पुणे – भारतीय महिलेस पतिव्रता आणि चारित्र्य संपन्नता सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्यांमधून जावे लागले आहे. त्यामुळे भारतीय महिला तावून व सुलाखून निघालेली आहे. या कसोट्यांमधून महाभारतातून द्रौपदी आणि रामायणातील सीताही सुटलेल्या नाहीत. त्या दोघींबद्दल निर्माण झालेल्या विविध गोष्टी तर भयानक प्रकारच्या असून खरी द्रौपदी व खरी सीता जाग्यावरच राहिल्या आहेत, असे ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी म्हटले आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित केलेल्या लाभसेटवार फाउंडेशन व्याख्यानमालेत डॉ. ढेरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, पाच पांडवांची पत्नी असूनही पतिव्रता राहणारी द्रौपदी भारतीय महिलांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थानावर आहे. आपल्याकडे पतिव्रता आणि चारित्र्य यासंर्भात विविध कसोट्या निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे भारतीय महिला अनेक बंधनांच्याखाली दबलेली आहे. मात्र यामुळे ती तावून सुलाखून तयार झालेली आहे.