पुणे- आज सकाळी १० वाजता भर पावसात महात्मा फुले मंडई तून पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाल्या नंतर मानाचा पहिला गणपती .. कसबा गणपतीचे दुपारी अडीच वाजता विसर्जन झाले . आणि मिरवणूक पूर्वीप्रमाणेच पूर्वीच्याच गतीने सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे .
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या क्रमाने मानाच्या पहिल्या पाच गणपतींची मिरवणूक होत असते. त्यानंतर इतर गणपतींची मिरवणूक निघत असते. दरम्यान यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतही दुपारी साडे अकरापर्यंत मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते

कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या रथातून निघाली. उत्सव मंडपातून सकाळी साडेआठ वाजता मुख्य मिरवणुकीसाठी पालखीने प्रस्थान ठेवले. अब्दागिरी, मानचिन्हांसहित श्रींच्या मिरवणुकीत प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन, देवळकर बंधूंचे नगारावादन, रोटरी क्लब ऑफ पुणे (सिंहगड रस्ता) यांचे परदेशी विद्यार्थ्यांचे पथक, इतिहासप्रेमी मंडळाचे पथक, महिलांची दिंडी, कामायनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पथक, प्रभात बॅंड, कलावंत, रमणबाग, शिववर्धन आदी ढोलताशा पथके सहभागी झाली होती.



