पुणे: मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार पुणे येथील प्रथितयश मानसोपचार तज्ञ व सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाला असून दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवान यांनी सांगितले.
पुणे येथील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मानसोपचार तज्ञ, मनोसामाजिक कार्यकर्ते, सायकॉलॉजीस्ट व इतर मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गतवर्षी मनोदय मेंटल हेल्थ फोरम ची स्थापना केली. मानसिक स्वास्थ्य आरोग्य वर्षभर विविध उपक्रम राबविने तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामधील कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा फोरम चा मुख्य उद्देश असून फोरम च्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा यथोचित गौरव करण्याचा देखील उपक्रम गतवर्षीपासून सुरु करण्यात आला आहे.
कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे प्रा. चेतन दिवान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच फोरम चे मुख्य सल्लागार डॉ. सुप्रकाश चौधरी, प्रा. महेश ठाकूर, डॉ योगेश पोकळे, सचिव राजेश अलोणे, सा संस्थेच्या सचिव निलीमाताई, सुमंत्रा समुपदेशन संस्थेच्या विनया भोसेकर, समुपदेशक शिल्पा तांबे, पल्लवी जोशी, अमृता बोकील, स्नेहल सस्तेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये डॉ मोहन आगाशे यांना गीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा जेष्ठ मानसोपचार तज्ञ उल्हास लुकतुके यांना देण्यात आला असून यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या दि १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उद्घाटन समारोह प्रसंगी डॉ मोहन आगाशे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
डॉ मोहन आगाशे यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असून त्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मानसिक आरोग्य क्षेत्रामधील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोदय मेंटल हेल्थ फोरम, पुणे च्या वतीने करण्यात आले आहे.