थकबाकीचा भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
पुणे, दि. ०३ मार्च २०२२: पश्चिम महाराष्ट्रामध्ये थकीत वीजबिलांचा भरणा करीत नसलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून मोठ्या वेगाने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्वच दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा व पथदिवे तसेच इतर वीजग्राहकांकडे २ हजार १७ कोटी ७४ लाख रुपये तसेच कृषिपंप वीजग्राहकांकडे ७ हजार ९६९ कोटी ९४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. अतिशय आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व अकृषी वर्गवारीतील एकूण ९ हजार ९८७ कोटी ६८ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांच्या वसूलीला वेग देण्यात आला आहे. तथापि वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा करीत नाही अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील वेगाने सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून विविध पथकांकडून ही कारवाई सुरु आहे.
या पार्श्वभूमिवर पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील प्रत्येक दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार मार्च महिन्यातील सर्वच शनिवारी, रविवारी तसेच शुक्रवारी (दि. १८) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील इतर दिवसांप्रमाणेच वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.