पर्यावरण संवर्धनासाठी पुणेकरांची सायकलस्वारी
बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीदिनी ‘लोकबिरादरी’तर्फे ‘पुणे सायक्लोथॉन ३.०’चे आयोजन
पुणे : ‘सायकल चालवा… आरोग्य टिकवा… सायकल चालवा… आयुष्य वाढवा… सायकल चालवा… पर्यावरण वाचवा… क्लीन पुणे… ग्रीन पुणे… सायकलींचे पुणे… अशा घोषणा देत प्रदूषण मुक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी लहानापासून मोठ्यांपर्यंतच्या पुणेकरांची सायकलस्वारी शहरातील रस्त्यांवरून निघाली. त्यामुळे शहरातील टिळक, फर्ग्युसन, भांडारकर, गणेशखिंड, सेनापती बापट, कर्वे रस्ता यासह इतर प्रमुख रस्ते सायकलमय झाले होते.
निमित्त होते, थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आठवणींचं पुणं…सायकलींचं पुणं’ संकल्पनेवर आधारित ‘पुणे सायक्लोथॉन ३.०’चे! रविवारी सकाळी झालेल्या या पुणे सायक्लोथॉनला एलआयसीचे प्रबंधक यु. सी. मलिक, एस. पी. लहाने यांनी ध्वज दाखवत प्रारंभ केला. यावेळी लोकबिरादरी मित्र मंडळचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी, ऐश्वर्या चपळगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ही सायकल रॅली २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन अंतराच्या मार्गावर धावली. पहिला मार्ग (२१ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ रस्ता, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा, तर दुसरा मार्ग (१० किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता पुणे विद्यापीठ रस्ता, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा होता. तिसरा ५ किलोमीटरचा मार्ग स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, स. प. महाविद्यालय असा होता.
सहा वर्षाच्या मुलापासून तर ७१ वर्षाच्या आजोबांपर्यंत जवळपास ३०० सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये प्रोफेशनल सायकलिंग ग्रुप्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी अशा सर्वच वर्गातील लोक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक, सर्वात छोटा सायकलस्वार, मोठा गट असे सन्मानही यावेळी झाले. सहा वर्षाचा अर्णव, २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करणारा आठ वर्षाचा करण, उत्साहाने सायकल चालवणारे उज्ज्वला (६७ वर्षे) आणि हनुमंत देशपांडे (७१ वर्षे) यांना सन्मानित करण्यात आले. सायकलींचे पुणे अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे शिल्पा तांबे यांनी सांगितले. १०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या रॅलीचे संयोजन केले.