पुणे- सुप्रसिद्ध ‘डीएसके’ समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.हा अपघात म्हणजे कोणतीही चूक नसताना रस्ते बांधणीतील चुकांचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे . ज्या रस्त्यासाठी करोडो अब्जावधी रुपयांचा महसूल लोकांकडून वसूल केला जातो त्या रस्त्याच्या सदोष बांधणीचा हल्ला डीएसके यांच्या मोटारीवर झाला आणि त्यांच्या चालकाचा यात बळी गेला .
मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांची प्रकृती सध्या ठीक असून, त्यांच्या बरगड्यांना मार मागला आहे. खुद्द डी.एस.कुलकर्णी यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे,ते म्हणाले,’ कालच्या काळरात्री जो अपघात घडला. त्यात गेल्या 22 वर्षांपासून माझ्या सोबत असणारा माझा सहकारी नीरज याचा बळी गेला. हो बळीच…कारण हा अपघात दैव निर्मित नसून मानव निर्मित आहे. याबद्दल मी काही दिवसांनी बोलेनच. पण तूर्तास…माझी प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा सोशल मीडियात फिरत आहेत. त्या वाचून चौकशी करणारे फोन, मेसेजेस येत आहेत.तर मित्रांनो या अफवेत काहीही तथ्य नसून माझ्या बरगड्यांना थोडा मार लागला आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा यांच्या बळावरच या जीवघेण्या अपघातातून मी सुखरूप बचावलो आणि 7-8 दिवसातच पुन्हा कामास लागेन. पहिलं काम असेल ते आमच्या नीरजला न्याय मिळवून देण्याचं. या रस्त्याने यापूर्वीही अनेक बळी घेतले आहेत. यापुढे हे बंद व्हायलाच हवे…यासाठी मी लढा देईन.तुम्हां सर्वांच्या शुभेच्छा अशाच पाठीशी असू द्या




