प्लास्टिक सर्जरी शिबिरातून ७६ जणांच्या चेहऱ्यावर हास्य
पुणे : विकृतींमुळे जीवनात दुखी व हतबल असण्याऱ्या लोकांच्या जीवनात पुन्हा नवी उमेद आणण्याचा संकल्प पुण्याच्या अग्रवाल क्लब आणि प्रसिद्ध प्लास्टिक आणि हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदाल यांनी केला आहे. यासाठी शिरूर मध्ये दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिरूरमधील धारिवाल हॉस्पिटलमधील या शिबिरात ७६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जीवनात पुन्हा हास्य फुलले आहे.
डॉ पंकज जिंदल आणि त्यांच्या चिकित्सक टीमने या शस्त्रक्रिया केल्या. एक हॅन्ड सर्जन, दोन प्लास्टिक सर्जन, पाच ऍनेस्थेटिक्स तज्ज्ञ आणि इतर सहकारी अशी ही टीम होती. जन्मजात विकृती, हात-पायातील व्यंग्य, भाजलेले, जखम झालेले अशा रुग्णांनी तपासणी करून घेत शस्त्रक्रिया केली. डॉ. पंकज जिंदाल यांनी आजवर २० वर्षात ५० पेक्षा जास्त शिबीर घेतले असून, त्यातून हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक सीए उमेश जालान यांच्यासह क्लबचे अध्यक्ष अमिताभ अग्रवाल, सतीश नेवटिया, कुंज टिबड़ेवाल, राजीव अग्रवाल, दीपक गुप्ता, राजेश टेकरीवाल आदींनी मेहनत घेतली.
डॉ. पंकज जिंदल म्हणाले, ग्रामीण भागामध्ये जळणे किंवा जन्मजात असलेल्या विकृतींमुळे लोकांची जीवन दुखी कष्टी बनते त्यांना अचूक माहिती नसल्याने हे दुःख ते आयुष्यभर झेलत असतात. परंतु याबाबत आपण माहिती सर्वांपर्यंत पोहचवू शकतो आणि पुन्हा त्या लोकांचे जीवन सुखमय बनण्यास प्रयत्न करू शकतो. लोकांना मदत करून त्यांचे जीवन सुखमय बनण्यासाठी अग्रवाल क्लब आणि धारिवाल फाऊंडेशन कार्यरत आहेत.”