सिनेमाची कथा रंजक करण्यासाठी आणि सिनेमा उत्तम चालण्यासाठी त्यातील गाणी महत्वाची भूमिका बजावतात. खास करून हे गाणे जर रॉमेंटीक जॉनरचे असेल, तर ते गाजलेच म्हणून समजा! येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फुगे’ या सिनेमातले ‘काही कळे तुला…’ हे गाणे देखील याच धाटणीचे आहे.
स्वप्नील जोशी- प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे-नीता शेट्टीवर आधारित असलेले हे गाणे रसिकांना एका स्वप्नवत दुनियेची सफर घडवून आणते. रॉमेंटीक या नावाला साजेल असा स्पेशल टच देखील या गाण्याला लाभला आहे. विशेष तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे गाणे तितकेच दर्जेदारदेखील झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सोशल साईटवर लॉंन्च करण्यात आलेले हे गाणे अधिक सुंदर दिसावे यासाठी, त्यावर 20 लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीच्या सर्वात महागड्या गाण्यांच्या यादीत, ‘फुगे’ सिनेमाच्या या गाण्यांचा समावेश होतो.
तरुणमनाचे भाव आपल्या लेखणीतून मांडणारा संवेदनशील कवी मंदार चोळकरने या गाण्याचे सुरेल बोल लिहिले आहेत. तसेच संगीतकार निलेश मोहरीर यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याला स्वप्नील बांदोडकर आणि जाहन्वी प्रभू अरोरा या गायकांचा आवाज लाभला असल्यामुळे, या गाण्यातील भाव थेट रसिकांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरत आहे.
विशेष म्हणजे, या गाण्याद्वारे सुबोधचा रोमॅंटीक अंदाज पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे, तसेच स्वप्नील- प्रार्थनाची लव्ह कॅमिस्ट्रीदेखील रसिकांसाठी मोठी मेजवाणी ठरत असल्यामुळे अल्पावधीतच या गाण्याला सोशलसाईटवर मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनाची एक मोठी व्याप्ती गाठेल, अशी आशा आहे.