अमरावती-कृषी आणि अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणातर्फे (APEDA) आयोजित कार्यक्रमात आज नितीन गडकरींनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गडकरी यांचं असंच एक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. यावेळी गडकरी म्हणाले, ‘तुम्हाला देवाचा आशीर्वाद असला तरी लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरगं कसं होणार. तुम्हालाही काही पुढाकार घ्यावाच लागेल.’ गडकरींच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. मात्र, ‘अशी उदाहरणं चांगली समजतात म्हणून बोललो. वेगळा अर्थ घेऊ नका. फक्त प्रयत्नवादी व्हा’, असे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरी म्हणाले, शेतीला आता आपल्याला पुन्हा पहिला दर्जा मिळवून द्यायचा आहे. प्रथम क्रमांकावर शेती, दुसऱ्या क्रमांकावर उद्योव व नंतर नोकरी असा प्राधान्यक्रम हवा. अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आणखी नर्सरी वाढवण्याची गरज आहे. भविष्यात या विभागातून 5 हजार कोटी रुपयांचा संत्रा निर्यात करायचा आहे. मात्र, पुर्णपणे सरकारवर विसंबून राहू नका. चांगल्या गुणवत्तेच्या संत्र्याचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
पेट्रोल-डिझेलला हद्दपार करू
शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन भाड्याने मिळेल, अशी व्यवस्था तयार करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, सध्या ड्रोनची किंमत 7-8 लाखांपर्यंत आहे. आम्ही 4 ते 5 लाखांत ते मिळवून देऊ. मात्र, तरुणांनी ड्रोनचे प्रशिक्षण घ्यायला हवे. तसेच, आपल्याला 5 वर्षांत पेट्रोल-डिझेल हद्दपार करायचे आहे. त्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले.

