मुंबई-टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूवर राजकीय व उद्योग क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सायरस यांचे वडील व विख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री (93) यांचे गत 28 जून रोजीच निधन झाले होते. आता सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्री पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्रींसह 2 बहिणी लैला मिस्त्री व अलू मिस्त्री राहिल्या आहेत.

रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. पण अवघ्या 4 वर्षांतच 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 12 जानवारी 2017 रोजी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
या वादानंतर टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सायरस यांच्या कामाची पद्धत टाटा समूहाच्या कामाच्या पद्धतीशी सुसंगत नाही. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याचे टाटा सन्सने म्हटले होते. सायरस 150 हून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते.