पुणे :- दरवर्षी प्रमाणे यंदाही डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नागरिकांना २,००० रोपांचे वाटप करण्यात आले. डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने गेल्या १० वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो. यावेळी डी. एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के आणि फौंडेशनच्या विश्वस्त सुनील महाजन, अॅड प्रमोद आडकर आणि डिएसके डेव्हलपर्सचे मनीष खाडिलकर आदी मान्यवरांच्या हस्ते म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे सर्वांना रोपांचे वाटप करण्यात आले.
मंगेश तेंडूलकर यांना पहिले रोप देऊन रोप वाटपाला सुरवात झाली. निसर्ग जपणं हे दैवी कार्य आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने त्याची सेवा करायला हवी, अशी भावना यावेळी मंगेश तेंडूलकर यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याची जोपासना करावी, झाडांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घालावे, अशा छोट्या गोष्टी ज्या वरवर पाहता फार छोट्या वाटतात पण प्रत्येकाने हळू-हळू या सवयी अंगीकारल्यास खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकतो अशी भावना श्याम भुर्के यांनी व्यक्त केली.
तसेच मोकळी जागा दाखवल्यास तेथे फाउंडेशन तर्फे वृक्षरोपण करण्यात येते. फाउंडेशन तर्फे आतापर्यंत ६५००० झाडे लावण्यात आली आहे, पंडित पाटील यांनी आभार मानले.

