पुणे येथे अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” प्रमाणपत्राचे अनावरण
पुणे :- पुणे विद्यापीठात संशोधन करणारा जागतिक विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याच्या नावे आजपर्यंत अनेक वेगवेगळे विक्रम आहेत. आनंदने आपली मैत्रीण अक्षया आरोटे हिच्यासोबत २६ जानेवारी २०१६ रोजी “भारतीय संविधानाचे वाचन करून”अनाथ मुलांच्या उपस्थितीत लग्न केले होते. या आगळ्यावेगळ्या लग्नाची नोंद आता “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये झाली असून देशाचे संविधान वाचून झालेले जगातील एकमेव लग्न ठरले आहे. नुकतेच पुणे येथे अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी आनंदचे गिर्यारोहणातील गुरु सुरेंद्र शेळके, आनंदचे फिटनेस गुरु विनोद पावसे, उद्योजक शेखर चिंचवडे ई. उपस्थीत होते.
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी आनंद बनसोडे याने आपली मैत्रीण अहमदनगर येथील अक्षया आरोटे सोबत संविधानाचे वाचन करून लग्न केले होते. हे लग्न अनाथ मुलांच्या उपस्थितीत “संस्कार फाउंडेशन” येथे पार पाडले होते. या लग्नातून स्वातंत्र, समता, बंधुता ई. भारतीय घटनेतील मुल्यांचा संदेश दिला होता. या लग्नाची सर्वच स्तरातून व देशविदेशातूनही कौतुक झाले होते. “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” ने या लग्नाची दखल घेवून याची विश्वविक्रमासाठी निवड केली. नुकतेच याबाबत प्रमाणपत्र आनंदला मिळाले असून याचे अनावरण अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते पुण्यात झाले. यापूर्वी आनंदने जगातील ४ खंडातील (आशिया , युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया) सर्वोच्च शिखरांवर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केले आहेत. शिवाय या प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना घेवून जाण्याचा विक्रमही आनंदने केला आहे. वेगळ्या पद्धतीने लग्न केल्याची नोंद ही विश्वविक्रमामध्ये झाल्यामुळे आनंद व अक्षया दोघेही विक्रमवीर झाले आहेत.
-आनंद बनसोडे (जागतिक गिर्यारोहक, विश्वविक्रमवीर , लेखक, प्रेरक वक्ता)
“हे आगळेवेगळे लग्न फक्त लग्न नसून त्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेचा व स्वातंत्र, समता, बंधुता ई. चा एक धागा आहे. आपण प्रथम भारतीय आहोत ही कल्पना नात्यांमध्ये रुजवण्यासाठी संविधानाला सर्वस्व मानून आम्ही लग्न केले. त्याची नोंद विश्व विक्रमामध्ये झाल्यामुळे खूप आनंद होत आहे”
-अक्षया बनसोडे (कवियत्री व लेखिका)
“अश्या पद्धतीने माझे लग्न होईल याची कधी कल्पना केली नव्हती. आनंदच्या विचारांवर पूर्णपणे विश्वास ठेवून लग्न केले आणि लगेच त्याची दखल विश्वविक्रमाने घेतली याचा अभिमान वाटत आहे. नटसम्राट नाना पाटेकर सर यांनी केलेले कौतुक खूप आनंद देवून गेले.”





