– महापौर चषक कबड्डी स्पर्धेला कोथरुडमध्ये सुरुवात
पुणे (प्रतिनिधी) :
‘व्यावसायिक कबड्डीला मी सुरुवात केल्यानंतर दहा वर्षांनंतर राष्ट्रीय कबड्डी लीगमध्ये महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळाले. त्या संघाचा मी भाग होतो. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक असे महान व्यक्तीमत्त्व होऊन गेले आणि त्याच पुण्याच्या मातीत मी पण घडलो यांचा मला अभिमान आहे, असे उदगार कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई यांनी काढले.
‘पुणे महानगरपालिका आयोजित महापौर चषक अंतर्गत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय पुरुष/महिला (खुले गट) मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोथरुड येथील जीत मैदानात आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रो कबड्डी खेळाडू, भारतीय संघाचे माजी खेळाडू निलेश साळुंखे, स्पर्धेचे संयोजक महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार, मनसे पक्षनेते वसंत मोरे, पुणे मनपा क्रीडा आयुक्त संतोष भोर, सहआयुक्त संदीप कदम, सहआयुक्त क्रीडा पुणे किशोरी शिंदे, लाइफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर महाराष्ट्र राज्य डॉ. प्रदीप तोडमल, नगरसेवक बाबुराव चांदेरे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, कोथरूड प्रभाग समिती स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, बाळासाहेब टेमकर, छत्रपती पुरस्कार विजेत्या रंजना भोसले उपस्थित होते. यावेळी महापौरांनी संयोजक म्हणून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आभार प्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन वैभव मुरकुटे व किशोर गावडे यांनी केले.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘महापौर चषकामध्ये २७ क्रीडा प्रकाराचे सामने पुण्यात वेगवेगळ्या भागात सुरू झाले आहेत. ऑलिंपिक संघटनेची मान्यता असलेले अनेक खेळांचा यामध्ये समावेश आहे. देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात खेळासाठी स्पर्धा घेणारी पुणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महापालिका आहे. पुण्याचा सांस्कृतिक वारसा, विद्येचे माहेरघर अशी ओळख आहेच, त्यात पुण्याने देशाला अनेक राष्ट्रीय आणिआंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला दिले आहेत, हीच परंपरा जतन करण्यासाठी महापालिकेतर्फे या खेळाचे नियोजन केले जाते. पुणे चषक स्पर्धेत एकूण २७ क्रीडा प्रकारात ११ हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. भव्य अशा कबड्डी स्पर्धेत राज्यातून एकूण ६० संघाचा, तसेच १००० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.’