पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष’ या ऍड. जयदेव गायकवाड लिखित ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. पद्मगंधा प्रकाशन व लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विजय जाधव, मयूर गायकवाड, अनोश मालेकर, पंडित कांबळे आदी उपस्थित असतील, असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
समाजातील दलित, वंचित, अस्पृश्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. समर्पित भावनेने देशहितासाठी, प्रत्येक भारतीयाला समान अधिकार मिळण्यासाठी व समाजातील जातीनिर्मूलनासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या याच वैचारिक संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम ऍड. जयदेव गायकवाड यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे.