स्पर्धेचा सविस्तर निकाल:मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): पुरुष गट:
एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुटाचा मान
पाचगणी-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने एकेरी गटात तेलंगणाच्या संस्कृती ढमेरा तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीत तेजस्वी काटे व श्रुष्टि दास यांचा पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात एकेरीत विजेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत सालसा आहेरने तेलंगणाच्या दुस-या मानांकीत संस्कृती ढमेराचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकावले. 1 तास 10मिनिटे चाललेल्या लढतीत सालसाने सुरेख सुरुवात करत संस्कृतीची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये सालसाने निर्विवाद वर्चस्व राखत पुन्हा संस्कृतीची तिसऱ्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील पिछाडीवर असलेल्या संस्कृतीला शेवटपर्यँत सूर गवसला नाही. या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सालसाने संस्कृतीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सालसा हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानी बॅनर्जीच्या साथीत महाराष्ट्रच्या तेजस्वी काटे व श्रुष्टि दास यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
पुरूष गटात एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकीत सूरज प्रबोधने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात पश्चिम बंगालच्या इशाक इकबाल व तमिळनाडूच्या मोहित मयूर या अव्वल मानांकीत जोडीने गुजरातच्या आघरा मौलिन व धर्मिल शहा यांचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक जावेद सुनेसरा, स्पर्धा सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सूरज प्रबोध(कर्नाटक)(1)वि.वि. कैवल्य कलमसे(महाराष्ट्र)(7)6-3, 6-2
महिला गट:
सालसा आहेर(महाराष्ट्र)(4)वि.वि.संस्कृती ढमेरा(तेलंगणा)(2) 6-1, 6-1
दुहेरी गट: अंतिम फेरी:पुरुष गट:
इशाक इकबाल(पश्चिम बंगाल)/मोहित मयूर(तमिळनाडू)(1) वि.वि.आघरा मौलिन(गुजरात)/धर्मिल शहा(गुजरात) 6-1, 6-0
महिला गट:
युब्रानी बॅनर्जी(पश्चिम बंगाल)/सालसा आहेर(महाराष्ट्र)(1) वि.वि. तेजस्वी काटे(महाराष्ट्र)/श्रुष्टि दास(महाराष्ट्र) 6-2, 6-3