पुणे :शहरामध्ये मेट्रो रेल्वे आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे आणि मेट्रोचा पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण का नाही ? असा काँग्रेसचा सवाल असून भाजपने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
शहरातील विविध योजनांचा गाजावाजा भाजपने सुरु केलेला आहे. पण, या योजनांचा पाया काँग्रेसने घातला हे पुणेकर जाणून आहेत. येत्या रविवारी मेट्रोचे उदघाटन होत आहे. हा मेट्रो प्रकल्पही काँग्रेसनेच आणला. २००१साली स्थायी समितीत मेट्रोची मंजुरी झाली तेव्हा काँग्रेसच्या संगीता देवकर स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. खासदार सुरेश कलमाडी यांच्या सूचनेवरून हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २००८ साली दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रोसाठी प्रारुप आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले. जून २०१२मध्ये राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्याच महिन्यात काँग्रेस आघाडी सरकारने प्रकल्प आराखडा केंद्र सरकारला सादर केला. २०१३साली तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ, कृषीमंत्री शरद पवार यांच्यासमवेत खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रदीर्घ बैठक घेतली आणि केंद्राकडे पुणे मेट्रो मंजुरीची मागणी केली.
केंद्र सरकारच्या २०१३च्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी ९कोटी९९लाख रुपयांची तरतूद प्रथमच करण्यात आली. ७ डिसेंबर २०१६ रोजी मेट्रो प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली. हा घटनाक्रम पाहाता काँग्रेस पक्षाने सन २०००पासून पुण्याला मेट्रो मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले हे दिसून येईल. शिवाय, केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्यांच्या परवानग्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून मिळविल्या. पण भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधामुळे मेट्रोला उशिर झाला आणि २०१४ ऐवजी २०१६मध्ये केंद्राची मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मग, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का देण्यात आलेले नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे. आमदार म्हणून मी सुद्धा विधीमंडळात पुण्याच्या मेट्रोच्या मागणीचा मुद्दा वारंवार मांडलेला आहे. असेही जोशी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमांना भाजपने पक्षीय स्वरुप देऊन निवडणुकीचा प्रचार चालविला आहे ते निषेधार्ह आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रो उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न देऊन भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. भाजपने काही नेत्यांना हायजॅक केलेच आता कामाचे श्रेयही हायजॅक करू पहात आहेत,अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

