रांच्या अनुसार, दोन्ही चित्रपटांसाठी गश्मीर महाजनी प्रत्येक देशात किमान आठ दिवस राहून आलाय. करीयरला आत्ताच सुरूवात झाली असताना, दोन वर्षांमध्ये पाच देशांमध्ये जाऊन शुटिंग केलेला तो एकमेव मराठी स्टार आहे. त्य़ाच्या सूमारास, आपल्या करीयरची सुरूवात केलेल्या एकही अभिनेत्याच्या नावावर अशा प्रकारची कामगिरी नाही. ही नक्कीच महत्वाची गोष्ट आहे.
गश्मीर ह्याविषयी सांगतो, “मी शुटिंग केलेल्या परदेशांमध्ये स्लोवेनियाचे पिरॅन आणि इटलीचे बार्ड शहर माझे सर्वात आवडते आहे. पिरॅन समुद्राकाठी वसलेले आहे. आणि मी समुद्राला लागूनच असलेलेल्या हॉटेलमध्ये राहायचो. दररोज शुटिंग पॅकअप झाल्यावर मी समुद्रावर फिरायला जायचो. समुद्राकाठच्या बीचवर बसून भव्य क्षितीजाकडे पाहत राहणे, मला खूप आवडायचे. तर इटलीतले बार्ड शहराला सुंदर वारसा लाभला आहे. बार्डच्या गल्यांमधून फिरताना गॉडफादर चित्रपटातल्या सिसिलीयन शहराची मला आठवण व्हायची.”