नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपने यामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपने स्पष्ट आणि मोठे बहुमत मिळवले आहे. पंजाबमधून काँग्रेससाठी केवळ चांगली बातमी मिळाली असून काँग्रेसने तेथे सत्ता खेचून आणली आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाले असून त्यांच्या आकडा ३२१ इतका प्रचंड फुगला आहे. उत्तराखंडमध्येही मोदीलाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. उत्तर प्रदेशात मायावती, अखिलेश यादव यांचे सरकार आजमावून पाहिल्यानंतर तिसरा पर्याय म्हणून यंदा मतदारांनी भाजपकडे पाहिले आहे. प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. १५ वर्षांपासून मणिपूरमध्ये असलेली काँग्रेसची सत्ता उलटवून यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारली असून तेथे स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला त्रिशतकी आघाडी मिळाली आहे. तर पुन्हा सत्तेचा मुकूट आपल्याच शिरपेचात असेल, असा ठाम विश्वास असणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला शतकी मजलही मारता आलेली नाही. केवळ ६० जागांवरच आघाडी मिळाली आहे. तर मायावतींचा हत्ती मजल-दरमजल करत कसाबसा १८ जागांवरच आघाडी मिळवू शकला आहे.
२००७ मध्ये मतदारांनी मायावतींना संधी दिल्यानंतर २०१२च्या निवडणुकीत मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाला मतदारांनी पसंती दिली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाटेवर स्वार होऊन भाजप रिंगणात उतरली. त्यादृष्टीने उत्तर प्रदेश जिंकण्याची तयारीच भाजपने सुरू केली. मतदारांनीही मायावती आणि अखिलेश यादव यांना नाकारल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी तिसरा पर्याय म्हणून भाजपला ‘साथ’ दिली आहे. प्रस्थापितांना धक्का देण्याचे तंत्र मतदारांनी यंदाच्या निवडणुकीतही अवलंबल्याचे दिसते.
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवल आहे. तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसने जोरदार वापसी केली आहे. विशेेष म्हणजे आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी अकाली दलाला पछाडले आहे. काँग्रेसने 77 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध करत पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. आपने अकाली दल+ भाजपला पछाडत 22 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. सत्ताधारी बादल सरकारला जनतेने स्पष्ट नाकारले आहे. अकाली दलाला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत.