पुणे – नोटाबंदीच्या काळात पुणे महापालिका प्रभागां प्रभागातील इच्छुक असलेल्या राजकारण्यांनी मतदारांसाठी विविध सहली ,भेट वस्तू देणारे तसेच करमणुकीचे कार्यक्रम यावर सुमारे १५० कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची आजवर उधळण झाली आहे. एकीकडे बँकेत नोटांची कमतरता असताना व सामान्य नागरिक नोटबंदीने होरपळत असतांना, दुसरीकडे उघड्या डोळ्यांनी दिसणारी ही उधळण पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयकर खात्याला कशी दिसत नाही? यांच्याकडून एवढा खर्च कसा कोठून केला याचा हिशेब घेणार कोण असा सवाल करीत स्वर्ण भारत पार्टीचे अध्यक्ष श्री. संजय सोनवणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व इच्छूक खर्चिल्या उमेदवारांची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. चौकशी केली नाही तर तुमचेही लागेबांधे आहेत असा स्पष्ट संदेश जाईल असेही सोनवणी यांनी म्हटले आहे .
याप्रकरणी सोनवणी यांनी धनकवडी, कात्रज सह शहर आणि उपनगरातील विविध कार्यक्रमांचे पोस्टर्स ,जाहिराती , फ्लेक्स यांचे फोटो पाठविले आहेत . बँकेत नोटा नाहीत, एटीएम मध्ये नोटा नाहीत , असे असताना २५ हजार लोकांना एका .इच्छुकाने वाटरपार्क मध्ये नेले. यासाठी लक्झरी बसेस वापरण्यात आल्या. भाजपच्या एका आमदाराने आपल्याच घरातील 2 इच्छुकांचे फोटो टाकून मतदारांना विविध आमिषे दाखविणारे कार्यक्रम आयोजित केले. शिवसेनेच्या एकाने जल्लोष मेळावा घेवून ३५ लाखाचा चुराडा केला. फ्रीज, वाशिंग मशीन सारखी उपकरणे भेट दिली. १० -१० कलाकार आणून त्यांच्या नृत्यांचे अलिशान कार्यक्रम ठेवले , हजारो लोकांच्या सहभागासाठी लाखोचा खर्च केला गेला आहे. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे… हे गाणे कुठल्या चित्रपटातले आहे… या गाण्यावर नृत्य करून दाखवा… तुमच्या मुलाने आज कुठल्या रंगाचे कपडे घातले आहेत…” असे सोपे-सोपे प्रश्न विचारून आणि व्यासपीठावर येऊन गाणी- नृत्य असे कलागुण सादर करायला लावून महिलांना ‘भाग्यवंत’ ठरवले जात आहे. इतकेच नव्हे, तर अशा भाग्यवंत महिलांना पैठणीपासून एलसीडी, फ्रिज, मिक्सर ते अगदी सोन्याच्या हारापर्यंतची भरघोस बक्षिसे दिली जात आहेत. हे चित्र शहरातील प्रभागा-प्रभागांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे.‘न्यू होम मिनिस्टर’, ‘खेळ मांडियेला’, ‘स्पर्धा तुमच्यातील कलागुणांची’, ‘उत्तर द्या, बक्षीस जिंका’, ‘खेळ रंगला पैठणीचा’… असे गर्दी खेचून घेणारे कार्यक्रम मतदारसंघात आयोजित केले जात आहेत. विविध पक्षांच्या तसेच काही अपक्ष इच्छुकांकडूनही हे कार्यक्रम होताना दिसत आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला मतदार एकत्र आणून त्यांच्यात एकीकडे स्पर्धा घेतली जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्यापर्यंत इच्छुक उमेदवाराचे नाव फोटोही पोचवले जात आहे.उपनगरांतच नव्हे, तर शहराच्या मध्यभागातही असे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या रंगत आहेत आणि महिलांची तेथे तुडुंब गर्दीही होत आहे. स्पर्धेत पहिल्या आलेल्या महिलेला ३२ इंची एलईडी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलेला २७५ लिटरचा फ्रिज, तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिलेला ॲटोमॅटिक वॉशिंग मशिन दिले जात आहे.
इलेक्ट्रिक शेगडी आणि मिक्सर ज्युसर ग्राइंडर हे चौथा, पाचवा क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला बक्षीस म्हणून मिळत आहे. स्पर्धेची पारितोषिके इथेच थांबत नाहीत, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ भाग्यवंत महिलांना प्रत्येकी एक पैठणी दिली जाते. ती सहभागी महिलांमधून ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने दिली जाते. लकी ड्रॉमधूनच एका महिलेला दुचाकी आणि सोन्याचा हारही दिला जात असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे.
हे सारे लोकांना दिसत आहे , ‘सकाळ ‘ने ही त्याकडे लक्ष्य वेधले होते … तरीही जिल्हाधिकारी यावर मुग गिळून का आहेत ? आयकर खाते काय करत आहे ? रांगेत तासंतास उभे राहून नागरिकांना दोन -चार -किंवा जास्तीत जास्त कधीतरी १० हजार रुपयेच मिळत आहेत. मग लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारे लक्षावधींचे हे कार्यक्रम कसे होत आहेत ? कुठून येत आहेत हे पैसे ? कोण करणार चौकशी , कोण घेणार हा हिशेब ?असे प्रश्न स्वर्ण भारत पक्षाचे अध्यक्ष आणि साहित्यिक संजय सोनवणी यांनी विचारले आहेत. सामान्य नागरिक एकीकडे होरपळत असतांना त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी हे उद्योग चालू आहेत. त्यामुळे राजकीय संस्कृती किती रसातळाला जाऊन पोहोचली आहे याचे खिन्न चित्र पहायला मिळते आहे असेही सोनवणी म्हणाले.
नोटबंदीमुळे एका व्यक्तीला किती रोकड मिळु शकेल यावर बंधने असतांनाही एवढा पैसा नव्या चलनात उधळला जातो आहे. या प्रकाराचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असेही सोनवणी म्हणाले.

