दिव्यांगांच्या सदाबहार कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
एपिक फौंडेशन आणि लिओ क्लब ऑफ नेचर लवर्स उपक्रम
पुणे : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शारीरिक अपंगत्वावर मात करत निरनिराळ्या क्षेत्रात यश मिळविलेल्या दिव्यांगांचा नेत्रदीपक गौरव सोहळा पाहून उपस्थिक श्रोते भारावून गेले…त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी ऐकून अंगावर शहारे आले, तर त्यांनी सादर केलेल्या सदाबहार कलाविष्काराने रसिक भारावून गेले. दिव्यांग कलाकारांनी केलेल्या हिंदी- मराठी गाण्यावरील नृत्य सादरीकरणावर प्रेक्षकांनीही ताल धरला.
एपिक फौंडेशन आणि लिओ क्लब ऑफ नेचर लवर्स या संस्थांतर्फे बालगंधर्व रंगमंदीर येथे ‘एपिक शो’चे आयोजन केले होते. नवजीवन औरंगाबाद, सी.आर.रंगनाथन, पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट, रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अनंतपुरम, बाल कल्याण संस्था अशा विविध संस्थामधील दिव्यांग कलाकारांनी जोगवा, पोवाडा, कुचिपुडी यासह चित्रपटातील गाण्यांवर ताल धरला. कार्यक्रमात अपंगत्वावर मात करून यशाची शिखरे गाठणार्या काही दिव्यांग व्यक्तींचा ‘एपिक अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.
या वर्षी ‘एपिक पुरस्कार’ महाबळेश्वर येथील दृष्टिहीन उद्योजक भावेश भाटिया (सनराईज कँडल्स), सेरेब्रल पाल्सीग्रस्त साहित्यिक, स्टॅन्डअप कॉमेडियन ओंकार वैद्य, अपंग गिर्यारोहक व धावपटू शेखर गौड, मुंबई येथील जन्मजात दृष्टिहीन फोटोग्राफर भावेश पटेल, व्हीलचेअरवरील पहिली महिला नृत्यांगना कृपा लोढीया आणि अपंग गायक, लेखक वक्ते डॉ. साई कौस्तुभ दासगुप्ता यांना प्रदान करण्यात आला. यावेळी एपिक फाउंडेशनचे केदार गोडसे, शुभम देशपांडे, निखिल ततार, हर्ष कुलकर्णी, रेश्मा राठी, ऐश्वर्या लोणकर, यशराज झंवर, रोहन सोनेजा आदी उपस्थित होते.
भावेश भाटिया म्हणाले, “राष्ट्रपतींच्या हस्ते तीन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार घेतला. परंतु आजचा हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार असल्याचा आनंद होत आहे. पत्नीची आयुष्यात खूप मोठी साथ मिळाली असून, तिच्या नजरेतूनच हे जग पाहत आहे. पुणे येथील टिळक स्मारक येथे मेणबत्तीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तेव्हा पुणेकरांनी भरभरून साथ दिली होती. आम्ही बनवलेल्या मेणबत्यानी सर्व जग प्रकाशित होत आहे, याचा आनंद आहे. काम कुठलेही लहान मोठे नाही. तुम्ही पूर्ण तन, मन, धनाने करा यश नक्कीच मिळेल. आगामी काळात ५० हजार अंध व्यक्तींना रोजगार देणार आहे.”
डॉ. साई कौस्तुव दासगुप्ता म्हणाले, “आयुष्यात आनंदी राहिल्यामुळे आपल्यात सकारात्मकता कायम राहते. त्यामुळे नवीन काही करण्याची जिद्द निर्माण होते. आयुष्य ब्लॅक अँड व्हाइट झाल्यामुळे ग्राफिक डिजाईनच्या माध्यमातून त्यात रंग भरत आहे. आज आंतरराष्ट्रीय ग्राफिक डिजाईनर बनलो आहे. प्रोत्साहन हे एक औषध म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज यशाच्या शिखरावर आहे.”
भावेश पटेल म्हणाले, ”कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहेत. स्पर्श, आवाज यांच्या मदतीने फोनच्या माध्यमातून छायाचित्रे काढत आलो. २००९ साली प्रथम छायाचित्रे काढण्यास सुरवात केली. अंधत्वावर मात करून पुढे चालत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने छायाचित्रण करतो. अभिनेत्री कॅटरिना कैफचा फोटो शूट करण्याची संधी मिळाली.”
शेखर गौड म्हणाले, ”कोणतेही अपंगत्व शरीराला होते; मनाला नसते. गिरीयारोहन करणे माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट आहे. माझ्यामध्ये असलेली इच्छाशक्ती मला गिर्यारोहण आणि सायकलिंग करण्याची प्रेरणा देते.” ओंकार वैद्य म्हणाले, ”माझा न्यूनगंड दूर करण्यासाठी माझे आई वडील व शिक्षकांची मदत झाली. दिव्यांग व्यक्तींनी समाजात सक्रिय राहणे गरजेचे आहे. तरच समाजातील लोकांचा दृष्टीकोन बदलेले. कामाच्या माध्यमातून समाजातील सकारात्मकता लोकांपुढे मांडत आहे.” कृपा लोढीया म्हणाल्या, ” व्हीलचेअरचा सर्वजण सहारा घेतात परन्तु मी त्याचा सहारा न घेता नृत्य केले. कोणी तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकत नाही आपण आपल्यालाच प्रोत्साहन द्यायला हवे. तरच माझ्यातील कमीला मी सकारात्मकतेने घेत यशस्वी डान्सर बनले.” अनघा मोडक व सानिका मुतालिक यांनी सूत्रसंचालन केले. हर्ष कुलकर्णी यांनी आभार मानले.