विनोद् खन्ना आणि फिरोज खान यांची मैत्री सर्वपरिचित अशी होती …
फिरोज खान यांचे निधन देखील २७ एप्रिलला झाले होते. आज फिरोज खान यांचा स्मृतिदीन असून त्यांनी २७ एप्रिल २००९ रोजी जगाचा निरोप घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या विनोद खन्ना यांची प्राणज्योतही आज, २७ एप्रिललाच मालवली. इतकेच नाही तर, या दोघांच्याही मृत्यूचे कारणसुद्धा एकच आहे. विनोद आणि फिरोज या दोघांचेही निधन कर्करोगामुळेच झाले.
बॉलिवूडमध्ये ‘लेडी किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोज यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ (१९८०) या चित्रपटाने विनोद खन्ना ला प्रसिद्धी च्या शिखरावर पोहोचविले होते . या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली.विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी ‘कुर्बानी’च्या आधी १९७६ मध्ये आलेल्या ‘शंकर शंभू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ‘दयावान’ या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही या दोन्ही मित्रांनी एकत्र काम केले. या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की योगायोगाने त्यांच्या निधनाची तारीखसुद्धा एकच ठरल्याचा योग जुळून आला.