पुणे : “जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानात रोज नवे बदल होताहेत. त्यामुळे आपण सुरु केलेल्या स्टार्टअपला यशस्वी बनविण्यासाठी आपण ‘अपडेट’ राहून नव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. त्याचबरोबर आपल्या स्टार्टअपला अधिकाधिक ग्राहकाभिमुख बनवण्याला प्राधान्य द्यावे,” असे मत मल्टिप्लाय व्हेंचर्सचे संस्थापक आणि पेटीएम व अलिबाबाचे माजी संचालक भूषण पाटील यांनी व्यक्त केले.
कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे आणि भाऊज आंत्रप्रेन्योर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‘पुणे स्टार्ट अप फेस्ट’चे उदघाटन भूषण पाटील व भारत फोर्जचे अमित कल्याणी यांच्या हस्ते झाले. ‘सीओईपी’मध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रशांत खटावकर, ‘सीओईपी’चे उपसंचालक प्रा. मुकुल सुतावणे आदी उपस्थित होते.
यावर्षी १४० स्टार्टअप्स आणि १०० हुन अधिक गुंतवणूकदारांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. नवउद्योजक, गुंतवणूकदार, नवीन कल्पना आणि सामान्याना एकमेकांशी जोडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. यामध्ये तांत्रिक, सामाजिक, विद्यार्थी, शेती,आरोग्य, जीवनशैली आणि नाविन्यता असे एकूण सात विभाग आहेत. हे प्रदर्शन उद्या (रविवार) सकाळी १० ते ५.३० या वेळेत सर्वासाठी विनामूल्य खुले असणार आहे.
भूषण पाटील म्हणाले, “कालची भव्यता आज सूक्ष्म होत आहे. भारतीय वापरकर्त्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्याला स्वसक्षम करणे मोठी संधी आहे. स्टार्टअप सुरु करताना खर्चाच्या बाबतीत काटेकोर असणे गरजेचे आहे. ग्राहक अधिकाधिक स्वावलंबी होत असल्याने त्यानुसार आपल्या सेवेत बदल करणे क्रमप्राप्त आहे. जाहिरातीवर खर्च न करता लोकप्रिय स्टार्टअप कसा उभारावा याचे उत्तम उदाहरण व्हाट्सअप आहे.”
अमित कल्याणी म्हणाले, “सीओईपीने नेहमीच उच्च दर्जाचे अभियंते घडवले आहेत. कठोर मेहनत, जिद्द आणि कल्पना शक्तीच्या जोरावर कोणीही स्टार्टअप सुरु करू शकतो. आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी स्टार्टअप्सचा उपयोग होऊ शकतो. वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठी संधी आहे. त्याशिवाय पाणी, रहदारी आणि शहरीकरण यासारख्या समस्यांवर उत्तरे शोधणाऱ्या स्टार्टअप्सना मागणी असणार आहे.”
प्रशांत खटावकर, प्रा. मुकुल सुतावणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. माधुरी कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. स्वराली व जिनीत यांनी सूत्रसंचालन केले. जागृती जेठवानीने आभार मानले.