पुणे, १२ जून २०१७: राजेश वाधवान समुह आणि र्हतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे व रॅडिसन ब्लु, पुणे हिंजेवाडी, आदिदास, वोलर कार्स, मॅक्डोनल्ड आणि पेटीएम यांच्या सहकार्यांने आयोजित धीरज रिअल्टी कॉर्पोरेट सुपर कप २०१७ फुटबॉल स्पर्धेत फिनआयक्यु संघाने कॅपजेमिनी संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
एफसी पुणे सिटीच्या मामुर्डी येथील सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत वैष्णव सिन्हा याने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोराच्या जोरावर फिनआयक्यु संघाने कॅपजेमिनी संघाचा १-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघानी आक्रमक धोरण स्वीकारले. ५व्या मिनिटाला फिनआयक्यु संघाच्या सूरज थापाने सुरेख चाल रचत कॅपजेमिनीच्या गोलकक्षात मुसंडी मारली. पण कॅपजेमिनीच्या बचावफळीने गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. ३२व्या मिनिटाला फिनआयक्यु संघाच्या वैष्णव सिन्हाने चेंडुवर सुरेख ताबा मिळवत सोलो गोल करून संघाचे खाते उघडले. पूर्वार्धात हि आघाडी कायम होती. उत्तरार्धात कॅपजेमिनीच्या आघाडीच्या फळीने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत जोरदार चढायांना प्रारंभ केला. ५२ व्या मिनिटाला रामनाथ विश्वनाथनने दीपक जोशींच्या पासवर मारलेला चेंडू गोलकक्षाच्या जवळून गेला. त्यानंतर फिनआयक्युच्या मध्यरक्षकांनी आपला बचाव अभेद्य ठेवत गोल होऊ न ज्ञानी खबरदारी घेतली. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत फिनआयक्यु संघाने कॅपजेमिनी संघावर १-० असा विजय मिळवला.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत कॅपजेमिनी संघाने टेक महिंद्रा संघाचा टायब्रेकरमध्ये ५-३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फिनआयक्यु संघाने सायबेज संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून सुरज थापाने तीन गोल, तर अमित नवेली व मिलिंद नेर्लेकर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: कॅपजेमिनी: ५(रामनाथ विश्वनाथन, शिवम प्रताप सिंग, अश्विन विजयन, दीपक जोशी, संजय वर्गीसे)टायब्रेकरमध्ये वि.वि.टेक महिंद्रा: ३(प्रवीण कार्की, नेव्हील वर्गीसे, स्मितेश भट)(गोल चुकविले-व्हिक्टर आंग्रे, आकाश पाटील);पूर्ण वेळ: ०-०; टायब्रेकर: ५-३;
फिनआयक्यु: ५(सुरज थापा २,५,४०मि., अमित नवेली ५२मि.,मिलिंद नेर्लेकर ६५मि.)वि.वि.सायबेज: १(चारुदत्त चव्हाण ७७मि.);
अंतिम फेरी: फिनआयक्यु: १(वैष्णव सिन्हा ३२मि.)वि.वि.कॅपजेमिनी: ०.

