एमआयटी डब्ल्यूपीयूत “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ०६ जून : “भारतात नवीन शिक्षणपध्दती विकसित होत असताना फिनलंड सारख्या शिक्षणक्षेत्रात उत्तुंग असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणाचे तंत्र अवलंबून त्याचा भारतासाठी उपयोग केल्यास भारतीय शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल होईल.” असे उद्गार माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटी, पुणे व कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई फिनलंड) तर्फे शिरीन कुलकर्णी व हेरंब कुलकर्णी लिखित “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. सीसीई फिनलंडचे शिक्षणतज्ञ श्रीमती नेल्ली लुहिवूरी, शिक्षणतज्ञ श्री. ख्रिस्तोफ फेनेव्हेसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. >
यावेळी सीसीई फिनलंडचे संस्थापक व लेखक हेरंब कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. रत्नदीप जोशी व श्रीमती धनिक सावरकर हे उपस्थित होते.
श्री.धर्माधिकारी म्हणाले, “शिक्षणगंगा फिनलंडमधून आपल्या दारी हे पुस्तक संस्कृतीचे लेणं आहे. यापुस्तकामध्ये फिनलंड या देशामध्ये तेथील सरकारने शिक्षण आणि आरोग्य हे या दोन्हींवर भर देऊन ना
सृजनशील शिक्षण देऊन विद्यार्थी घडविले जात आहेत. या देशाने ३० वर्षात शिक्षणक्षेत्रात भरारी घेतलेली आहे. या शिक्षणपध्दतीचा भारताला फायदा होणार आहे. फिनलंडमध्ये शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे आहे. नवनवीन प्रयोगकरून भावी पिढी घडवित आहे. लहानपणी आई हिच खरी शिक्षिका आहे. त्यानंतर वडिल आणि त्यानंतर शिक्षक हाच गुरू आहे. शिक्षक हा शिकविण्याच्या नवीन पध्दतीचा अवलंब करून दर्जेदार विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणपध्दतीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. यातून सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी घडला जाईल. शरीर आणि बुध्दीचा विचार आजच्या शिक्षणातून केला जात आहे. परंतू आत्मा आणि मनाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे शिक्षकाला समाजामध्ये मानाचे स्थान आहे.”
श्री.हेरंब कुलकर्णी म्हणाले, “फिनलंडमध्ये ज्ञानाचा विकास करून विद्यार्थ्यांना हसत -खेळत शिक्षण दिले जाते. त्याठिकाणी क्लासरूम नाहीत परंतू ते निसर्गाच्या सानिध्यात राहून मुलांना सृजनशील शिक्षण दिले जात आहे. तोच प्रयोग भारतातील छत्तीसगढ राज्यातील वनवासी भागामधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून अंकगणिताचे शिक्षण दिले आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी निर्माण केले आहेत. माझे यापुढचे पुस्तक हे भारतातील शिक्षणाची गंगा जगाकडे हे असणार आहे.”
डॉ. रत्नदीप जोशी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन अमेय खरे यांनी केले.
धनिका सावरकर यांनी आभार मानले.
